दोन चारोळ्या -

१.
हजार टाळ्या मोजत मोजत

लोकांना मी हसवत असतो -


मोजदाद मी करू कशी


वेदना किती लपवत असतो !

.

२.

प्रेम आणि विश्वास बसले


तराजूत पक्के तोलायला -


संशयाचा धक्का लागला


दोन्ही लागले डोलायला !

.

.  
                                                          
                                                                                             

कोठे गेली दुरून बघुनी --[गझल]


कोठे गेली दुरून बघुनी
आशा जागी मनात करुनी ..

ओळख झाली इथे फुलांची
टकमक बघती खुशाल फुलुनी..

दमलो होतो आपण दोघे
इथे फुलांना वेचवेचुनी.. 

थकतो आहे एकटाच मी
आता काटे दूर सारुनी..

भिडले डोळे अचानक जरी
साद मिळाली तिचीहि हसुनी ..

का बघवेना तिची निराशा   
गजऱ्याविण ती उदास बसुनी ..

शोधत होते सख्यास डोळे 
उरला हाती रुमाल भिजुनी ..
.


श्री स्वामी समर्थ-- मंत्र जपतो मनी आम्ही -


क्षणोक्षणी तुम्हास स्वामी शरण येतो आम्ही
रहात असता सतत आमच्या सोबतीस तुम्ही ..

डगमगतो ना अडचणीत वा संकटात आम्ही
हात आधाराला तो असतो धीर देत तुम्ही ..

संसाराचा मार्ग चालतो धीराने आम्ही
"भिऊ नकोस.."ऐकवता उच्चार कानी तुम्ही ..

पूजापाठ करतो नित्य जप ध्यान आम्ही
मनात भीती कधीच कसली येऊ देत ना तुम्ही ..

सदाचार अन सुसंगतीतच रमतो सतत आम्ही
अमुच्या डोळ्यांपुढती दाखवता प्रतिमा तुम्ही ..

" श्री स्वामी समर्थ.." मंत्र जपतो मनी आम्ही
खात्री असते पाठीशी उभे असताच तुम्ही .. !
.

सेल्फीग्रस्त

ते सर्वजण 

सहकुटुंब सहपरिवार 

देवळात जाऊन आले


देवळात 

गर्दी असल्याने 

बाहेरच्या बाहेर 

देवळाच्या कळसाच्या दर्शनावर 

समाधान मानून परत फिरले.


पण -


इतक्या दूरवर देवळात जाऊन 

देवाचे दर्शन झाले नाहीच 

या दु:खापेक्षा --


देवळाच्या पटांगणात 

ग्रुपसेल्फी घेतल्याचे तेज 

सर्वांच्याच चेहऱ्यावर 

अगदी ओसंडून वाहताना दिसत होते !
.

ठेऊन झोपतो मी स्वप्नासही उशाशी - [गझल]

वृत्त- आनंदकंद 
लगावली- गागालगालगागा  गागालगालगागा 
मात्रा- २४ 
 - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

ठेऊन झोपतो मी स्वप्नासही उशाशी
तू भेटशील तेव्हां आशा मला जराशी..

दु:खात काळजीला बाजूस सारतो मी  
स्वप्नातल्या सुखाला कवटाळतो उराशी..

सारा सुखात आहे हा देश आज माझा 
शहरातले तुपाशी शेतातले उपाशी..

का पीक घोषणांचे उगवे सभेत त्यांच्या 
आशाळभूत आम्ही होतो किती अधाशी..

उपदेश छान करती ज्ञानी सुजाण येथे  
कर्तव्य टाळण्याचे ठरवूनिया मनाशी.. 
.

क च्या पोष्टची गोष्ट .. फेसबुकी वास्तव

अ ने ब ला विचारले -

" काय रे ब ,
क ने तिच्या त्या 
इंग्रजी पोस्टवर 
काय लिहिल आहे 
एवढ महत्वाचं ? 
एकच मिनिटात 
कित्ती लाईक आलेले दिसतात 
आणि
तू सुद्धा आता दिलास -
म्हणून विचारतोय हं !"

ब त्यावर उत्तरला -

"काय की बुवा, 
ड पासून ज्ञ पर्यंत 
सगळ्यांनी दिलेत,
म्हणून मीही 
ठोकलाय रे लाईक ! 
मला तरी कुठ कळलीय
क ची पोष्ट !"
.

