हायकू -आकाशी पक्षी  
उडतात मजेत
शिकारी खिन्न 


            हाती लपली
            चार फुले चाफ्याची    
            शीळ वाऱ्याची


निजरूपाचे    
कुतूहल बाळाचे
आरसा खूष


            पुढे दगड 
            पडलेले रग्गड 
            मी का शहाणा


उत्सुक डोळे 
पिंडापाशी कावळे
मोकळा आत्मा

गाढवदादा गाढवदादा -गाढवदादा गाढवदादा -
माणूस म्हणू का ?
माणूस म्हणताच चिडून
लाथा झाडाल का ?  |१|

               मासेभाऊ मासेभाऊ -
               नापास झाला का हो ?
               रडून रडून सगळा
               टँक भरला की हो !  |२|

पोपटराव पोपटराव -
शीळ छान घालता राव !
मैनाताईला वाटतं का हो 
एकदा तरी वळून बघाव ?  |३|

               कासवपंत कासवपंत -
               लढायला किती हळू जाता ?
               ढाल पाठीवरती घेता
               तलवार कुठे विसरता ?  |४|

भोलानाथ भोलानाथ -
गुब्बू गुब्बू गुब्बू
पैशाचं मी पेरलं झाड
पैसे येतिल का रे ढब्बू ?  |५|

संथ पाडते गझला बाई ....

(चाल : संथ वाहते कृष्णामाई ....)


संथ पाडते गझला बाई -

गझलेवरच्या प्रतिसादांची जाणिव तिजला नाही..


कधी न आटपे काम सहज ती 

कूर्मगतीने सदा करी ती
बॉसगिरीची काही पर्वा नाही तिज ठायी ..


कुणी पुरे ना म्हणती गझला 

कुणी वर्णिती उच्च गेयता 

गण मात्रांची करून जंत्री मोजत कुणी राही ..


सतत चालते गझल-टंकणी 

निरोपातुनी न बाई शहाणी

वाचकास का व्हावी शिक्षा सांगा दुखदायी ..
.

तो पूर पावसाचा डोळ्यांत साठलेला - [गझल]


तो पूर पावसाचा डोळ्यांत साठलेला
प्रेमात भंगता मी डोळ्यांत दाटलेला 
   
आकाश भार झेले लाखो पतंग उडता     
माझा पतंग दिसतो तो खूप फाटलेला 

लाभात खूप आता व्यवहार येथ झाले
व्यवहार नेमका का माझाच घाटलेला   

माझ्या मनांत घुसले तव वार पापण्यांचे
जखमी कसा ग सांगू आनंद वाटलेला 

रस्ते अनेक दिसती ओसाड चालता मी
वाटयास मात्र माझ्या गर्दी झपाटलेला  
.

साहित्याशी जवळिक साधत -

साहित्याशी जवळिक साधत खुशाल हा बसणार ,
गोड बोलुनी सर्वांशी हा साहित्यातच रमणार !

भविष्यवाणी सांगुन गेले जाणते कुणी स्वर्गाला
भविष्यवाणी खोटी नव्हती , सांगतोच मी तुम्हाला !

बालपणीचा काळ सुखाचा - म्हटले आहे कुणीतरी
वह्या नि पुस्तक हाती पडता, चीरफाड मी नित्य करी ;

शैशवात मी वह्यांत लपवी - आठवणींची मोरपिसे ,
फूल सखीच्या गज-यामधले पुस्तकातुनी दडवितसे !

कविता, कादंबरी नि नाटक यांचा नव्हता गंध मला
दैनिक मासिक पुस्तक साहित्याची आवड तरी मला !

साहित्याशी सलगी करणे मजला खूपच आवडले,
'वजनदार साहित्य' मलाही रद्दीत घेणे परवडले !

दीड-दान्डीचे मोल मला; ते नसेल काही इतरांना -
हर्ष होतसे मलाच , माझा 'रद्दी डेपो' बघताना !!

सण पाऊस साजरा ---


निळ्या निळ्या नभातून -
कोसळती शुभ्र धारा ;

                 काळ्या काळ्या मातीतून -
                 ओल्या गंधाचा फवारा ;

हिरव्या हिरव्या कोंबातून -
दिमाखात ये फुलोरा ;

                 पिवळ्या पिवळ्या फुलांतून -
                 झुले तो  सोनपिसारा ;

अज्ञातशा कुंचल्यातून
खेळ रंगतो हा न्यारा !

                 सप्तरंगी  अफलातून
                इंद्रधनूचा नजारा -

फुलतो रोमांचातून 
मनमोराचा पिसारा -                          
        
                 होई  चिंब मिठीतून ...
                 सण पाऊस साजरा !

आल्या पावसाच्या सरी -

आल्या पावसाच्या सरी -
भिजू एकवार तरी ;
ओल्या माती गंधासंग ...
आणू प्रेमाला ग रंग !

नको साक्षी आणाभाका ,
पुरावा कशाला तो फुका -
साक्ष ओल्या अंगांगांची
पावसाच्या या सरींची !

प्रेम माझे तुझ्यावर
तुझे किती माझ्यावर -
सरींत मोजणी कशाला
जीव कधीचा हरवला !