वसंत ऋतू आला -



सकाळी तू ओले केस 
फटकारत असताना 
आरसाच दिमाखात असतो 

पुडीतून हळूच डोकावणारा 
मोगरा प्रसन्न हसत असतो 
स्वत:शीच मान डोलावत 

खिडकीतून डोकावणारी अबोली 
काहीतरी पुटपुटत असते 
मनातल्या मनांत छानसे 

मिठी मारल्यागत 
लाजाळू तुझी पाठ पहात 
खुदकन लाजलेले असते 

आरशासमोर दोन गुलाब 
उमलत चाललेले 
मला दुरूनही दिसतात 

ओठावरचे निसर्गदत्त 
डाळिंबाचे दाणे पिळवटून
ओठावर पसरायला पहातात 

दोन भुवयांच्या कमानीत 
जास्वन्दीचा लालभडक ठिपका 
विराजमान होत असतो 

पावडरच्या कणाकणात 
जाईजुईचा मंद सुगंध 
अहाहा, चेहऱ्यावर पसरतो 

हिरव्या साडीचोळीतले 
अनोखे रूप 
मनाची घालमेल वाढवते 

माझ्या कवितेतला वसंत 
बहरलेला असतो
उन्मुक्तपणे जगापुढे !

.

पोरी....!!!


पोरी...!

जपून टाक पाऊल पूर्ण -

तुझ्या स्वप्नातले जग आणि स्वप्नाच्या पलीकडचे जग 

जमीन अस्मानाचे अंतर आहे.... दोन्हीत !

स्वप्नात येत असेल तुझ्या एकच आवडता राजकुमार 
तुझ्या आवडत्या गुलाबी आयाळीच्या घोड्यावर बसून हसत हसत ..

स्वप्नाबाहेरच्या जगात मात्र राजकुमाराच्या वेशातले
दैत्य येतील 
भेटतील 
गोड गोड बोलतील

तू जाळ्यात सापडो अगर न सापडो... 

संधी मिळताच,
आपले खरे दैत्याचे 
हिंस्र रूप दाखवत 
दाताड विचकत
अचकट विचकत वाकुल्या दाखवत 
तुटून पडतील ..! 

कुणालाही तू बोलवू शकणार नाहीस 
कुणी तुझे आर्त हृदय पिळवटणारे आक्रंदन ऐकण्यास 
समोर आसपास असले,
कुणीही तरी येणार नाही
सगळे धृतराष्ट्र असणार 
आता कौरवांचे वंशज जिवंत आहेत
संधीसाधू दु:शासन दुर्योधन अस्तित्वात आहेत 

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला 
आपली मुलगी मानणारा एकच शिवाजी होता 
इथे आता पदोपदी मावळे नाहीत 
डोमकावळे जागोजागी टपलेले आहेत 
आपल्या मुलीवर वाईट नजर ठेवणारे आहेत 
नात्यागोत्याना वेळप्रसंगी झुगारून देणारे आहेत 

कृष्ण पुन्हा धावा केल्यावर येईल,
ह्या भ्रमात राहू नकोस !

तुझे तुलाच रणरागिणी बनायचे आहे 
तुझे तुलाच रक्षण करायचे आहे 
तुझे नशीब तुझे तुलाच घडवायचे आहे 
तुझ्यातली हिम्मत 
तुझे सामर्थ्य 
तुझी आत्मसन्मानाची ओळख 
तू पटवण्यास सशक्त आहेस 
हे तूच दाखवून द्यायचे आहेस 

जग फार भोंदू असल्याचे दाखवील 
भोळेभाबडे असल्याचा आव आणील 

पण ....
लक्षात ठेव 
तू अबला नाहीस- सबला होऊ शकतेस 
मनाची पारख करून ठेव 
तुला काहीही अशक्य नाही 
याची जाणीव सतत मनाशी ठेव 

पुढचे तुझे पाऊल ...
तुझ्या विजयाची नांदी असेल !
.

प्रेमबुडी -




तू रागावतेस अन् 

फुरंगटून बसतेस - 



तशा अवतारातही 

खूप क्यूट दिसतेस !



मी पुन्हा पुन्हा 

तुला बघत राहतो, 


समजूत काढणे 

विसरून जातो ...



आणखी चिडतेस 

चांगलीच दिसतेस !



तुझा आवडता

नेहमीचाच खेळ .. 



मान वळते दुसरीकडे 

मन गुंफल्या बोटांकडे 



खेळत राहू हाच खेळ 

जगाच्या अंताला खूप वेळ !

.

सुप्रभात -



वेळ झाली हो चहाची सूर्य सांगे तो पहा 
कोंबडाही साद घाली स्मरण द्याया तो पहा -

पाखरे घेण्या भरारी आळसाला झटकती 
छान वाटे गार वारा झोंबणारा तो पहा -

वर्दळीला जाग आली चालली रस्त्यावरी 
श्वान भुंके आणि सांगे मीहि जागा तो पहा !

दूध पिशव्या लागल्या की लोंबण्या दारावरी 
स्वच्छता मोहीमवाला शीळ घाली तो पहा ;

छान सजली आज दारी नक्षिची रंगावली 
पाहुणाही थबकला का पाहण्याला तो पहा !

.



रंगल्या भिंती अशा -


भिंत !

               दोन अक्षरी साधा शब्द !
  
      "नावात काय आहे"च्या धर्तीवर, तुम्ही आता "भिंतीत काय आहे ?"- असे विचारणारच ! अर्थात असे विचारणे म्हणजे " दिवाळीत काय आहे " असेच विचारणे !

               " भिंत " या सध्या शब्दातच एक भव्यपणा आहे. आजच्या युगातील एक प्रकारचे वैशिष्ट्य जणु या शब्दात दडले आहे. व्याघ्रावर स्वार होऊन येणाऱ्या गुरू चांगदेवाला भेटण्यासाठी जेव्हां ज्ञानदेवाने भिंत चालवली, तेव्हां खुद्द चांगदेवाने आपल्याच तोंडात बोट घातले म्हणे ! या कथेमुळे तर भिंतीला एकप्रकारचे आगळेच तेज प्राप्त झाले आहे !

                बाजारात फाटक्या नोटा चालत नाहीत, शाळेत विद्यार्थ्यांना जुनी पुस्तके चालत नाहीत ! कित्येकदा नव-याचे बायकोपुढे काहीच चालत नाही-, असे असताना, पाय नसलेली, जीव नसलेली- साधी भिंत चालते- हे आश्चर्यकारक विस्मयपूर्ण वैशिष्ट्य नाही ?

               मनुष्य कल्पक आहे. पूर्वी ज्ञानेश्वरकाळात "चालणारी भिंत" असल्याचे ऐकिवात आहे, तर आज आपण "बोलणारी भिंत"ही  प्रत्यक्ष पाहू शकतो ! आपण जे काही बोलू तेच आणि तसेच बोलून दाखवणाऱ्या विजापूरच्या गोलघुमटाच्या भिंती हा सर्व जगाच्या कौतुकाचा विषय आहे !

               चालू शतकातील माणसे मुक्या, अबोल भिंतीना बोलण्यास भाग पाडू शकतात. निवडणुकीचे दिवस आठवा. याच भिंतींनी तुम्हाला "- - - पुढे एक फुली ", किंवा " - - -लाच मते दया"- असे आवर्जून सांगितल्याचे स्मरते ना ? प्रियकराला प्रियाराधनाच्या काळात "आंधळ्या प्रेयसीचे डोळे " कसे बोलके " वाटतात, तद्वतच निवडणुकीच्या काळात मुक्या भिंतीना वाचा फुटून त्या "बोलक्या" बनतात ! निवडणुकीच्या प्रचाराचे साधन, म्हणून जगात भिंतीला अद्वितीय स्थान आहे !

