करायला गेलो एक अन् -


भल्या सकाळीच .....
"बडबड्या" बायकोच्या माहेरून सासरेबुवांचा फोन आला -
 आणि नंतर ...

बायकोने मला माहिती दिली -
" काल आपल्या घरी,
आपली जेवणं झाल्यावर,
 माझ्या आईला पानाचा विडा दिला .
त्यात चुना जास्त लागल्याने,
आईचे तोंड खूपच भाजलेय . 
तिला आज बोलताही येईना म्हणे ! " 

मी म्हणालो  -
" अरेच्चा ! विडे वाटताना,
 काहीतरी गडबड झाली वाटतं, ! "

बायकोने उत्सुकतेने विचारले -
" कसली हो गडबड ? "

मी उत्तर देऊन चुकलो -
" अग एक विडा मी खास तुझ्यासाठी बनवला होता, 
तो चुकून तुझ्या आईला दिला गेला वाटतं ! "
.

हसणे - उदास चिंतन !

'
सकाळ प्रसन्नतेने उगवली
आणि मला उदास विचारात पाडून गेली...

सकाळी सकाळी बागेजवळून फेरफटका मारतांना,
 एका "हास्यक्लबा"तले सभासद हसताना दिसले आणि
माझ्याच मनांत एक हलकीशी कळ येऊन गेली ...

ह्या सर्व सभासदात -
मनापासून हसणारे किती ?
जुलमाने हसणारे किती ?
घरांत हसता येत नाही, म्हणून इथे येऊन हसणारे किती ?
मुळातच हसण्याची सवय नसणारे -
तरीही हसण्याचा प्रयत्न करणारे किती ?

चेहरे दिसतात केविलवाणे -
चेहरे भासतात उदासवाणे -
हसणे तरीही मुखावर आणणे -

लाचाचारीचे हासू ..
केविलवाणे हासू ..
विचित्र हासू...
भकासपणे हासू ..
कृत्रीमपणे हासू ..
व्यवहारी हासू ...
इतरांबरोबर हसावे लागणारे हासू ....
सगळे मुखवट्याआडचे हासू !!!

हसण्यातला नैसर्गिक आनंद ह्यातल्या कितीजणांना मिळाला असेल आजवर ..!

सगळेच ज्येष्ठ सभासद !

नोकरीत वेळ मिळाला नसेल ?
घरात हसरे वातावरण कधी अनुभवायला मिळाले नसेल ?
हसण्यावर बंधन येत असेल ?
गमती जमती- मौज मस्ती ह्यात रस नसेल ?

आयुष्यात विनोद कशाशी खातात, हे उमगले नसेल ?
निर्मळ मनाचा अभाव असेल ?
मुळातच स्वभाव चिडचिडा, तिरसट, तापट असेल तर ?

हसणारे हसताना दिसून गेले ,
प्रश्न असंख्य माझ्यापुढे ठेवून गेले ...!
.

कत्तल हिंदीतल्या एका फोडणीची -

'
प्रवासात आमची रेल्वेगाडी रुळावरून पुढे सरकू लागली...

आमच्या बायकोची हिंदी बोलण्याची गाडी रुळावरून,

आणखी किती खाली घसरून कोसळणार...,
या कल्पनेने माझ्या जिवाची घालमेल होत होती !

आमच्या समोर बसलेल्या त्या महिलेची आणि बायकोची चर्चा -

आता एकमेकीँच्या स्वैपाकाच्या पाककृतीवर सुरू झाली !

खिन्नपणे हताश होऊन,

ती चर्चा ऐकण्याखेरीज मी दुसरे काहीच करू शकत नव्हतो.

एकमेकीँच्या घरी स्वैपाकात "फोडणी" कशी करतात,

हा खमंग विषय समोर चर्चेत आला ...

