साखळीतल्या कुत्र्यावर -

साखळीतल्या कुत्र्यावर -
ते खूपच माया करती ;
' माया  ' नसल्या नात्यावरती
ते का डाफरती ?

त्यांच्या भ्रष्ट संपत्तीची
उधळण होते सगळीकडे !
माझी नजर मात्र वळते  -
माझ्या गळक्या खिशाकडे ?

रस्त्यावरून जाताना ,
एक भिकारी दिसतो ;
उपहासाने माझ्याकडेच
पाहून का हसतो ?

धडपड माझी चालू आहे -
पतंग उडवण्यासाठी !
दोर राहू द्या - रीळहि साधे
नाही , सध्या हाती !

एकेकटा 'मी ' रस्त्यामध्ये
गर्दी करीत असतो !
गर्दीच्या खिजगणतीमध्ये
कुठेच 'मी ' का नसतो ?    

दोन चारोळ्या -

झाली सवय झोपण्याची 
दु:खाच्या गादीवर मस्त -
करतो काटा सुखाचा का 
स्वप्नी येउनी मजला त्रस्त ..
.


पावसाचे थेंब काही 
अंगणी बघ आज पडले -
शब्द माझ्या मानसीही 
खेळतांना चिंब भिजले ..
.

ससा आणि कासव -

पांढरा शुभ्र कापूस जसा
इवला पिटुकला होता ससा

लाजरा बुजरा भित्रा जरा
अवखळ चपळ होता ससा

एकदा मळ्यातून फिरता  फिरता 
गेला तो  तळ्याकाठी तडक
 
इवल्या पिटुकल्या सशाला
दिसला मोठा एक खडक

खुदकन ससा मनात  हसला
ऐटीत खडकावरती  बसला

थोड्या वेळाने झाली गम्मत
सशाला वाटली जम्माडी जम्मत

खडक लागला हलायला
ससोबा लागले डुलायला

अचानक घडले तरी काय
सशाचे थरथरले की पाय

सशाला वाटले झाला भूकंप
त्याच्या अंगाला सुटला कंप

पहिले त्याने पायाखाली
जीव झाला वर खाली

नव्हता पायाखाली खडक
होती कासवाची पाठ टणक

कासवाने हलवली हळूच मुंडी
ससोबाची उडाली घाबरगुंडी

धूम ठोकली सशाने मळ्यात
कासव निघाले निवांत तळ्यात 

रोज कौतुकात दंग बायको जरी ,

( चाल: आज गोकुळात रंग खेळतो हरी - )

रोज कौतुकात दंग बायको जरी ,
लाटणे जरा जपून आज बघ करी  |धृ |

तोच मित्र रोज सिगारेट ओढतो
थेट खिशातून तुझ्या नोट काढतो ,
गुंतवुनी बोलण्यात चहा उकळतो -
सावध केले मी तुला कितीदा तरी  ||

सांग मित्रमंडळास काय जाहले ?
कुणी गंडविल्याविना कुणा न सोडले !
ज्यास त्यास लुटण्याचे चंग बांधले -
एकटाच वाचशील काय तू तरी  ||

तू कधीच रंगढंग नाही उधळला !
मित्रमंडळात तरी कसा गुंगला  ?
तो पहा - चंडिकेस पत्ता लागला ...
हाय, धावली धरून लाटणे करी  ||

हत्तीदादा हत्तीदादा -


हत्तीदादा हत्तीदादा
कसला आहार घेतो रे ?
अगडबंब शरीर बघून
शत्रू गार होतो रे !
ससेभाऊ ससेभाऊ
कुठला साबण वापरतो ?
शुभ्र रेशमी अंगाला
डाग एकही ना पडतो !
अस्वलकाका अस्वलकाका
कोणते तेल लावतो रे
केस नेहमी दाट काळे
गुपित काय सांग बरे ?
हरणा हरणा - थोडं थांब
कसले बूट घालतो सांग ?
उड्या मारत चपळाईने
लांब लांब टाकतो ढांग !
माकड माकड - हूप हूप
कुठली फळे खातो खूप ?
फांदीवरच्या कसरतीने
आम्हाला तू करतो चूप !
सिंहराज सिंहराज -
कोणत्या चघळता गोळ्या ?
त त प प करतो आम्ही
ऐकून तुमच्या डरकाळ्या !