जाहीरनामा

" माझा प्रभाग . . 

धूम्रपानविरहीत
कचराविरहीत
अतिक्रमणविरहीत
तंबाखूगुटखापिचकारीविरहीत
मद्यपानविरहीत
खड्डेविरहीत
करीनच . ."

- असली खरोखरची समाजसुधारक घोषणा

 कुठल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात 

कुणी वाचली का हो !
.

पोट -

कुणीतरी 
कधीतरी
एकदातरी
 
जेवताना
लक्ष देईल का.. !

मेजवानी
झोडताना
"माणूस"
होण्याचे
कष्ट घेईल का - !

माजून
अन्न ताटात
टाकताना,

मेजवानी
नाहीतर नाही ,

निदान
त्यातला
एखादा घास ..

भुकेल्या पोटासाठी
ठेवील का ..!
.

मंद गारवा हवेत - [गझल]

मंद गारवा हवेत साथ तव सखे गृहीत 
दुग्धशर्करा ग योग गात गीत ये मिठीत..
गीत हे सुरेल छान ऐकुनी तुझीच तान
चंद्रमा बघे वरून चांदणीहि ये खुषीत..
दोन जीव शांततेत मस्त आज एक होत
दूर दूर अनिल नेत सूर मस्त संगतीत..
दो करात घे करांस पुलकित तन खास स्पर्श
श्वास धुंद जाहले नि बहरली तशीच प्रीत..
भास खास अंतरात होत वेगवेगळाच
भावना मनातल्याच खचित आपुल्या लयीत..
ठोकरून या जगास प्रीत आज ये भरात
मीलनात दंग होत गात गात प्रेमगीत..
जग सखे तुला मलाच वेगळे ग भासणार
विसरणार मी जगास दंगणार संगतीत..
वाढ स्पंदनात खास मीलनास प्रीति अधिर
आज दोन जीव एक वाव फार जवळिकीत.. !
-

लिहितेस कधी तू जेव्हा --


[चाल- नसतेस घरी तू जेव्हा...]

लिहितेस कधी तू जेव्हा
जीव सुटका सुटका म्हणतो -
लाईटचे वरती वांधे
अंधार सारखा पडतो .. 


तू लिहिता वीज रुसावी
जवळून दूर मी सरतो -
तू जरा दिशाहीन होते
अन घोळ नेमका होतो -


येताच ती वीज जराशी
धुसफुसून बघशी मागे -
खिडकीशी कागद वारा
तव धरण्यावाचून नेतो .. 


तव लिखीत ओळी साऱ्या
मज पाठ ग हजारवेळा -
स्मरणातच तुझे अडावे
मी उगाच अगतिक होतो -


तू थांब सखे लिहितांना
मी झाडू का घरदारा -
कागदाचा केर ढिगात
माझ्यासह घरभर फिरतो ..


ना अजून झालो लेखक
ना प्रसिद्ध कवी मी झालो -
तुजवाचून अडतच जाते
तुजपासून शिकत रहातो ..
.

पारध

 करण्यासाठी पारध माझी
बनलीस शिकारी समोर तू

शब्दांच्या शस्त्राने सखये
राहिलीस वार करतच तू

अथक केलेस प्रयत्न किती
मजला ठार करण्यास तू

ओरखडा ना मनास माझ्या
उमटवू शकली कधीच तू

निष्फळ ठरले प्रयत्न तुझे
हरून शेवटी दमलीस तू

टाकला असतास एक कटाक्ष
प्रेमळ जर माझ्यावर तू

पुरते घायाळ केले असतेस
कधीच नजरबाणाने तू ..
.

["साहित्य-लोभस"- दिवाळी विशेषांक - २०१५]

हा कोणाचा नवाच फतवा - - [गझल]

हा कोणाचा नवाच फतवा
कायम अफवा नवी पसरवा ..

खाक्या इथला जगावेगळा
नियमांना पण खुशाल तुडवा..

जीवननौका बुडू लागली
तिजला आता किनारा हवा ..

हसवत राहू कसा यापुढे
आणू कोठुन मुखवटा नवा ..

मधुमेही तो जरी सोयरा
मिष्टान्नेही खुशाल भरवा ..

.

एकेकाचे नशीब

"हु हु हुsssss
कालपासून
किती थंडी
वाजते आहे -"

- उबदार
पांघरुणातला
श्रीमंत
कुरकुरतो आहे -

"आर द्येवा
उद्यातरी
पोटाला
भाकरतुकडा
घावल का -"

- फाटक्या
घोंगडीतला
गरीब
कुडकुडत
पुटपुटतो आहे ..
-

तन एक मने दोन

एकदा
धडपड करत
गगनविहार करून
तुझ्याचसाठी
आकाशातला चंद्र
आणला होता -

तर
तेव्हा तूच
म्हणालीस ना

"अय्या,
एखादी चांदणीही
चालली असती
की रे मला !"

नंतर
हिंडून फिरून
चौकशी करून
एक छानसा रुमाल
तुझ्याचसाठी
आणला -

तर
फुरंगटून म्हणतेस -

"इश्श,
त्यापेक्षा
एखादी साडी
आवडली असती
ना हो मला !"
-

तुझे येणे दरवळ सुवास - - [गझल]

तुझे येणे दरवळ सुवास 
तुझे जाणे एकांतवास ..

तुझे रुसणे शब्द उपवास 
तुझे हसणे खास घरवास ..

तुझे छळणे श्वासनिश्वास 
तुझे बघणे अटळ विश्वास ..

तुझे दमणे हा अविश्वास 
तुझे रमणे आत्मविश्वास ..

तुझे असणे मधुर सहवास 
तुझे नसणे विधुर वनवास ..
.

हेकायंत्र


एकजण म्हणतो -
दक्षिणेकडे
झोपताना पाय करू नयेत .


दुसरा म्हणतो -
पूर्वेकडे
डोके करून झोपावे .


तिसरा म्हणतो -
उत्तरेकडे
पोट करून झोपावे .


तर चौथा म्हणतो -
पश्चिमेकडे
पाठ करून झोपावे.


........ एक नक्कीच....

माझी सगळ्या ह्या "हेकायंत्रां"वर
श्रद्धा असल्याने ,
ठरवले आहे -


छानपैकी एक "होकायंत्र" घ्यावे
डोळ्यांसमोर ठेवावे -


रात्रभर दिशा बदलत
निवांत झोपावे !


- - - ठीक आहे ना ?
.

उघडच होता घालत वैरी - - - [गझल]


उघडच होता घालत वैरी माझ्या आयुष्यावर घाला
असता बेसावध मित्राचा वार कसा पाठीवर झाला ..


म्हणुनी ज्याला त्याला माझा सांभाळत नाती मी गेलो
ना साथीला माझ्या कोणी कुत्रा फक्तच सोबत आला .. 


असते रोकड अपुल्याजवळी तोवर असती सच्ची नाती
दिसती पक्षी सोडुन जाता वठल्या निष्पर्णी वृक्षाला .. 


गावी परतायाला थोडा आळस माझ्याकडुनी होता
येता नयनी अश्रूपाझर संधी तुज ती बरसायाला .. 


पाझरती डोळ्यामधले ढग माझ्या पाहुन दु:खाला का
बघुन तरी त्या दुष्काळाला का न दया ये आकाशाला .. 

.