बायकोने विषयाला तोँड फोडले आणि ती फोडणीबद्दल बोलू लागली,
" हमारे घरमेँ पैले पैले एक काळी पळीमेँ एक चमचभर तेल डालते है.
वो तेल उकळते नही, लेकिन थोडा गरम करके.....
फिर उसमे जिरे, हळद, मौरी, हिँगकी पावडर डालके चुर्रर्रर्र आवाज तेलमेसे आती है,

तबतक पळी गरम करते है.
वो तेल तडतडनेके बाद उसमेसे थोडे थोडे बुडबुडे कभी कभी देखते है.....!"

त्या महिलेच्या तोँडावर बायकोच्या फोडणीचा झालेला असर काय झाला, 

हे पहायचे धाडस म्यां पामराने नाही केले !
.

नको देवराया, अंत आता पाहू -

पुण्याच्या रस्त्याला एकदाचे लागलो.

माझ्या पोटात भलामोठा गोळा !


प्रवासात गाडीत बायकोसमोर दुसरी एक विशालकाय महिला.
ती पट्टीची अस्खलित हिंदी बोलणारी....


आणि आमचं अर्धांग हिंदीची पार कत्तल करून खांडोळी करणारं धाराशिवी पात्र ! 

दोघीत गप्पांना सुरुवात झाली -

आणि त्या महिलेने बायकोला विचारले -
" कैसा रहा आपका सफर, बहेनजी ?"


तत्परतेने आमचं हौशी अर्धांग उत्तरले -
" बहोत अच्छा  !
जिधर देखो उधर चहाके मळेच मळे थे !

वहाँ इतना बरफ था कि उस बरफमेँ काडी बुडाके 
बामगोळे बनाकर खानेकी,
लहानपणकी याद सारखी सारखी आ रही थी ! "

मनातल्या मनात मी काडी बुडवलेला बर्फ निवांतपणे,

 घशातल्या आवंढ्याबरोबर,
 खिडकीबाहेर नजर लावून गिळत होतो.
.

ती कॉफीवाली

दार्जीलिँगला मुक्काम ...
भल्यापहाटे चार वाजता मुक्कामाच्या ठिकाणाहून,

 कांचनजंगाचा पहाटेचा सव्वापाचचा सूर्योदय पहायला ..... 
 इच्छित स्थळी धडपडत रवाना झालो.

घरच्या चहाइतकेच दार्जीलिँग थंडगार असेल,

 अशा गैरसमजुतीने नवा खरेदी केलेला स्वेटर मी घातला. टक्कल असले तरी, 
वुलनची कानटोपी डोक्यावरून खप्पड गालापर्यंत ओढून घेतली.
देवानंदप्रेमी असल्याने शाईनिँग मारण्यासाठी ,

नवीकोरी मफलर मस्तपैकी सुरकुतलेल्या माझ्या गळ्यावर मी फेकली,
 आणि बालउत्साहाने सूर्यनारायणदर्शनासाठी द्वादशनामाचा जप करत राहिलो ...

अक्षरशः हज्जारोँची उपस्थिती त्या अनुपम सूर्योदयदर्शन सोहळ्यासाठी झाली होती.
"कॉफी कॉफी" ओरडत, एक विक्रेती आमच्यापाशी आली.
आम्हाला कॉफीचे कप भरून देऊन,
ती इतरांना कॉफी विकण्यासाठी , पुन्हा "कॉफी कॉफी" ओरडत गर्दीघोळक्यात दिसेनाशी झाली.
आम्ही कॉफी पिऊन कप फेकून दिले आणि सूर्यदेवागमनाची वाट पहात, 

नसते फोटो काढण्यात गुंगलो !

नाराज सूर्याने बहुधा आम्ही विनाअंघोळीचेच सर्वजण उपस्थित राहिल्याने, 

दर्शन देणे रद्द करून, ढगाआड रहाणेच पसंत केले असावे !

आम्ही उदास मनाने परत निघालो आणि.,.
कॉफीवालीच्या न दिलेल्या बिलाची आठवण झाली.


शेकडो गाडया परतीच्या मार्गावर निघालेल्या !
नेमक्या त्याच कॉफीवालीला शोधणे, 

म्हणजे फेसबुकी भाषेत,
शेकडो खात्यातले नेमके मुलीच्या नावाने चालू असलेले मुलाचे फेक खाते शोधणे ...
आम्हाला तिचे पन्नास रुपये बुडवून,

इमलेमाड्या बांधायच्या नव्हत्या,
पण प्राप्त परिस्थितीत केवळ तिच्या बिलासाठी थांबून रहाणे कठीण होते. 
आमच्यासर्वाँच्या मनाला खृप चुटपुट लागून राहिली.
नुसता पश्चात्ताप वाटृन आता आम्ही आतमक्लेश तरी कसा करणार हो ?


आम्ही हिरमुसल्या मनाने निघालो .
फर्लांगभर अंतर आमची गाडी पूढे सरकली आणि, 

कॉफीवाली गाडीच्या बाजृला उभी !
आयुष्यात कधी कुणाच्या पैचा अपहार न करण्याची इच्छा झालेल्या-

 आमच्या सुसंस्कारित मनाला अवर्णनीय आनंद झाला !

कॉफीवालीला तिच्या कष्टाचे फळ मिळालेच, शिवाय आम्हाला, 

आम्ही राजकारणी नसल्याने, 
एक नैतिक समाधानहि तिचे बिल चुकते केल्याने मिळाले !
.

पाणी म्हणजे जीवन


दार्जीलिँगहून कोलकत्याकडे जाण्यासाठी,

 आम्ही न्यू जलपैगुडी नावाच्या रेल्वेस्थानकाकडे कूच केली .
वाटेत नयनरम्य अशा सुंदर बर्फाळ 'कांचनजंगा'

 ह्या जगातल्या तिसऱ्‍या क्रमांकाच्या उंच पर्वतशिखराचे दर्शन झाल्याने ,
लग्नानंतर पुन्हा एकदा जीवनाचे सार्थक झाल्याची जाणिव झाली.
डोळ्याचे पारणे फिटेपर्यंत पाहून छायाचित्रात त्याला टिपले.

पण ...


त्या रेल्वेस्थानकावर मात्र एसीची सोय असून , 

एसी नेहमीप्रमाणे ऐन मोक्याच्या वेळीच बंद !
एसी हॉलमधल्या गैरसोयीने आणि गर्दीमुळे इतके हाल हाल झाले की, 

एकवेळ ते हालाहल नामक विष पिऊनही,
 जीवन आणखी एकदा सार्थकी लावले असते !

प्रचंड असह्य उकाड्याने अंगातून पाणी गळू लागले.
तहानेने जीव व्याकुळ-
तोँडाला पडली कोरड-
घशाची पाणी पाणी ओरड-

बाटली आणि नळाच्या साध्या पाण्यासाठी देखील
डोळ्यातून पाणी काढत ,
आम्हाला पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागला की हो !


अंगात एवढे पाणी मुरलेले असून,

 त्यावरही पाणी पडले !

पाणी म्हणजे जीवन... 

असे म्हणणाऱ्‍याचे कौतुक करावे तितके थोडेच !
.

चार चारोळ्या -

१.  पंचाईत -

नवस देवांना करून राहिलो
कार्य सिद्धीस घेऊन बसलो -
कुठल्या देवाला काय बोललो
हेच नेमके विसरून बसलो ..
.

२.  मत्सरी कुठले -

तुझे प्रेम माझ्यावर 
माझे प्रेम तुझ्यावर -
होऊ दे बघणाऱ्याच्या 
ओझे ते डोळ्यावर ..
.

३.  नशिबावर हवाला -

बुडणाऱ्याने बुडत जावे
बुडवणाऱ्याने बुडवत रहावे -
बुडणाऱ्याने बुडता बुडता
नुसते कपाळ बडवत रहावे ..
.

४.  वंदन -

अंकुर भुईतल्या बीजाला जडवतो
फूल फांदीवरच्या कळीचे साकारतो -
बाळ पोटातल्या जिवाचे घडवतो 
"अनाम कर्त्याला" त्या वंदन मी करतो ..
.