लग्नपत्रिका



शेतकरी सुगीच्या दिवसांची वाट पहातो, कंपनीचा  कर्मचारी बोनसची वाट पहातो आणि प्रियकर आपल्या प्रेयसीची वाट पहातो ! या तिघांच्याही वाट पहाण्यातली आतुरता, उत्सुकता शब्दानी वर्णन करण्यापलीकडची असते ! तितक्याच, किंबहुना तीहूनही अधिकच तीव्रतेने मी पोस्टमनची वाट पहात असे ! याचाच त्याअर्थी अर्थ असा की - 'मी हल्ली पोस्टमनची वाट पहात नाही किंवा नसतो !'


मी नोकरीला लागण्याआधी, तमाम छंदिष्टांपैकी एक होतो.  मला छंद  होता- 'लग्नपत्रिका' जमविण्याचा !
त्या जमवताजमवता माझेच लग्न जमले आणि मला त्या छंदाशी घटस्फोट  घ्यावा लागला !


प्रत्येक माणसाचे लग्नपत्रिकेकडे पहाण्याचे दोन दृष्टीकोन असतात. पहिला नोकरी व छोकरी मिळण्यापूर्वीचा, आणि दुसरा दोन्ही मिळाल्यानंतरचा ! दोन्ही दृष्टीकोनातला फरक अगदी 'बारसे आणि श्रध्धांजली'  या प्रकारातला असतो.


 प्रत्येक लग्नपत्रिका आधी कुतूहलजनक असते. पोस्टमनने ती  दारात टाकल्याबरोबर,  प्रत्येक लहान मूल आणि ब्रम्हाचारी त्या लग्नपत्रिकेवर तुटून पडत असतो. त्या पत्रिकेवरील तिकीटापासून ते आपल्या घरच्या पत्त्यापर्यंत अक्षर न अक्षर वाचले जाते. पत्रिकेवरील गणपतीच्या निरनिराळ्या पोझेस, त्यातल्या रिसेप्शनच्या  चिठ्ठ्या सर्वजण  आनंदाने पहातात.


मऊ  सुबक कागदापासून ते खडबडीत साच्यातील कागदापर्यंत शेकडो नमुने पहाताना दमछाक होते. पत्रिकेतील मजकुरात- विशेषत: 'इष्ट मित्र-मैत्रिणीसह अवश्य यावे' वाचताना डोळ्यासमोरून असणार्‍या आणि नसणार्‍या हजारो सहचारिणी तरळून जातात !


एकच वधु  आणि एकच वर यांच्या एकुलत्या एक लग्नासाठी, अगत्यपूर्वक निमंत्रण  देणार्‍या त्यांच्या गोतावळ्याची  पाचपन्नास नावे शोधण्यातही और मजा असते. अशा पार्श्वभूमीवर काही पत्रिकेत  शेवटी    '+++ आणि परिवाराच्या शुभेच्छेसह' असे छापलेले उगीच सपक वाटते . कारण वृत्तपत्रात नाव छापून यायला, काहीतरी कर्तबगारी असावी लागते. नाहीतर  आपल्याच ब्लॉकचा खर्च  आपण  करून जाहिरातीला आपलेच पैसे खर्च करून नाव छापण्यात कसला पुरुषार्थ  हो ! म्हणून माझे तर असे मत आहे की, पत्रिकेत एक वेळ वधुवरांचे नाव- फोटो नाही दिले तरी चालतील, पण त्यांच्या नातेवाईकांची नावे त्यांच्या डिग्रीसकट अवश्य छापली जावीत !  वधूवरांच्या पदव्या सर्वाना नाहीतरी माहीत असतातच की !  शेवटी 'नाव छापून येणे'  ह्याचे कौतुक परिवारातील सर्वानाच असणार ना !


मुद्द्याचे सांगायचे राहिलेच !
निरनिराळ्या रंगातल्या, हरतऱ्हेच्या आकारातल्या,  वेगवेगळ्या छपाईच्या लग्नपत्रिका कितीही आकर्षक असल्या तरी, मी आता त्यांच्या वाटेला जात नसतो !  कारण एकच- त्या बिन तिकिटाच्या पत्रिकेची किंमत आता मला  दहा रुपये तरी असते ! तेवढ्या किमतीत माझा एक पेशल चहा, दोन चॉकलेटस किंवा लोटरीचे एक तिकीट मला  मिळू शकते !    अर्थात काही जणांना दहा  रुपयेही स्वस्त वाटतील.  दहा रुपये आहेर द्यायचा आणि घरात आलेल्या दहा पाहुण्यासकट पाच जणांनी जेवायला जायचे...करा हिशेब.. केवढ्याला पडते हो जेवण ! पण  इतक्या कंजूष वृत्तीचा मी नसल्याने, वधूवराना शुभेच्छा देणे आणि लग्नाला जाणेही मी टाळतो ! कारण जेव्हा मी वरीलप्रमाणे दहा रुपयांचा हिशेब करून सौ.ला बरोबर घेऊन, अगत्याने एका लग्नाला हजर राहिलो, त्यावेळी त्या लगीन घाईत माझ्या खिशातले पाकीट त्यातील चारशेवीस रुपयासकट- कापले गेले आणि सौ. च्या नव्याकोऱ्या चपला (किंमत नव्व्याण्णव रुपये )ही गेले ! करा हिशेब. .. केवढ्याला पडले हो  ते लग्न ?
म्हणून म्हणतो- 'दुरून लग्नपत्रिका साजऱ्या' !  लग्नाचे अगत्यपूर्वक आमंत्रण म्हणजे "बळी जाणार्‍या बकऱ्याचा साजशृंगार !


तुम्ही नोकरीत असाल, तर  लग्नपत्रिका  भरपूर येतील. नोकरीत नसाल, तर कुत्र्याच्या लग्नाची पत्रिकाही तुम्हाला येणार नाही !  नोकरीच्या हुद्द्यानुसार तुमच्यासमोरच्या टेबलावर पत्रिकांचा ढीग वाढत जाईल. 'लहानपण देगा देवा- ' म्हणण्यामागील प्रयोजन हेच असते की, पत्रिका वाचायला मिळूनही, लग्न फुकटात अटेंड करायला मिळावे- घरांतल्या  इतर वडीलधाऱ्या  माणसाबरोबर फुकटात !


 नोकरीचा हुद्दा वाढला की, आहेराचा रतीब वाढतो. जो लग्नपत्रिका देतो, त्याला लग्न फायद्यात,  जो पत्रिका घेतो- त्याचा मात्र केसाने गळा कापला जातो ! कारण 'कृपया आहेर आणू नये'असे छापूनही त्याचा अर्थ-  'कृपया आहेराशिवाय येऊ  नये ' असाच वाचणार्‍याने काढायचा असतो !


अनुभवान्ती- लग्नपत्रिका  ही 'टेबलाच्या ड्रावरमधे दडपण्याची वस्तू' असा निष्कर्ष मी काढला आहे ! लग्नपत्रिका  हातात देणारा सस्मित निघून जातो, आणि घेणारा 'आताच  नेमकी आली का महिनाअखेरला ही ब्याद' म्हणत दुर्मुखतो ! कारण  लग्नसराईत इतके मित्र आणि नातेवाईक उपटतात की कुणाच्या लग्नाला जावे आणि कुणाच्या नको, हे ठरवताना नाकी अगदी दहा येतात !  बर, गेलो तरीही आपली योग्यता आहेरावरूनच ठरवली जाणार ना !  ही पत्रिका म्हणजे 'असून  अडचण नसून खोळंबा' ठरते !


सारांश एकच-  लग्नसराईचे  दिवस आले की, मला नेमका फ्लूचा अट्याक येतो आणि दारात पोस्टमनच्या हातात पत्रिका दिसली की, मला हार्टअट्याक जाणवतो !


आता लग्नसराई सुरू..
फ्लूची लक्षणे दिसत आहेतच  आणि हृदयाची धडधड वाढत आहे...
आणि "लग्नपत्रिका" माझ्या  हातात  देण्यासाठी-
 दारासमोर पोस्टमन उभाच आहे !
.

२ टिप्पण्या: