गजानना, वंदन करतो देवा --

गजानना, वंदन करतो तुला      
आशीर्वाद द्यावा शुभ तू मला ..

आम्हाला सुखी ठेवशी तू 
संकट दूरही करशी तू 
विध्नेश्वरा, शरण मी आलो तुला ..

लंबोदरा , तू पाठीशी 
भीती होते नाहीशी
विनायका, ध्यास तुझा लागला  ..  

चरणी मस्तक ठेवतो रे 
मनात तुलाच स्मरतो रे 
मोरेश्वरा, भक्ती भाव पावला  ..

प्रदक्षिणा ही घालतो मी 
नामाचा जप तुझ्या करतो मी 
चिंतामणी, प्रसन्न होई मला  ..
.

आठवणींच्या जखमा ताज्या स्मरतो आहे - -[गझल]

आठवणींच्या जखमा ताज्या स्मरतो आहे 
रोजच धावा मी भेटीचा करतो आहे..

रुसवेफुगवे पुजले कायम नशिबी माझ्या 
हसतमुखाची वेडी आशा धरतो आहे..

ना येते तव हाताची चव दुसऱ्या हाता 
दिसते जे मज अन्न समजुनी चरतो आहे..

हुरहुर अजुनी पूर्वीची ती कायम आहे 
थकल्या हृदयी श्वास किती मी भरतो आहे..

वाटे ममता शिल्लक थोडी माझ्यासाठी 
मी दिसता तव अश्रू नयनी झरतो आहे.. 
.

अशाच "माणसां"त मी कसे पुन्हा रमायचे ---[गझल]

अशाच "माणसां"त मी कसे पुन्हा रमायचे
त्रिवार भेटले तरी अनोळखी बघायचे ..

जपून जात ती कधी न ठेवली मनात मी   
विचारती मलाच ते सहन किती करायचे ..

जिवास चैन ना पडे उदास रात्र जागतो    
तुफान उसळते तरी मनास आवरायचे ..

प्रवास जीवनातला नि ऊन खूप तापते   
तिथे नसेच सावली जिथे मला बसायचे ..

कशास पोट हे दिले भरीस भूक ईश्वरा      
विहीर आड कोरडे उगाच डोकवायचे ..
.

रडण्यासाठी धाय मोकलुन गर्दीला गाठतो --[गझल]

रडण्यासाठी धाय मोकलुन गर्दीला गाठतो 
सांगाया मी वेदना मला एकांंती राहतो..

डोळे विस्फारी बघून मज जो तो का सारखा    
माझी मी 'माणूस' जात जर कोणाला सांगतो..

ऐकू येती झोपडीत त्या मातेचे हुंदके 
जेव्हा जेव्हा देव मंदिरी दुग्धाने नाहतो ..

आभाळाच्या का सभागृही जमती ढग बेरकी 
पर्जन्याच्या घोषणाच त्या आभाळी ऐकतो..

भिंती माझ्या का घरास या कळले नाही मला 
भीतीने भिंतीस कान त्या फरशीशी बोलतो..

येताजाता बघु नकोस रे लावुन टक तू मला 
दम बघ माझ्या पापण्यांस या मिटताना लागतो..

विसरायाला आज मी तुला पेला हा घेतला 
थेंबाथेंबातून का तुझी प्रतिमा मी पाहतो ..

मनवृक्षावर बांडगूळ ते चिंतेचे वाढते  
ना दुसरा पर्यायही मला पेलत मी साहतो ..
.