               भिंतीचा दुसरा अवतार म्हणजे "जाहिरातीचे उत्तम साधन !" रंगीबेरंगी बनलेल्या ठिगळानी बनलेल्या वस्त्रांप्रमाणेच ती भिंत नटूनथटून उभी रहात असते ! नाना जातीची, नाना धर्माची माणसे धर्मशाळेत एकत्र जमावीत, त्याप्रमाणे निवडणुकीनंतर भिंतीचे स्वरूप बनते. एका कोपऱ्यात धारदार ब्लेडची  जाहिरात, त्याशेजारीच फेअर-एन-लवली वापरणा-या  सुंदर स्त्रीच्या मुखड्याची जाहिरात,  त्याखालच्याच  कोप-यांत वरील सुंदर (!) स्त्रीचा मुखडा पाहून- घ्याव्या वाटणा-या डोकेदुखीच्या अप्रतिम गोळ्यांची जाहिरात, ह्या सर्व जाहिरातीत उठून दिसणारा तो "लाल त्रिकोण !" चारपाच नातेवाईक एकत्र नीटपणे राहू शकत नाहीत, पण चार-पाच विरोधाभासात्मक जाहिराती मात्र समाधानाने अगणित काळ  एकत्र नंदू शकतात, ही गोष्ट निर्जीव भिंतीच्या आत रहाणाऱ्या माणसांपेक्षा निश्चितच अभिमानास्पद आहे ना ! अशा भिंती पाहिल्या की, मला उगीच त्याबद्दल आदर वाटू लागतो. कारण असा "कोस्मोपोलिटीशिअन सर्वधर्मसमभाव" इतरत्र दिसणे हे - सोलापुरात खरेदी केलेल्या लोटरीच्या तिकिटास सोलापुरातच बक्षिस लागण्याइतके दुर्मिळ दुर्लभ आहे !

               पुरातन काळात मानव अक्षरशः उघडा होता. जसजसा तो प्रगतीपथावरून चालू लागला, तसतसा अडथळा आणणा-या शत्रूला तो भिऊ लागला. तो स्वत:ला दडवण्यासाठी आधार शोधू लागला. एका दगडाची भिंत अपुरी पडून, भिंतींची संख्या दोनावरून चार झाली ! त्याला चार भिंती आधी पुरेशा वाटल्या खऱ्या- पण तो आधार अधिकच आकर्षक बनवण्यासाठी, त्याची धडपड सुरू झाली. तिची रचना, आकार, बांधणी- याकडे तो काळजीपूर्वक लक्ष देऊ लागला. दगड-विटा-मातीच्या भिंतीना आतून बाहेरून तो रंगवू लागला. तिची शान वाढवू लागला. सदैव काळेबेरे करण्यात हात गुंतलेल्या पुढाऱ्याचे लक्ष जसे, आपला चेहरा आणि पोशाख तरी स्वच्छ असावा- याकडे असते, तसे घरातील घाण लपवण्यासाठी भिंतीना छान ठेवण्यात मानवाचे मन रंगू लागले ! नुसत्याच भिंती बेडौल दिसतील-  म्हणून तो भिंतीत कोनाडे, खिडक्या, खुंट्या, फडताळे बनवू लागला. भिंतीची महती  त्याला पटली ! "भिंत" ही केवळ नावालाच भिंत नसून, ती आपली रक्षकही  आहे. ती आपल्या भांड्यांची व भांडणांची अब्रू झाकते. घरातील लक्तरे जगापुढे उघड्यावर न आणता, ती घरातच लोंबू देण्याची सेवाइमाने इतबारे भिंत बजावते !

               स्वत:चे संरक्षण  व्हावे, म्हणून जनता स्वत:ला चार भिंतीत कोंडते, तर चोरांचे संरक्षण व्यवस्थित व्हावे- म्हणून सरकार तुरूंगाच्या भिंती उभारते ! भिंत तरी एकाच प्रकारची असते म्हणता काय ! छे ! उभ्या भिंती, आडव्या भिंती, सिमेंटच्या भिंती, विटांच्या भिंती, दगडांच्या भिंती, लाकडी भिंती ! जसे भिंतींचे नाना प्रकार, तसे त्यांचे विविध मालक- श्रीमंतांच्या गुळगुळीत संगमरवरी, शेतकरी-मजुरांच्या कुडाच्या झोपडीच्या  भिंती ! इतिहासात अजरामर झालेली चीनची लांबलचक, उंच आणि अभेद्य भिंत-, तर भूगोलात आढळणारी भूकंपविरोधक  पुठ्ठ्याची घडी करता येणारी भिंत !

               भिंतीचे महत्व समजल्याशिवाय का अकबराने मुमताजला का त्या शहाजहानने अनारकलीला भिंतीतच चिणून मारायचे ठरवले होते ! इतिहासाने तळघराच्या भिंतीना काय उगाच महत्व दिले ? तळघर हे तर पूर्वी सैन्याचे सर्वस्व असायचे. तळघरातील गुप्त वाटा दाखवणारा सूर्याजी पिसाळ उघडपणे आपल्या फितुरीने अजरामर (!) झाला !  शत्रूने भिंतीला पाडलेले खिंडार, एका रात्रीत बुजवण्याच्या कामगिरीने चांदबीबी उगाच नाही प्रसिद्ध झाली ! एकंदरीत भिंतीने जगात इतिहास घडवायला सहाय्य केले आहे ! "भिंत नसती तर-" काय अनर्थ घडले असते, हे लिहिण्यास माझी लेखणी तरी समर्थ नाही, आणि ते आता लिहिण्यातही काही अर्थ असे वाटत नाही !

               एवढे मात्र खरे की, पूर्वीची भिंत ही पूर्वजाइतकीच स्वाभिमानी होती. जुन्या इमारती, वाडे, किल्ले अद्यापही ताठ मानेनेच उभे असलेले आपल्याला आजही दिसतात ! "मोडेन पण वाकणार नाही-" अशा बाण्याच्या पूर्वजाप्रमाणेच, त्यानी बांधलेल्या भिंतीही खाल्ल्या सिमेंटला- मातीला- चुन्याला जागून अजूनही  दिमाखात उभ्या आहेत ! हल्ली पैसा दिला की माणूस मान तुकवतो, झुकवतो. भिंतीना याच गोष्टीचे वाईट वाटून, त्या आपल्या शिमिटाच्या डोळ्यातून वालुकामय अश्रू ढाळतात ! नाइलाजानेच  त्या आपल्या धन्याआधी पंचत्वात विलीन होऊ बघतात !

               पूर्वीच्या भिंती "इमानदार" होत्या, तर आजच्या भिंती "कानदार" आहेत. धन्याच्या कसल्याही बातम्या शेवटपर्यंत गुप्त ठेवण्यात जुन्या भिंती तरबेज होत्या, तर गुप्त बातम्याच प्रथम फोडण्यात आजच्या भिंती वाकबगार आहेत, असे म्हणण्यात- मुळीच अतिशयोक्ती नाही !

               भक्कम भिंतीमुळे  एकेकाळी, या कानाची बातमी त्या कानाला कळत नसे. आजच्या काळात आपल्याच घरात आपल्याच बायकोला मारलेली लाथ चुकली, तर ती हमखास भिंत फोडून आरपार जाऊन आपल्याच शेजाऱ्याच्या बायकोच्या कमरेत अचूक बसण्याची शक्यता अशक्य वाटत नाही ! कुठे पूर्वीच्या त्या "भीतीतारक" भिंती आणि कुठे आजच्या  "भीतीकारक" भिंती !

               भिंतीचे महत्व अमूल्य आहे. ते कित्येकांना माहित असल्याने ते लिहितात- "येथे जाहिरात व अन्य मजकूर लिहिण्यास सक्त मनाई आहे-"  अशी सूचना वाचूनही, एखादी जाहिरात वा अन्यप्रकारचा मजकूर तेथे लिहिला गेलेला असतोच ! बिच्चारे भिंत-मालक ! 

