चतुर्थी पालुपद पुराण

पहिला- नमस्कार, सकाळी सकाळी फिरायला वाटते ?

दुसरा- हो हो हो, आज चतुर्थी आहे. 

म्हटल जरा गणपतीच्या देवळाकडे चक्कर मारावी. 
संध्याकाळी ही गर्दी असते ना !

तिसरा- [दुसऱ्याला तासाभराने -] काय , इकडे कुणीकडे ?

दुसरा- अहो, आज चतुर्थी ना ! 

जरा गणपतीच्या देवळाकडे चक्कर मारावी म्हटलं. 
संध्याकाळी ही गर्दी असते !

चौथा- [दुपारी -] झाले का जेवण ?
दुसरा- आज चतुर्थी आहे. दिवसभर उपास !
जेवण संध्याकाळीच ! म्हणून म्हटल, 

जरा गणपतीच्या देवळाकडे चक्कर मारावी....
मघाशीच जाऊन आलो. 
संध्याकाळी ही गर्दी असते ना !

पाचवा- [संध्याकाळी-] झाला का चारचा चहा ? का नाही अजून ?
दुसरा- सकाळपासून पाचवा चहा झाला हो ! आज चतुर्थी आहे ना. 

वेळ होता म्हणून, गणपतीच्या देवळाकडे चक्कर तेवढी कधीच मारून आलो. 
आता संध्याकाळी ही गर्दी असते ना !

सहावा- [रात्री-] जेवण झालं का नाही अजून ?
दुसरा- चंद्रोदय झाल्यावर, 

मोदकांचा नैवेद्य दाखवूनच आत्ता चतुर्थी सोडली ना !
आज चतुर्थी होती. आज सकाळी सकाळीच,

 गणपतीच्या देवळाकडे चक्कर मारून आलो होतो. 
संध्याकाळी ही गर्दी असते ना !
.

हेल्मेट.. हेल्मेट ..

पूर्वी छान जेवण झाल्यावर,
नेहमी वामकुक्षीप्रसंगी वाट्टेल ती स्वप्ने पडायची.
बऱ्याच काळानंतर आजही अगदी तसेच घडले की हो !

दुपारच्या जेवणात मस्तपैकी
गोलगरगरीत भाकरी, शेंगाचटणी, अळूची पातळ भाजी, गरम गरम कढी इ. इ.मनसोक्त हादडले.
मग काय....ढाराढूर झोपेत स्वप्नमालिका सुरू -
त्यातली एक तर फारच गमतीदार..

मी बाईकला किक मारून ,
भाजी आणायला मंडईकडे निघालो होतो.
अर्ध्या रस्त्यात बायकोची आठवण आली.... ,
आज बायको बरोबर नाही आणि त्यामुळे,
मी नेमका डोक्यावर हेल्मेट घालायचेच नाही,
तर बरोबर घ्यायचेही विसरलो.
आता पोलीस मला अडवणार आणि हेल्मेट नाही म्हणून,
हा भलामोठ्ठा दंड ठोकणार !

नुसत्या कल्पनेनेच मी घामेघूम होत-
ब्रेक लावत, बाईकचे इंजिन बंद मधेच केले.
आणि का कुणास ठाऊक,
अचानक रस्त्यातच डायलॉग मारायला सुरुवात केली - - -

" कुणी, हेल्मेट देता का रे ... हेल्मेट ?
एका बाईकस्वाराला कुणी हेल्मेट देता का ?
हा बाईकस्वार डोक्यावाचून ,
आठवणीवाचून,
बायकोच्या छायेवाचून
पोलिसाच्या दयेवाचून
घराघरात हिंडत आहे
जिथे कुणी हेल्मेटवाचून राहणार नाही
अशी डोकी ढूंढत आहे
कुणी, हेल्मेट देता का रे ?
हे ल्मे ट .........?
हे ल्मे ट ...........?? "

---------- बायको मला गदागदा हलवत होती..
मी जागा झालेला दिसताच म्हणाली -
" झोपेतही हेल्मेट घालायची सक्ती अजून कुणी केली नाही हो.
भलतीच स्वप्न पहायची तुमची जुनी खोड मेली काही कमी होत नाहीय..
चला, चहा झालाय !"
.

[कुणाच्या तरी-] बाबाचा वाढदिवस -

बाबा, असाच दिन सोन्याचा
रोज रोज जीवनी रहावा,
तुमचा आशीष कायमचा
आम्हा असाच मिळत रहावा  ..

घडले संस्कार नियमाने
तुमच्यामुळेच आमच्यावर -
चालत राहतो आम्ही
दाखवलेल्या सन्मार्गावर ..

प्रेम स्नेह माया आपुलकी
सद्गुण आम्हाला दिधले हो ,
विसर कधी ना पाडू त्यांचा
वचन तुम्हाला देतो हो ..

सत्याला अनुसरून आम्ही
सदाचार केले आपलेसे ,
कलंक न लागो वागणुकीला
जपतो धोरण नित्य असे ..

सुदिन आजचा धन्य आम्ही
वरदहस्त ठेवाल तुम्ही -
अंतर कधी न मनात रहावे 
आशिष द्यावा आम्हास तुम्ही ..

तुमच्यामुळेच घडलो आम्ही
जाणिव असते नेहमी  मनी -
अर्पण करतो तव चरणी
"शब्दफुले" या मंगलदिनी ..
 ..

विठ्ठल .. विठ्ठल ..

विजयकुमार देशपांडे's photo.

मुखात विठ्ठल डोळ्यात विठ्ठल -
जयघोष जोरात विठ्ठल विठ्ठल ..

टाळात विठ्ठल तालात विठ्ठल -
नामाचा गजर विठ्ठल विठ्ठल ..

एकतारी विठ्ठल मृदुंगात विठ्ठल -
रिंगणात नाद विठ्ठल विठ्ठल ..

बालमुखी विठ्ठल शैशवात विठ्ठल -
जीवनात सार्थक विठ्ठल विठ्ठल ..

नगरात विठ्ठल वाळवंटी विठ्ठल -
कीर्तनात गजर विठ्ठल विठ्ठल ..

जय हरी विठ्ठल राम कृष्ण विठ्ठल -
रखुमाई विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ..

दिंडीत विठ्ठल वारीत विठ्ठल -
सर्वामुखी घोष - "विठ्ठल.. विठ्ठल .."
.

प्राधान्य आज मिळते मानात मिळवतीला ..

एकांत छान होता दोघांत सोबतीला 
एकांत आज उरला त्याच्याच संगतीला

गाड्यास जुंपुनीया का घेतले विकासा

ओढा विरोधकांचा नेण्या अधोगतीला

नशिबात वाट बघणे अजुनीहि मी सुखाची

दुःखेच आज जमली आहेत पंगतीला 

देवा तुझी कशी रे सापत्न भावना ही

पुष्पे दुजास काटे माझ्याच सोडतीला

हा काळ बदल आहे गृहिणीस स्थान नाही

प्राधान्य आज मिळते मानात मिळवतीला ..
.

स्टेटस तुझे ते पहायचे ..

(चालः दिवस तुझे हे फुलायचे..)

स्टेटस तुझे ते पहायचे
लाईक्सवाचून झुरायचे ..

फ्रेंडलिस्ट लांबत जाणे
रोजचे अॅड ते करणे
यादीस उगाच भुलायचे ..

पहावी भिँत ती आपली
रिकामी करावी टोपली
स्टेटस भरतीत फसायचे ..

भरारी स्टेटसची फार
कॉमेंटीविना बेकार
पहात कसनुसे हसायचे ..

तुझ्या त्या भिँतीच्यापाशी
टॅग किति करून घेशी
टॅगात स्वतःस हरवायचे ..
.

ती आणि तो -

मुलाला अमुक आवडते
मुलीला तमुक आवडते
 

नवरोजीला हे पसंत पडते
नवरोजीला ते पसंत पडते
 

या पाव्हण्याला ते बरे वाटते
त्या पाव्हण्याला हे बरे वाटते
 

सासूला असे छान वाटते
सासऱ्याला तसे छान वाटते
 

दिराची अशी आवड आहे
नणंदेची तशी आवड आहे...
 

अशा अवस्थेतच ,
...... ती "आपले" आयुष्य
घरातल्या सर्वांसाठी अर्पून
वर्षानुवर्षे काळजी घेत राहते
उघडपणे !

आटापिटा करून हपिसात
वर्षानुवर्षे प्रत्येक बॉसच्या
आवडीनिवडी जपतजपत
 

" आपले " नावाचे आयुष्य
बरीच वर्षे जगत असतो...

....."तो" बिचारा बढतीसाठी...
निमूटपणे !
.

माणूस म्हणुन कौतुक जिव्हा कधी न करते .. [गझल]

माणूस म्हणुन कौतुक जिव्हा कधी न करते
जिव्हेस सवय पक्की निंदेत मस्त रमते ..

वारीत शिस्त न्यारी पाहून थक्क सारी
सत्ता पदी भुकेले कोणीहि तेथ नसते

आयुष्य अल्प असते ठाऊक सर्व लोका
सत्कर्म सोडुनी का स्वार्थामधेच सरते

जवळीक वेदनांशी झाली अतीच माझी
करता विचार त्यांचा का काळजात दुखते

मी शोध गंधवेडा जागेपणीहि घेतो
गंधास फूल जेव्हा स्वप्नातुनी पसरते ..

.