हेल्मेट.. हेल्मेट ..

पूर्वी छान जेवण झाल्यावर,
नेहमी वामकुक्षीप्रसंगी वाट्टेल ती स्वप्ने पडायची.
बऱ्याच काळानंतर आजही अगदी तसेच घडले की हो !

दुपारच्या जेवणात मस्तपैकी
गोलगरगरीत भाकरी, शेंगाचटणी, अळूची पातळ भाजी, गरम गरम कढी इ. इ.मनसोक्त हादडले.
मग काय....ढाराढूर झोपेत स्वप्नमालिका सुरू -
त्यातली एक तर फारच गमतीदार..

मी बाईकला किक मारून ,
भाजी आणायला मंडईकडे निघालो होतो.
अर्ध्या रस्त्यात बायकोची आठवण आली.... ,
आज बायको बरोबर नाही आणि त्यामुळे,
मी नेमका डोक्यावर हेल्मेट घालायचेच नाही,
तर बरोबर घ्यायचेही विसरलो.
आता पोलीस मला अडवणार आणि हेल्मेट नाही म्हणून,
हा भलामोठ्ठा दंड ठोकणार !

नुसत्या कल्पनेनेच मी घामेघूम होत-
ब्रेक लावत, बाईकचे इंजिन बंद मधेच केले.
आणि का कुणास ठाऊक,
अचानक रस्त्यातच डायलॉग मारायला सुरुवात केली - - -

" कुणी, हेल्मेट देता का रे ... हेल्मेट ?
एका बाईकस्वाराला कुणी हेल्मेट देता का ?
हा बाईकस्वार डोक्यावाचून ,
आठवणीवाचून,
बायकोच्या छायेवाचून
पोलिसाच्या दयेवाचून
घराघरात हिंडत आहे
जिथे कुणी हेल्मेटवाचून राहणार नाही
अशी डोकी ढूंढत आहे
कुणी, हेल्मेट देता का रे ?
हे ल्मे ट .........?
हे ल्मे ट ...........?? "

---------- बायको मला गदागदा हलवत होती..
मी जागा झालेला दिसताच म्हणाली -
" झोपेतही हेल्मेट घालायची सक्ती अजून कुणी केली नाही हो.
भलतीच स्वप्न पहायची तुमची जुनी खोड मेली काही कमी होत नाहीय..
चला, चहा झालाय !"
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा