शंभर


" या !  शंभर वर्षे आयुष्य आहे तुम्हाला- अगदी नाव काढल्याबरोबर हजर झालात ! " 
- अशा  प्रकारचे स्वागत रोज  कुणाच्यातरी घरी कुणाचे तरी होत असतेच !
यात स्वागताचे काही नवल नाही, परंतु 'शंभर' या शब्दाचे आहे ! दुसऱ्यांना  'शंभर'च वर्ष आयुष्य का दान करतात,  नव्व्याण्णव किंवा एकशेएक किंवा इतर कोणत्या अंकाचे आयुष्य का  दिले जात नाही ?


" शंभर " हा आकडा खराच कुतूहलजनक आहे .
 

अर्थात पुरातनकालापासूनच याची प्रसिद्धी असणार ! रोजच्या जीवनात सर्वात जास्त उपयोग केला जाणारा, हाच एकमेव अंक असावा. ऋषीमुनी किंवा तत्सम वडीलधारी मंडळी लहान मंडळीना आधी 'आयुष्यमान भव !' हा आशीर्वाद देत असावीत. कालांतराने 'शंभरा'चे महत्व पटल्याने तो आशीर्वाद ' शतायुषी  भव!' असा बनला. महाभारतातील गांधारीला कदाचित, केव्हातरी 'शतपुत्रा सौ. भव' असाच आशीर्वाद  मिळाल्याने, शंभर कौरव तदनंतर जन्मास आले. त्याअर्थी  'शंभर' या आकड्यात, शंभर टक्के काहीतरी गूढ चमत्कार असावा !

पुराणकाल लोटून 'शेकडो' वर्षे लोटली, पण आजच्या आपल्या सरकारनेही बरोबर 'शंभर' पैशांचाच एक रुपया का बरे बनविला असावा ?  क्रिकेटच्या खेळात 'शंभर' धावा पूर्ण करण्यास आणि 'शंभर' बळींची संख्या गाठणार्‍यास मानाचे पान का  बरे मिळते ?  आंब्याच्या सीझनमधे मंडईत  पाऊल टाकले, तर तुम्हाला 'शेकडा' याच भावाने, एकशेवीस आंबे मिळतील ! परीक्षेत प्रत्येक विषयाचा पेपर, 'एकावर दोन शून्ये 'इतक्या मार्कांचा का असतो, व त्यातीलच एखादे शून्य आपल्या 'पेपरी' पडत असते. परीक्षेत मिळणाऱ्या  गुणांची टक्केवारी देखील 'प्रती शत'च काढली जाते.

एकंदरीत 'शंभर' हा अंक कुणाच्याही नजरेतून सुटलेला नाही !  मिळेल त्या संधीला तो उपयोगात आणला जातो. माणसाच्या आयुष्यात 'सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वता एवढे' हे तत्वज्ञान 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे ' याच शब्दानी पुरेपूर अर्थपूर्ण वाटते  ! लहान मुलगा मोठ्याना नेहमीच सांगतो, " मी मोठा झाल्यावर, रोज शंभर रुपये पगार मिळवणार !"  किंवा  " मी आता खाऊच्या पैशातून शंभर रुपये जमवणार आहे !" लहान मुलानाही 'शंभरा'चेच काय कौतुक वाटत असते, कुणास ठाऊक ! रहस्यकथेतील डिटेक्टिव्हदेखील बातमीदाराला बक्षिसी म्हणून चक्क 'शंभर' रुपयाची नोटच देऊन टाकत असतो !

साहित्य घ्या किंवा राजकारण घ्या, सर्वत्र 'शंभर'चाच प्रभाव पडलेला दिसतो. ऐतिहासिक भाषेत बोलावयाचे झाल्यास 'अमुक राजा तमुक शतकात झाला' असे आपण म्हणतो. तर भौगोलिक भाषेत असे म्हणतो की, गेल्या 'शंभर' वर्षातील भूकंपच्या धक्क्याच्या नोंदीत असली नोंद कधी नव्हती ! शंभर वर्षाहून कमी आयुष्याची माणसेदेखील 'गेल्या शंभर वर्षात असला दुष्काळ पडलाच नव्हता', असा दाखला देताना ऐकून अचंबा वाटल्याखेरीज राहात नाही !

या शतकातील 'शंभरा'चा सरकारवरील आणखी परिणाम म्हणजे मेट्रिक  वजनमाप पद्धतीचा पुरस्कार ; त्यातही एका मीटरचे शंभर सेंटीमीटर होतात, तर एका क्विंटलचे नेमके 'शंभर'च किलोग्राम होतात !  म. गांधींच्या जयंतीचे 'शंभरा'वे वर्ष किती उत्साहाने साजरे केले गेले ! बँका  व पोस्ट यांचे व्याजाचे दरही दरसाल दर'शेकडा' याच पद्धतीने आकारले जातात. आपला भारत देश एकविसाव्या दशकात  वा एकविसाव्या सहस्रात  स्वतंत्र  न होता, योगायोगाने तो विसाव्या 'शतका'तच स्वतंत्र झालेला आहे !

'शंभरा'ची साथ  भयंकरच पसरलेली आहे ! एखाद्या गोष्टीची वस्तुस्थिती पटवून द्यायची असल्यास, शंभर टक्क्यांच्याच खात्रीचाच आधार घ्यावा लागतो. दुकानदाराला आपला 'शंभर' नंबरी माल  असल्याची 'शंभर' टक्के खात्री गिऱ्हाइकाला द्यावी लागते ! फडतूस चित्रपटाचा 'शंभरा'वा दिवशी किती थाटात साजरा करतात ! मजनू आपल्या लैलाला "सौ साल पहले भी प्यार"  असल्याची खात्री देतो , पण प्रेमभांग झाला की, त्याच मजनूच्या दिलाचे "सौ तुकडे" झालेले आपल्याला आढळतात ! श्रीकृष्ण शिशुपालाच्या शंभर अपराधांचीच वाट पहात होता, त्या नंतरच त्याने शिशुपालाचे मस्तक सुदर्शनचक्राने  धडावेगळे केले. त्यावरूनही कदाचित 'शंभर वर्षे भरणे' म्हणजे मृत्यू समीप येणे - हा वाक्प्रचार प्रचारात आला असावा !

जेवण झाल्यावर, मी अभ्यासाला लगेच बसलो की, आमच्या तीर्थरुपांचा आवाज चढत असे -

 " शंभर वेळा सांगितले की , जेवण झाल्यावर 'शतपावली' करीत जा- म्हणून! " 
आणि मग शतपावली म्हणून मला  हजार पावले इकडून तिकडे फिरावे लागत असे !

वयाची 'शंभरी' गाठणे, हा पराक्रम अलीकडे 'शंभरा'त एखाद्यालाच जमतो. ते निरोगी, निकोप प्राकृतीचे लक्षण  होय. त्यामुळेच दैनंदिन जीवनात 'शंभरा'चे महत्व वाढत असावे !

आणखी एक गंमत म्हणजे, 

तुम्ही 'शे' म्हणा किंवा 'शेकडा' समजा, 'शतक' असे लिहा अथवा 'एकावर दोन शून्ये' मांडा-- 
त्या सर्वांचा अर्थ एकच -  " शंभर " !  

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा