का नशिबी हे असेच माझ्या घडत असावे - [गझल]

मात्रावृत्त -
मात्रा- ८+८+८ = २४
-------------------------------------------------------------
का नशिबी हे असेच माझ्या घडत असावे 
वाट पाहुनी ठरल्यावेळी निमुट निघावे- 
.
ना कळते मज गेलेली तू निघून तिथुनी 
किती वाट मी पाहत नंतर तेथ बसावे- 
.
तूच नसावे असता जेव्हा मीही तेथे 
म्हणतो मनात त्राग्याने मी परत फिरावे- 
.
पुडीत असतो वाट बघत तो गंधित गजरा 
पुष्पांनीही सोबत माझ्या छान रुसावे- 
.
रागाने मी फिरता फिरता तू हळु यावे 
आणि फुलांनी आनंदाने मग बहरावे.. ! 
.

किती काळ असा उभा

किती काळ असा उभा 
माझा विटेवर विठोबा -

ठेवोनिया हात कटीवर 
कंटाळला ना आजवर -

करती वारी वारकरी 
चिंता मनी विठू करी -

भक्तीची पुरवी शक्ती 
विठोबाची अजब युक्ती -

पायदुखी ना पोटदुखी 
विठूराया वसता मुखी -

भजनी वारकरी दंग 
भक्तीलाही चढतो रंग -

म्हणतो पंढरीसी जावे 
नयनी रूप साठवावे -

हरपावे मी देहभान 
पाहता साजरेसे ध्यान - ! 
.

बेभान वारा

बेभान किती तो वारा 
कोठे न मिळे पण थारा -

मनात येई तिकडे वाही 
माजवी गोंधळ गोंधळ सारा -

भोंगळपणा नि बेशिस्त 
उध्वस्त कुणाचा हो निवारा -

भलेबुरे ना कळते त्याला 
वाहत सुटतो उगा भरारा -

इकडे तिकडे चोहोकडूनी 
आपटतो धडाधड दारा -

ना सुखदु:ख सोयरसुतक 
वाहतो निज ढंगात न्यारा -

झोपडी बंगला न भेदभाव 
चालतसे बेधुंद तो मारा -

घरट्याचेही राहते न भान 
घालतो थैमान का वादळवारा -

हैवान बनुनी होतो शांत 
उरतो फक्त अथांग पसारा !
.

कौतुक

मागच्या वर्षीची गोष्ट एकदम आठवली ...

त्यावेळी मी एटीएममधून 
नुकत्याच मिळालेल्या
दोन हजारच्या 
"त्या" गुलाबी नोटेकडे बघत बघत 
कौतुकाने गुणगुणत होतो ..

"बहुत प्यार करते हैं, तुमको सनम- 
कसम चाहे ले लो, ख़ुदा की कसम........."

तेवढ्यात 
हातात चहाचा कप घेऊन आलेल्या बायकोने
माझे गुणगुणणे ऐकले..

मग काय ..
ती खूष -

म्हणून मीही खूष !
.

असे का - ?

असे का - ?

आपला बाब्या
दुसऱ्यांच्या घरातल्या सोफ्यावर 
दाणदाण नाचताना,
कौतुकाची अपेक्षा असते !

आणि -

दुसऱ्याच कार्ट 
आपल्या घरातल्या दिवाणावर 
टणाटण उड्या मारताना मात्र,
आपल्या चेहऱ्यावर 
आठ्या पसरतात !
.

त्या वळणावर ..

आठवतो मी आजही 
घेतलेले तू अचानक 
होकाराचे नकार वळण
त्या वळणावर ..

भेटत होतो दोघे 
कितीकदा आपण 
वेळेवरती नियमित 
त्या वळणावर ..

गारव्यातली ऊब 
उन्हाळ्यातला गारवा
पावसातली चिंब मिठी 
त्या वळणावर ..

वचने आणाभाका 
आठवतात अजूनही 
विसावलेल्या त्या 
त्या वळणावर ..

काय अचानक घडले 
नशीब माझे रडले 
होकाराचा मिळता नकार 
त्या वळणावर .. !
.

दोन चारोळ्या

१.

ओळखावा आपला गुण 
एक आधी चांगला -
दोष सारे मग दुजाचे 

धाव रे मोजायला..
.

२.

"वाहवा"ने खूष होते 
स्फूर्तिदेवी ही किती -
त्याच शब्दाचीच मागू 
भीक मी तुजला किती !

.

जीवनाला चाळले मी - -[गझल]

" जीवनाला चाळले मी - "

जीवनाला चाळले मी 
नको होते गाळले मी ..

सांभाळले जुने काही 
नविन होते जाळले मी ..

रीति नियमा जीवनी या 
शक्यतोवर पाळले मी ..

गरजवंता जवळ केले
ऐतखाऊ टाळले मी ..

गंध नव्हता सारले मी 
जे सुगंधी माळले मी ..
.
- - - विजयकुमार देशपांडे

दृष्ट

बरे झाले -

देवाने 

गालावर तुझ्या 

छानशा तिळाचा 

गोंदवलाय 

एकच 

तो झकास ठिपका - !


नाहीतर -


येताजाता ....

माझ्या ह्या 

सारखे सारखे 

तुझ्याकडे 

बघत राहण्याने -


तुला माझी 

दृष्ट लागण्याचा 

बसला असता

कायमचाच  

ठपका .. !
.

बर्थडे केक

बाळाचा असो 
वा 
पणजोबाचा ----

"वाढदिवस" 
साजरा होताना,

तो
"बर्थ डे केक" 

एकमेकांच्या तोंडावर थापला जाणे -

म्हणजे अगदी......

"व्यर्थ डे केक" होऊन जातो ना !

कारण तो 
गावातल्या भिंतीवर-

शेणाच्या गोवऱ्या 
थापल्यासारखेच वाटते बुवा !

गोवऱ्यांचा उपयोग निदान  
नंतर तरी  होतो ,,,,,,,,

पण -
केकचा असा उपयोग म्हणजे -

अन्नाची 
एकप्रकारे नासाडीच की हो !

...... शिवाय 
तो प्रकार पाहताना तर, 

अगदी "असह्य" वाटते ब्वा !

हौसेपोटी 
मोजलेले 
अनमोल मोल -

मातीमोल 
झाल्यासारखेच की हो ..... !
.

मत्सर

मेकअपसाठी 

बसतेस तू
तासभर,

फक्त
तुझ्याशी
बोलक्या,
त्या आरशासमोर -

खूपच
हेवा वाटतो
ग सखे,

वाटते ....

फेकून द्यावा
आरसा,

अन बसावे
तुझ्यासमोर .. !
.