               आपला आधार म्हणजे "भिंत". आपल्या पूर्वजन्मातल्या पापकर्माचे फळ म्हणून भूकंपप्रसंगी भिंत आपल्याला गाडावयास मुळीच मागेपुढे पहात नाही. कुस्ती आणि कुस्तीशौकिन, तसेच क्रिकेट आणि क्रिकेटशौकिन- यांचे नाते अतूट आहे. भिंतींचा आधार  ह्या फुकट्या शौकिनांना खेळाचे सामने फुकट पहाण्यात कितीतरी होतो ! सरळ मार्गाने कधीच न जाणारे चोर ऊर्फ शर्विलक,  तुरुंगातून  अथवा घरांतून उड्या मारून पोबारा करण्यात,  भिंतीचाच किती लीलया वापर करतात ! नवरा-बायकोला भांडणानंतर, (स्वत:चेच -) कपाळ फोडून घेण्यासाठी म्हणून,  ह्या भिंतीसारखे उत्तम जवळचे साधन नाहीच ! असे फुकटे प्रेक्षक, असे फुकटे चोर आपले खास कौशल्य दाखवताना पाहून, अनादिकालातील आपल्या "पूर्वजां"ची आठवण होत रहाणे, स्वाभाविक आहे !  

              सुप्रसिद्ध देशभक्तांनी तुरुंगाच्याच भिंतीवर आपली काव्यसुमने फुलवली आहेत ! तर काही ठिकाणच्या विशिष्ट भिंती अश्लील काव्याने थुंकलेल्या आढळतात ! भिंतीबद्दलच्या वाढत्या आस्थेमुळे भिंतीला किंमत आहे. ती उभी असतांना भाड्याने देता येते. ती कोसळल्यानंतर तिच्या भग्नावशेषांना मागणी येते. जाहिरातीद्वारे पैसे मिळवण्याचे, भिंत एक उत्तम साधन आहे. कधीकाळी गवळ्याकडून घेतलेल्या कमी जास्त दुधाची नोंद अन्यत्र कुठेही न करता, ती भिंतीवरच करण्यात महिलांना विशेष अप्रूप वाटत असते ! ज्ञानेश्वरानी चालवलेली भिंत एकवेळ आपल्याला कुठे पहायला मिळणार नाही, पण दूध-नोंदीची दुर्मिळ भिंत आपल्याला आपल्या घरात कधीही पहायला मिळू शकते ! समस्त महिलावर्ग या भिंतीवरच आपल्या बाळांना "घोडा-घोडा" खेळायला शिकवतात आणि बाळ खेळूनखेळून दमले की, त्याच भिंतीवर "शू" करायला शिकवतात ! 

              भिंतीचा योग्य उपयोग करण्यात, महिलावर्गानंतर नंबर लागतो तो, कुटुंबनियोजन-प्रचारकांचा ! त्यांना भिंतीबद्दल वाटणा-या प्रेम, आदर, कौतुक याबद्दल न लिहिणेच बरे ! एखादा मंत्री अगर एखादा प्रसिद्ध नट आपली प्राप्तीकराची थकबाकी पंधरा वर्षांनी भरण्याची चूक करील, पण कुटुंबनियोजनप्रचारक आपल्या हातून पंधरा भिंतीतील एकही भिंत लाल त्रिकोणाच्या तडाख्यातून सुटण्याची चूक, चुकूनही होऊ देणार नाही !

               भावी जावयाबरोबरच त्याच्या स्वत:च्या मालकीच्या चार भिंतींची चौकशी पूर्ण केल्याखेरीज, कुठल्याही वाधुपित्याचा आत्मा शांत होतच नाही ! 

               टक्कल पडलेला माणूस आणि घराच्या रिकाम्या भिंती- दोन्ही गोष्टी सारख्याच ! म्हणून तर आपण आरसा, फोटो, खिळे, शोभेच्या वस्तू, मोडक्या खुर्च्या, छत्र्या, घड्याळे यानी आपल्या घराच्या भिंती सजवतो. पैसा न खाता काम करणाऱ्या अधिकाऱ्याइतकेच, क्यालेंडरशिवाय भिंत दिसणे दुर्मिळ जाहले आहे.
भिंतीत खिळा ठोकणाऱ्या कमनीय कामिनीस पाहून एखाद्या काविराजाला काव्यप्रसूतीची स्फूर्ती होते, तशीच स्फूर्ती भिंत समोर दिसली रे दिसली की, एखाद्या श्वानराजाला आपली मागची तंगडी वर करायची येत असावी ! जाहिराती पाहून फसणे, भुलणे हे प्रत्येक स्त्रीपुरुषाचे आद्यकर्तव्य ठरते ! त्यामुळे भविष्यकाळात असे होईल की, माणूस पुनश्च उघड्यावर राहू लागेल आणि जाहिरातींच्या भावी उत्पन्नासाठी नुसत्याच लांबलचक आणि उंच भिंती बांधू लागेल !

               " भिंतीत काय आहे ?"- असे विचारणारे सूज्ञ आता " भिंतीतच सारे काही आहे ! "- असे म्हणणार, यात शंकाच नाही ! रस्त्यातून जाताना आलिशान इमारतींच्या रंगीबेरंगी आकर्षक भिंती दिसतात. सिनेमांची दिलखेचक रंगीत पोस्टर्स, हरेक मालाच्या उठावदार जाहिराती, आम जनतेने बार भरल्यावर मारलेल्या पिचका-यांची नक्षीदार कलाकुसर ! मधूनच जुन्या इमारतींच्या उसासे टाकणाऱ्या विटक्या भिंती ! रात्रीच्या मंद उजेडात हितगुज करू इच्छिणाऱ्या पोपडे निघालेल्या भिंती ! 

               कधीतरी, सटीसामासी अथवा दिवाळी वा तत्समप्रसंगी- ह्या साऱ्या भिंती रंगीबेरंगी प्रकाशात न्हाऊनमाखून निघतात. त्या त्यावेळी अधिकच आकर्षक वाटतात आणि मग कौतुकाने तोंडून उस्फूर्तपणे उद्गार बाहेर पडतात -

" रंगल्या भिंती अशा ! " 

.              

माझाही आत्मक्लेशपूर्ण उपास !



काल रविवार ,
सुट्टीचा दिवस ,
होळी पौर्णिमेपासून पुरणपोळी श्रीखंडपुरी असले रोज यथेच्छ गोड गोड खाऊन -
कंटाळा आला बुवा !

आता काही तरी बदल हवा म्हणून ,
काल मी एक संपूर्ण दिवस उपास करायचा ठरवले !

सकाळी सहा ते संध्याकाळी सहा ....

झाले ..शनिवारी शनिवारचा उपास होताच !

रविवारी सकाळी सहालाच -
भुकेने पोटात सगळेच पशुपक्षी ओरडून ,
चांगलाच धुमाकूळ घालू लागले !

उपास म्हणजे फलाहार चालतो ...इति सौभाग्यवती !
म्हटले, 
बायकोचे नाही, तर कुणाचे ऐकायचे अशा बिकट प्रसंगी ?

एक कलिंगड, दोन सफरचंद, तीन केळी, चार अंजीर, पाच चिक्कू ...
बस्स, एवढेच फराळासाठी म्हणून खाल्ले. ... 
म्हटलं उपास मोडायला नको .. 
आणि एकदा ठरवले ते मनापासून पार पाडायला तर हवेच ना !

सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी,
 बायकोच्या माहेरची मंडळी आली ...
त्यानी खास माझ्यासाठी 
डाळिंब, फणसाचे गरे, संत्री, दोन डझन हापूस आंबे आणलेले !

त्यांच्या प्रेमाचा अव्हेर कसा करायचा ?
.......म्हणून दिवसभर मी एक एक करून खात बसलो !

संध्याकाळी सहा वाजता -
 फक्त एक तांब्याभरून मिल्कशेक प्यालो !

काही म्हणा, 
आपली नाजूक तब्येत नीट सांभाळायची असेल तर ...

प्रत्येकाने रोज असा उपास करायला हवाच -
या निष्कर्षाला मी तरी आलो आहे ! 

. . .

बायकोचा मूड


बायकोच्या मूडवरच 

सगळा दिवस नव्हे तर

अख्खं आयुष्य अवलंबून असते !


उगाच नाही हं ,

चाळीस पावसाळ्यानच्या अनुभवातून बोलतोय मी हे 

घरोघरी हेच चित्र असणार आहे 

मुकाट्याने कबूल कोण करणार आहे ?


सकाळी सकाळी 

चहाच्या चाहुलीने 

माझी एखादी चक्कर हळूच स्वैपाकघरात होते.

बायको स्वत:शीच...

"उंच माझा झोका",

"बहारो फूल बरसाओ",

"जीवनात ही घडी " असली गाणी गुणगुणत असली की समजावे ...

आज फक्कडसा चहा मिळणारच !


पण बायकोचे -

नि:शब्द शांतपणे

कामकाज चालू असले तर मात्र..


त्या असह्य आणि जीवघेण्या शांततेपाठोपाठ

कोणते संकट उद्भवणार,

ह्या विचारानेच मी अर्धमेला झालेला असतो!


मित्रानो,

ह्यालाच म्हणतात .. "संसार "

उगाच नाही म्हटले कुणीतरी -

"अरे संसार संसार ,

जसा चहा ग्यासवर ....."

नेमके त्याचवेळी सिलेंडर संपणार !!!
.

वास्तव -



लेकराचे डोळे त्या वाटेकडे लागलेले 
गाणे ऐकवायचे ओठातच राहिलेले 

आईबाबा उशिरा कामावरून आलेले 
हुश्श करून बिचारे थकून बसलेले 

ना लक्ष लेकराकडे उशिराने गेलेले 
ना कुणी एकही शब्द आधी बोललेले 

गाणे ऐकायचे कानीं तसेच राहिलेले 
लेकराचे प्रेम ध्यानी कधीच पेंगलेले 

वन आंब्याचे कुणी खुशाल तोडलेले 
पिसारे नाचऱ्या मोराचे कुणी छाटलेले 

वर्तमान फक्त बघते कष्ट उपसलेले 
मायाप्रेम करायचे ते राहून गेलेले 

योग्य वेळेचे क्षण कधी निघून गेलेले 
भविष्यात उरले हाती अश्रू गोठलेले !

.

चार चारोळ्या -

१.
नाते -

पैसा नसता जे जुळते
तेच खरे असते नाते -
पैसा असता जे जुळते
मनामनाचे ना ते नाते ..
.

२.

'खरा[ब] नेता -'

आमचा नेता बिसलरीसाठी
कसा नेहमी तळमळतो -
खेडुत साध्या पाण्यासाठी
थेंब आसवांचे का गिळतो ..
.

३.

'जीवन मरण -'

जगतो आहे जोवर मजला
सुगंधी हे फुलासम जगणे -
आहे अंती ना तर मजला
निर्माल्यासम निपचित पडणे ..
.

४.

'गोधडी आठवणींची -'

गोधडी जुन्या आठवणींची
बघत आहे निवांत पसरून -
हळुवार आनंद मनात मी
जपत आहे दु:ख विसरून ..
.

कॉमेंट्री -


                    टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तंद्रीतून मी भानावर येताच रस्त्यात थबकलो. एका घरासमोरील छोटया मैदानात, काही मुले व मुली घोळका करून उभी होती. त्यापैकी दोन-तीनजण ओरडले -
 "शाब्बास रे कोमेंटेटर ! "
ते ऐकून व पाहून, मी पुढे चालू लागलो. रॉकेल मिळाले नसल्याने हातातले डबडे हेलकावे खात होते. त्या हेलकाव्यागणिक "कॉमेंट्री"संबंधी विचार माझ्या मनांत झोके घेऊ लागले......

              '........ आता काही दिवसातच सर्व लोकांचा दुपारचा चहा चुकेल, पण रेडीओकडे एक कान टाकायचा चुकायचा नाही ! कॉमेंट्रीची गोडी काही अवीटच आहे. मग ती कुठल्याही खेळाची असो- कुस्ती, हॉकी, टेनिस वा क्रिकेट ! हिवाळा, उन्हाळा, पावसाळा या ऋतूंप्रमाणेच हिचाही विशिष्ट ऋतू असतो. आपली क्रिकेटची टीम परदेशी दौऱ्यावर निघाली किंवा परदेशी टीम आपल्या देशाच्या दौऱ्यावर आली, की संपूर्ण देशातील सर्व गल्लीबोळ झाडून- त्यांच्या आधीच क्रिकेट खेळायला तयार होतात. जागा मिळेल तेथे एक/ दोन/ तीन लाकडे उभी केली जातात, एकजण कागदी बांधलेला किंवा चिंध्या गुंडाळलेला किंवा रबरे गुंडाळलेला किंवा हाताला येईल तसल्या आकाराचा गोल झेलता येणारा, गोळा फेकण्यास सज्ज होतो. एखादी जहांबाज बाई आपल्या हातातल्या लाटण्याने नवऱ्याला मारण्यासाठी ज्या अपरिमित आनंदाने उभी असते- त्या स्थितीत लाकडाजवळचा एक पोरगा  आपल्या हातात एखादे फळकूट पकडून, चेंडू अंगावर येण्याची वाट पहाताना दिसतो. मग एखाद्याच्या मुखातून, रेड्याच्या तोंडून वदवल्या गेलेल्या वेदाप्रमाणे,  "कॉमेंट्री"चा जन्म होतो !

               एकवेळ पहिल्या यत्तेतला मुलगा संपूर्ण वर्षात मास्तरांनी  सांगितलेली उजळणी पाठ करू शकणार नाही; परंतु कॉमेंट्रीच्या आगळ्या वेगळ्या ऋतूत तोच मुलगा आपल्या स्मरणशक्तीचे विस्मयकारक प्रदर्शन करू शकतो. क्रिकेटचे खेळातले सर्व मोडकेतोडके नियम, तो  व्याकरणाच्या नियमापेक्षा सुलभतेने, नीट ध्यानात ठेवू शकतो. मिडऑन, लॉंगऑफ, लॉंगऑनसारखे किचकट शब्द खिशातल्या गोट्यांसारखे, तो लीलया तोंडी खेळवू शकतो.

              टेस्टम्याच सुरू होण्याचा अवकाश की, सर्व उपहारगृहांपुढे (शाळेतही कधी न आढळतील इतके -) काळे कुळकुळीत स्वच्छ फळे दिसू लागतात. रेडिओ, ट्रांझिस्टर, दूरदर्शनला हारतुरे घालून ओवाळण्यात येते.
सर्व शाळांतून 'कॉमेंट्री ऐकणे' हा जणू "शालेय कार्यक्रमाचा"च भाग गृहीत धरण्यात येतो. कॉमेंट्री कशाशी खातात, हे माहित नसणाऱ्या महिला महिला-मंडपात बटाटेपोहे खातखात " आज सुनील मांजरेकरने कित्ती कित्ती छान आवाजात कॉमेंट्री सांगितली होती " - या विषयावर बिंधास कॉमेंट्स करू लागतात ! 

           सर्व ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी, "मोस्ट अर्जंट" फायली तातडीने बाजूला फेकून आधी, कनिष्ठ कर्मचाऱ्याला अर्जंटली ताबडतोब "ताजा स्कोअर" कळवण्याची फर्माईश सुनावतो. त्या (कामचुकार-) कर्मचाऱ्याला तेच हवे असते ! नाहीतर ऑफिसच्या कामाच्या आकडेमोडीत कॉमेंट्रीमधले स्कोअरचे आकडे घुसडले जाण्याची शक्यता अगदीच अशक्य नसते ! त्यापेक्षा कॉमेंट्री ऐकायला बरी वाटते !          

               क्रिकेटच्या कॉमेंट्रीमुळे असंख्य फायदे आणि अगणित तोटे झालेले आपल्याला दिसतात. कॉमेंट्रीमुळे वेळेचा अपव्यय होण्याच्या तोट्याबरोबरच, घरबसल्या एक देशकार्य पार पाडल्याचे सात्विक समाधान आपल्याला लाभू शकते !  हो- 'कॉमेंट्री ऐकणे' हे एक देशकार्यच होऊन बसले आहे. कारण आपल्या देशातील आपले खेळाडू आपल्या देशाचे नांव उज्ज्वल करण्यास काय पराक्रम गाजवतात, हे ऐकण्यास साऱ्या देशाचे काम त्या खेळाच्या वेळेतच खोळंबून राहिलेले दिसते !

               एरव्ही रिकामी असणारी हॉटेल्स 'कॉमेंट्री'काळात गच्च भरलेली दिसतात. त्यामुळे मालकांना आपल्या आणि हॉटेलच्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते ! दुसरा फायदा, ज्यांच्याकडे रेडिओ नाही अशांना होतो. हे लोक कॉमेंट्रीच्या काळात नातेवाईक अथवा मित्रांकडे जाऊन (रेशनिंग वा महागाईच्या काळात-)  फुकटातला चहा पिण्याची संधी साधतात ! शिक्षकांना या कॉमेंट्रीमुळे, विद्यार्थ्यांपुढे आपल्या रटाळ विषयाची कॉमेंट्री ऐकवण्याची गरज टाळता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळही अगदी मजेत, आनंदात, सुखात जातो !

                काही कामचुकार कारकुनाना कॉमेंट्रीच्या निमित्ताने, स्कोअर ऐकण्यास व तो तत्परतेने 'बॉस'ला ऐकवण्यात, दोन क्षण विश्रांतीही मिळते. काही ठिकाणी खास कॉमेंट्री ऐकण्यासाठी रेडिओची खरेदी होते. हा रेडिओ-विक्रेत्या दुकानदाराचा फायदाच की ! रिकामटेकड्यांचा वेळ फालतू गप्पा मारत बसण्याऐवजी, कॉमेंट्री ऐकण्यात सत्कारणी लागतो. आपल्या बायकोची निरर्थक बडबड, एखादा नवरा या कॉमेंट्रीच्या आवाजात दाबुन ठेवू शकतो.

               शिवाय, कुणी सांगावं - नुसती कॉमेंट्री ऐकून ऐकून, लाखातला एखादा तरुण या खेळाकडे आकृष्ट होऊन, आपल्या देशाचा एक भरवशाचा खेळाडू म्हणून नावारूपाला येऊ शकेल ! कॉमेंट्री ऐकण्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात एक प्रकारचा उत्साह, एक प्रकारचे चैतन्य खेळत रहाते. अशा   वातावरणामुळे देशाचे आरोग्य (!) सुधारण्याचा संभव असतो. ज्या प्रेक्षकांना सामन्याचे तिकीट मिळत नाही, त्यांना रेडिओवरची नुसती कॉमेंट्री ऐकून (तिकिटाचा खर्च, जाण्या-येण्याचा खर्च, मधल्या वेळचा अरबटचरबट खाण्याचा खर्च वाचवून-) कितीतरी रुपयांची बचत करता येते. (-आणि बचतीच्या संदेशाने देशकार्यास खिसाभार लावता येतो !)  

              कॉमेंट्रीमुळे आबालवृद्धांना खेळाचे कामचलाऊ व सम्यक ज्ञान (म्हणजे काय कुणास ठाऊक, पण वाचायला बरे वाटते ना, असले काहीतरी भारी !) प्राप्त होऊ शकते. क्रीडाविषयक आवश्यक शब्दभांडार मनांत साठून रहाते. स्नेहसंमेलनप्रसंगी एखादी व्यक्ती, काल्पनिक खेळाची काल्पनिक कॉमेंट्री ऐकवून, सुखद बक्षिस मिळवू शकते !

                एकंदरीत कॉमेंट्री ऐकणे, म्हणजे रेशनिंगच्या काळात एका आठवड्यास एका युनिटला चक्क एक ग्राम साखर वाढवून मिळण्याइतका   आनंद उपभोगणे ! त्यातल्यात्यात काही नाणावलेल्या कोमेंटेटर्सची कॉमेंट्री ऐकणे हा, भारताने पाकिस्तानच्या केलेल्या पराभवाइतका दुर्मिळ योग आहे ! '

            " आई ग्ग ...! "
          - या कॉमेंट्रीच्या नादात माझा अंगठा समोरच्या दगडामुळे फुटला की हो ! पण जाऊ द्या. महानगरपालिकेने पडू दिलेल्या या दगडावर, आता मी  कॉमेंट्री तुम्हाला  ऐकवण्यात काहीच अर्थ नाही. कारण रॉकेल न आणल्याने, आमच्या गृहदेवतेची अस्मादिकांवरील कॉमेंट्री मला निमूटपणे ऐकावी लागणारच आहे. 

                तुम्हीही (सवय असली तर, आमच्या घराच्या भिंतीला कान लावून ती -) ऐका हं !

ना शिते ... ना भुते ... !





आकाशाकडे डोळे 


भकास नजरेने 


उभे झाड .....





पर्जन्याची आस 



पानाफुलांचे ओझे 



ताटातूट निश्चिती...





एकेकाळचे पांथस्थ



नुसते बघून जातात 



सावलीलाही 



फिरकत नाहीत... 





आपले एकेकाळचे 



डेरेदार रूप 



स्वत:शी आठवत 



पाखरांना साद घालते... 





चिटपाखरूही 



फिरकायला आता 



तयार नाही !



.

ह्या पुणेकरांचे...



ह्या पुणेकरांचे 
काही खरे नाही ...

सदोदित दुसऱ्यालाच 
शिस्तीचे धडे 
कायम दुसऱ्यांचे वाभाडे 

आपल्याखाली जळतय काय 
कुणाला पहायला वेळच नाही 

एवढया एवढ्याशा पोरापोरीपासून 
ते थेट मसणात गवऱ्या पोचणाऱ्या म्हातारीपर्यंत..... 

..... सारे टपलेले सिग्नल तोडायला 

पण ,
दुसऱ्यांनी तोडलेला दिसला रे दिसला 
की ह्यांची गावभर बोंब सुरूच !

............... जाऊ द्या 

आपल्याला काय करायचे आहे म्हणा 
आपण पुण्यात चार दिसाचा पाहुणा 

पोलिसाचे लक्ष नाही
 माझ्याकडे 
तोवर मनातले तुम्हाला सांगून 
मोकळा झालो बघा -

अजूनही त्याचे लक्ष आणि लक्ष्य 
इकडे नाही तोवर दाम्टावी आपली गाडी ,

लाल सिग्नल तोडून
त्या नो एन्ट्रीच्या बोळात !

काहीही म्हणा राव,
वाण नाही 
पण पुणेरी गुण
कसा 
पट्कन आत्मसात होतोच बघा ! 
.

ग बाई गेला टँकर कुणीकडे ...



पाणीच पाणी चहूकडे ... ग बाई गेला टँकर कुणीकडे ...


कार्यकर्ता घाईघाईत नेत्याजवळ येऊन म्हणाला -


" आपली दुष्काळ दौऱ्यावर निघायची वेळ झाली आहे , 


निघायचं ना आता ?

तुम्ही डुलकी घेत आहात म्हणून विचारतोय, साहेब ! "



नेता त्याच्याकडे पहात उत्तरला -


" अरे ज्याला तू डुलकी समजतोस,


 ती माझ्या मनांत चाललेली काळजी आहे !

त्या भागात न्यायच्या पाण्याच्या आपल्या टँकरचा-


कुठ्ला दर फायदेशीर आहे, 


त्याचा विचार करत होतो मी ! "


.

अरे बिल्डर बिल्डर ....





अरे बिल्डर बिल्डर 

किती फोडशी डोंगर -

वनराई जाई वाया

निसर्गाचा रे जागर !




अरे बिल्डर बिल्डर 

किती तुझा अविचार ,

पैशापायी हकनाक 

बळी घेशी रे हजार !




अरे बिल्डर बिल्डर 

किती झालास नीडर  ;

जीव गेले हकनाक 

तुझा तोरा तरीही झ्याक !




अरे बिल्डर बिल्डर 

एखादा करी विचार ....

सर्व सोयी पाहुनिया 

खूष ग्राहक होणार !


.

सुट्टी



           शिशुशाळेत जाणाऱ्या अजाण बालकापासून ते दुकानदारी करणाऱ्या सुजाण मालकापर्यंत- सर्वांना हवीशी वाटणारी "सुट्टी",  ही मनाला विरंगुळा देणारी अफलातून बाब आहे !

          'मला हे नको, मला ते नको'- असे चिकित्सक वृत्तीने प्रत्येक बाबतीत गरजणारी स्त्री 'स्वयंपाकाला सुट्टी हवी कां ?' असे पतिराजाने विचारताच चट्कन 'होकार'  देऊन मोकळी का होत असेल बरे !

        केशकर्तनालयाचा धंदा, सराफाचा धंदा, किराणा दुकानाचा धंदा, कपडे विक्रेत्याचा धंदा बघा-  प्रत्येक ठिकाणी सुट्टी आहेच ! कुठल्याही धंद्याला सुरुवात करण्याआधीच, आपल्याला सोयीनुसार आणि कायद्याने देखील आठवड्यातून एक दिवस 'सुट्टीचा दिवस' म्हणून ठरवावा लागतो. सुट्टीचा दिवस उपभोगू न शकणारा दुर्दैवी मनुष्य प्राणी या भूतलावर क्वचितच आढळेल ! सुट्टीला काळाचे बंधन नाही. ती क्षणैक असू शकते वा अनंत काळाची चिरकाल असू शकते !

          परवा दूरच्या एका नातेवाईकास मी एका दवाखान्यात भेटायला गेलो होतो. बिचारा दुखण्याने अगदी जर्जर झाला होता . 
मी त्याला विचारले - 
"काय महाराज, दुखण्याला सुट्टी वगैरे काही द्यायचा विचार आहे की नाही मनांत  ? "
त्यावर विनोदाने (माझाच नातेवाईक ना !) तो उत्तरला -
"त्या परमेश्वराला तरी सुट्टी हवी ना , माझ्या दुखण्याच्या सुट्टीचा विचार करत बसायला !"

          या भूतलाच्या छत्रावर एकटा परमेश्वरच दुर्दैवाने जिवंत असेल, जो सुट्टीचे महत्व जाणत नसेल ! आपण 'दिवाळीची सुट्टी'  उपभोगतो. 'दिवाळीची सुट्टी'-  या दोन शब्दांचा विचार केल्यास, सुट्टीमुळे दिवाळीला महत्व आहे कां, दिवाळीमुळे सुट्टीला ? आपल्याला असे दिसून येईल की, सुट्टीमुळेच निश्चित दिवाळीला महत्व प्राप्त झालेले आहे ! 

          "सुट्टी" नसती तर ऐन दिवाळीतच आपल्याला शिमग्याचा सण साजरा करावा लागला असता. कारण पावसाळ्यानंतर हीच सुट्टी सर्वात  जास्त काळाची असते. बहीणभावांची भेट याच काळात होते. फराळाच्या निमित्ताने मित्रमंडळी याच काळात एकत्र जमतात. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात. दिवाळसणानिमित्त जावईबापूना भेटवस्तूचा लाभ होतो. या सुट्टीचा फायदा घेऊन, एखादी तरुणी आपल्यामागे हात धुवून लागणाऱ्या तरुणास 'भाऊराया' असे भाऊबिजेनिमित्त संबोधून, त्याचा 'मामा' बनवू शकते. आणि सुट्टीतील रम्य मधुचंद्राच्या कल्पना-सरोवरात डुंबणाऱ्या बिचाऱ्या त्या तरुणाच्या मनोराज्याला अर्धचंद्र मिळतो !

          त्यानंतर महत्व आहे ते म्हणजे 'उन्हाळी सुट्टी'ला ! ही खरी बाळगोपाळांची सुट्टी ! 'पळती झाडे पहात' बेटे मस्त मजेत 'मामाच्या गावाला' निघतात. मुलांच्या पाठोपाठ या सुट्टीचा आस्वाद घेणारी ती  मास्तरमंडळी ! हां हां म्हणता म्हणता, वार्षिक परीक्षेच्या पेपर तपासणीच्या गठ्ठ्यानी, ती आपली सुट्टीची विकेट पार सीमापार उडवून लावतात !

          माणसाला मरेस्तोवर कष्ट करावे लागतात. हे कष्टाचे जाळे सुखदु:खाच्या धाग्यांनी विणलेले असते. हे जाळे व्यवस्थितपणे विणण्याचे साधन म्हणजे 'सुट्टी' ! सुट्टीच्या सहाय्याने माणूस टप्प्याटप्प्याने प्रगतीपथावर घोडदौड करू शकतो. सुट्टी आहे म्हणून जीवनात राम आहे, जीव आहे. जीवनातील सुट्टीच्या अतुलनीय स्थानाचे महत्व मी तुम्हाला लिहून सांगू शकणार नाही आणि वाचूनही तुम्हाला ते कळणार नाही. अहो, सुट्टीशिवाय जीवन म्हणजे बघा...म्हणजे...अं अं.... फराळाशिवायच दिवाळी समजा  की हो !     

          कोणतेही काम 'पूर्ण' करायचे असल्यास, ते काम अधूनमधून 'अपूर्ण' ठेवावे लागते. मधे सुट्टी घेतली की, ते काम व्यवस्थित पार पडत जाते. त्या कामाला चालना मिळालेली असते. 'काम चालू, रस्ता बंद'ची पाटी वाचली की, आपण समजू शकतो-
 'काय चालू आणि काय बंद' आहे ते ! 

          ही 'सुट्टी'ची प्रथा पार पुरातनकालापासून चालत आलेली असावी ! आजोळी गेलेला भरत रामाला भेटायला, उन्हाळ्याची किंवा दिवाळीची सुट्टी गाठून येत असावा. दुष्यंत राजा देखील रविवारची सुट्टी गाठून शिकारीला गेलेला असताना, रविवारच्या सुट्टीची मौज आपल्या सख्यांसह मनमुराद लुटणाऱ्या शकुंतलेची शिकार बनला असेल ना !

      सुट्टीची प्रथा अंमलात आणणाऱ्या महाभागाचे कौतुक, करावे तेवढे थोडेच आहे ! आपल्या मायबाप सरकारने सुट्टीचे महत्व चांगले जाणले आहे. महिन्यातील दुसऱ्या आणि चवथ्या/पाचव्या शनिवारी सुट्टी सुरू करून, सरकारी कामकाज व्यवस्थेत किती आमूलाग्र बदल घडवला आहे ते आपण पाहतोच ना ! मी तर असे सुचवीन की, आठवड्यातले सातही दिवस सुट्टी जाहीर करावी ! काय हरकत आहे हो ? सर्व कर्मचारी बंधू नेहमी ताजेतवाने रहातील. आपल्या 'छोटया कुटुंबा'समवेत ते वेळ मजेत घालवतील. अशारीतीने ते सदासतेज रहातील. सदा उत्साही राहिल्याने 'आराम हराम है'- हे वचन त्यांना तरी पचनी पडेल. (सरकारला कुठलीच गोष्ट रुचत नाही पचत नाही !) जास्त सुट्टी मिळाल्याने, विश्रांती घेण्याच्या कामाचा वेग निश्चितच वाढेल !

          माणसाला जीवनात बदल हा हवाच असतो. एका गोष्टीला 'बगल' देऊन तो दुसऱ्या गोष्टीत 'बदल' घडवत असतो. घरातल्या कामात एखादी मोलकरीण त्रास देत असेल, तर तिला 'कायमची सुट्टी' देऊन दुसरी मोलकरीण कामासाठी आपल्या घरात आणली जाते. एखादी फ्याशन जुनी झाली की, तिला आपोआप सुट्टी मिळून, नवीन फ्याशन अस्तित्वात येते. 

          सुट्टीची सवय लहानपणापासूनच लागते. सवय म्हणण्यापेक्षा चटक किंवा लळा हे शब्द जास्त योग्य ठरतील ! लघवीची सुट्टी, मधली सुट्टी, खेळाची सुट्टी- हे विद्यार्थी जीवनातील महत्वाच्या घडामोडीचे प्रसंग ! शनिवारची अर्धी सुट्टी, महिनाअखेरची अर्धी सुट्टी- हे विद्यार्थी दशेतले आवडते प्रकार !  एखादी व्यक्ती निधन पावल्यास, दुखवट्यापेक्षा नंतर मिळणारी सुट्टी जास्त आनंददायक वाटते ! मृत व्यक्तीला 'कायमची सुट्टी' मिळालेली असते- तर आपल्याला तिच्यामुळे थोडी तरी सुट्टी मिळावी, अशीच दुखवट्यामागची भावना असते !  

          सुट्टीचा आनंद हाच खरा जीवनातला आनंद. थकल्याभागलेल्या आपल्या जिवाला विश्रांतीमुळे बदल मिळतो. बंधमुक्त जीवन आपण सुट्टीच्या काळात उपभोगू शकतो, जगू शकतो. खरे तर सरकारला मुदतवाढ, नगरपालिकेला करवाढ, व्यापाऱ्याला भाववाढ, सिनेमा-नाटकवाल्यांना दरवाढ जशी आवश्यक वाटते, तशी आमजनतेला सुट्टीवाढ का आवश्यक वाटू नये हो !        

              " आजपर्यंत जगात ज्या काही थोर महान व्यक्ती होऊन गेल्या, त्यापैकी xxx  म्हणजे "- अशाप्रकारचे व्याख्यान केवळ  "सुट्टी"मुळे देता येते. फुल्यातल्या व्यक्तीची आपण आदरपूर्वक जयंती/पुण्यतिथी साजरी करतो. सुट्टीच नसती तर जयंती/पुण्यतिथी कशी काय साजरी करणार  आपण ?  वेळ कधी मिळणार आपल्याला ! सुट्टी मिळते, म्हणून व्याख्यान द्यायला वेळ मिळतो- तर सुट्टी मिळते, म्हणून ते ऐकायला वेळ मिळतो. 

          त्या एका रविवारच्या सुट्टीमुळेतर आपल्याला इतर वारांची नावे लक्षात ठेवायला वेळ मिळतो. एक दिवसाच्या साप्ताहिक सुट्टीमुळे आपले जीवन एक दिवस सुखी होत असते. 

          पुढाऱ्यांची जयंती/पुण्यतिथी, लहानमोठे सणवार, महत्वाच्या घडामोडींचे दिवस, अमुकदिन तमुकदिन वगैरे- केवळ सुट्टीमुळे लक्षात ठेवता येतात ! 

          दिवस उगवतो आणि उगवल्यामुळे मावळतो. पण सुट्टीचा दिवस तो सुट्टीचाच दिवस ! तो एखादाच असतो. म्हणून म्हणावेसे वाटते -              " सुट्टीत खरोखर जग जगते ! " 

          तरी बरे.... आजचा सुट्टीचा दिवस मी- 'सुट्टी' हा शब्द, 'सुटी' असा लिहावा, का 'सुट् टी ' असा लिहावा, का 'सुट्टी' असाच लिहावा; ह्या मतभेदाना चव्हाट्यावर आणण्याच्या विचारास पूर्ण सुट्टी दिलेली आहे ! 
.

अनुभव


" नको असलेले पाहुणे, शेवटी त्यांच्या गावी रवाना झाले आणि आमच्या जिवात जीव आला ! "

       - ही काय भानगड आहे, ते समजण्यास 'अनुभव' घ्यायलाच हवा ! 'पाहुणे ' ही गोष्ट वास्तविक सर्वाना हवी वाटणारी आहे. कारण ते थोडेच दिवस रहातात, बहुधा बरोबर साखर- तांदूळ आणतात आणि जाताना मुलांच्या हातावर खाऊही ठेवतात !

               पण अनेक दिवस मुक्काम थकणारा, 'माझे नाही तर माझ्या काकाचे घर' मानणारा, मोकळ्या हाताने व रिकाम्या खिशानेच दुसऱ्यांच्या घरात वावरणारा असा-  ' पाहुणा' नामक प्राणी दिसला की,  आमचे धाबे दणाणते बुवा ! असल्या पाहुण्यांचा अनुभव फारच भयानक असतो . ' कधी एकदाचा तो कटतोय' अशी वाट पहातच,  त्याची उत्तम बडदास्त राखण्याचे कर्तव्य इमानेइतबारे पार पाडणारा, हाच खरा 'नटसम्राट' कसा, ते अनुभावानेच तुम्हाला समजेल !

               तर सांगायचा मुद्दा हा की, आजकाल अनुभवाचा जमाना आहे. टक्के टोणपे खाल्ल्याशिवाय आणि बऱ्यावाईट  अनुभवांची शिदोरी जवळ बाळगल्याशिवाय मानवाला आपल्या आयुष्याचा रथ हाकताच येणार नाही ! अनुभवी असणे,  हाच आजच्या युगाचा आदर्श आहे. परदेशी जाऊन स्वदेशी परत आलेल्या मानवास पहिला प्रश्न पत्रकार विचारतात, तो हाच की, " आपल्याला ह्या दौऱ्यात काय काय अनुभव आले ? " ज्याचे अनुभव अधिक, त्याला भाव अधिक मिळतो. तुम्हाला म्हणणं पटतंय कां पहा ! जरा सविस्तरच सांगतो हं -

               एका वर्तमानपत्रातली ही जाहिरात पहा- " उमेदवार पाहिजे ! शिक्षणाची अट वगैरे पुढीलप्रमाणे - उमेदवार कमीतकमी पी एच डी असावा, किंवा काहीच न शिकलेला असल्यास किमान ३० वर्षाचा त्याला कामाचा अनुभव असावा ! " आहे की नाही कम्माल ?  'एक सुप्रशिक्षित उमेदवार आणि एक अशिक्षित पण अनुभवी  उमेदवार' यात अडाण्याचाच गाडा पुढे रेटला जातोय की नाही ?  कशामुळे हो ?

                आजीबाईजवळ अनुभवांच्या गोष्टींचा बटवा असल्यामुळे,  लहान मुले  तिच्याचभोवती गोळा होतात ना ! अनेक भलेबुरे अनुभव घेऊनच पुष्कळ संशोधक चांगल्या नावारूपास येतात. शिक्षणाला  अनुभवाची जोड असणे,  म्हणजे सुगंधी सोने सापडण्याचा अनुभव घेण्यासारखेच  !

               अनेक मुलाखती देऊन पदवीधर उमेदवार अनुभवाने पुढे येऊ शकतो.  खूप वधुपरीक्षेतून तावून  सुलाखून म्हणजेच अनुभव घेऊन एखादी तरुणी उत्तम गृहिणी बनू शकते !  मुलींसाठी आपली पादत्राणे झिजवणारा वधुपिता आपल्या अनुभवामुळेच दुसऱ्यांना "लाल त्रिकोण" दाखवण्यास क्वालिफ़ाईड ठरतो .

               आयुष्याचे सार अनुभवांमधे एकवटलेले आढळते. अनुभवांच्या ठेचा बसून मनुष्याला शहाणपणा येतो.  "एकवार अनुभव हीच यशाची खात्री" देणारे, शेवटी यशाला कात्रीही लावतात, ही गोष्ट अनुभवानेच कळते !  दारावरचे अनेक फिरते विक्रेते असे यशाला कात्री लावणारे दिसतात. विद्यार्थ्याना पुच्छगतीने प्रगतीपथावर नेणारे काही "अनुभवी" मार्गदर्शक  आपल्याला गाईडसवर विराजमान झालेले दिसतात. अर्थात स्वत:ला आलेल्या काही खास अनुभवाने विद्यार्थीही "अनुभवी" होऊन वरील अनुभवांपासून चार हात दूर रहातात.  ही पण एक झलक- अनुभवाचीच !

               लग्नसमारम्भाप्रसंगी याद्या-बैठका-कोठी यासाठी अनुभवी माणसे अनुभव असणाऱ्यानाच का नियुक्त करतात, ते अनुभव आल्याशिवाय नाहीच उमजणार ! अनुभवी तिकीट तपासनीस विनातिकीट प्रवाशांना कसे अगदी अचूक "सावज" म्हणून हेरतात, हे पाहण्यासाठी एकदा अनुभवच घ्यायला हवा ! अनुभवांच्या अनेक पेडानी जीवनाचा दोरखंड मजबूत होत जातो ! वाईट अनुभवांती माणूस चांगल्या गोष्टी आत्मसात करू शकतो, तर चांगल्या गोष्टी अनुभवणारा माणूस वाममार्गाचा अनुभवही घेऊ इच्छितो. अनुभव हे असे दुहेरी हत्यार आहे !

              भरबाजारात सर्वांच्या समोर घसरून पडण्याचा अनुभव तुम्ही घेतलाय का कधी ? मद्द्याची चव अनुभवानेच कळते, असे म्हणतात. पण एखाद्या मद्द्यप्याला नको तिथे, नको तसे लोळताना पाहिल्यावर कुणाला बरे तसल्या अनुभवाचे अप्रूप वाटेल ?  दुसऱ्याला आलेल्या अनुभवापासून आपल्याला कोणता अनुभव येईल, हे अनुभवानेच ज्ञात झाले पाहिजे !

               अनुभवाबरोबर भाव जास्त खाता येतो, याचा मलाही अनुभव आलेला आहे. माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवशी "बॉस"ने एक आकडेतक्ता मला टंकलिखित करायला सांगितला होता. त्यात काहीतरी गफलत असल्याची शंका आल्याने मी बॉसला तसे म्हटले.  तर थंडीने कुडकुडणार्‍या दातांप्रमाणे तो उसळला - " हे पहा मिष्टर टायपिष्ट ! तुमच्यापेक्षा चार पावसाळे (- का पैसे ! ) मी जास्तच खाल्लेत, तेव्हां माझ्या चुका काढत बसू नका ! " बॉसने चार पावसाळ्याचा अनुभव पाठीशी जास्त घेतल्याने आणि मी नोकरीत पूर्ण अननुभवी असल्याने, मी निमूटपणे परत फिरलो. बॉसचा हा पहिलाच अनुभव माझ्या भावी कारकीर्दीला फार अनुभवी ठरला !

               गिऱ्हाईकापासून येणाऱ्या निरनिराळ्या अनुभवांती दुकानदार शहाणा होऊ शकतो. माणसाच्या प्रत्येक पावलागणिक अनुभव त्याला पुढे पुढे ढकलत असतो. "अनुभवी हो" असे नुसते म्हटल्याने, अनुभवी होता येत नाही,  तो प्रत्यक्ष घ्यावाच लागतो !  कंडक्टर -प्रवासी, वकील-अशील, डॉक्टर-पेशंट , विक्रेता-ग्राहक ह्या सगळ्या जोड्या  एकमेकांच्या सहवासातच एकापेक्षा एक अनुभवाने वरचढ होतात !

               माझ्यामते सर्वात अनुभवी कोण असेल तर तो म्हणजे साडी विक्रेता ! आशा निराशेच्या हिंदोळ्यावर, त्याला चोखंदळ स्त्री-ग्राहकांचे अनुभव घेत झुलावे लागते. त्यांच्या चंचल स्वभावाचे प्रत्यंतर, तो हरघडीला अनुभवत असतो. शंभर  साड्यातून महिलावर्गाची रंगाबाबत चिकित्सा, त्यांचे  काठपदरांविषयी पसंती-नापसंतीचे चीत्कार, त्या डीझाईन्सबद्दल हजारो हुंकार आणि सरतेशेवटी शंभरातील एकाही साडीची पसंती नसण्याचा उद्गार ऐकणे-  म्हणजे त्या विक्रेत्याच्या सहनशीलतेचा अंतच की हो ! पण अनुभवाने तोही सोशिक बनतो ना !  " ही नको ती - ती नको तिच्या पलीकडची -" ह्या असल्या कोलाहलात, त्याला अनुभवाने रममाण व्हावेच लागते.  शिवाय साड्यांचा तो भलामोठा उत्तुंग डोंगर रचून, त्यातून तळाशी असलेलीच साडी नेमकी एखाद्या विशालकाय पुरंध्रीने  निवडताच ...., पुन्हा दर भाव ह्यांची घासाघीस- त्या विक्रेत्याला स्वस्थ चित्ताने ऐकून घ्यावी लागते !  स्त्रियांच्या स्वभावाला मनोभावे शरण जाऊन, अनुभवाने स्थितप्रज्ञ राहू शकणाऱ्या अशा त्या अनुभवी विक्रेत्याची धन्य होय !                      

                 थेटरापाशी चालू असलेल्या काळ्याबाजारातले तिकीट निर्भीडपणे घेण्यास, अनुभव लागतो. रेशनच्या रांगेत आपला नंबर येताच- साखर व धान्य संपण्याचा दु:खद निराशेचा क्षण अनुभवण्यातले थ्रिल काही वेगळेच ! नेहमी नापास होणाऱ्याला, एखादेवेळी पास होण्याचा आनंद अनुभवल्याखेरीज पुढे यशस्वी होण्याची गुरुकिल्ली   गवसणार नाही.

              रुळलेल्या चाकोरीतून वेगळे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न म्हणजे " अनुभव ! "    धाडसाने अनुभव येतात आणि अनुभव आले की माणूस धाडसी बनू शकतो !
.

हाल कैसा है जनाबका ----- !


सकाळचा चहा म्हणजे,

बायकोबरोबर काल शिळ्या वाटलेल्या


यथेच्छ गप्पाटप्पा - 


आज ताज्यातवान्या करायची संधी !




विषय एका जुन्या मित्राच्या नव्या लग्नाचा निघाला ...




बोलता बोलता मी म्हणालो -



" किती हालात दिवस काढले होते बिचाऱ्याने !


आठवले की अजून अंगावर काटा येतो.


बरे झाले आता दोनाचे चार झाले.

सुखाचे दिवस पहायला मिळतील त्याला आता ! "




बायको शांतपणे उद्गारली -


" लग्न आत्तातर झालेय ना ?


खरे हाल आता सुरू होतील बघा ! "




मी रिकाम्या कपबशा आत नेत असताना....



बायको फेसबुकावर लॉगिन करत होती !!!


.