उंदराला साक्ष देण्या येथ मांजर हजर असते --[गझल]

उंदराला साक्ष देण्या खास मांजर हजर असते 
का हपापाचा गपापा माल होतो ना समजते..

चोरट्याला जामिनावर छान सुटकाही मिळे ती 
का तुरुंगी साव कुढतो तो उगा काळीज जळते ..

पापण्यांचा उंबरा का आसवे ओलांडती तो 
लेक निघते सासुराला अन पित्याचे भान सुटते ..

माजतो काळोख सारा अस्त होता त्या रवीचा 
चालता अंधारपथ तो काजव्याचे मोल कळते ..

बेलगामी धुंद सारे अश्व नजरांचे उधळती
वासनेला बंधनाचे ना मुळी भय फार उरते..
.

विश्वास ठेवतो मी परका असो कुणीही -- [गझल]


विश्वास ठेवतो मी परका असो कुणीही
फसवून खूप गेले नात्यातले जरीही..

बिनधास्त झोपती ते शेतात कुंपणाच्या
असते उभेच कुंपण शेतास खाउनीही..

चिंता मनात करतो मी का उगा चितेची
मरतो क्षणोक्षणी मी जगण्यात जीवनीही..

जाळून राख माझी त्यांनी कधीच केली
ठाऊक ना तयांना आहे फिनिक्स मीही..

चुरगाळुनी इथे जर ते फेकती कळीला
ना थोरवी फुलाची कळणार ती कधीही..
.

वाटे मज जावे फुलाने हळूच स्पर्शुनिया --[गझल]


वाटे मज जावे फुलाने हळूच स्पर्शुनिया
का काटा जातो मला तो अचूक टोचुनिया ..

माळुन गजरा ती निघाली, खुशाल आहे रे
देई वारा का दिलासा सुगंध पसरुनिया ..

जेव्हा तुज विसरायचे मी मनात घोकावे
दमती उचक्या का हजेरी लगेच लावुनिया ..

जाणे येणे वेळ माझी ठरून गेलेली
दारी येशी तीच संधी कशी ग साधुनिया ..

बघुन खिसा ते मोकळा हा दुरून जाती का
जमती भवती तेच भरल्या खिशास पाहुनिया ..


घेतो करुनी आपलेसे घरात दु:खांना
देतो दारी मी सुखाला निरोप हासुनिया ..

.

गायला मी सूर धरला हा असा लावूनिया -- [गझल]


गायला मी सूर धरला हा असा लावूनिया 
ती निघुन गेली कुठे का भैरवी समजूनिया ..

चांदणी तू जवळ माझी तारका लपल्या कुठे 
चंद्रही गेला ढगातच का तुला पाहूनिया ..

सर्व पुढती ते उपाशी झोडले व्याख्यान पण 
खूष नेता एक ढेकर जाहला देऊनिया ..

काम त्याचे खूप असते मग बसूनी हासतो 
लपवतो का ओळखीला काम तो उरकूनिया .. 

थेंब गाली ओघळाचे खूप काही ते तुझ्या 
दुःख माझे त्यात सारे चालले वाहूनिया ..

वाहत्या पाण्यात होडी कागदी मी सोडली 
बालपणही त्या प्रवाही पाहिले डोलूनिया ..
.

नेक रस्ता चालवेना --[गझल]

नेक रस्ता चालवेना 
वाम रस्ता सापडेना ..

एकटा मी सोबती तू 
हात हाती सोडवेना ..

समजुनीया हे सभागृह 
शांत का कोणी बसेना ..

काय झाले लेखणीला 
का कुणी जखमी दिसेना ..

खूप ज्ञानी येथ जमले 
पण शहाणा का कळेना .. 

दोन होते पण कवी ते 
एक श्रोता का बनेना ..
.

वन आंब्याचे नष्ट जाहले ..[गझल]

वन आंब्याचे नष्ट जाहले 
मोर नाचरे नाच विसरले ..

भूतकाळची माया ममता 
चालू काळी कष्ट उपसलेे ..

गेले निघून परदेशी ते 
भावी काळी अश्रू उरले ..

तोंडे बघतच पिता नि माता 
मरण न येई जगत थांबले ..

नाही येथे कुणी कुणाचे 
जमेल त्याने स्वार्थ साधले ..
.

चढली आहे रविराजाच्या लाली गाली - - [गझल]

चढली आहे रविराजाच्या लाली गाली 
संध्येच्या तो हसत निघाला हळुच महाली ..

संध्या सजली सोनेरी ती तोरण बांधुन
स्वागत करण्या रविराजाचे आतुर झाली ..

निळसर गगनी आनंदाने फिरती खगही 
वाहत वारा सुटला शीतल पुसत खुशाली ..

शुभ्र नि काळ्या वर मेघांचे ते भरकटणे 
शांत धरा ही जणु विश्वाला ग्लानी आली ..

चंद्र उगवला रविराजाच्या बघुनी अस्ता 
एक चांदणी चंद्रासोबत फिरत निघाली .. !
.

आसरा होता दिला मी पाहुनी त्याची दशा -- [गझल]

आसरा होता दिला मी पाहुनी त्याची दशा
तो दिशा दाही मला या आज फिरवीतो कशा..

टाकली विश्वास ठेवुन मान मी खांद्यावरी
कापली ती काय समजू आज मित्राला अशा..

विसरुनी रमली असावी सासरी मज ती जरा
देत नाही रोज उचक्या मीहि आता फारशा..

वाट काट्यातून ही मी चाललो आनंदुनी 
पाकळ्या मज टोचती अन दुखवती त्या खूपशा..

झिंगलेला वाटतो मी दोष तुमचा ना मुळी 
भेट घडली बहु दिसांनी त्या प्रियेची ही नशा..
.

सुगंध उधळत गेली निघुनी --[गझल]

सुगंध उधळत गेली निघुनी
मनास माझ्या इथे सोडुनी ..

जाता जाता लाडिक हसुनी
घरे काळजा सहज पाडुनी ..

नजरेचा तो तीर नेमका
हृदयावर या कसा फेकुनी..

ओळखपाळख नसता काही
छान बोलली समोर बसुनी ..

नजरभेट पण चार क्षणांची
सय जन्माची गेली पटुनी ..
.

केस भुरभुरणारे -- [गझल]

केस भुरभुरणारे
चित्त थरथरणारे ..

होताच स्पर्श तुझा
भान हुरहुरणारे ..

गंध तव अंगाचा
श्वास सुरसुरणारे ..

डौल तुझा पाहता
नयन भिरभिरणारे ..

होता आजहि स्मरण
ध्यान कुरकुरणारे ..
.