नेहमीच माझ्या बायकोची घाई ..

(चाल- नेहमीच राया तुमची घाई ..)

नेहमीच माझ्या बायकोची घाई
'नका लावू उशीर रांधायलाsss'
होते वेडीपिशी ती भांडायला हो,
होते वेडीपिशी ती भांडायला ..!

सकाळी सकाळी "चहा द्या" म्हणते,
"नाष्टा तयार ठेवा हो" म्हणते,
वेळ लागे डिशेस घासायला हो ..
होते वेडीपिशी ती भांडायला ..!

स्वैपाक लौकर तयार करतो,
ताट पाट पाणी तयार ठेवतो,
लागते बायकोच घोरायला हो ..
होते वेडीपिशी ती भांडायला ..!

टीव्हीपुढे सातला ती होते हजर
माझ्यापुढे नऊला करते गजर
"लौकर वाढा ना जेवायला हो" ..
होते वेडीपिशी ती भांडायला ..!

आजाराची कारणे शंभर तिची-
बसूनही दुखते कंबर तिची
कंटाळलो तिच्या मी वागण्याला हो..
होते वेडीपिशी ती भांडायला ..!
.

आ बैल मुझे मार

काल सकाळी 
बायकोला मोठ्या कौतुकाने फ्लिपकार्ट . ची माहिती दिली.
घर बसल्याच ऑर्डर दिलेला जिन्नस,
किती कमी कालावधीत आपल्याला घरपोच मिळतो, 
ह्याचेही रसभरीत वर्णन करायला मी मुळीच विसरलो नाही !
........ रात्री नऊ वाजता-
ती मला काळजीच्या स्वरात म्हणाली -
"
अहो, तो कोपऱ्यावरचा भाजीवाला दुकान बंद करून गेला की हो ! "
मी विचारले -
"
हात्तीच्या ! एवढच ना ?
अग, सकाळी मंडईतून आणतो ना मी काय आणायचे आहे ते !
कशाला काळजी करतेस आता ."
किंचित विचारमग्न होत ती म्हणाली -
"
त्यापेक्षा आपण अस करू या का..
सकाळी तुम्ही सांगितले ना....
तिथेच ऑर्डर देऊ या की दोन लिंब आणि दहा रुपयांच्या कोथिम्बिरीची ! "

टेबलाला धरून बसलो... 
नाहीतर खुर्चीवरुन खाली धाडकन कधीच कोसळलो असतो
!
.

'"" - हिरव्या हिरव्या झाडावरून - ""' (बालकविता)

हिरव्या हिरव्या झाडावरून    
हिरवा हिरवा पोपट सांगतो ,  
"लाललाल माझ्या चोचीतून    
विडा पानांचा छान रंगतो" ..

वाळवंटात पाणी शोधत
सगळीकडे फिरती मान ,
उंट पळवी शहाण्याला
लांबच लांब करुनी मान ..

उड्या टणाटण मारताना 
सशाचा डोळा लुकलुकतो
गवताची सळसळ ऐकून    
ससोबा घरी धूम ठोकतो ..

उलट्यासुलट्या कोलांट्या
झाडांच्या फांद्यांवरुनी , 
सर्कशीतला विदूषक जणू
दावी माकड खोड्या करुनी ..
.

तुजसाठी रडणार न कोणी ..!

 भल्या पहाटे सडा रांगोळी
हीटर गिझर बघा आंघोळी ..

इकडे चहापाण्याची तयारी
तिकडे दप्तर डबा न्याहरी ..
 

ह्यांचे ऑफिस त्यांच्या शाळा
सासू सासरा लावा जिव्हाळा ..

टीव्ही करमणूक दोनच घटका
आल्यागेल्यांचा रागही झटका ..

पहावे इकडे का मी तिकडे
डोळ्यांपुढती सदा साकडे ..

आयता चहा कधी मिळावा
गरम घास तो कधी गिळावा..

सहानुभूती कुणा न वाटे
विश्रांतीस्तव फुटती फाटे ..

कुणास रडगाणे सांगावे
प्रसंग पाहुन शहाणे व्हावे..

दुखणीखुपणी सहन करावी
दु:खी ओवी मनात गावी..

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
तुजसाठी रडणार न कोणी ..!
.

आपल्याच पायावर धोंडा !


टकलावरून हात फिरवत निवांत बसलो होतो.
तेवढाच विरंगुळा बसल्याबसल्या !

कंगव्याने आपले लांबसडक केस विंचरत,
 बायको आरशासमोर आली..
पर्यायाने माझ्याहीसमोर .

न राहवून उत्सुकतेने-
 (कुठून अवदसा आठवली आणि-) मी विचारले -

" तुझ्या ह्या लांबसडक केसांचे रहस्य काय ? "

मान वेळावत, हुंकारत....
 ती आरशात पाहून हसत उद्गारली-
" रहस्य कसल आलय त्यात डोम्बलाच !
ज्याच्यावर ते उगवलेत, ते महत्वाचे आहे की नै ?
ते रोज वापरात आहे ना....!"
.

नाइलाज आहे

"एssss
माझ्यावरही
कर ना एखादी कविता.."

बालिश हट्ट

तरी  किती
पदोपदी तुझा..

आता तुझी 

समजूत  घालण्यासाठी,
अख्ख्खा शब्दकोशही
मला अपुराच पडेल..

वेगळी कविता
मी
काय लिहावी ग...

तू ......
म्हणजेच
मूर्तिमंत कविता ..

तुला हे पटतच नाही
माझा नाईलाज आहे !
.

आयुष्यवृक्ष

विश्वासाचे बीज रोविले
चिकाटीचे खतपाणी केले

कर्तव्याचे रोप सुरेख उगवले
प्रामाणिकतेचे खोड जोपासले

मेहनतीच्या फांद्या वाढवल्या
हलगर्जीपणाच्या ढलप्या काढल्या

आळसाची बांडगुळे झटकली
कंटाळ्याची जळमटे सारली

जिद्दीची पाने लहरली
उत्साहाची फुले बहरली

उदासपणाची वाळवी रोखली
हक्काची फळे मधुर चाखली

आयुष्य-सरपण उपयोगी आले
आयुष्यवृक्षाचे सोने झाले
.

पोरांची जमली पावसाशी गट्टी - (बालकविता)

आकाश होते स्वच्छ निवांत
क्षितिजापर्यंत सकाळी शांत ..

तिकडून आले पांढरे ढग
इकडून काळे काळे ढग ..

"आम्हाला आधी जाऊ द्या"
"आधी आम्हाला जाऊ द्या" ..

धक्काबुक्की सुरू जाहली
झाला गोंधळ ढकलाढकली ..

केला सगळ्यांनी गडगडाट
सुरू सगळ्यांचा थयथयाट ..

भांडता भांडता रडू लागले
धो धो पाणी वाहू लागले ..

पोरेबाळे पाहू लागली
"पाऊस.. पाऊस" ओरडू लागली ..

गल्लोगल्ली धुमाकूळ तो
जो तो पावसात भिजायला पळतो ..

हिवाळ्यात जरी.. जरा उन्हाळा
मधेच घुसला हा पावसाळा ..

नव्हती सुट्टी.. शाळेला बुट्टी
पोरांची जमली पावसाशी गट्टी !
.

ढोल नगारा

कोण कोण येणार
काय काय मी करणार
तुम्हा सर्वांना
सांगून ठेवणार ..

नवरा माझा येणार
खोबरे मी खाणार
करवंटी त्याच्यासाठी
खवून ठेवणार ..

नणंद माझी येणार
चॉकलेट मी खाणार
कागद तिच्यासाठी
बाजूला ठेवणार ..

दीर माझा येणार
पेढे मी खाणार
खोके त्याच्यासाठी
जपून ठेवणार ..

सासू माझी येणार
केळी मी खाणार
साली तिच्यासाठी
सांभाळून ठेवणार ..

सासरा माझा येणार
जेवण मी करणार
ताट धुण्यासाठी
त्याच्यापुढे ठेवणार ..

आई बाबा येणार
स्वैपाक मी करणार
ताई दादालाही
बोलावून घेणार .. !
.

स्वामी समर्था, संकटहर्ता

स्वामी समर्था, संकटहर्ता
दुबळ्यांचा तू रक्षणकर्ता ..


"भिऊ नकोस,पाठीशी आहे"
नित्य वचन हे ध्यानी आहे ..


रात्रंदिन स्मरणात गुंततो
मनोमनी मी तुला वंदितो ..


माझे दु:खहरण तू करशी
मज आनंदी क्षणही देशी .. 


शक्य अशक्यासी तू करशी
अद्भुत लीला सहज दाविशी  ..  

उपकार तुझे मानु किती मी
अनंत जन्मी तुझा ऋणी मी .. !

.

कोंडमारा

बऱ्याच कालावधीनंतर 
आपण दोघे 
भेटल्यावर -
अलगद 
टिपून घेतोस आसवे, 
धुळीचे कण 
डोळ्यात गेल्याचे 
निमित्त दाखवून ..
जणू काही विशेष 
घडलेच नाही -

तुझ्या बाबतीत 
हे ठीक आहे ..

मी नाहीच 
आवरू शकत, 
माझ्या मनातला 
माझा कोंडमारा - 

तू  जवळ घेतल्यावर
वाहू लागतात ,

तुझ्या अंगावर 
माझ्या अश्रूधारा .. !
.

कसे करू स्वागता

नेहमीच्या डौलात
स्वत:च्या तोऱ्यात
निघालेली असते ती
निवांत माझ्या घरी ..
 
वर्दी देण्यासाठी
माझ्या सखीची
उतावीळ वारा पोचतो
आधीच माझ्या दारी ..

... अचंबित चेहरा तिचा
उल्हासित होत जाई 
हास्यासवे पाहुनी  
स्वागताची माझी तयारी ..


.

साजणे

वर्दी मिळता तुझी साजणे
गंध पसरला जाईजुईने ..


हळूच हसला कसा मोगरा
बघुनी मुखडा ग साजणे ..
 

पहा लाजली मनी अबोली
म्हणते गाणे संतोषाने ..

तुझी लागता चाहुल चाफा
डोलत आहे आनंदाने ..

गुलाब झाला वेडा का तो
रंगुनी गेला लालीम्याने .. 

प्राजक्ताने सडा टाकला 

श्वेत केशरी रंगाने  ..

निशिगंधाचे भान हरपले
झुलतो आहे बेहोषीने ..

गुलमोहर ग आला फुलुनी
पसरत आहे चहुबाजूने ..

जास्वंदी झाली आनंदी
टवटवली हिरवी ती पाने ..   

ब्रह्मकमळ बघ सुखावले
बहुत दिसांच्या विश्रांतीने ..

गेली बहरुन बाग ही सारी
केवळ तुझिया आगमनाने ..

अद्भुत लीला सखे साजणे
फुलले जग हे चैतन्याने .. !.

पसरायचे जे पसरून झाले - [गझल]

पसरायचे जे पसरून झाले
जखडायचे ते जखडून झाले 


जगण्यात गोटे सोनेहि दिसले
नशिबात होते वेचून झाले 


बांधून घेता पुण्यास पाठी
पापात माझे डुबकून झाले 


माझ्या लढयाचे अप्रूप नाही
झुरळासही मी पकडून झाले 


ठरलेच होते जैसे जगावे
गोत्यात नाते झटकून झाले 


आले यमाचे बोलावणे जर
आभार सगळे मानून झाले ..


.

डस्टबिन

लग्न झाले .
प्रथेनुसार तो तिच्या ताटाखालचे मांजर झाला.
तरीपण थोडेफार भान ठेवू लागला.
तारतम्य बाळगू लागला.

एके सकाळी ती त्याला म्हणाली-
"स्वच्छता अभियान सुरू झाले .
आपणही हातभार लावू.
आपल्या घरातल्या जुन्या डस्टबिनला "वृद्धाश्रमा"त पाठवू ."

त्याने थोडा विचार केला .

नंतर तो म्हणाला -
" ठीक आहे.
माहेरी तुझ्या भावाला फोन करून विचार-
"तिथल्या डस्टबिनचीपण वाट लावायची आहे का"- म्हणून.
एकाचवेळी इथले आणि तिथले काम होईल !"

बुमरँग असे अचानक आपल्यावर उलटेल, 

असे तिच्या ध्यानीमनीही नव्हते ..

डस्टबिनचा विषय कोपऱ्यात पडून राहिला तो राहिलाच...... धूळ खात !


.

असे का होते -

असे का होते, समजत नाही
पण तसेच घडते, हे मात्र खरे ..

देवळात गेलो की,
कमीतकमी किंमतीचे
नाणे खिशातून निघते -

हॉटेलात गेल्यावर मात्र,
डिशच्या भावाचे
मूल्यमापन नसते ..

देवळात गेलो की
रांगेत उभा रहायला कुरकुरतो ..

हॉटेलात नंबर लावून
बाहेर मुकाट चुळबुळतो ..

देवळासमोरच्या भिकाऱ्याच्या थाळीत
त्याने अजीजीने मागितले तरीही
एक नाणे टाकायला
हात मागेपुढे पाहतो ..

हॉटेलसमोर दरवानाच्या हातात 

त्याने कडक सलाम ठोकला की,
दहाची तरी नोट
बिनधास्त मी टाकतो .. !
.

