दोन चारोळ्या -


(१)

'कोडे-'

ऑफिसात गरजणारे 'वाघ'
येता घरात बायको पुढे -
एकदम का बनतात 'शेळी'
हे न उलगडणारेच कोडे ..

.

(२)

'ह्याला संसार ऐसे नाव-'

ऑफिसला उशीर.. ताणाताणी वाढते
नवरा उपाशी.. बायको रुसते -
नवरा आल्यावर, सुनसानी शमते
मोगऱ्याचा गजरा.. घरदार हसते ..

.

भेट घडली माऊलीची

टाळ चिपळ्यांचा नाद 
मुखातून तुजला साद 
"विठ्ठल" "विठ्ठल" असा  
घुमतो कानी प्रतिसाद ..

आलो आलो बा विठ्ठला 

धावत तुझ्या भेटीला 
सुखदु;ख सारे माझे 
टांगुनिया मी वेशीला ..

वेडी आशा होती मनी   

माथा टेकावा तव चरणी   
मूर्ती तुझी डोळे भरुनी 
हृदयी साठवावी बघुनी .. 

झाले अभंग गाऊन 

झाले करून कीर्तन
झाली आस माझी पूर्ण 
डोळे भरून दर्शन ..

ओढ विठ्ठल भेटीची   

वाट धरली पंढरीची   
 "विठ्ठल" गाता स्मरता
भेट घडली माऊलीची ..
.

एकादशीचा उपास

आज सकाळची गोष्ट .

बायकोला स्वैपाक करता करताच, आठवण झाली असावी.

स्वैपाकघरातून मोठ्या आवाजात ओरडून तिने मला विचारले-
"अहो, तुम्ही उद्या उपास करणार आहात का ? 
मोठ्ठी एकादशी आहे, म्हणून विचारतेय. 
मी तरी उपास करणार आहे. "

मीही तेवढ्याच आवाजात उत्तरलो-
" तू करणार आहेस ना उपास ? मग मीही करणार !
अग, तेवढीच तुझ्या स्वैपाकाला आणि आपल्या पोटोबाला विश्रांती मिळून, थोडेफार पुण्य त्यानिमित्ताने पदरात पाडून घेता येईल ! "

दुपारचे जेवण झाल्यावर अंमळ पहुडलो. 

तेवढ्यात, बाईसाहेब एक भला मोठ्ठा कागद घेऊन
 माझ्यासमोर हजर !

मी कागद घेतला. उद्याच्या "उपासाच्या पदार्थां"ची यादी होती ...
मी वाचू लागलो-
" साबूदाणा, भगर, शेंगदाण्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, चिक्की, 
वेफर्स, रताळी, केळी, डाळिंब, पेरू, सफरचंद, चिक्कू, 
बटाटा चिवडापाकिट, उपासाची बिस्किटे, खजूर......इ. इ. "

अबबबब ! मोठ्ठ्या एकादशीच्या "उपासा"ची ही एवढी मोठ्ठी तयारी ? 

मी चक्रावून गेलो. पण एक आज्ञाधारक नवरा असल्याने,
नंदीबैलासारखी मान हलवत, 
मुकाट्याने पिशव्या घेण्यासाठी जागचा उठलो ...

...... माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होतीच-
शंभर किलो वजनाच्या बायकोला खरच उपास कसा काय ब्वा पेलणार !
.

मौनाचे खोबरे

आजची दुपारची गोष्ट .

काहीही विषय नसला तरी,
अखंड बोलण्यात हातखंडा असलेल्या
आणि आपल्या बडबडीने भंडावलेल्या बायकोला,
शेवटी चिडूनच मी म्हणालो-

" किती ही बडबड ! 
खापराचे असते तर कधीच फुटून,
शंभर शकले झाली असती बघ.. तुझ्या ह्या कोमल मुखाची !
अग, दोन मिनिटे तरी गप्प बसून दाखवशील का जरा मला ? "

इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर,
माझ्या बोलण्याचा काहीही परिणाम तिच्यावर होणार नाही, हे मला ठाऊक होते ..
माझ्या अनावर झालेल्या झोपेचे
पार खोबरे केलेच तिने !

"केवळ "मौना"मुळे माणसाचे जीवनात किती आणि कसे नुकसान होते -"
ह्या विषयावर मला दोन तास तिने व्याख्यान ऐकवले की !

शेवटी आपलेच कान आणि आपलीच बायको ......

तुमच्याशिवाय आपले दु:ख सांगणार तरी कुणाला हो !
.

लब्बाड


तो पाऊस सखे ग,

अगदी तुझ्यासारखाच

नियमित भुलवणारा -

"येणार येणार" म्हणत

वाट पहायला लावणारा -

वाट पहायला लावत

कंटाळूनही जायला लावणारा -

कंटाळून गेलो तरीही

पुन्हा पुन्हा..........
हवा हवासा आणि -

यावा यावासाच वाटणारा !
.

आयुष्य मिळाले आहे सुंदर ..

निवांत त्या सागरतीरावर 
चल जाऊ दोघे घटकाभर 
गोळा करूया शंखशिंपले
आपण दोघे ओंजळभर ..

निमित्त शिंपले गोळा करणे 
हात हळूच हाती गुंफणे 
डोळ्यांमधे घालुनी डोळे 
भाव मनी अलवार स्पर्शणे ..

भविष्यात राहतील आठवणी 
जातील मने दोघांची हरखुनी   
तो सागरतीर ते शंखशिंपले  
ती घटका साठवू मनी जुनी ..

आठवणी जरी जुन्यापुराण्या 
पुरतील जीवनगीत गाण्या  
थरथरत्या हातांना गुंफत 
मजेत दोघे गाऊ विराण्या ..

कष्ट संकटे कायम ती तर
मनी बनवुया होड्या कणखर 
तरू सोबतीने भवसागर  
आयुष्य मिळाले आहे सुंदर ..
.

तिची आठवण -

पाऊस 
थांबल्यावर -

टपटप
आवाजात -

साठलेल्या 
पाण्याने -

पत्र्यावरून 
थेंबथेंबाने -

निवांत 
रहाव पडत - - - -

अगदी 
तश्शीच -

ती गेल्यावर 
तिची आठवण -

माझ्या 
मनातून -

एकेक 
करत -

शांतपणे 
राहिली ठिबकत . . . . .
.

सदैव तू पाठीशी त्राता -

सदैव तू पाठीशी त्राता 
भिऊ कशाला स्वामी समर्था ..

समाधान शांतीचा दाता  
असशी मजला स्वामी समर्था ..

संकटात मी असता नसता 
स्मरणी माझ्या स्वामी समर्था ..

गेही देही तुझा राबता 
जाणिव आहे स्वामी समर्था ..

वरदहस्त नित तुझ्या कृपेचा   
असाच राहो स्वामी समर्था ..

पापपुण्य ना गणती करता 
शरण तुला मी स्वामी समर्था ..  

"श्री स्वामी समर्थ" जपता   
देह पडू दे स्वामी समर्था ..  
.

का त्सुनामी वादळाच्या लावता नादी मला ..[गझल]

का त्सुनामी वादळाच्या लावता नादी मला 
सहन नाही होत आता झुळुकही साधी मला 

आपली म्हणतो जयांना का दुजांना खेटती 
टाळतो ज्या माणसांना भेटती दारी मला 

 हौस नाही अत्तराची कामगारांना इथे 
वास कचऱ्याचाहि भारी सांगती काही मला 

झोडतो व्याख्यान भारी जातिभेदावर किती 
पंगतीला भोजनाच्या टाळतो आधी मला

 फक्त ती माझी दिसावी छान फलकावर छबी  
जाहिरातीची जराशी हाव पण नाही मला 
.

बोलण्याआधीच ठरते मनन करणे चांगले - [गझल]

वळुनिया मी सोसलेले दु:ख जेव्हा वेचले    
फार कौतुक मज सुखांचे का न तेव्हा लाभले  

देश माझा गाव माझा मी कुठे मजला दिसेना 

ओसरी माझीच म्हणुनी शांत ते का झोपले  

निन्दकाला जवळ करता दोष सारे संपले  

मित्र माझे दोष माझे का न आधी दावले    

मौन त्याचे मोल त्याला ना कळे का वाटले 

शब्द माझ्या तोंडचे ना फुकट कोणी घेतले  
  
वेळ ती जाता न काही फायदा होई क्षमेचा    
बोलण्याआधीच ठरते मनन करणे चांगले  .. 


.

जन्माला आलो जगती नशिबी जपणे आले ..[गझल]

जन्माला आलो जगती नशिबी जपणे आले
मरणे ना अपुल्या हाती जीवन जगणे आले

खुडताना पुष्पे भवती टोचत काटे होते 
कुरवाळत आता जखमा नुसते बसणे आले 

बघण्याला घायाळाला जेव्हा सारे जमले
ना जखमी दिसण्यासाठी खोटे हसणे आले

आनंदी त्यांनी व्हावे झालो वाल्या कोळी
दु:खाला साथी नाही नुसते खपणे आले

हे जीवन दुस-यासाठी का मज जगण्यासाठी
ना अजुनी सुटले कोडे भाळी फसणे आले ..
.

"लाटणे-स्पेशल" म्हणी -


१) रात्रंदिन आम्हा लाटण्याचा प्रसाद ..

२) इकडे बायको तिकडे लाटणे ..

३) बायकोला लाटण्याचा आधार ..

४) लाटण्याचा मार खाई तो संसारसागर तरून जाई ..

५) दुरून लाटणे साजरे ..

६) लाटणे पाहून तोंड फिरवावे ..

७) लाटणे हातभर मार अंगभर ..

८) आले लाटण्याच्या मना तेथे नवऱ्याचे चालेना ..

९) लाटणे तिथे लाडीगोडी ..

१०) बायकोवर रुसला अन लाटणे बघून हसला ..

११) लाटणे जिच्या हाती नवरा तिच्या पाठी ..

१२) नवऱ्याच्या स्वप्नात लाटणे ..

१३) चार आण्याचे लाटणे बारा आण्याचा मार ..

१४) अविवाहिताला लाटण्याची भीती कशाला ..

१५) लाटणे दिसणाऱ्याने स्वैपाकाला नाव ठेवू नये ..

१६) जिचे लाटणे मजबूत तिचा संसार शाबूत/काबूत . .

१७) लाटणे धरता येईना पोळपाट वाकडा ..

१८) बायकोचे लाटणे नवऱ्यास काळ ..

१९) काखेत लाटणे गावभर शोधणे ..

.

प्रत्येकाचा नाद वेगळा

टाळ वारकऱ्याचे वाजती तालात 
कुटाळाच्या टाळाचा वेगळाच नाद ..

धाव भक्तजन घेती पंढरीत 
उचल्यांच्या मनात भलताच नाद ..

दिंडी चालतसे भक्तीभावनेत 
खिसेकापूच्या हाती ब्लेडचा नाद ..

सर्वधर्मसमभाव पहावा वारीत 
नाव ठेवण्याचा शिक्षितास नाद ..

अभंगी कीर्तनी डोले वारकरी 
पुढाऱ्यास लागे फ्लेक्सचाच नाद ..

"विठ्ठल विठ्ठल" कानी घोषनाद
"हरवले-सापडले" वेगळाच नाद ..

मोबाईलवेडे

नवरा बायको दोघांनाही मुलीने घेऊन दिलेल्या मोबाईलचे अतोनात वेड.

मोबाईलची माहिती दोघांनाही कामापुरती जुजबी झालेली !

ती दोघ एकवेळ एकमेकांपासून दीर्घकाळ दूर रमू शकली असती..
पण मोबाईलपासून...? क्षणभरही नाही !

तिचा मोबाईल स्वैपाकघराच्या कट्ट्यावर, बाथरूममधल्या दगडावर,
ड्रेसिंगटेबलावर, अंथरुणावर उशाशी  ..ती कुठेही असली तरी, तो अगदी हाताशी विराजमान !

त्याचा मोबाईल एरव्ही खिशात, कामाच्यावेळी टेबलावर समोर ..कायम हाताशी ..
त्याचीही परिस्थिती काही वेगळी नव्हतीच !

 एकदा ती साडीखरेदीसाठी बाहेर गेली होती.
दुकानात शंभर साड्यांच्या अस्ताव्यस्त ढिगात असतानाच -
ग्यासवर तापवण्यासाठी ठेवलेल्या दुधाची,
 तिला अचानक आठवण झाली..

घाईघाईने तिने आपल्या हातातल्या मोबाईलवर नवऱ्याला संदेश पाठवला-
"अहो, ग्यासचे बटन तेवढे पट्कन बंद करा !"  

नवरा घरीच हातातल्या मोबाईलला कुरवाळत बसला होता.
बायकोचा संदेश त्याने वाचला.

काही वेळातच-
 बायकोने आपल्या मोबाईलवर आलेला नवऱ्याचा संदेश वाचला -

"ग्यास बंद करायचे बटन,
मोबाईलवर कुठेच दिसत नाही की ग !"
.

बाई, तुझीsss आठवण येते

नात आणि नातू शाळेत.
सूनबाई जनसेवेत.
मुलगा ऑफिसात. 
मुलगी कॉलेजात.

घरी मी एकटा.
हो, अगदी एकटाच !

आज गुरुवार.
सकाळी सकाळी वीजमंडळाची अवकृपा झाली.
वीज गायब !

मी ओलांडली साठी, माझी बुद्धी नाठी ...

विस्मरणामुळे मोबाईलचे चार्जिँग करायचे राहून गेले. 
संगणक बंद.
वापरात नसलेल्या रेडिओतल्या सेलनी कधीच आत्महत्या केली आहे.
इनव्हर्टरची बॅटरी आज सकाळीच अगदी वेळेवर डाऊन... तोही गतप्राण !

पेपरात माझ्या राशीचे भविष्य वाचले होतेच - 
" संकटे एका मागोमाग एक येतच राहतील....."

पेप्रातल्या त्या भविष्यासकट,
एकुणेक झैराती वाचून झाल्या आहेत.
लैब्रीचे मासिक, पुस्तक ह्यांचा कधीच फडशा पाडून झाला आहे.

अतिशय बोअरिँग, दारुण, केविलवाण्या अवस्थेत एकटा बसलोय. 
नशिबात घर मलाच सांभाळणे. 
बाहेर पडू शकत नाही.

चोविस तास माझ्या कानाशी अखंड बडबड करणारा,
"बायको" नावाचा लाऊडस्पीकर,
माहेरवाशिणीचा आनंद उपभोगण्यासाठी,
नेमका आजच परगावी रवाना झालेला आहे.

तो असता तर ...

अगदी राहून राहून वाटतेय की,
जगणे किती सुसह्य झाले असते .

ती नाहीय.. खोटे कशाला बोलू ..
अजिबात करमतही नाहीच !

या असह्य भयाण शांततेत...
एकच मार्ग उरलेला -

बेंबीच्या देठापासून, व्याकुळ, आर्त स्वरात बायकोला उद्देशून,
'दुरितांचे तिमिर जावो' या नाटकातील,
ते प्रसिद्ध नाट्यगीत,
एक शब्द बदलून गावेसे वाटतेय हो . . .

"बाई, तुझीsss आठवण येते ..."
.

कोडे

बडबड सदैव करतो    
बहिऱ्यांच्या सोबतीत मी -

मार्ग विचारत फिरतो  
आंधळ्यांच्या जगात मी -

शर्यत लावुन पळतो  
लंगड्यांच्या आसपास मी -

गप्पा ऐकत फसतो  
मुखदुर्बळांच्या घरात मी -

शड्डू ठोकत असतो 
भितऱ्यांच्या तालमीत मी -

जगताना मी दिसतो 
मुडद्यांच्या संगतीत मी - !
.

""" - गुणवंत विद्यार्थ्यास - """

गुणवंत तू, यशवंतही तू 
गाजावाजा खूप जाहला ..

जिद्द, चिकाटी बाळगली 
सुवर्णदिन तो आज उगवला ..

आई, बाप, गुरू सर्वांचा 
अभिमान छान सार्थकी लागला ..

अपार मेहनत तुझीच ती 
पाठी आशीष "त्या"चा लाभला ..

उतू नको तू, मातू नको 
अभ्यासाचा लळा लागला ..

वाट यशाची भलीचांगली  
सन्मार्गी अवलंब जाहला ..

ठेव "आदर्श" सत्पुरुषांचा 
नावारुपाला येई चांगला ..

"जीवनपथ तुज सुकर राहो -"  
विश्वास मनी आम्ही बाळगला .. !
.

बिनकामाचे अवतार


दगडामधल्या देवापुढती 
सदैव दिसतो अंध:कार ..

"अवतारा"ला फुटे न पाझर 
कधी ना घडे चमत्कार ..

उजेडातही नित्यच होती  
जगी  भ्रूणहत्या अपार ..

वाटे लेक नकोशी अजुनी  
होई अस्वस्थच घरबार ..

देवा घेई "खरा अवतार"
भ्रूणहत्येवर करण्या वार .. !

.

घोटाळा झाला हो

घोटाळा झाला हो, घोटाळा झाला 
मैत्रिण समजून "लाईक" मी केला -

"स्टेटस " मस्त मी वाचत गेलो 
छान छान शब्दांनी हुरळून गेलो -

लक्षात आली ती .."माझीच पोस्ट" 
"कॉपी-पेस्ट" ढापली होती बेस्ट -

कपाळाला हात लावून बसलो 
"लाईक" स्वत:लाच करून फसलो -

"प्रोफाईल"ची सुरेख छबीही सुंदर 
वाटली नव्हती निघेल ...ते बंदर -

घोटाळा झाला हो, घोटाळा झाला 
मैत्रिण समजून "लाईक" मी केला.....!
.

मी पैलतिरावर

जीवन जगता कधी न ऐकली 


सुखाची कहाणी ..
पिऊन थकलो पुरता आता 


डोळ्यातले पाणी ..
मरण कुणाला मागू कसे मी 


सांगेना कोणी ..
जगणे मरणे सीमेवर मी 


कोरडी ही वाणी ..
गाऊ न शकतो सुरात आता


दु:खांची गाणी ..
त्रिशंकूसम हो मी पैलतिरावर 


काया केविलवाणी ..


.

रात्रीत खेळ चाले

उंच लहरते निळीनिळी
आकाशाची वर साडी

चमचमते कशी सुंदरशी
चांदण्यांची जर खडी

बघता बघता जाहली
धरतीही पुरती वेडी

लपुनी छपुनी चंद्र तो
ढगाआडुनी डोळा मोडी ..
.

तुझं नि माझं जमेना अन -

1.     

आज लातूर ते पुणे परतीचा प्रवास चालू आहे. 
तीन तासानंतर, 
यष्टीच्या बार्शी स्थानकावर 
मस्तपैकी एक पावपॅटीस आम्ही दोघांत मिळून फस्त केले. 

मी अर्थात थोडासाच तुकडा...
आणि बायकोला चक्क उरलेला ! 

तीन तास बडबडीसाठी चालू होते, 
ते आता अर्धा तास खाण्यासाठी तिचे तोँड चालू . . .

 तेवढीच माझ्या कानांना अर्धा तास बेष्टपैकी रेष्ट मिळाली !
...................................................................................................

2. 

इंदापूर ते भिगवणः
इन मिन अर्ध्या तासाचा तर प्रवास. 

मस्तपैकी जेवण झाले.

दोन मिनीटातच, 
बायको यष्टीच्या इंजिनाच्या घरघरीपेक्षा 
वरच्या पट्टीत घुर्र घुर्र करत घोरू लागली.

आता जागी होईल, 
मग जागी होईल .. 
मी वाट बघत राहिलो की !

एरव्ही तिच्याकडून शांततेची अपेक्षा बाळगणारा मी, 
अस्वस्थ होऊ लागलो, 
बेचैनी वाढृ लागली.

बायकोच्या बडबडीची इतकी सवय की, 
असली शांतता असह्य झाली !

. . . शेवटी संसार म्हणजे तरी काय हो,
तुझं नि माझं जमेना अन -
.

घोडेस्वार बंटी


हात टेकवून फरशीवर
गुडघे वाकवून, पाठ वर
बाबाघोडा होई तयार
वरती बंटी घोडेस्वार ..

घोडा होता हुषार फार
घरभर फे-या मारल्या चार
घोडा पळाला जोरात
उड्या मारल्या दारात ..

स्वार म्हणे, अरे हळूहळू 
घोडा म्हणे, जोरात पळू 
घातली घोड्याने मांडी
स्वाराची उडाली घाबरगुंडी ..

स्वार ओढे कानांचा लगाम
घोड्याला फुटला हो घाम
धपकन घोडा खाली पडला
स्वार आईच्या पदरी दडला ..
.

मखमली हिरवळ

येणाऱ्या जाणाऱ्यांची 
पावले चालताना
तुडवत राहतात 
मखमली हिरवळीला -

कोमेजून निपचित 
पडून राहते ती बिचारी ...

तुझ्या मुखातून 
सुसाट सुटणारे शब्द 
घायाळ करून 
रडवत राहतात 
माझ्या कोवळ्या मनाला ..

तेव्हां भावनांची 
मनातली मखमली हिरवळ 
कोमेजून निपचित 
पडून राहते -

तीही तशीच बिचारी ... !
.