पाहू रे किती वाट -


तुझ्या अस्तित्वासाठी,
मी मागे राहून
तुला मोठे केले-
मला काही त्याचे श्रेय नकोच आहे ..

वेळात वेळ काढून
तुझ्या मोठेपणासाठी
माझ्या हाडाची काडे केली पोरा,

माझी तहानभूक विसरून
तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था
करण्यात जगात राहिलो
जगतही राहिलो की रे ..

आज त्या दूर देशात
तुला इथूनच पाहताना
डोळ्यातला आनंदाश्रू
आवरू शकत नाहीच -

तिकडे गेल्यावर नुसतीच
"येतो येतो"ची हूल देतोस -
आता आमच्याशी
दोन शब्द बोलायला
तुला वेळ मिळत नाही
फुरसत होत नाही.. समजले बरे !

दोनाचे चार तिकडे केलेस
चाराचे सहा पण झाले -
आता इकडे डोकावायला
वेळ तुला कसा मिळेल पोरा..

जगाची रीतच आहे
भुतानी शिते
असेतोवारच जमायचे.....

तूही त्याला अपवाद ठरला नाहीस -
जमलेच तर
अखेरचे भेटून जा !

नाहीतर आहेच,
शेवटी
तो दर्भाचा कावळा तयार
मला शिवायला !!!
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा