कविता वृक्ष

अक्षरांचे बीज 
पेरले

शब्दांचे रोपटे
उगवले

वाक्यांच्या फांद्या 
पसरल्या

विचारांची फुले
उमलली 

कल्पनांची फळे 
लटकली

आनंदी भावना
डुलू लागल्या

आशय भरा-या
मारत राहिल्या

कविता वृक्ष
बहरू लागला

वाचक दक्ष
मनी आनंदला..!
.

" स्वामी समर्था, संकटहर्ता - "

स्वामी समर्था, संकटहर्ता 

दुबळ्यांचा तू रक्षणकर्ता ..


"भिऊ नकोस,पाठीशी आहे" 

नित्य वचन हे ध्यानी आहे ..


रात्रंदिन स्मरणात गुंततो 

मनोमनी मी तुला वंदितो ..


माझे दु:खहरण तू करशी 

मज आनंदी क्षणही देशी .. 


शक्य अशक्यासी तू करशी 

अद्भुत लीला सहज दाविशी  ..   


उपकार तुझे मानु किती मी 

अनंत जन्मी तुझा ऋणी मी .. !

.

" श्री गुरुदेव दत्त.."

'श्री गुरुदेव दत्त' करा जप आनंदाने

जीवन आपले जगत रहा शांत चित्ताने..


आळशी होऊन कर्तव्याला चुकू नका

कर्तव्यपूर्ती आनंदाला मुकू नका..


दत्त गुरूंचे स्मरण करा जमते जेव्हा

नामजपाची गोडी वाढवा मनात तेव्हा..


ध्यानीमनी नित्य असू द्या मूर्ती दत्ताची

भजन कीर्तन यात रमू द्या ओढ चित्ताची..


'श्री गुरुदेव दत्त' जपता नयनासमोर मूर्ती

हृदयी वसू द्या दत्तगुरूंचा महिमा आणि कीर्ती..


वंदन मनापासून करावे दोन्ही कर जोडुनी

शरणागत सद्गुरूस व्हावे शांती सुखाचे धनी..! 

.

आकाशाने भाव मनीचे जणू जाणले..गझल होते

 लवंगलता- मात्रावृत्त.. 

८+८+८+४ मात्रा

अलामत.. अ

रदीफ.. होते

.....................................


आकाशाने भाव मनीचे जणू जाणले होते

दुष्काळाने त्रस्त भुई ते बघत बरसले होते ..


का दाखवली वाट सुखाची मज देवाने तेव्हा

दु:खी मन हे गाण्यामध्ये माझे रमले होते ..


किती वेदना मजेत होत्या मनात नांदत  माझ्या 

मी आनंदी दिसता सुखही रुसून बसले होते ..


बडबड कानी ऐकून तिची हैराण जरी झालो

मौनानंतर शब्द ऐकण्या मन आतुरले होते.. 


रंग माणसे बदलत होती पाहत होते सरडे

वरचढ झाली किती जाणुनी ते हिरमुसले होते..

.

क्षणात जेव्हा गुलाब हसतो.. गझल

जलौघवेगा वृत्त-

क्षणात जेव्हा गुलाब हसतो
उदास काटा मनात खुपतो..

म्हणे न कोणी जगात दु:खी 
सुखी कुणीही मला न दिसतो..

तिने झुलवणे तिचे न येणे 
जिवंत असुनी मनात मरतो..

कधी पहाटे तिच्या मिठीचे
अधीरतेने 'सपान' बघतो..

असे करावे तसे करावे
मनी ठरवतो तसाच बसतो..
.

पाच दोनोळ्या..

कुणी न बोलला जीवनी शब्द एक चांगला
झाला विस्मित अती मृतात्मा श्रद्धांजली ऐकुनी..

हसवत बसतो तो लोकांना आवडते म्हणुनी
फसवत असतो स्वतःस पण तो व्यथा दडवुनी..

कटीवर हात ठेवत तू निवांत उभा रहा विठ्ठला
दाखव दुष्काळात माझ्या गावी तू पाऊस पाडुनी..

फूल न साधे दिले कुणी जिवंतपणी ज्याला
निघाला पहा खांद्यावर तो हारांनी सजुनी..

समोर न भेटलीस मला तू नाही बिघडत काही
दिसते तुझीच प्रतिमा घेता डोळे बंद मी करुनी..
.

गाढवाची शाळा..(बालकविता)

काढायची ठरवली गाढवाने नवी शाळा
झाले शाळेत सगळे उत्सुक प्राणी गोळा

हत्ती बनला हेडमास्तर लांब सोंड उंचावून
सिंह झाला पर्यवेक्षक आपली मान हलवून

गेंडा ठरला मॉनीटर वर्गाचा मग एकमताने  
ऐकून खूप खूष गेंडा जयजयकार जोराने

हरीण शेळी गाय ससा वर्गात पुढे बसले
वाघ बोकड लांडगा कोल्हा सर्व मागे बसले  

मान खाली घालून जिराफ मास्तर वर्गात
थांबला वर्गाबाहेर शहाणा उंट उंच सर्वात

इकडे तिकडे माकड उड्या मारत होते 
बैल घोडा शेपटाने माशा सारत होते

आले गाढव पहायला नवीन आपली शाळा
वर्ग सोडत सर्व प्राणी त्याच्याभवती गोळा

इतके विद्यार्थी झाले माझ्या शाळेत भरती
आनंदी गाढव लोळू लागले उकिरड्यावरती !
.

सहा चारोळ्या..

जुगलबंदी आपली ही 
कोठवर चालायची -
मौन तुझे, मीहि संधी 
न घेतो बोलायची ..
.

अजब खेळ पावसाचा
धरतीच्या लेकराशी-
गाव एखादा उपाशी 
गाव एखादा तुपाशी..
.

शक्य वाटते दगडातही 
"देव" पाहणे- 
अवघड वाटते माणसांत 
"माणूस" शोधणे..
.

जो तो हात जोडतो
मागण्यास सुख देवापुढे-
सुख पडताच पदरी
पाठ फिरवतो देवाकडे..
.

आयुष्याची नाव निघाली 
धाव घेउनी किना-याकडे,
'उरला प्रवास असाच घडावा' 
देवाला घालतो साकडे !
.

हिंडतो मी वेदनेला 
घेउनीया संगती-  
मत्सरी सुख होत नाही  
मज कधीही सोबती..
.

गजानना गजानना.. (भक्तीगीत)

गजानना गजानना
सद्बुद्धी दे सकलांना

समाधान सुख आम्हा देशी
विघ्न संकटे दूर तू करशी

नष्ट करावे अविचारांना
मनी भरावे सुविचारांना

द्वेष नको भांडणे ना मनी
प्रेम सलोखा नित्य जीवनी

सदैव आचरतो सद्वर्तन
तुला स्मरूनी घेतो दर्शन

असशी दुःखात तूच आधार
जीवन सागर सुखात पार

करतो प्रार्थना तुला गणेशा
पूर्ण करी सर्वांच्या अपेक्षा..!
.

पाठीवर तू घेशी सदैव थाप मारुनी.. गझल

अनलज्वाला मात्रावृत्त
८+८+८.
..........................................
पाठीवर तू घेशी सदैव थाप मारुनी
होता कौतुक पण इतरांचे जाशी पळुनी..

पावसातली भेट आपली  का आठवली
आठवणींच्या सरीत गेलो पुरता भिजुनी..

तिने वाचली माझ्या नयनी कथा व्यथेची
दादही दिली तिने मग मला आसवांतुनी..

फुलांसवे मी किती खेळलो बागेमध्ये
काट्यांनी पण सूड घेतला मला टोचुनी..

आठवणींचे पंख लावले मनास माझ्या
फिरून आलो पुन्हा तिच्या मी दारावरुनी..
.