काही जमत नाही .. तरीही-

हसायला मुळी जमत नाही
कवळी तोंडात राहत नाही ..
चालायला नीट जमत नाही
हातातली काठी डुगडुगते ..

नात्यागोत्यात जमत नाही
रुसव्याफुगव्याची गंमत नाही ..
वाचायला काही जमत नाही
चष्म्याची काडी खाली घसरते ..

रुसायला कधी जमत नाही
लक्ष कुणी देतच नाही ..
बसायलाही जमत नाही
गुडघ्याची वाटी कटकट करते ..

कुचूकुचू काही जमत नाही
कानांची साथ मिळत नाही ..
श्वासोच्छ्वास जमत नाही
धाप खालीवर होत राहते ..

जगायला आता जमत नाही
जगण्याची आशा सुटत नाही ..
.

अजुनी बसून आहे

(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना )

अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना
उघडे तसेच फेस्बुक
लॉगौट.. मन धजेना ..

मी फेस्बुकासमोरी
फेस्बुक-अॅडिक्ट आहे ..
मी हेच सांगताना
रुसुनी कधी बसावे
मी का इथून उठावे
समजूत का पटेना
धरसी अजब अबोला
तुज मौन सोडवेना ..

का पोस्ट मी लिहावी
चर्चाहि होत आहे
मेजवानी वाचका त्या
जाणून उत्सुकाहे
काही अटीतटीने
कुढता अढी सुटेना
कॉमेंट ये स्टेटसला
ऐसी स्थिती इथे ना ..

हा गूढ काही घाव
अन्फ्रेंडचाच रंग
कॉपीस खूप वाव
करण्यात होत गुंग
नावाविना कसा हा
बघ पोस्टतो कळे ना ..

अजुनी बसून आहे
गुंता मुळी सुटेना ........
.

जीवन ह्याला ऐसे नाव... (गझल)

खाटेवर देईल हरी मज जीवन अर्धे फसलो मी 
तळहातीच्या रेषा झाकत अर्धे जीवन हसलो मी  
 
गंडेदोरे नवस तोडगे धडपड करती काही ते    
असेल नशिबी घडेल ते ते म्हणून निवांत बसलो मी        

कष्टातूनच ईश्वर मिळतो कळूनही त्याला मुकलो               
प्रयत्न नाही केले काही आळसात समरसलो मी            

कुण्या मुखातुन निंदा आली माझ्या कानावर ऐकू               
उभारून या जिभेचा फणा तिथल्या तिथेच डसलो मी        
                
तू तू मी मी होत राहता पळून हळु कोणी जाती   
असती वेठबिगारी काही कधीच ना खेकसलो मी ..  
.

प्रेमभाषा

किती आढेवेढे
किती आडवळणे

पदराशी चाळा
दाती ओठ दाबणे

फरशीकडे नजर
मान झुकवणे

हातात हात
शहारून जाणे

अलवार स्मित
रोमांचित होणे

इतरांची चाहूल
गाल गुलाबी होणे

'आय लव्ह यू'..
अस्फुट पुटपुटणे ..

.

जीवन

हसून घ्यावे
रुसून घ्यावे
चार दिसाचे
हे तर जीवन

कुढत रहावे
सडत रहावे
पिडत रहावे
नकोच जीवन

छंदात रहावे
वंदित रहावे
धुंदीत रहावे
क्षणैक जीवन

प्रेम घ्यावे
प्रेम द्यावे
वैर शमावे
दुर्मिळ जीवन

शांत रहावे
निवांत रहावे
खंत न करता
जगावे जीवन

गाणे गावे
खाणे खावे
जगणे जगावे
हे तर जीवन ..

.

आली दिवाळी


छ्या ! ह्या बायकोने नसतीच आफत आणली की हो !
आज सुट्टीचा दिवस .
वाटल काही तरी मस्त मस्त खायला मिळेल.

पण कुठलं काय नि पिठलं बी न्हाय !

आज तिने हट्टच धरला -
 "मी पण आजपासून फेसबुक वाचणार बर का हो तुमच्याबरोबर !"


मी झिडकारून म्हटले -
"अग, काही विशेष नसते ग ह्या फेस्बुकात !"

ती उसळून म्हणाली- 
" तुम्ही तसेच म्हणणार, हेही माहीतच होत मला !
पण मला सांगा- आता रोज कुणीतरी तुमची मैत्रीण 
हॉटेलातले चकली, शेव, अनारसे, करंजी, निरनिराळ्या लाडूचे फोटो टाकणार की नाही फेस्बुकावर.... 
आणि ते 'घरी केलेले' म्हणून बजावत फुकटचा टेंभा मिरवणार ना ?
तुम्ही ते मिटक्या मारत,
 "वा वा ! छान ! खमंग हं ! मस्त मस्त ! हौ स्वीट !" असे खोटे खोटे का होईना म्हणत..
मनांत खात बसणार तासनतास !
मी पण तुमच्याबरोबर इथेच बसून राहणार आणि खाणार ! 
आत मी मेली एकटीच मरमर किती करत बसू हो ?"

मुकाट्याने लॉगौट केले आणि-
 लाडू वळायला तिच्या मदतीला गेलो !
.

अशी दिवाळी माझीहीबंगल्यामधुनी समोरच्या 
तो आवाज कानी येतो ..

झोपडीतले काम हातचे  
सोडून जागा ती हेरतो .. 

माळ हजार फटाक्यांची 
आवाज फटाफट घुमतो ..

फुलबाज्या रंगीत अर्ध्या 
धूर मस्तसा दिसतो ..... !

सारीकडे चिडीचूप होता 
मी कानोसा हळूच घेतो ..

फुसके फटाके वातींचे 
एकेक गोळा करतो ..

अर्ध्या उडलेल्या फुलबाज्या  
फाटक्यात साठवतो ..

पणतीवर मी शेजाऱ्याच्या  
कागद एक पेटवितो ..

फुलबाज्या फटाके जमलेले  
त्यावर पसरून देतो ..

रंगबिरंगी आवाजाची 
दिवाळी साजरी करतो .. !
.

आई.. तुझीच आठवण होते -

मेसमधल्या वरणामधुनी
येतो दाताखाली खडा
आई.. तुझीच आठवण होते
पाणावतात डोळ्यांच्या कडा ..


कॉटवर वसतीगृहात मी
फणफणत्या तापात ग्लानी
आई.. तुझीच आठवण होते
मित्राच्याही करस्पर्शातुनी ..


रस्त्यामधे तंद्री लागता 
दगडावरती बोट ठेचते ;
आई.. तुझीच आठवण होते
हळद चिमुटभर समोर दिसते ..


वाटे, आता घरीच रहावे
गाणे गुणगुणत डोळे मिटून 
आई.. तुझीच आठवण होते
अंगाई घुमते कानामधून ..

.

काव्यरूप

सकाळी सकाळी 
मनातल्या भावना 
ओतल्या कागदावर 
पसरले शब्द ..

काही अर्थपूर्ण 
बोजड अवघड 
काही निरर्थक 
उनाड उनाड ..

काही आवरले 
काही सावरले 
जरासे साकारले 
जरासे विखुरले ..

वा वा सुंदर
काही प्रकटले 
एकदम भिकार 
काही सटकले ..

अक्षरे तीच 
शब्दही तेच
मागेपुढे रचले 
काहींना पचले ..

वेगळे तन मन 
वेगळ्या भावना 
डोळ्यात अप्रूप  
वेगळे काव्यरूप  ..
.

त्या गेंड्याची दोन पावले


(चाल -  या डोळयांची दोन पाखरे ..)

त्या गेंड्याची दोन पावले, 

फिरतील तुमच्या भवती -
पाठलाग ती सदैव करतील, 
फक्त मताच्यासाठी .....

वर्तन तुमचे, हात असे हो 

त्या गेंड्याचा थारा 
सहवासातून हवाच त्याला, 
नित्यच तुमचा नारा   
तुमचा परिचय त्यास हो आंदण, 
बिलकुल मताचसाठी ..    

भाव देतही असतील काही, 

पैसा अडक्यातुनी
एका मताचसाठी तुमचे 
धरतील कर दोन्ही      
आहेत डोळे, क्षणैक प्रीती, 
ते तर खुर्चीवरती ..  

.

संसार


चहा पिणे झाल्यावर, 
माझा कान दूर असल्याने, कपाचाच कान धरून, 
तो टेबलावर आदळत, 
बायको धुसफुसत म्हणाली-
" ह्या दिवाळीला मला एखादा दागिना करायचा-"

मी शांतपणे म्हणालो - " उद्या बघू !"

ती पुढे म्हणाली- " निदान नवी पैठणीतरी घ्यायची-"

बशी हळूच खाली ठेवत मी म्हटलं - " उद्या बघू !"

तिने मधेच विचारले- "आज हॉटेलात जाऊ या का ?" 

त्यावर पुन्हा माझे उत्तर - "उद्या बघू !"

ताडकन उभी राहत बायको उद्गारली -
"प्रत्येकवेळी माझ काम उद्यावरच का ढकलायला बघता हो ! 
अस सारख सारख ऐकत रहाण्यापेक्षा, 
घरातून आजच कुठेतरी निघून गेलेलं काय वाईट ? "

तिच्याकडे पाहत, मी पटकन म्हणालोच-
"असं म्हणतेस ? 
एखाद्या चांगल्या कामाला नाही कसे म्हणू ग !
चल, माहेरी सोडू का तुला... 
आज आत्ता ताबडतोब ?
पण, नंतर ओरडू नकोस हं...
आता कसं उद्याचं काम आजच उरकलं म्हणून !"
.

आलीया भोगासी


नेहमीप्रमाणे मी आपला फेस्बुकात डोके खुपसून बसलो होतो .

अचानक मागे लक्ष गेले ..

बायको आपल्या नाकपुड्या फुगवत ,
तणतण करत , धुसफुसत ,
इकडे तिकडे येरझाऱ्या घालत असलेली दिसली ...!

मी तिच्याकडे पहिले, हे तिने पाहिले ... 

आणि तिने बॉम्बस्फोट केला -

" झाले का हो त्या फेस्बुकावर तासभर,
रेखाचे फोटो पोटभर न्याहाळून/लाईक करून/कॉमेंट करून/शेअर करून एकदाचे..?
चला आता.. 
आज माझ्या वाढदिवसासाठी साडी आणायची कबूल केल होत ना ?
माझ्याच वाढदिवसाची आठवण नेमकी राहत नाही तुम्हाला .."

पाकिटातले एटीएम कार्ड चाचपून-
मुकाट्याने "बिचाऱ्या नवऱ्या"ची भूमिका पार पाडायला,
मला सज्ज व्हावेच लागले शेवटी !

.

चारोळीमय जीवन


परवा कोजागिरीच्या दिवशीची गोष्ट.

बायको तिच्या स्वैपाकाच्या नादात.

मी काहीतरी खरडायच्या माझ्या नादात .


बायको आतून ओरडली-
"अहो, सात-आठ चारोळ्या पाहिजेत मला !"

मीही मान डोलावतच आत गेलो आणि-
माझी चारोळ्यांची वही पुढे करून म्हणालो-
" कुठल्या....सांग. एकापेक्षा एक छान आहेत !"

उलट उसळून ती म्हणाली -
" फाडा ती वही आणि घाला ह्या गरम गरम दुधात ,
चांगले टेस्टी लागेल तुम्हाला ते -
रात्री कोजागिरीच्या  चांदण्यात बसून प्यायला !"


माझ्या डोक्यात प्रकाश पडला.... 
तिला त्या समोरच्या बरणीतल्या 
चारोळ्या हव्या होत्या ! 
.

टीकाकारच तो

सुचले काही
भर भर

खरडले काही
खर खर

नजर टाकली
वर वर

जरा जाणली
थर थर

नीट लिहिली
झर झर

पुन्हा वाचली
सर सर

उगाच केली
मर मर

चक्कर आली
घर घर

हृदय कापले
चर चर

त्याने फाडली
टर टर

.

क्रांती

 " मी कवी आहे..."- सगळीकडून हे
सगळीकडे जगजाहीर झाले आहे ..

जो तो आपले पाकिट चाचपून पाहत आहे
जमलेच तर पाकिट लपवून ठेवत आहे ..

मी अलिकडून येताना दिसलोच तर  
तो रस्त्याच्या पलीकडून जात आहे ..

मी समोरून येताना दिसताच
तो उलट पावली माघारी फिरत आहे ..

रद्दीवाला येताजाता नमस्कार करत आहे
चहावाला माझी नजर टाळत आहे ..

माझी चाहूल लागताच आंधळा भिकारीदेखील
आपला वाडगा अथवा थाळी पुन्हापुन्हा चाचपून बघत आहे .. 

गद्य लेखक, चारोळीकार, गझलकार हा सगळा वर्ग
अंमळ तुच्छतादर्शक नजरेनेच मजकडे पाहत आहे ..

येणारा जाणारा मला बघून आपल्या खिशात हात घालतो 
आणि स्वतःच्या खिशातले कापसाचे दोन बोळे काढत आहे ..

वरचेवर मी हाडकुळा आणि बायको जाड दिसत आहे
असे दूरूनही पहाणारा कधीतरी भेटलाच तर सांगत आहे ..

नातेवाईकांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे
त्यामुळेच की काय बायको बहुधा खूष आहे ..

पाहुणे आणि मित्र-मंडळींची वर्दळ कमी होत आहे
असे मला एकट्याला उगाच वाटत आहे ..

महिनाअखेरीसही बरीच शिल्लक पडत आहे
असे आतल्या गोटातून मागल्या हाताला समजत आहे ..!
.

तू तिथ मी

दोन वर्षे झाली होती लग्नाला .
सुट्टीचा दिवस होता. 

दुपारचे दोन वाजून गेले होते.
जेवणाचा पत्ता अजूनही नव्हता.

रीतीरिवाज, प्रथेनुसार नेहमीचे-

 आमचे नवराबायकोत भांडण सुरू झाले.

मी त्राग्याने विचारले,
" तुला सुट्टीच्या दिवशीच कसा उशीर होतो ग स्वैपाकाला ?
आता जेवायला मी घरात नाही थांबत.
बाहेर हॉटेलातच जेवून येतो. "

बायको चट्कन म्हणाली,
" दहाच मिनिटे थांबता का ? "

मी उत्सुकतेने पण चिडूनच विचारले,
" दहाच मिनिटे ? आणखी दहा मिनिटात तू स्वैपाकाचा असा काय उजेड पाडणार आहेस ग ? "

दुप्पट आवाजात, 

पण बायको ठामपणे ओरडली-
" माझ्या स्वैपाकाचा मी उजेड पाडीन,

 नाही तर अंधार !
पण तुम्हाला मी कशी बरी जाऊ देईन,
बाहेर हॉटेलात
एकट्यालाच जेवायला ?  थांबा -
दहा मिनिटात मीही तयार होते...

आणि तुमच्या बरोबर हॉटेलात जेवायला येते ! "
 

.

सात पावलांच्या वचनात

तुझा हात माझ्या हातात
माझे डोळे तुझ्या डोळ्यात
दोघे आपण मिठीत निवांत
प्रीत गुंतवून एकमेकात..

तुझे मन माझ्या विचारात
माझे मन माझ्याच विचारात
भविष्य आपले मनामनात
क्षणोक्षणी राहू आधारात..

चुका क्षम्य म्हणे युद्धात
चुका क्षम्य म्हणे प्रेमात 
चुकायचे नाहीच जीवनात
विचार दोघांच्याही मनात..

दोघांची एकमेकांना साथ
अतूट ठेवायची बंधनात
चालणे आहे आता सुखात   
सात पावलांच्या वचनात .. 

आजचा रंग - गुलाबी

गुलाबी साडी अंगावर
गुलाबी ब्लाऊज साडीवर
गुलाबी टिकली कपाळावर
गुलाबी गुलाब बॉबकटवर
गुलाबी रूज गालावर ..

सगळा सगळा मामला- 

आपल्या गुबगुबीत गुलाबी अंगभर,
वेवस्थित जमलेला बघून...
आपल्या गुलाबी ओठांवर,
गुलाबी लिपस्टिक फिरवत ती आरशात बघत होती ..

सकाळी सकाळी त्याने बायकोला विचारले-
" अग, तू शाळेत जाऊन,

त्या स्वच्छता अभियानात भाग नाहीस का घेणार ? "

पन्नास पादत्राणातून गुलाबी जोड शोधून,

पायात सरकवत,
ती उत्तरली-
" त्यासाठीच तर निघालेय ना !
पण आता तो मेला गुलाबी झाडू
नेमका ह्यावेळेसच शोधायचा म्हंजे..........!"
.

आनंद लुटू अवघेजण

आज पहाटे पहाटे साडेचार वाजता साखरझोपेतून अचानक जाग आली.

नेहमीप्रमाणे फेसबुकाचे तोंड न पाहता वेगळे काहीतरी करायचे ठरवले.

मोबाईल घेतला.
हेडफोनचे एक टोक त्यात खुपसले .
दुसरी दोन टोकं माझ्या दोन कानात .

गाण्यांचा विभाग शोधला आणि यादीवरून बोट फिरवले.
माझे डोळे झाकून ठरवले.
कुठल्याही एका गाण्यावर बोट थांबू दे.
ते प्रथम ऐकायचे......

आणि काय सांगू मित्रहो -

लता आणि भीमसेनजी माझ्या कानात आपले प्राण आणून गाऊ लागले.
जणू काही माझ्या एकटयासाठीच.

अहाहा .. आधीच पहाटेची शांत वेळ आणि कानात हे गाणे ऐकायला ...

...." बाजे रे मुरलिया बाजे रे
अधर धरे मोहन मुरली पर
होंठ पे माया बिराजे... "

तुम्हाला सांगितल्याशिवाय कसा बरे राहीन ..

"आनंद लुटणे" म्हणजे आणखी दुसरे काय असते हो ?
 

.

चैन बेचैन

महिनाअखेर सुरू झाला .
मध्यमवर्गाची "चैन" आठवली .

पगाराच्या दिवशीचा पहिला आठवडा ....
खिशातल्या नोटा बाहेर दाखवत,
दुनियेला फाट्यावर मारत,
मस्त मजेत खाऱ्या काजूवर ताव मारणे .

दुसरा आठवडा.... पुढचा हिशेब आठवत,
किसमिसाचे तोबरे भरणे .

तिसरा आठवडा-
इकडे तिकडे बघत, हळूच पुडीतले शेंगदाणे मोजत चरणे ...

आणि...................

शेवटच्या आठवड्यात -
पोरांच्या बरोबरीने जिभल्या चाटत आवडीने लेमन गोळ्या चघळणे !

खरय ना ?
.

बगळे


सगळे बगळे
आगळे वेगळे..

कामापुरते
गळ्यात गळे..

काम होताच
पकडतात गळे..

एका पायावरती
टपलेले बगळे..

दोन पायावरचे
धूर्त काही बगळे..

स्वार्थ असता
काढतात गळे..

सत्ता दिसता
दाबतात गळे..

संधी मिळता
ओढतात गळे..

केसाने मग
कापतात गळे.. !
 
.

कवितेचा मोर

कवितेची भट्टी जमली मजला
पाव किलो "श्वास" गोळा केला ..

अर्धा किलो "यातना" त्यात ओतल्या
पाऊण किलो "वेदना"ही मिसळल्या ..

एक किलो "जखमा" शोधून ठेवल्या
दीड किलो "मलमपट्ट्या" वर लावल्या ..

दोन किलो "प्रेम" हळुवार साठवले
अडीच किलो "अश्रू" त्यात गोठवले ..

तीन किलो अशुद्ध, चार किलो शुद्ध
रांगेत ठेवले एक मीटर शब्द ..

एवढा मसाला उत्साहाने जमवला
थोडाही कंटाळा नाही मी केला ..

रसिक/अरसिक थोडे आले समोर
नाचवला माझ्या कवितेचा मोर .. !
.

'विरोधाभास -'

एखाद्याने म्हटले 'अरे '
दुसरा नक्की म्हणतो 'का रे '..

एक आणतो बासुंदी घडा
दुसरा टाकतो मीठखडा..

एखादा 'वा छान ' म्हणतो
दुसरा शेरा 'भंकस ' हाणतो ..

एक आनंदे टाळ्या वाजवी
दुसरा बंद पाडण्या वाजवी..

असे एखादा 'किती छानसा '
दिसतो दुसरा 'असातसा '..

एका दगडाचा 'देव ' बनतो
दुसरा मात्र 'दगड 'च राहतो..

सूरत नियत नको एकसमान
पारखावे कैसे साधू-सैतान..!

.

बूमरँग

बातमी वाचली..
आणि बायकोच्या ज्ञानात थोडीशी भर घालावी म्हणून,
मी घाईघाईत स्वैपाकघरात डोकावलो.

बायकोचे दोन्ही हातानी धबाधब कणिक तिंबणे चालू होते.
एका बाजूला लाटणे, दुसऱ्या बाजूला पोळपाट होता. 
सावध पवित्रा आणि सुरक्षित अंतराची काळजी घेऊन,
मी तिला म्हणालो-

" अग, हे बघ !
आपल्या इस्रोने 

त्या कोट्यावधी किलोमीटर अंतरावरच्या मंगळ ग्रहावर,
यशस्वीरीत्या यानाची पाठवणी केलीय आणि मंगळाची माहिती आणली,  बरं का ! "

आपले कणिक तिंबण्याचे कार्य यशस्वीरीत्या चालूच ठेवत,
बायकोने प्रत्यक्ष घाव न मारताही,
एक शाब्दिक तडाखा मला हाणलाच -

" तुम्हीच बघत बसा ! जग कुठल्या कुठे चाललय .
तुम्हाला मेलं साध, 

अर्ध्या फर्लांगावरच्या मंडईत चालत चालत जाऊन,
कोथिंबिरीच्या चार काड्या आणायचे किती जिवावर येतंय ! "

मी खालमानेने आणखी हाल नकोत,
या सूज्ञ विचाराने खालमानेने हॉलमधे परतलो .


.

काटा रुते कुणाला

मी फूल तोडण्यासाठी
हलवले जरा फांदीला..
" हळूच सांभाळून रे.."
आवाज फुलातून आला -


दचकलो.. हाय..थोडा मी ,
बोटातच घुसता काटे..

हुंदके फुलाचे काही
टपकले पाकळ्यांवाटे ..
.

बिन पाण्याने

श्रावणानंतरचा रविवारचा दिवस,
निवांत दिवस !

डोक्यावर आणि हनुवटीवर केसांचा भारा वाढलेला...
म्हटलं चला-
आज सगळा भार उतरवून टाकूया !

केसांची वाट लावायची ठरवल्याने,
पावलांनी आपोआप केशकर्तनालयाची वाट धरली

नाभिकमित्राने बाटलीतून पाण्याचा मस्त फवारा उडवला....
वाटलं....
बहुतेक आसारामकडे होळी साजरी करून आला असावा !

डोक्यावरच्या केसांची वास्तपुस्त झाल्यावर,
 त्याने गमतीने विचारले,
"साहेब, दाढी पाण्याने का बिनपाण्याने ? "

मी उत्तरलो -
" घरी आणि ऑफिसात,

 आमची बिनपाण्याने होतेच -
निदान इथे तरी पाणी वापरा ! "
.

आम्हाला जमणार नाही

दारिद्र्यात खितपत पडणे
आम्हाला जमणार नाही..

सत्ता पद खुर्ची सोडणे
आम्हाला जमणार नाही..

सत्यअहिंसाशांती रुचणे
आम्हाला जमणार नाही..

शिष्टाचार पाळणे कधी
आम्हाला जमणार नाही..

सुसंस्कृत सदाचारी असणे
आम्हाला जमणार नाही..

घोटाळ्यावाचून जगणे
आम्हाला जमणार नाही..

भाषणात आश्वासन गाळणे
आम्हाला जमणार नाही..

रात्री हेवेदावे दिवसा एकी
आम्हाला जमणार नाही..

लांगूलचालन सोडणे कधी
आम्हाला जमणार नाही.. !
.

नसते वेड हे मला लागले

दार घराचे उघडे माझ्या
असेच होते कधीतरी 
दारातुन डोकावुन गेली
कशी अचानक हळूच परी ..

ती डोकावुन गेली एकदा
मी अस्वस्थच कायमचा  
पुन्हा कधी येईल परी ती
मनात क्षण नित उत्सुकतेचा ..

थोडे हलले दार घराचे
वाटे आली असेल का ती
निराशाच येई परि पदरी
दुसरे निघते कुणीतरी ..

डोकावणे ते तिचे एकदा 
दुखणे ठरले मज कायमचे
नसते वेड हे मला लागले   
नेहमी बाहेर डोकावण्याचे ..
.

घरोघरी


मी बर माझ घर बर
कशाला नसती उठाठेव
घरात करत बसाव
निवांत आपल देव देव ..

तुमच तुमच्यापाशी
आमच आमच्यापाशी
कशाला करायची हो
इतरांची नसती चौकशी .....

आलेच हं दोन मिनिटात
शेजारच्या की-होलात डोकावून
डोळे जरा लावून अन
कान थोडे भिंतीला लावून ..

हीच बोंब घरोघरी -
म्हणायची नेहमीच घाई
....आमच्या तरी कधी घरी
अस्स काही नसत बाई .. !

.

पैज

बायको माहेरी गेली की, माझ्या अंगावर काटा येतो.
(....सासरी असली की गुलाब असतो, हे वेगळे सांगायलाच हवे काय !)

जुन्या मैत्रिणी भेटल्यामुळे,
ती माहेराहून येताना बरोबर हमखास काहीतरी नाविन्य घेऊन येतेच .

परवा गेली होती आणि येताना "पैज" नावाचे नाविन्य घेऊन आली.
उठता, बसता, चालता, बोलता, हलता, डुलता ..
प्रत्येक गोष्टीला...
पैज लावण्याची नवी खोड तिला लागली .

मी चिडूनच तिला म्हणालो-
"अग, सारखी सारखी काय पैज लावतेस?"

ती त्यावर उत्तरली --
"बरं बाई,राहिलं!
यापुढ कध्धी पैज लावणार नाही,मग तर झालं !"

मी उलट विचारले -
"हे  तुझे म्हणणे तरी मी कशावरून खरे समजायचे ?"

हसत हसत ती म्हणाली -
"कशावरून म्हणजे?
मी सांगतेय ना म्हणून !
अगदीच खोटं वाटत असलं माझं म्हणण तर...
... लावता का पैज ? "
.

आयुष्याची तब्येत

एखाद्या सुट्टीदिवशी-

चल ग,
जरा बागेत फिरून येऊ.
जाम कंटाळा आलाय.
आठवड्यात काम, काम, काम !
मागची सुट्टीही तशीच गेली-
थोडस फ्रेश होऊन येऊ . .
बर वाटेल बाहेरच्या वातावरणात ....

नको रे .
आज गुरुवार आहे.
आज माझा उपास आहे .
मंदिरात जाऊन येऊ.
उशीर लागला तरी हरकत नाही,
मागच्या गुरुवारीपण,
जमलेच नव्हते ना आपल्याला जायला तिकडे !

...... कुरबुर आणि मनस्ताप वाढल्यावर,
जेवणाच्या वेळा अयोग्य झाल्या तर ,
आयुष्याची तब्येत

 कशी जपणार ही दोघं भविष्यात ?
.

माणसातला देव

बऱ्याच दिवसांनी तो आपल्या मित्राच्या घरी आला होता.

"काय रे, आज कशी काय वाट चुकला इकडे ?" - मित्राने विचारले.

" आज शुक्रवार ना, संतोषीमातेच्या मंदिराकडे निघालो होतो.
म्हटल, आज निवांत आहे जरासा, मारावी चक्कर तुझ्याकडेही-"

 - तो थकल्या चेहऱ्याने म्हणाला.

गप्पाटप्पा झाल्या.

चहानाष्टापाणी झाले.

मित्राची म्हातारी, थकलेली आई बाहेर आली.

तिच्याबरोबरही त्याने दोनचार घरगुती गोष्टी शेअर केल्या.

तिच्या पायावर डोके टेकवून,
"बराय येतो, काकू." - असे म्हणत, तो आल्या दिशेने परत निघाला.

मित्राने पृच्छा केलीच- "अरे तू तर संतोषीमाता मंदिराकडे जाणार होतास ना ?
मग परत घराकडे ...?"

तो हसत हसत उत्तरला-
"तुझ्या घरीच आत्ता संतोषीमातेचे दर्शन घेतले ना.
खूप बरे वाटले.
पुरेसे आहे तेवढे !"
.

उपमा

माझ्यासमोर बसलेल्या,
 त्या रसिकाच्या एका हातात माझे पुस्तक होते...
आणि -
पुढ्यातल्या मेजावर उपम्याची बशी होती !

तो रसिक अचानक माझ्याकडे
आपली निर्विकार नजर टाकत उद्गारला -
"वा, वा... काय छान उपमा आहे हो !"

- मी अंमळ माझी कॉलर ताठ करून, 

सावरून बसलो.

पण -

पुस्तकातील मी लिहिलेली एखादी उपमा वाचत वाचत तो पुटपुटला..
की तोंडातल्या उपम्याचा घास चावत चावत पुटपुटला.......

मला कळायला काहीच मार्ग नव्हता !
.

ती आणि सटवी

दुष्काळात कधी ती
पुढ्यातल्या परातीत
प्राक्तनाचे पीठ मळत असते ..

आसवासकट कधी ती
उद्याच्या चिंतेत
घशाखाली आवंढा गिळत असते ..

बिनपाण्याची बघत शेती
अनवाणी शिवारात
तळव्याची जखम पिळत असते ..

वाट बघत धन्याची
मनातल्या मनास
नशिबाला कोसत छळत असते ..

पोराबाळांच्या जन्माची
आठवण करत
कणाकणाने तनात जळत असते ..

तिला तसे पहात सटवी
खदखदा हसत
पुढच्या खोपटात पळत असते .. !
.

ताटाखालच मांजर

सकाळी सकाळी एका हातात चहाचा कप -
आणि दुसऱ्या हातात इंग्रजी पेपर धरून,
बायकोसमोर उभा होतो.

बायको इंग्रजीत शिजलेली- पण मराठीत एकदम कच्ची !
ती कधी नव्हे ते, "मराठी नॉव्हेल" वाचायचा "प्रयत्न" करत होती.

बायकोने अचानक पुस्तकातून आपली नजर काढून -
माझ्याकडून रोखून पाहत,
मला विचारले-
"अहो, 'ताटाखालच मांजर' म्हणजे काय हो ? "

मला जोराचा ठसका लागला,
हातातला पेपर निसटून खाली पडला...
- आणि कपातला सगळा चहा त्या इंग्रजी पेपरवर सांडला.
(.....माझ्याबद्दलची बातमी सर्व इंग्रजानाही कळली की काय ?)

मी खाली पाहत, अंगठ्याने फरशी टोकत उद्गारलो -
"आज्ञाधारक नवऱ्याला, बायकोच्या 'ताटाखालच मांजर' म्हणतात !"

माझं म्हणणं बायकोला पटलं !
(- नको त्या गोष्टी लगेच कशा काय पटतात, ह्या बायकांना देव जाणे.)
आणि तिने पुन्हा आपली दृष्टी पुस्तकात खुपसली.

मी माझी नजर पोतेरे शोधण्याकडे वळवली ..........
.

सवय दु:खाची

का रे देवा, 
असे मला
दु:खाच्या "सीटबेल्ट"ने
माझ्या जीवनरथात
जखडून ठेवले आहेस-
मी चुकून कधीतरी
सुखाच्या खाईत
लोटला जाईन... म्हणून ?
इतकी काळजी नकोच,
मला जागोजागी
उचक्या लागतात,
दु:खाच्या आठवणींच्याच !
दु:ख
इतके पचनी पडत आहे....
चुकून सुख वाट्याला आले,
तरीही
मला भीती वाटत असते
ती अपचनाचीच !
.

अंतिम सत्य

जागोजागी मेनका असती
जोगीभोगी अवतीभवती..

नरमादी या दोनच जाती 
नर आसक्ती स्त्रीवर सक्ती ..

आपण सौंदर्याची खाण
स्त्रीजातीला पुरती जाण ..

पदर ढळला तोल न ढळला 

विश्वामित्र  कुठे आढळला . . !
.

लहरी

प्रेयसी
बरोबर असताना,
पाऊस
येतच नाही..


प्रेयसी
बरोबर नसताना,
हमखास
येऊन जातो -


वाण नाही
पण त्याला
गुण लागले
असावेत प्रेयसीचे.....


नको तेव्हा
तोंड दाखवायचे..
हवे तेव्हा नेमके
गुल व्हायचे .. !

.

'मोह -'

भुलवले मन किती
टिमटिमणाऱ्या ताऱ्यांनी ..

झुलवले तन कसे
टपटपणाऱ्या प्राजक्तफुलांनी ..

हरवले क्षण किती
हुरहुरणाऱ्या त्या आठवणीतुनी ..

फिरवले मन कसे
झरझर त्या निसर्गसृष्टीतुनी ..


ठरवले किती जरी
वरवर रहायचे हे आज दुर्लक्षुनी .. !

.

जालीम गोळी चारोळीची

दिवसभर मंडपातल्या वाद्यांचा ढणढणाट,
आणि गणपतीपुढची प्रेमगीत ऐकून,
जाम कंटाळलो होतो.
त्यात दिवसभर बायकोची "एकेरी वाहतुकीची" बडबड !

रात्र उजाडली...
अंथरुणावर पडलो तरी बडबड झोपायची काहीच चिन्ह दिसेनात !
शेवटी एक आयडिया सुचली आणि बायकोला म्हटलं -

"तू एकच क्षणभर गप्प बसतेस का ?
तुला मी शेजारणीची एक गंमत सांगतो."

लगेच तिची बडबड थांबली आणि कान टवकारले गेले.
ती संधी अचूक साधून मी म्हणालो -
"आधी ही आत्ताच मनात सुचलेली,

 माझी ताजी चारोळी तुला ऐकवतो !"

काय आश्चर्य कुणास ठाऊक ..
दुसऱ्या क्षणी,
ती मात्रा लागू पडून -
तिच्या घोरण्याचा आवाज हॉलभर ऐकू येऊ लागला !

त्या घोरण्याच्या तालात मी कधी झोपलो ते मलाही कळलेच नाही .

---- तात्पर्य :
काही वेळेला झोपेची गोळी लागू पडत नाही,
पण कवीची चारोळी..........?
.

प्रांजळ मत

त्या मोनालिसाच इतकं का कौतुक करतात-
हे मला पामराला तरी आजवर कळले नाही !

मुळात ती रडून हसते का हसून रडते,
तेही तिच्या चित्रावरून मला कळत नाही.


कुण्या एकाने वारेमाप कौतुक केले -
म्हणून बाकीचे करू लागले असावेत !

गूढ हास्य म्हणजे...
कुणाला न कळलेले हास्य !

कुणाला जे कळलेच नाही....
त्यात कसले बोड्ख्याचे कौतुक ?

बिनवस्त्राच्या गावभर हिंडणाऱ्या,

 त्या राजाची गोष्ट आठवते ना ?
.

सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ते -

  
आजपासून ....

बरीच सेलेब्रिटीज मंडळी,

बऱ्याच सेलेब्रिटीज मंडळींच्या गणपतीला 

आणि देखाव्यांना भेट देऊन येतील ......


बरे वाटते !


बऱ्याच वृत्तपत्रांनी

दूरदर्शन वाहिन्यांनी त्या सर्व सेलेब्रिटीज मंडळींचेही,

वारेमाप कौतुक केलेले दिसेल .........


आणखी बरे वाटले !!


पण -

ऋण काढून गणपतीचा सण साजऱ्या करणाऱ्या मंडळींचे,

किंवा झोपडीत,

किंवा पत्र्याच्या शेडमधील,

किंवा खोपटातल्या गरीब गणपतीचे छान छान फोटो,

वृत्तपत्रात आणि विविध वाहिन्यांवर झळकलेले दिसले तर.....


सोन्याहून पिवळेअसे खुद्द श्रीगणेशालाही नक्कीच वाटेल ना !
.

पदक


नेत्याच्या, 

आमदाराच्या, 

नामदाराच्या,

खासदाराच्या पोराला-

" जवान " म्हणून....

 सीमेवरच्या लढाईच्या धुमश्चक्रीमुळे-

" मरणोत्तर एखादे पदक " 

मिळाल्याची एखादी तरी बातमी,

आजपर्यंत -

कधी वाचण्यात आली का हो ?
.

बैल - डे

" तुझे डोके ठिकाणावर आहे का ...? " 

-- बायकोला असे ठणकावून विचारावेसे वाटत होते .

भलत्या वेळी, भलते काहीही - कसे सुचते हो तिला ! 


त्याचे असे झाले ...

काल रात्रीचे जेवण आटोपले . 


घाईघाईने तिने पाट मांडला .

समोर छानशी रांगोळी काढली .

औक्षवणाचे तबक सजवले ..मला म्हणाली - " ही टोपी घाला, मी ओवाळते तुम्हाला . "

अनुभवांती पाठीशी लाटण्याची भीती होती... 


त्यामुळे मला काहीच संदर्भ न कळल्यानेही ,

मी मुकाट्याने टोपी घालून बसलो .मनांत आठवत होतो. 


आज काही तिचा वाढदिवस नाही. 

आज माझाही वाढदिवस नाही .

आपल्या लग्नाचाही वाढदिवस नाही. 

आज दिवाळीतला पाडवाही नाही .

मग कशाबद्दल बरे ही ओवाळणी ?

बायकोने कुंकवाचा हा भलामोठा उभा फराटा


 माझ्या कपाळावर ओढला. 


ओवाळत म्हणते कशी -

" दिवसभरात लक्षात नाही राहिले हो ! 
खूप खूप शुभेच्छा ....

आज तुमचा सण होता ना - 'बैलपोळा' अर्थात "बैल-डे !"निमूटपणे नेहमीप्रमाणे, 


नंदीबैलासारखी मान हलवण्याशिवाय- 

मी तरी दुसरे काय करू शकणार होतो !
.

कवितेचे दु:ख -

 कागद हरवला
कोपऱ्यात सापडला
मावेना आनंद
हृदयात झालेला ..

कागद होता तो
कविता लिहिलेला
वाईट वाटले खूप
कागद चुरगळलेला ..

कागद तसा साधाच
कुणीतरी टाकलेला
वाचून कवितेला
फेकून टाळलेला ..

माझ्या हातात मी
कागद धरलेला
किंचित थरथर
थोडा ओलावलेला ..

कवितेचा त्यावर
अश्रू झरलेला ....!

.

आयुष्याचा पावा

कसा घडविलास रे देवा
माझ्या आयुष्याचा पावा ..

नीट मी वाजवण्या बघतो
सूर आता बेसूर उमटतो ..

वाजवतो मी व्यथा जरी
हर्ष नादतो मधुर तरी ..

आनंदाने वाजवतो मी
आर्त स्वर का निघती नेहमी ..

वाजवून मी थकलो देवा
केला कितीतरी मी धावा ..

बघ बोटे ही माझी थकली
पाव्यानेही मान टाकली ..

घेई परत तुझा तू पावा
शरणागत मी तुजला देवा !

.

मनीचा डबा


सकाळी सकाळी लौकर उठून
दप्तरात ठेवला डबा भरून ..

निघाली शाळेत मनीमावशी
मनीच्या बोटाला नीट धरून ..


मनीने विचारले- "डब्यात काय"
मावशी म्हणाली- "उंदराचे पाय" ..


मनी म्हणाली जोरात हसून-
"कंटाळले रोज उंदीर खाऊन" ..


मावशी म्हणाली- "इलाज नाही...
चिमणी कावळा सापडत नाही !"

.