चतकोर भाकरी ती त्याच्या करात आली .. [गझल]

चतकोर भाकरी ती त्याच्या करात आली 
गेली शिवी मनीची ओवी मुखात आली..

रागात ती तरी पण थोडी हसून गेली 
हळुवार पावसाची जणु सर उन्हात आली..

माळून खास आली का मोगरा सखी तो
साधावयास कावा गनिमी मनात आली..

चाहूल लागली त्या चंद्रास तारकेची
निद्रेत तत्क्षणी का स्वप्नात गात आली ..

आसूसलो किती मी ऐकावयास कौतुक   
श्रद्धांजलीच कानी एका सुरात आली ..
.   

पर्याय आज नाही फुलण्याशिवाय आता .. [गझल]

पर्याय आज नाही फुलण्याशिवाय आता
फुलणार ना फुले ही काट्याशिवाय आता

आश्वासनास देण्या नेता सरावलेला
मतदार राहतो का भुलल्याशिवाय आता

होता अनोळखी पण नात्यातला निघाला
राहील काय येथे घुसल्याशिवाय आता 

पेशा विदूषकाचा पाठीस लागलेला
उरली व्यथा न दुसरी हसण्याशिवाय आता

हुजरेगिरीत सारे आयुष्य काढलेले
होते न काम काही झुकल्याशिवाय आता ..
.

चार चारोळ्या -

१)

भाऊगर्दी झाली आहे
जगात मुखवट्यांची -
पारख अवघडली आहे

जगात माणुसकीची ..

२)

चार पुस्तके व्यवहारज्ञानाची
कोळून प्यालो मी -
अनुभव व्यवहारात वेगळे

कोसळून का गेलो मी ..


३)

छंद लावुन घेतला 
मी मनोरे बांधण्याचा -
छंद त्यांना लागला 

ते बघूनी पाडण्याचा ..

४)

फूल ते साधे कुणी न दिले
जिवंत होतो जोवर मी -
सजुन बघा हारांत निघालो

चौघांच्या खांद्यावर मी ..
.

दोन डोळे मत्सराचे हाय दिसती का मला ..[गझल]

वृत्त- देवप्रिया/कालगंगा 
लगावली- गालगागा गालगागा गालगागा गालगा 
मात्रा- २६ 
---------------------------------------------------------------------------------------------------------
बोलतो मी जास्त जेव्हा चुप बसवती का मला
गप्प असतो मात्र तेव्हा बोल म्हणती का मला-

वाटते ना कायद्याची आजही भीती कुणा
लाच देता काम होते ते हुडकती का मला-

ओळखीचे चांगले ते समजुनी मी भेटता
विसरुनी उपकार माझे दूर करती का मला-

सांगतो सर्वास माझी जात मी माणूसकी
घेउनी बाजूस कानी परत पुसती का मला-

चार येती कौतुकाचे शब्द कानी ऐकण्या
दोन डोळे मत्सराचे हाय दिसती का मला ..

.

चार चारोळ्या -

जातो करायला मी एक 
करते नशीब उलटे- 
केव्हा पहायला देणार 
फासे नशीब सुलटे..
.

जिवंतपणी तुमच्या डोक्याचा उपयोग
माणूस कधीच करून घेत नसतो -
पाखरांना त्यावर बसायची सोय मात्र
माणूस एकजुटीने भांडून करत असतो . .
.

जरी भाकरी होती 
शिळीच ती पुढ्यात -
भिजत सतत होती 
आसवांच्या कालवणात ..
.

जेव्हा समोर अचानक तू येतेस 
माझ्याकडे पाहून गोड हसतेस -
भांड्याला कल्हई केल्यासारखा 
क्षणात माझा चेहरा उजळवतेस ..
.

|| श्री गुरुदेव दत्त ||


प्रसन्न श्रीदत्ताची मूर्ती
उभी राहता नयनापुढती ..

दु:ख संकटे क्षणात सरती
आनंदाला येते भरती ..

तीन शिरे कर सहा शोभती 
देती अपुल्या मनास शांती ..

चार श्वान हे अवती भवती
आठवण वेदांची जणु देती ..
    
गोमाता पाठीशी उभी ती
कामधेनु पृथ्वीही संगती ..

दंड कमंडलु त्याग प्रचीती
औदुंबरतरु छायेखालती ..

गुरुदेवासी जाणुन स्मरती
समाधान नित चेहऱ्यावरती ..

गजर दत्तनामाचा करती
वाट सुखाची सदैव धरती ..
.

मी तो एक .. हमाल -


"अग एsssss ,
किती जड आहेत या ब्यागा...
शिवाय या तीन चार पिशव्या ? "

- बायकोला तिच्या माहेरी आनंदाने सोडायला निघालेला मी..
तरीही जरासा त्राग्याने ओरडलोच .


"अहो, मग त्यात इतक किंचाळायला काय झाल " 
- बायको सगळ्या नगावर नजर फिरवत उद्गारली .

"अग पण- 
इतकी ओझी बरोबर घेऊन जाण्याची,
 काही आवश्यकता आहे का ? "
- महाकाय तोफेपुढे अंमळ नमते घेऊन, 

थोड्याशा नरमाईच्या पण समजावणीच्या स्वरात मी म्हटले .

ती शांतपणे उत्तरली-
"मी एकटी जाते, तेव्हा एखादीच ब्याग बरोबर नेते की नाही ?
आता अनायासे तुम्ही सोबत आहात .. म्हणून मग ....!"


तिची विजयी मुद्रा चुकवत,
 माझ्या चपलेत पाय सरकावत,

मी मुकाट्याने पुढे निघालो ...
.

स्व भाव

एका शासकीय कार्यालयात कामाला वाहून घेतलेला मित्र ..

सेवाभावी, निष्कपटी वृत्ती असलेला .

आपण बरे आपले काम बरे. 

मित्रमंडळ बोटावर मोजण्याइतकेच.
नातेवाईकमंडळी कामापुरती जमणारी.


... त्याची सेवानिवृत्ती जवळ आलेली आहे. 

समाजसेवा, इतरांना मदत करणे नाही.
इतरांच्याकडून तशी अपेक्षा बाळगणे नाही !


छंद कसलाही नाही.
टीव्हीची नावड.
सिनेमाकडे ढुंकूनही पाहत नाही.
कथा, कादंबरी, मासिक इ. पैकी खास आवड कश्शाचीच नाही.
घरात पडणाऱ्या पेपरखेरीज अवांतर वाचन नाही.


सवय लावण्याचे प्रयत्न निष्फळ .


आजचा दिवस कर्तव्य करण्यात पार पाडला, 
एवढाच काय तो आनंद !

नवीन तंत्रज्ञानापासून चार हात दूर राहण्यात,

असुरी आनंद.
मोबाईल कामापुरता म्हणजे .. 

आलेला फोन घेणे व कामापुरता इतरांना करणे !
कार्यालयात कामापुरतेच संगणकाचे ज्ञान प्राप्त करून घेतलेले .


..... सेवानिवृत्तीनंतर कशी आणि कशासाठी 
जगत असतील अशी माणसे !
.

चार चारोळ्या..

ना करावा कधी बायकोने
नवऱ्याच्या पगाराचा अवमान-
ना करावा कधी नवऱ्याने
बायकोच्या सौंदर्याचा अपमान..
.

सदैव ती अक्षरविश्वात वसते
भान विसरून खेळत हसते-
शब्दांच्या भातुकलीत रमते
जगाशी देणे घेणे नसते..
.

स्वजनहो, जाळा हवे तेवढे
अजुनी मज सरणावरी -
चटके त्याहुनी दिले तुम्ही
जीवनी मज नानापरी ..
.

हवे कशाला तुला प्रिये
अजून वेगळे शस्त्र-
कटाक्ष टाकून जखमी करणे
हे तव हुकमी अस्त्र..
.

छानशी करतो अपेक्षा - [गझल]

वृत्त = व्योमगंगा 
लगावली= गालगागा गालगागा गालगागा गालगागा 
मात्रा  = २८ 
-------------------------------------------------------
छानशी करतो अपेक्षा "स्वप्न पाहूया" बिलोरी
का नशिबी पाहणे ते स्वप्न माझ्या हो अघोरी

काय वर्णू साठलेल्या वेदनांची थोरवी मी
वेदना वाटून घ्या हो फोडुनी माझी तिजोरी

थोर आहे आज पैसा सत्यही झाकावयाला
दाखला खोटाच घेई न्याय घेण्याला टपोरी


दान देवाला सुखाचे मागताना नेहमी मी  
टाकतो झोळीत का तो खास दु:खाची शिदोरी

का मनाला हौस होती शोधण्याची राक्षसाला
शोधताना नेमका का आरसा आला समोरी ..
.

'महिला..महिला..महिला.......'

महिला..महिला..महिला.......

आमच्या जुन्या कोत्या अर्धवट विचारानुसार .....

महिलेने अमुक करू नये / महिलेने तमुक करू नये ...
महिलेने हे वाचू नये / महिलेने हे धर्म पाळावे पाळू नयेत ..
महिलेने तसे वागू नये / महिलेने असे वागू नये ........

किती किती अनिर्बंध निर्बंध हो हे महिलेवर ?

...... जिच्यावाचून हे जग राहूच शकत नाही
जिच्यावाचून घरात घास मिळतच नाही
जिच्यावाचून जीवनाचे पान उलगडत नाही
जिच्यावाचून पुरुषाचे जीवन "अर्धांग" ...
नव्हे तर.... अर्धांगवायु झाल्यासारखेच ..
आहे .

सगळ्या अटी / नियम /प्रतिबंध महिलेबाबतच आवर्जून का बरे ?

काळ बदलत चालला आहे , हे फक्त मालिका पाह्ण्यापुर्तेच ?

काळ बदलतो आहे, हे फक्त पुस्तका/नाटका/कादंबऱ्यापुरतेच का ?

....... महिला पुरुषाइतकेच नाही तर,
कांकणभर जास्तच काम करू शकते,
हे सर्वांना माहितही आहेच !
 

कोणताही व्यवसाय/नोकरी/शेती/रोजगार ....
सर्वच क्षेत्रात ती त्याच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर आहे !


पूर्वीची पुरातनकालाची दृष्टी अजूनही अंधुक ठेवून,
काही प्रवृत्ती तसेच जगणार आहेत, असे वाटते.....

ज्यांना स्वत:लाही पुढे सरकायचे नाही आणि
 महिलेलाही दडपशाही दाखवून,
एक पाऊल मागेच ठेवायचे आहे... असे दिसत आहे. 

तिला पुढे जाऊ द्यायची तर बात सोडाच !

........ काळाबरोबर पुरुषाने बदलले पाहिजेच !

महिलेच्या सुधारणेच्या आड येणाऱ्या वृती/प्रवृत्ती/विकृतीला दूर करण्याची वेळ आहे..

आमच्या सोयीस्कर असणाऱ्या /वाटणाऱ्या
 परंपरा/रूढी/संस्कार/रीती/रिवाज-
 ह्या गोंडस नावाखाली होणारा महिलेचा छळ थांबला गेलाच पाहिजे !!!

सुधारणेपासून दूर राहू इच्छिणाऱ्या
 सर्वच वृती/प्रवृत्ती/विकृतीचा त्रिवार निषेध .......... .

तीन चारोळ्या -

'सुगंधी स्मरण -'

येउन गेली झुळूक वाऱ्याची
हळूच सुगंधी मोगऱ्याची -
करून गेली आठवण आपल्या
पहिल्या विसरलेल्या भेटीची ..
.



                                      'शुभरात्री-'

                                 मनाच्या पणतीत आता रात्रभर
                                शब्दांचे तेल ठिबकत राहणार -
                                विचाराची वात निवांत जळणार
                                काव्यस्फूर्ती प्रकाशत राहणार ..
                                                                  .



'शब्दपक्षी -'' 

पक्षी उनाड शब्दांचे
बंदिस्त करू मनात किती -
मिळताच संधी पहा ते
मनपिंजऱ्यातून उधळती ..
.

दोन चारोळ्या

१.
'आर्ट -'

"आर्ट ऑफ लिव्हिंग"साठी 
मी आयुष्यभर धडपडलो -
"आर्ट ऑफ लव्हिंग"मधे 
का आयुष्यभर गडबडलो ..
....


२.
'तुमचा ऱ्हास.. आमचा ध्यास -'

आवड सुखदु:खाची आहे
जगात प्रत्येकास निराळी -
"ह्या"च्या घरात दु:ख दिसता
"त्या"च्या घरात सुखास उकळी . .
.