जेथे विठूच्या नामाचा हो गजर

       
            ... विठ्ठल... विठ्ठल... विठ्ठल...
            जेथे विठूच्या नामाचा हो गजर
            माझ्या विठूचे तेथे पंढरपूर || धृ ||
           

            डोळ्यासमोरी उभा सावळा हरी
            टाळ चिपळ्या नाद मधुर करी
            जेथे विठूच्या विटेवरी नजर ||१||        
           

            रंगे कीर्तन घेऊन वीणा करी
            संगे नर्तन तल्लीन झाल्यावरी
            जेथे नेमाने वारकरी हजर ||२||        
           
      
          बुक्का गुलाल शोभे ललाटावरी
          तुळशीमाळ रुळते कंठावरी
          जेथे आधार माउलीचा पदर ||३||             
                 
.          
   

दे धक्का -

आजपर्यंत हॉटेलात
ठेवलं नाही पाऊल मी ---

सुपारीचं खांड तोंडात
टाकलं नाही अजून मी ---

सिगारेटची कांडी ओठात
धरली नाही कधीच मी ---

पेला दारूचा तोंडाला 

लावला नाही कधीच मी ---

गुटख्याची पुडी खिशात
बाळगली कधी नाही मी ----

तंबाखूचा तोबरा भरून
पिचकारी मारली नाही मी ---

हिरव्या माडीची पायरी
चढलो नाही चुकूनही मी ----

परस्त्रीकडे ढुंकून कधी
टाकली नाही नजरही मी ----

कौतुक माझे कराल ना तुम्ही 

"निर्व्यसनी लई भारी तुम्ही -"
 

- - - कान जरा इकडे करा 
काय सांगतो ते ऐका जरा -

तुम्हाला म्हणून सांगतो मी  
इतरांना सांगू नकाच तुम्ही 

आजवर .... आत्तापर्यंत 
एकाच व्यसनात गुंतलो मी 

खरं कुणाला सांगायचं नाही 
खोटं बोलल्याशिवाय रहायचं नाही ! 
.

तीन चारोळ्या -

देवाचिये दारी
उभा क्षणभरी
ध्यान चपलेवरी
ठेवोनिया !
.


देवळाबाहेर भिकारी 
माणसाला पैसे मागत असतो -
घरातला माणूस 
देवाला सुख मागत बसतो ..
.

देवाघरचा अजब न्याय
गरिबाला दूर सारतो -
सोनेनाणे अर्पिल्यावर

दर्शनाला त्वरित पावतो !
.

दिन दिन... दिवाळी -

महिलादिनानिमित्त-

आज
सकाळी
पहिले सात्विक
काम मी केले ---

ते म्हणजे,

माझ्या
कपातल्या
गरम गरम
अर्ध्या चहाची
बशी

अर्धांगीपुढे
सादर केली -----

तेव्हापासून
येता जाता
माझ्या कानावर
एकच गाणे
ऐकू येत आहे --

जीवनात
ही बशी
अशीच
लाभू दे ------- !
.

लाईफ टॅक्स

आमचा रस्ता
आमच्या गाड्या
त्यावर लावला टॅक्स तुम्ही-

आमचे कष्ट
आमचे वेतन
त्यावर लावला टॅक्स तुम्ही-

आमची मिळकत
आमची कमाई
त्यावर लावला टॅक्स तुम्ही-

मायबाप सरकार,
उरले 'जगणे'
त्यावरही लावा टॅक्स तुम्ही-- !
.

सुख म्हणजे नक्की काय असते

परदेशस्थित

बेचैन मुलाच्या मालकीच्या

भारतातल्या चार बेडरूमच्या

प्रशस्त "रिकाम्या" फ्ल्याटकडे

मी हळूच नजर टाकतो ,



आणि -



माझ्या पाणावलेल्या डोळ्यांपुढे

उगाचच उभा राहतो

लहानपणचा

गावाकडचा

आते-मामे-चुलत-मावस भावंडानी

"गजबजलेला"

तो माझा

आजोळचा वाडा . . !

.

फेस्बुकी जाते

"फेस्बुकी" जाते
सुरेख बाई,
कणभर "पोस्ट" मी
दळssssते,

"कॉमेंट" "लाईक"चे
त्यातून मणभर,
रोजच पीठ ग
मिळsssते . .

अस्से पीठ
चविष्ट बाई,
त्यानेच पोट
भरsssते,

दादल्याच्या
भुकेची आठवण,
कशाला मग
उरsssते !
.

सौ सुनार की एक लोहार की

काल रविवार

दिवसभर रेडिओवर गाणी ऐकून झाली
दूरदर्शनवर बातम्यांची बरसात पाहिली 

दोन तासाचे लग्न
आहेर न देता नजरेखालून घातले
करमणूक मनोरंजन नावाचे दु:खद प्रकार बघून झाले
विनोदी मालिका नावाखाली रटाळ मालिका पाहून झाल्या
 

शेवटी पाचवीला पुजलेला
आळस आणि कंटाळा
दोन्ही मदतीला धावून आले

सावधगिरी बाळगत
खिशातले एटीएम कार्ड चाचपून
बायकोबरोबर फिरायला जाण्याचा निर्णय घेतला

--- बागेजवळ गेल्यावर 

बायकोला गजरा घेणे प्राप्त होते
गजऱ्यानंतर खादगीत तोंड घालणे क्रमप्राप्त होते
त्यानंतर आईस्क्रीम ओघाने आलेच

घराकडे दोघे डुलत डुलत निघालो
बायकोने हसत हसत गुगली टाकलाच

" काय हो .. मघाशी जाताना आणि आता येताना
आज तुमची नजर बरीच पारदर्शकतेकडे झुकलेली दिसली ..!"

त्या "एकाच शब्दा"ने सगळ्या
राजकारणात समाजकारणात आपल्या दैनंदिन जीवनात
इतका घोळ घातला आहे म्हणून सांगू
जगणेही किती मुश्कील झाले-
समजले ना !

बायकोकडची नजर चुकवणे क्रमप्राप्त
लाटणे बरोब्बर नेम धरून 

आमच्या पाठीवर हाणलेच ना !
.

वदनी कवळ घेता

जेवतांना पुन्हा एकवार

बायकोने विचारलेच,

" जेवायला सुरुवात करतांना,

देवाचे काही स्मरण वगैरे

करता की नाही ? "


मीही तेवढ्याच ठसक्यात

उत्तर दिले,

" त्याशिवाय मी जेवायला

कधी सुरुवातच करत नाही ! "


बायकोने दुसऱ्या दिवशी पाळत ठेवलेली

माझ्या लक्षात आली..

जेवायला सुरुवात करतांना,

मी भाताचा घास चिमटीत धरून

जोरातच म्हणालो,

" अरे देवा ! आजही भात कच्चाच ! "
.

त्रांगडे अॅडमिशनचे

तुलनेने 


इंजिनिअरिंग 

वा

मेडिकलची 

एन्ट्रन्स फी 

कमी -


आणि . 

. .
"प्लेग्रुप"ची फी 

जास्त 

वाटत असल्याने. . . .


मी 

माझ्या नातवाला 

डायरेक्ट इंजिनिअरिंग 

वा

मेडिकललाच


कसे दाखल करता येईल -

याचा विचार करत आहे !
.

वामकुक्षीतले स्वप्न

" मी ढोंगी नाही

मी खरे बोलतो .

मी प्रामाणिक आहे

मी भ्रष्टाचारी नाही.

मी शांतताप्रिय आहे

मी सन्मार्गाने चालतो.

मी फ्लेक्सविरोधी आहे 

मी गॉगल वापरत नाही .

मी घोटाळा करू शकत नाही

मी कुठलाही कायदा मोडू/तोडू शकत नाही..."


" छे छे छे छे --

अहो, कुठल्याच चांगल्या गुणवत्तेत, 

बसत नाहीत तुम्ही तर !

माफ करा हं --

तुम्ही आमच्या पक्षाततरी बदलून येऊ शकत नाही !

तुम्हाला तिकीट देणे तर लांबची गोष्ट !! "


..... इतक माझ्यासारखं 

वास्तववादी स्वप्न

दुपारच्या वामकुक्षीत 

आजवर कुणाला तरी पडलं असेल का हो ?
.