उशीर झाला रे ब्रिजलाला


दह्यादुधाचा माठ घेऊनी 
निघाले मथुरेच्या बाजारी
कुठून येतो कृष्ण आडवा 
घोर जिवाला उगा श्रीहरी . .

उशीर झाला रे ब्रिजलाला 
लौकर निघता नाही आले 
सडासारवण आवरून होता 
लोणी-घुसळण काम लावले . .

नकोस देऊ त्रास कन्हैया 
नकोस फोडू या माठाला 
दहीदूध ते जाईल सांडून 
सासू येईल भांडायाला . . 

खोड्या मुरलीधरा वाढती 
जागोजागी तूच दिसशी रे 
इकडुन जावे म्हणते तिकडे 
कशी अडवशी माझी वाट रे . .

सासूचा मी चुकवून डोळा 
हाती ठेविन तुझ्या हळू रे 
लोण्याचा आवडता गोळा 
परंतु आता वाट सोड रे .  .

साऱ्या गौळणी गेल्या पुढती 
इथे थांबले एकटीच रे 
लीला तव मी नंद्कुमारा 
वर्णत राहू कुणापुढे रे . .
.

वासना


वासनेला जात नाही 
वासनेला धर्म नाही 
वासनेला नाते नाही 
वासनेला वयही नाही 

वासना ती वासना 
जरी आली तिची घृणा 
वासना आहे बुभुक्षित 
वासना नाही सुरक्षित 

वासना शमणार नाही 
वासना दमणार नाही 
वासना रमणार कुठून 
वासना पडणार तुटून 

वासना ती निर्दयी 
वासना ती पाशवी 
वासना एका क्षणाची 
वासना खेळी मनाची 

वासना होते अनावर 
वासना आरूढ शवावर
वासनेला अंत नाही 
वासना "माणूस" नाही . .
.

नाही चाखली चव 'लाडू'ची - (विडंबन)


( चाल : नाही खर्चली कवडी दमडी...)

नाही चाखली चव 'लाडू'ची, नाही घेतला ठाव
उगिच घातला घाव, हाताने उगिच घातला घाव |धृ |

कुणी आपटे 'तो' फरशीवर
कुणा वाटते फुटे भिंतीवर
फुटण्याचे ना घेतो इतुके फोडियले तरी नाव .. |१|

'काळ' मम मुखी लाडू घरचा
जबडा न कळा सहतो वरचा
हात दुखोनी तुटेल भीती दाताचा न टिकाव .. |२|

जितुके लाडू तितुकी नावे
हृदये चिडुनी शिव्यासी द्यावे
मनीं न आवडे पत्नीपुढे मी दीन-अनाथ-'अ'भाव .. |३|
.

शब्दांची किमया


दडून बसलेली 
विचारांची पाखरे...
मनाच्या दाराआड 
घुटमळत असतात - 

कुरकुरते 
मनाचे दार 
किलकिले होते 
उघडझाप दिसते 
सुसाट निघतात 
एकापाठोपाठ एक विचार 

पर्वा न करता 
बेभान अवस्थेत
कशाचीही कुणाचीही 


माझ्या वेदना
माझा आनंद 
माझे हुंदके 
माझा उल्हास 
माझा आक्रोश 

एकाच्याही
खिजगणतीत नसतो . . 

आपल्याच तोऱ्यात 
आपल्याच नादात 
बेगुमान बेलगाम 

रेखीव 
लांबलचक 
मोडकीतोडकी 
वेडीवाकडी नागमोडी 

तयार होत जाते आपसूकच 
जमेल तशी शब्दांची साखळी 
......विचाराविचारातून ......

वाटत राहते 
कुणाला काय 
तर कुणाला काय 

छान- मस्त- बंडल- 

हायकू 
चारोळी 
काव्यरचना 
मुक्तछंदी किंवा 
गणमात्राबद्ध गझल ..
.

गारवाएकदा भर उन्हाळ्यात 
मी म्हणालो सूर्याला-
होऊ नकोस इतका प्रखर 
किरण थोडे अड्जस्ट कर !

सूर्य म्हणाला रागाने 
बडबड तुझी बंद कर -
सगळ काही ऐकायला 
मी नाही तुझा नोकर !

मी म्हणालो- मित्रा !
मी तुला रिक्वेस्ट केली,
बरा नव्हे इतका ताठा 
असा गर्व अशी बोली !

बघ माझी सखी आली
नकोस धरू वर सावली-
सूर्य पाहू लागला खाली
मी छत्री हाती धरली ..

बसला सूर्य चडफडत 
एकटाच उन्हात तडफडत- 
त्याला काही बोलता येईना
त्याला काही पाहता येईना !

मी छत्री ऐटीत उघडली 
माझ्या डोक्यावर धरली -
घेऊन बसलो हातात हात
सावलीच्या गारव्यात निवांत !
.

माझे जीवनगाणे

पहिल्यासारखे आणि पहिल्याइतके
होत नाही माझ्याच्याने चालणेफिरणे -

दहाव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर
जमत नाही सहजासहजी निरोप देणे -

अशावेळी बायकोजवळ हळूच मी कुजबुजतो
सुरू होते.. निरोपाचे झटपट खाली सरकणे -

नवव्या मजल्यावरच्या शेजारणीकडून
आठ सात चारच्या शेजारणीकडे झिरपणे -

पहिल्या मजल्यावरच्या हव्या त्या घरात
पाहिजे त्यावेळी निरोप अचूक पोहोचणे . .
.

पाच चारोळ्या -----

 दैवलीला -
अधीर देव तो सुख भरण्या 
फाटकी असताना झोळी -
अधीर होतसे दु:ख भरण्या 
चांगली असताना झोळी ..
.

आरपार -
अगदी थेट काळजावर 
एखादा कटु शब्द वार करतो -
शेकडो स्तुतीसुमनांपेक्षा 
त्यानेच मनुष्य फार सुधारतो ..
.

आई -
आपल्याच तंद्रीत रस्त्यामधे
ठेच लागुनी बोट ठेचते -
आईऽ ग, तुझीच आठवण होते
चिमूट हळदीची समोर नाचते ..
.

व्यथा -
आवडते लोकांना म्हणून 
कुणाला किती हसवू मी -
मुखवट्यात दु:खे लपवून  
स्वत:ला किती फसवू मी ..
.

तुमचा ऱ्हास, आमचा ध्यास -
आवड सुखदु:खाची आहे
जगात प्रत्येकास निराळी -
"ह्या"च्या घरात दु:ख दिसता
"त्या"च्या घरात सुखास उकळी . .
.

विनोद जुनाच, पण

'
तुझी शैली
माझी शैली
त्याची शैली ...
एकसारखीच कशी असेल !

विनोद तोच 

जुनाट असतो
वाचलेलाही असतो ...

पण
तोच विनोद -


ती पत्रातून सांगते
 ती काव्यमय लिहिते
ती चारोळीतून व्यक्त करते

तो व्यंगचित्रातून टपकवतो
तो वात्रटिकेतून सादर करतो
तो लेखातून वाचायला लावतो

एकच विनोद
वेगळ्या शैलीने

खुलवलेला-फुलवलेला- पकवलेला-

हंशा पिकवतो
गुदगुल्या करतो
कोपरखळी मारतो

स्मित करायला लावतो...

रसिक अरसिक वाचक

आपापल्या वकूबाप्रमाणे
वाचतो - पचवतो - पकतो - फेकतोही !
.


तीन चारोळ्या -


 ' सवय- '

फुलांच्या शय्येवर नाही मी मोहरत
काट्यांचे अंथरूण सवयीचे झाले -
स्तुतीच्या वर्षावात नाही मी शहारत
निंदेचे पांघरूण सवयीचे झाले ..
------------------------------------------------

   ' भाव - '

गुलाबपुष्प मी हाती  देऊन
 'भाव' फुलवले सखे मनातून -
 केलेस नाराज 'भाव' विचारून    
" कितीला आणले बाजारातून ? " ..
------------------------------------------------

' नवस -'

"हाच नवरा नशिबात मिळू दे-"
बायकोच्या नवसाला लगेच देव पावणार ..
"मलाही  सात जन्म  सुख मिळू दे-"
नवऱ्याच्या नवसाला कधी देव पावणार !
-------------------------------------------------
.

शोकांतिका


जगाच्या अंतापर्यंत
 

दोन पक्ष
अस्तित्वात आहेत
तोपर्यंत ....

मतभेद
भांडणे

रुसवेफुगवे
वादावादी
कुरापती
भ्रष्टाचार
लाचखोरी
हमरीतुमरी
हातघाई
घुसखोरी
हाणामारी
मोडतोड
तोडफोड
निलंबन
तडजोड
फुटाफूट
पक्षांतर

ओढाओढी
आणखी
बरच काही
घडत राहणार -

फक्त
घडणार नाही ...

दोघात कधीही-
" जनकल्याणासाठी एकी ! "
.

फेस्बुकाच्या पारावर


फेस्बुकाच्या पारावर
जमतो सगळा परिवार
सुखदु:खाचा गहिवर
सहभागी एकमेकात . .

आनंदास मिळे लाईक
दु:खासही स्माईलीशोक
तिरकस कुणाची कॉमेंट
सहभागी एकमेकात . .

लाईकचा कुठे सुकाळ
कुठेतरी दिसे दुष्काळ
पोस्ट टाकत राहणे
सहभागी एकमेकात . .

ग्रुप कुठेतरी गुपचूप
ट्याग उघड आपोआप
नाराजी कुठे दाखवणे
सहभागी एकमेकात . .

खेळ पोकचा लुटूपुटीचा
इतरांना डिवचण्याचा
कुणा आवडे कुणा नावडे
सहभागी एकमेकात . .

कॉपीपेस्टची चुणूक
नावाची ती फसवणूक
बोंबाबोंब करण्यास
सहभागी एकमेकात . .

हळूच ते डोकावणे
दुसऱ्याला खुणावणे
शेरेबाजीला ये ऊत
सहभागी एकमेकात . .

खोट्यांचा घेऊन बुरखा
बने कुणी तिसमारखा
कुजबूज नुसती करीत
सहभागी एकमेकात . .

आभासी हे फेसबुक
आहे सर्वांना ठाऊक
तरीही सर्व भावूक
सहभागी एकमेकात . . 

.

बदल


कॉलेजचे दिवस -
तो बोलत असायचा
ती पहात असायची
लक्ष नेहमीच
त्याच्या चेहऱ्याकडे
स्वप्नाळू डोळे
जोषात आविर्भाव
बोलणे ह्या कानातून
त्या कानातच
किती कौतुक
त्याच्या ओघवत्या
शब्द विचार कल्पनांचे . .
पायाच्या अंगठ्याने
चाळा चाललेला
मनात उद्याच्या
भविष्याचा विचार . .

लग्नानंतरचे दिवस -
ती बोलत असते
तो पहात असतो
लक्ष नेहमीच
तिच्या हुकुमाकडे
बोलणे कानामधे
साठवले नाहीतर
नशिबात आहेच
अंगावर गुरगुरणे
अरेरावी वसकन
पायांची थरथर
हात घामेजलेला
मनात उद्याच्या
आयुष्याच्या विचार . .
.

दहा चारोळ्या ----------

माणसे नकोत घरोघरी आता 
पाहिजे फेसबुक व्हाटसअप हाती -
कुठेही कसेही एकटेच बसायचे  
विसरून भान माणुसकी नाती ..
.

माझ्याजवळी तू बसता 
रुसतो का प्राजक्त इकडे -
हलवत आपल्या फांदीला 
घालतो सडा फुलांचा तिकडे..
.

माझ्या बागेत सुंदर फुले 
दाखवली सगळी त्याला - 
कौतुक करणे दूर राहिले 
'निवडुंग कुठे' विचारत गेला ..
.

मी शांतीचा आहे भोक्ता
तो होता सुटला सांगत-
ना ठेवला विश्वास ज्याने 
का त्याच्याशी बसला भांडत ..
.

नकोस देवा रे सुख देऊ 
कधीच तू मला आयुष्यात -
घेऊ चव मी कधी सुखाची 
गुरफटलो इतका दु:खात..
.

न धावते आयुष्याची गाडी 
देवाच्या इशाऱ्याशिवाय -
न थांबते आयुष्याची गाडी 
यमाच्या इशाऱ्याशिवाय ..
.

नदीच्या पुरात कदाचित 
ताठ उभा राहू शकेन -
तुझ्या आसवांच्या धारेत 
क्षणात कोलमडून पडेन..
.

निमित्त गळाभेटीचे अरे, 
कशाला तू केलेस मित्रा-
आधीच केली असती पुढे 
वार करायला पाठ मित्रा ..
.

नाती ही कोळ्याची जाळी 
गुरफटली तर छान गुंतती -
जीवनातुनी तुटली जर ती 
दूर कुठे फेकली जाती . .
.


नकोच घाई करूस सखे, 
केशसंभार दूर सारावयाची -
मलाही नाही मुळीच घाई 
सूर्योदय तो पहावयाची ..
.

जागतिक पुरुष दिन

 एक दिनाचा मी बादशहा
राज्यकारभार माझाच पहा


दिवसभर एकटा बडबडलो
मुळीच नाही गडबडलो


पाहिजे तसे ओरडून झाले
पाहिजे तितके हादडून झाले


मित्र जमवले हुषार चार
करून टाकला घरात बार


पत्ते कुटले मित्रासंगे
गोंधळ घातला त्यांच्यासंगे


"आज" बायको माहेरी
मजला किती आनंद घरी


आज "जागतिक पुरुष दिन"
उद्या रोजचा..."अगतिक दीन" . .
.

पाच चारोळ्या -----

जगातला सारा अंधार
माझ्याच प्रकाशाने दूर केला -
दिव्याच्या ज्योतीचा गर्व
वाऱ्याच्या  झुळकेने दूर केला !
.

जवळुन माझ्या गेली सकाळी
उधळुन पदराने गंधित वारा -
दिवसभर भावनांचे वादळ
घालते थैमान मनी सैरावैरा !
.

जगण्यातुनी मज एकच पटते 
"चेहरा" न खरी ओळख आहे -
ज्याचे त्याचे नाते शोधते 
"खिसा" रिता वा भरला आहे ..
.

 जिवंत होतो तेव्हां कुणी
भेटण्यास ना धडपडले -
मी मेल्यावर ते सारे का
मजभवती का येऊन रडले . .
.

जेव्हां जेव्हां विसरायचे
तुला मी मनांत ठरवले -
तेव्हां तेव्हां उचकीने
बेत माझे हाणून पाडले  !
.

हझल


ना वार लाटण्याचे खाणे चुकेल आता
हा पोळपाट हाती तोही फुटेल आता

पाठीस ढाल केले त्या लाटण्यासमोरी
डोक्यावरी निशाणा कैसा हुकेल आता

तो संपला 'पुरुषदिन' कळता तिला अखेरी
पर्याय शरण जाणे मजला उरेल आता

प्राविण्य नेमबाजी कौतूक फार केले
खाणे तरी तडाखे मज ना पचेल आता

ती सात जन्म नशिबी हिटलर म्हणून आली
आज्ञा झुगारता का माफी मिळेल आता . .
.

सच्च्या... तेंडल्या... झिंदाबाद !


उंची नसतानाही,
आभाळाला टेकलेला सचिन

आभाळाला टेकूनही,
जमिनीवरच पाय घट्ट रोवलेला सचिन

गर्वाचे घर कुठे असते,
हे माहित नसणारा सचिन

आपल्या खेळाने इतरांना क्रिकेटचे वेड लावणारा,
शहाणा सचिन

खेळासाठी खेळ मानून,
खेळाचा खेळखंडोबा न होऊ देणारा सचिन

इतरांना योग्य आदर देऊन,
स्वत:बद्दलचा आदर वाढवणारा सचिन

प्रतिपक्षाच्या कुजबुजीला,
आपल्या ब्याटीने खणखणीत उत्तर देणारा सचिन

पंचांचा निर्णय मान्य करून-
यथोचित मान देऊन,
कधीही गळा न काढणारा सचिन

आणखी काय काय करणारा, असणारा आणि नसणारा सचिन

पुरे पुरे की हो .....
 श्रीयुत राजमान्य राजश्री सचिन रमेश तेंडूलकर.......
तुमचे कौतुक !

तुम्ही "भारतरत्न" झालात तरी.......
आमच्या सगळ्यांच्या तोंडून,
हृदयातून  एकच गर्जना येत राहणार -....

" सच्च्या... तेंडल्या... झिंदाबाद !
हिप हिप हुर्रे !! "
.

पाच चारोळ्या -----

नकोस बुडवू आकंठ 
तुझ्या प्रेमात मला -
गुदमरलो तर मुश्किल
पडणे बाहेर मला ..
.

नियमाविरुद्ध सिग्नल तोडून
गेलास, तर जगलास -
नियमानुसार सिग्नलसाठी
खोळंबलास, तर मेलास . .
.

नजरानजर अचानक झाली 
अर्धी पापणी झुकली खाली 
दिसली होकाराची लाली 
हळूच पसरत जाता गाली !
.

नव्हती होकाराची जरुरी 
नजर तू झुकवलीस जेव्हां -
भावी जीवनातली मी स्वप्ने 
रंगवली ग मनांत तेव्हां ! 
.

नेता 'माणुसकी' विषयावर 
टाळ्या मिळवत उभा तासभर -
शोकसभा मृत बळीराजाची 
टाळत गेला का सोईस्कर ..
.

सचिन नावाचे तुफान आले

त्याचे ध्येय झपाटलेले
आम्ही नुसते  भारावलेले

त्याने एकाग्रचित्त असायचे
आम्ही उगाच भ्रमिष्ट व्हायचे

निर्णय त्याने  मान्य केले
आमचे डोळे विस्फारलेले

त्याची एकेरीही धाव
घेतसे हृदयाचा ठाव

क्रिकेटचे देऊळ पाहणे
देवाविना आता सुनेसुने

सगळे देव उरलेले
गाभाऱ्यात गोंधळलेले

सचिन नावाचे तुफान आले
क्रिकेटविश्व ढवळून गेले . .
.

एक तारखेला -


माझ्या घरात हे चित्र दिसते


प्रत्येक एक तारखेलाच असते


बायको येरझाऱ्या घालत असते 


मी येण्याची वाट पहात असते माझ्यासमोर गिरक्या घेत असते जमेल तेवढ्या फिरक्या घेत बसते  तिचा चेहरा किती हसरा असतो माझा कसा नेमका पडेल दिसतोनजर माझी तिच्यावर खिळलेली


तिची माझ्या पाकिटावर रोखलेली  !दोन तारखेपासून बदलते चित्र दोघांतले बोलणे होते विचित्र ती आपल्याच तोऱ्यात असते 


ढुंकूनही माझ्याकडे पहात नसतेमाझी तिच्यावर नजर असते 


रिकामे पाकीट हसत असते !

.

एकापेक्षा एक


दात किडले

दात पडले 

बाळ रडले -

चॉकलेट खाल्लेस 

- आजोबा ओरडले आजोबा आजोबा,

तुमचेही सगळे 

दात पडले -

काय काय खाल्ले ? “

- बाळ ओरडले 


.

संस्कारतो समोर दिसला 


मी हात जोडला -


संस्कार नडला

नमस्कार केला . .तो तसाच गेला

पाहूनही मजला -


संस्कारच नडला 


जाणवले मजला . .


.

बायको साडीला राजीबायको दाणकन आपले धूड आणि बूड सोफ्यावर आदळत,
भाज्यांच्या पिशव्या बाजूला टेकवत,
हाश्शहुश्श करत उद्गारली-
" 
बै बै बै... हे आपले चार जिने खाली उतरून,
वर चढून जायचेयायचे म्हणजे अगदी अग्नीदिव्यच आहे बै !
तेवढा फ्यान सुरू करता का हो ? "

होकारार्थी मुंडी हलवत,
तिचाही मी फ्यान असल्यामुळे,
लगेच डोक्यावरचा फ्यान चालू करत म्हणालो -
" 
अग, आज दिवाळीसाठी साडीखरेदीला जायचं ठरल होतं ना आपलं ! "

क्षणार्धात-
ती सोफ्यावरून टुण्णकरून उडी मारत,
अपूर्व उत्साहाने चित्कारली -
विसरलेच होते की मी ह्या भाजीच्या नादात ..
बसलात काय असे मग उगीच ! चला की हो पटकन..,
तयार होऊन आले हं मी दोन मिनिटातच ! "

मघाची ती दमलेली बायको खरी का,
ही आताची उत्साही खरी... 
असा विचार मी मनात करीपर्यंत ,
ती फ्रेश होऊन- 
" हं चला ".....
म्हणत माझ्यासमोर हजर !
.

विठ्ठल विठ्ठल . .

 
नयनापुढती सुंदर विठ्ठल
मनात मूर्ती सुंदर विठ्ठल 
पाय विटेवर कर कटीवर
राउळातला सुंदर विठ्ठल . .
 
टाळ बोलती विठ्ठल विठ्ठल
पखवाजातुन नाद ये विठ्ठल
वीणा वदते विठ्ठल विठ्ठल
नामस्मरणी विठ्ठल विठ्ठल . .
 
सर्वधर्मसमभावी विठ्ठल
जयघोषातुन विठ्ठल विठ्ठल
कृपाळु विठ्ठल दयाळु विठ्ठल
वारकऱ्याचा प्राण तो विठ्ठल . . 
 
नर्तनी विठ्ठल किर्तनी विठ्ठल
भजनी विठ्ठल देह हा विठ्ठल
एकच आशा उरली आता
पंढरीत हो अखेर विठ्ठल . .
.
 
 

" पुरे संसार संसार - "


                                             अग, संसार संसार
                                             फेस पुरे फेस्बुकावर -
                                             करणार का भाकर
                                             बंद करुन कॉम्प्यूटर ?
                                             कासावीस झालो बघ
                                             भूक लागली भयंकर -
                                             येत आहे ग चक्कर
                                             लॉग औट हो लौकर !


                                                      

                                                                  अहो, संसार संसार
                                                                  मला होईल उशीर -
                                                                  बघा ना ह्या चारोळ्यावर
                                                                  लाईक कॉमेंट भरभर !
                                                                  खूप भूक लागली का हो ?
                                                                   व्हा ना लौकर तयार -
                                                                   गडे, हॉटेलात द्याना
                                                                   पार्सलची ती ऑर्डर !
                                                                                 .

दोन चारोळ्या -

' खात्री -'

पृथ्वी सूर्याभवती फिरते का 
याची मला शंका आहे -
नवरा पत्नीभवती फिरतो
याची मात्र खात्री आहे !
---------------------------------------------------

' रणभागिनी -'

संकटसमयी मी मदतीला
धावत येईन तुझ्या सख्या रे -
समोरची ती पाल नि झुरळे
आधी हाकलुन लाव सख्या रे ..
--------------------------------------------------
.

पक्षीपाखरे -


कुठे रोपटी कुठे फुले ती
झाडे नाहित नजरेपुढती

उंच इमारती खांब नि सळई
शोधुन दमली ती हिरवाई

हौद पाईप जिकडे तिकडे
पाणीथेंब ना त्या नळापुढे

कावरीबावरी प्राण सावरी
पक्षीपाखरे लाजरीबुजरी

हिरमुसलेले जीव बापुडे
हवेत नुसते पंख फडफडे

ओढ न पाणवठ्यावरची
गाणी कुठली मोटेवरची

जरी धावती इकडे तिकडे
फेऱ्यानी परि जीव तडफडे

चिऊ-काऊचे नुरले कौतुक
त्यांच्याशी ना सोयरसुतक

गोष्टी गाणी चित्रापुरते
पक्षीपाखरे उरले नाते

झाडे लावा झाडे जगवा
निघे नुसता कागदी फतवा

डोंगर फोडुन झाडे तोडून
आश्रय पाखरांचा घालवून

मुर्दाड मने ती माणसांची
जाणीव ना पक्ष्या-पाखरांची

माणूस जिवावर उठला त्यांच्या
काळीमा माणुसकीला त्यांच्या

निराधार ती पक्षीपाखरे
आश्रयास्तव नजर भिरभिरे . .
.

आनेसे उसके आये बहार -


चाफा डोलायला लागतो
प्राजक्त सडा घालायला लागतो
गुलमोहर मोहरायला लागतो
गुलाब जास्तच गुलाबी होत जातो
अबोली काहीतरी पुटपुटत राहते
जास्वंदी अधिक खुलते
मोगरा बहरायला लागतो
जाईजुई सुवास पसरतात......

केवळ तुझी चाहुल लागताच !

आणि मी गाऊ लागतो,
जमेल तशा तारस्वरात ....

"आनेसे उसके आये बहार -"
.

कुंकू


कुंकवाचा लाल ठिपका
कपाळावर लावावाच का -

आपल्या सुंदर कपाळावर
तो लाल ठिपका जणू
ह्या "मॉडर्न"ला वाटते ती
जुलमाची जबरदस्ती -

कोपऱ्यात बसलेली
वाट पहात आहे ती -
सीमेवरून परतणाऱ्या
आपल्या घरधन्याची
कपाळभर मिरवू देणाऱ्या
कुंकवाच्या धन्याची !

चूक काय बरोबर काय
संस्कार बरोबर आहेत काय
सीमा ती कुंकवाची
कुणाला किती महत्वाची !

कुंकवाचे महत्व तिलाच कळते -
जिच्या कमनशिबी दुर्दैवाने
जेव्हा कपाळावरून......
कायमचे ते पुसले जाते !
.