महाशिवरात्रीचा महादिवस ...

पुणे ते भुतान व्हाया कलकत्ता (मार्गे .. ?) :

काल सायंकाळी टूर-इ-भुतान सुरू झाली आहे.
आझाद हिँद सेनेत सामील होता आले नाही, 
निदान आझाद हिँद एक्सप्रेसमधे सही !

आम्ही दोघे आणि मित्र त्याच्या बायकोमेहुणीसह.. 
असे एकुण पाचजण ! 
महिलादिन जवळ आला आहे, 
त्यात तीन विरुद्ध दोन, असा सामना रंगतदार होत राहणार 18 तारखेपर्यंत ! 

काल एकादशीचा दिवस ! 
रात्री आमचे दोघांचे खाणे आणि त्या तिघीँचे बोलणे यासाठी तोँडाने दुप्पट जोर धरला होता ! 
काल उपास असल्याने, आज खाणे पिणे जोरात चालू आहे...

.
आज सोमवार ..
महाशिवरात्रीचा महादिवस ...

वर्षभरात काही ठराविक महाउपास करतोच, 
त्यापैकी हा एक दिवस ! 
पुण्याहून कोलकत्याला जाण्यासाठी निघतानाच, 
आजच्या उपासाची जय्यत तयारी आम्ही केली होती.

आज खास शिवशंकराचे दर्शन घ्यायचे ठरवून, 
सकाळी दक्षिणेश्वराचे दर्शनासाठी निघालो. 
मंदिराच्या आवारात आलो तर, इतर दिवशी एकही भक्त न फिरकल्याने ओसाड वाटणारे आवार, आज सोमवारच्या महाशिवरात्रीची संधी साधून,
हजारोँच्या संख्येने दाही दिशांनी भक्तगण जमताना दिसले ! 
त्यामुळे ह्या महादेवाचे महादर्शन,
 नंतर कधीतरी निवांत घेण्याचे आम्ही पंचमुखातून एकमताने ठरवले . 

 एकेक साईटसिईँगचा भाग उरकत, दक्षिणेश्वर मंदिर वगळून, तेथून 3किमी अंतर नदीतून, नौकानयनाचा आनंद लुटत, लाँचद्वारे पार करून, रामकृष्ण परमहंसांचा बेलूर मठ पाहिला.

मठाच्या प्रवेशद्वाराजवळच महादेवाचे छोटेसे टुमदार मंदिर दिसले. आम्हाला शिवानेच असे अचानक सुंदर दर्शन सत्यात दिल्याने, 
आमचा आनंद मनाच्या गगनात मावेना ! 
महिला त्रिकुटाचे मेतकूट जमले आणि काथ्याकूट होऊन,
तिथे वाती प्रज्वलनाचा सोहळा सुखशांतीसमाधानात पार पडला !

दुपारी 2 वाजता आम्ही पाचजण कोलकत्यातील प्रसिद्ध ईडन गार्डन स्टेडियम, रायटर्स बिल्डिंग, जीपीओ बिल्डिंग, आरबीआय बिल्डिंग कारमधूनच बघत.. 
व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल पहायला गेलो.

सोमवार असल्याने, व्हिक्टोरिया हॉल बंद !

तेथील गार्डनमधेच बसून आम्ही पोटपुजेचा उपासधर्म पार पाडायचा विचार केला..
उपास असल्याने-
आम्ही फक्त पेरू द्राक्षे संत्री इ. फळे, श्रीखंड, खजूरलाडू, शिंगाड्याच्या पिठाचे थालपीठ, लाडू, वेफर्स, सुगंधी दूध, घट्ट दही, दहीदूधसाबुदाणा... 
कसेबसे एवढ्याच खाद्यपदार्थावरच भागवले !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा