माझी कविता


माझ्या कवितेत श्वास नाही
माझ्या कवितेत उच्छवास नाही ..

माझ्या कवितेत मिठी नाही
माझ्या कवितेत चुंबन नाही ..


माझ्या कवितेत सूर्य नाही
माझ्या कवितेत चंद्र नाही ..


माझ्या कवितेत दाहकता नाही
माझ्या कवितेत  जळजळ नाही ..


माझ्या कवितेत  वेदना नाही 

माझ्या कवितेत यातना नाही ..

माझ्या कवितेत द्वेष नाही
माझ्या कवितेत प्रेम नाही ..


माझ्या कवितेत आहे फक्त
साधा सोपा.. जिवंत शब्दार्थ .. 

.

प्रत्येकाचा चंद्र वेगळा

आमच्या गच्चीवरून
चंद्र खूप छान दिसतो
बंगलेवाला मुलगा
झोपडीवाल्याला म्हणाला ..आमच्या झोपडीतून तर
डायरेक्ट चंद्रच दिसतो
झोपडीवाला मुलगा
बंगलेवाल्याला म्हणाला ..


बंगलेवाल्याला
कुठे ठाऊक आहे ....
झोपडीला वर
छप्परही नाही ..!

.

बारा वाजले झोपेचे

रात्र झाली
झोप आली
निरोप घेऊन
सखी गेली..

जावे तरी
मुकाट तिने..
जाता जाता
हसून गेली..

हसावे तरी
जरा स्मितातून
खूप छानसे
हसून गेली..

गेली ती गेली
जाता जाता
उचक्या मला
देऊन गेली ..

.

आ रही हूँ मैं बरसात

नीले नीले आकाशमें
कालेसफेद मेघोमें
चमकती बिजलीके साथ
आ रही हूँ मैं बरसात ..

काली काली धरतीपर
बूंदबूंदमें टपटपाती
खेलने शोर मचानेको
हरे हरे पौधोंके साथ ..

लहर लहर लहराती
झूमझूमके मैं दौडती
पीले पीले फूलोंमें
मैं अपनी धाराके साथ ..

देखो देखो प्यारे बच्चो
रंगबिरंगी इंद्रधनू
ऊँचे ऊँचे नील गगनमें
दिखाती हूँ मैं अपने साथ ..

दुखको दूर करती हूँ
सुखको मै बांटती हूँ
मनमयूरों को नचाने
फैलाती अपने विशाल हाथ ..


.

भूक

देवाने दिले तुला एक पोट
तोडावे वाटे नाते कष्टाशी
आळसाशी जवळीक -
भूक तुला आहे फक्त
आयते गिळायची ..

देवाने दिले तुला दोन डोळे
सौंदर्यास न्याहाळशी
वाईटाशी जवळीक -
भूक तुला आहे फक्त
नित्य दुर्वर्तनाची ..

देवाने दिला तुला एक देह
संग तुला आवडे षड्रिपुंशी
अहिताशी जवळीक -
भूक तुला आहे फक्त
संधी वासनेची ..

देवाने दिले तुला सर्व काही
आणखी थोडे तरी मागशी
हव्यासाची जवळीक -
भूक तुला आहे फक्त
अनीती भ्रष्टाचाराची ..


.

चिमणे चिमणे दार उघड-

१.
चिमणा हपीसातून हाश्श हुश्श करत घरात शिरतो.
पुकारा करतो - "पाणी देता का कुणी पाणी ?"

टीव्हीच्या पडद्याकडे टक लावणारी चिमणी...... सहेतुक सासूकडे बघते .
सासू बिलंदरपणे भलतीकडे रिमोटची नजर वळवते .
मुलगी अभ्यासाचे नाटक करते .
मुलगा मोबाईलच्या गेममधे गुंग .

एकंदरीत काय ?

"चिमणे चिमणे दार उघड - थांब माझ्या बाळाला न्हाऊ घालू दे ......." ची ष्टोरी ,
अजूनही घराघरात घडतच आहे ना ?.

/././/././/./././././././/.././././././././././././.../....//..///././././//./././/././././././././././././././././././././././/. 


२.

 "'अरसिक किती हा मेला-'"

मागच्या वर्षातली आठवण .
मित्राला म्हटलं -
" चल बाहेर जरा, ती पालखी आलीय म्हणे . 

बघून यायची का !"

मित्र लगेच म्हणाला-
" पालखी काय पहायची रे .

 बसू इथेच गप्पा मारत ! "
काय उत्तर देणार मी त्याला ?

आपण बरे, आपले काम बरे -
अशी वृत्ती एका ठराविक मर्यादेपर्यंत ठीक आहे ना ?

पण -
इंद्रधनुष्य ... त्यात काय पहायचे ?
पहिला धो धो पाऊस ... त्याला काय पहायचा ?
लाटांचा उसळता डोंगर .. त्यात काय विशेष ?
एखादा चांगला सिनेमा, एखादे चांगले नाटक,
एखादे चांगले पुस्तक, एखादी दुर्मिळ गोष्ट ...असली, दिसली, भेटली तरी -
" त्यात काय विशेष ? "

- असला संवाद करणारा ..
आणि इतरांचाही त्यामुळे विरस करणारा..
अरसिक कशासाठी जगात जगत असेल ?

.

चांदोबाचा दिवा

आई  ग आई ,
चांदोबाचा दिवा
किती चांगला  -
 उंच उंच आकाशात
कुणी टांगला ..

आई ग आई  ,
चांदण्यांच्या पणत्या
किती लावल्या  -
उंच उंच आकाशात
कुणी सजवल्या ..

आई ग आई  ,
दे ग शिडी मला
उंच उंच चढून  -

चांदोबा-चांदण्या
आणीन मी काढून ..

आई ग आई  ,

चांदोबा-चांदण्या
ठेऊन अंगणात  -
रात्री छान खेळेन
त्यांच्या प्रकाशात .. 

.

असा मी असामी - [गझल]

नाही उद्धट मी हो कोणी बघुनी व्यक्ती मी झुकतो  
हळवाही नाही मी तितुका देण्या दणका ना डरतो    

वाऱ्यासंगे तोंड फिरवतो जैशाला तैसा भिडतो  
संधी साधत निवडणुकीची हातापायाही पडतो   

मागे कोणी गरजेपोटी शक्यच तेथे भागवतो   
ना घाबरता घातापाता वार समोरुन मी करतो  

रचुनी कपटी कारस्थाने इतका मोठा झालो मी 
बोलत असते जग दो तोंडी अनुभव घेतच मी असतो  

गंगेमधुनी पावन होतो पडतो बघुन गटारीला    
ठेवत राहो कोणी नावे जीवन माझे मी जगतो ..
.

तीन चारोळ्या पावसाच्या

१.
हट्टी -

तो पाऊसही सखे, तुझ्यासारखाच
अगदी पारंगत रुसव्याफुगव्यात -
ये रे ये रे म्हणून विनवणी करताच
नेमका लपून बसतो ढगांच्या थव्यात . .
.२.
दुर्मिळच -

दुधात साखर म्हणजे काय
अचानक धोधो पाऊस यावा -
जोडप्याजवळ नसावी छत्री
असा क्षण रस्त्यातच न्हावा ..
.३.
मृद्गंध -

चार थेंब अंगणात
टाकून नभ पळाले -
चार थेंब अत्तर जणू
धरतीला मिळाले ..
.

प्रश्न -

मला लिहावेसे वाटते
मी लिहीत रहाणार,
तुला वाचावेसे वाटले
वाच नाहीतर नको -

'तू का लिहितोस'
असे विचारण्याचा
वेडगळ प्रयत्न
तू करू नकोस !

तूच सांग, मी तुला
विचारले आहे का,
आजवर कधीतरी
'तू का जगतोस' ?
. . .

वेग चक्र

पायी चालणाऱ्याकडे
घोडेस्वार हसून बघतो -

घोडेस्वाराकडे पहात
सायकलस्वार पळतो -

सायकलस्वाराकडे बघत
स्कूटरवाला बघून हसतो -

स्कूटरवाल्याला हसून
कारवाला निरोप देतो -

बंद कारला ढकलायला 
पायी चालणाराच मदत करतो !
.

माते -

माया तुझी छत
सहवास भिंती
प्रेम तुझे खिडकी
कृपा तुझी दार
अस्तित्व ही भूमी
वेगळे कशास हवे घर
माते, तुझे विश्व माझे घर !

श्वासात तू
हृदयात तू
संकटात तू
स्पंदनात तू
हुरहूर तू
चिंतेत तू
हर्षात तू
आसपास तू
वेगळे काय जगणे
माते, माझे जीवन म्हणजे तू !
.

हुषार कोण -


रोज सकाळी शाळेत जातो
पाढे बाराखडी शाळेत शिकतो ..


बाईंच्यासमोर पुस्तक वाचतो
पाढे धाडधाड म्हणून दाखवतो ..


मन लावून अभ्यास करतो
प्रश्नांचे उत्तर भरभर देतो ..


बाई "वा वा छान" म्हणतात
पाठीवर शाबासकी देतात .. 


मला एक समजत नाही
कसे विचारावे कळत नाही ..


बाईना पाढे येत नाहीत का
बाईना वाचता येत नाही का ..


वर्गात पुस्तक मीच वाचतो
वर्गात पाढे मीच म्हणतो .. !


.

शाळा


आई स्वैपाकघरात फिरणार
बाबा ऑफिसात काम करणार ..

दादा बाहेर क्रिकेट खेळणार
ताई सारखी मैत्रिणीत  असणार ..

कुणीही शाळेत नाही जाणार
मला मात्र शाळेत पाठवणार .. !

आजपासून मी शाळेत जाणार
शाळेत जाऊन खूप शिकणार ..

सर्वांपेक्षा मोठ्ठा मी होणार
सर्वांना घरात मी शिकवणार ..

अ आ ई काढायला लावणार
शिकवून त्यांना शहाणे करणार ..

त्यानी माझे ऐकले नाहीतर
शंभर उठाबशा काढायला लावणार  .. !

बरं झालं बाबा आज -


बरं झालं बाबा
आज तुम्ही जिवंत नाहीत -

मी चौकात उभा असतो
इकडे तिकडे टेहळणी करत असतो -

एका हातात पुडी घेत असतो
नसली तर दोस्ताला मागत बसतो -

जमेल तेव्हा
तुमच्या कष्टाच्या फंडातून,
मला मिळालेल्या गाडीवर
टांग मारून
इकडे तिकडे उनाडक्या करत असतो -

माझ्या हातून काहीच
घडत नसल्याने,
पूर्वजांच्या नावाच्या आरोळ्या
बेंबीच्या देठापासून ठोकून
त्यांची आठवण मात्र काढत असतो -

सिग्रेटच्या प्रत्येक झुरक्याबरोबर
तुमची आठवण करून ,
तुमच्या खिशातून उचललेल्या
नोटांची याद करत बसतो -

खाना पिना सोना
मनसोक्त भटकना
मस्त ऐष चालली आहे माझी !

बरं झालं बाबा
आता तुम्ही जिवंत नाहीत .....

नाहीतर तुमचे उपदेशाचे डोस
येताजाता ऐकण्यातच -
माझी अख्खी जिंदगी
बर्बाद झाली असती !

.

पुत्र- सुखाचा ठेवा

मी बालपणी खेळविले, 
तुज खांद्यावर नाचविले..

तुज खेळविता मी बाळा
ना केला कधी कंटाळा..

तू किती जरी मज छळले

 तव खेळी मन विरघळले..

कधि घोडा-घोडा झालो

ओझ्याचे गाढव बनलो !

तू तळहाताचा फोड

पुरविले सर्व तव लाड..

ठेवून 'रोज' मनी स्वार्थ

ना घालविला क्षण व्यर्थ..

कालांतरि होशिल मोठा

सन्माना नसेल तोटा !

नोटांच्या पायघडया त्या

कुणि घाली सामोरी त्या..

ना विसरावे तू मजला, 

ही एकच आस मनाला !

कधि कुणापुढे ना झुकलो

परि आता मी रे थकलो-

'ती' इच्छा मम पुरवावी ' 

मज वृद्धाश्रमी न ठेवी ! '

तव खांदा मला मिळावा-

 मजसाठी "सुखाचा ठेवा" !
.

अनुयायी


तू येत होतीस
अनुयायी पाऊस
तुझ्या मागे मागे
तेव्हा येत होता..


तुझे येणे नंतर
झाले अनियमित
त्याचेही आगमन
असेच क्वचित..


तुझे येणे जेव्हा
कायमचे थांबले
त्याचे येणेही आता
कायमच लांबले ... !
.

गेले ते दिन गेले-


आरशासमोर उभी असताना 
तू मान वेळावत असतेस -
तुझ्या लांबसडक केसातून
ऐटीत कंगवा फिरत असतो  ..

तू आपल्याच तोऱ्यात, नादात
एखादे गाणेही गुणगुणतेस-
हातातले काम अर्धवट टाकून
मी तुला न्याहाळत असतो ..

केसांचा चिमटा, पिन, आकडा,
मधूनच दातात पकडतेस-
अदाकारीचा तो कळस असतो
मी स्वत:शीच धुसफुसत बसतो ..

"कशी जिरतेय-" आविर्भावात
आरसा मजकडे हळूच पाहतो-
तुझा कंगवाही दाताड विचकत
कुत्सित नजरेने मला पाहतो ..

माझ्या गळलेल्या केसांचे दु:ख
मनातल्या मनात मी गिळतो-
माझ्या टकलावरून हात फिरवत
मनातल्या मनात मी जळतो ..! 

.

नकोस आणू अश्रू नयनी, थांबव ते अंतरी ..


निघालीस लाडके आपुल्या हक्काच्या ग घरी
नकोस आणू अश्रू नयनी, थांबव ते अंतरी ..

नव्हे सासरा, पिताच आता
सासू नाही, माता आता
नवीन नात्यांची जोड ही ठेवावी अंतरी -
नकोस आणू अश्रू नयनी, थांबव ते अंतरी ..

नणंद ना ती, भगिनी आता
दीर नव्हे तो, भाऊ छोटा
बरोबरीची नाती दोन ही सांभाळी अंतरी -
नकोस आणू अश्रू नयनी, थांबव ते अंतरी ..

येता जाता अतिथी राबता
अपुले म्हणुनी त्यांना जपता
स्वागत कर ग मायेने ममतेने अंतरी -
नकोस आणू अश्रू नयनी, थांबव ते अंतरी ..

रुसवे फुगवे कसले आता
नवऱ्याचे मुख सदैव हसता
आशिष अमुचे स्मरणापुरते नित्य तुझ्या अंतरी -
नकोस आणू अश्रू नयनी, थांबव ते अंतरी ..
.

सांगा बरे यात माझे काय चुकले ..


सकाळी सकाळी मला 
 तिने "गुड डे"म्हटले -
चार पुडे मी तिला  
"गुड डे" बिस्किटांचे दिले -  
सांगा बरे यात  
माझे काय चुकले ..  

तिला फूल आवडते 
पहिल्यांदा जेव्हा कळले -
सूर्यफूल एक मोठे    
तिच्या केसात खोवले -
सांगा बरे यात 
माझे काय चुकले  ..

गाडीवर फिरते आवडीने 
जेव्हा मला कळले  -
हातगाडीचे धूड मी 
तिच्यासमोर उभे केले  - 
सांगा बरे यात 
माझे काय चुकले ..

आंबटशौकीन आहे ती 
माझ्या कानावर आले -
लिंबूपाणी तांब्याभर 
तिला प्रेमाने पाजले -
सांगा बरे यात 
माझे काय चुकले ..

तिला प्राण्यांचा लळा
जेव्हा मी जाणले  -
पिंजरा उघडून तिच्यापुढे    
उंदीर मी सोडले -
सांगा बरे यात 
माझे काय चुकले .. 

तिला सिनेमे आवडतात   
जेव्हा मला माहित झाले - 
रामसे बंधूंचे सिनेमे  
खास तिलाच दाखवले - 
सांगा बरे यात  
माझे काय चुकले ..   

 'बाय बाय टाटा '  
एकदा तिने म्हटले - 
टाटा मिठाचे पुडे   
विकत आणून दिले -
सांगा बरे यात  
माझे काय चुकले ....

सांगा बरे यात  
माझे काय चुकले .... !

.

असंतुष्ट आत्मे

आपल्या हातून काही घडत नाही
दुसरे घडवतात ते बघवत नाही..

आपल्याला काही लिहिता येत नाही
दुसऱ्याने लिहिलेले आवडत नाही..

आपण  स्वत:हून काही करत नाही
दुसऱ्याला मदत करवत नाही..

दुसरा वरचढ आपल्यापेक्षा झाला
पाण्यात पाहिल्याशिवाय राहवत नाही ..

आपल्याला  चांगले बोलता येत नाही
दुसऱ्याची री ओढता येत नाही..

इतर काहीतरी  करायला धडपडतात
आपण खो घातल्याशिवाय रहात नाही..

दुसरे काहीतरी करून बोलतात
आपण बडबडीशिवाय काही करत नाही . .! 

.

स्त्री पुरुष कर्तव्य

१)

"दमले ग बाई "
- असे म्हणत म्हणत,
स्त्री पट्कन पुढील आवराआवरीच्या तयारीला
 जुंपून घेताना दिसतेच ......

"छे, फार दमलो बुवा आज !"
- असे म्हणत म्हणत ,
भविष्याची फिकीर न करता-
 आपण पुरुष खुशाल ताणून देत असतो ..!

खरं आहे ना ?
.

२)

खरेच बायकांच्या कामाचे कौतुक

 करावे तेवढे थोडेच !

दोनच हात...पण झपाटा पाहिला तर ,
आठ हातांच्या कामाचा-
न कुरकुरता उरक !

- आणि आम्हा पुरुषांच्या दोन हातांना ,
एका हातातले काम निपटायलाही,
दहावेळा किरकिर केल्याशिवाय-
चैनच पडत नाही ना .

खरंय की नाही ?
.

आधी "त्यांना" वरती ने -


आधी "त्यांना" वरती ने-
गर्जतो आम्ही एकमुखाने..

धावा नेहमी करतो आम्ही
देवा रोजच नित्यनेमाने ..

अंत आमचा किती पाहणे
ठरवशी कसा तू वेगाने..

"त्यांना" सोडून येथे खाली
"ह्यांना" का नेशी घाईने.. ?

स्वर्गातही का तुला नकोसे
वाटते लगेच "त्यांना" नेणे..

दु:खात लोटशी का आम्हाला
"ह्यांना" नेऊन तत्परतेने ..! 


.

क्षण एक पुरे झटक्याचा -


रुसतेस फुगतेस
निघून जातेस..

जाता जाता हळूच
मागे वळतेस..

माझ्याकडे पाहून
मान झटकतेस..

ज्या क्षणाची वाट -
तोच क्षण पाठवतेस..

थांबलेल्या हृदयात
प्राणवायू भरतेस..

उद्या येण्याची
खात्रीच पटवतेस.. !

.

स्त्री पुरुष मन

१)
         पोलिओ झालेल्या मुलाचे दु:ख
हृदयात लपवून आई 
उसने हासू आणून
हसतखेळत जगात वावरत असते ...

          त्याच मुलाचा बाप मात्र
आपल्या दु:खाची जाहिरात करत
 रात्री चारजणांच्या सोबतीने 
बारच्या अंधारात लपवत बसतो ....... !

वाईट वाटते ना ?


            ............................................................२) 

          स्त्रिया आपले दु:खातले आसू 
हूं की चू न करता, शक्यतो गिळू पाहतात
आणि खोटे खोटे हासू
चेहऱ्यावर दाखवण्याचा प्रयत्न तरी करतात ....

          आपण पुरुष मात्र
दु:खांचे डांगोरे पिटतच राहतो -
आणि कुणी थोडेसे जरी दुर्लक्ष केले की
त्याचेही गावभर ढोल बडवत सुटतो !

खरंय का नाही ?


.