चतकोर भाकरी ही हातात आज आली.. [गझल]

चतकोर भाकरी ही हातात आज आली
बघुनी सुखात जग हे मज झोप गाढ आली

रागात ती जरीही थोडी हसून गेली
बेसूर गायना जणु हळुवार दाद आली

माळून खास आली का मोगरा सखी तो
साधावयास कावा गनिमी मनात आली

चाहूल लागली त्या चंद्रास तारकेची
निद्रेत तत्क्षणी का स्वप्नास जाग आली

आसूसलो किती मी ऐकावयास कौतुक  
श्रद्धांजलीच कानी मज शेवटास आली ..
.   

पर्याय आज नाही फुलण्याशिवाय आता .. [गझल]

पर्याय आज नाही फुलण्याशिवाय आता
फुलणार ना फुले ही काट्याशिवाय आता

आश्वासनास देण्या नेता सरावलेला
मतदार राहतो का भुलल्याशिवाय आता

होता अनोळखी पण नात्यातला निघाला
राहील काय येथे घुसल्याशिवाय आता 

पेशा विदूषकाचा पाठीस लागलेला
उरली व्यथा न दुसरी हसण्याशिवाय आता

हुजरेगिरीत सारे आयुष्य काढलेले
होते न काम काही झुकल्याशिवाय आता ..
.

चार चारोळ्या -

१)

भाऊगर्दी झाली आहे
जगात मुखवट्यांची -
पारख अवघडली आहे

जगात माणुसकीची ..

२)

चार पुस्तके व्यवहारज्ञानाची
कोळून प्यालो मी -
अनुभव व्यवहारात वेगळे

कोसळून का गेलो मी ..


३)

छंद लावुन घेतला 
मी मनोरे बांधण्याचा -
छंद त्यांना लागला 

ते बघूनी पाडण्याचा ..

४)

फूल ते साधे कुणी न दिले
जिवंत होतो जोवर मी -
सजुन बघा हारांत निघालो

चौघांच्या खांद्यावर मी ..
.

दोन डोळे मत्सराचे हाय दिसती का मला ..[गझल]

बोलतो मी जास्त जेव्हा चुप बसवती का मला
गप्प असतो मात्र तेव्हा बोल म्हणती का मला

वाटते ना कायद्याची आजही भीती कुणा
लाच देता काम होते ते हुडकती का मला

ओळखीचे चांगले ते समजुनी मी भेटता
विसरुनी उपकार माझे दूर करती का मला

सांगतो सर्वास माझी जात मी माणूसकी
घेउनी बाजूस कानी परत पुसती का मला

चार येती कौतुकाचे शब्द कानी ऐकण्या
दोन डोळे मत्सराचे हाय दिसती का मला ..

.

चार चारोळ्या -

जातो करायला मी एक 
करते नशीब उलटे- 
केव्हा पहायला देणार 
फासे नशीब सुलटे..
.

जिवंतपणी तुमच्या डोक्याचा उपयोग
माणूस कधीच करून घेत नसतो -
पाखरांना त्यावर बसायची सोय मात्र
माणूस एकजुटीने भांडून करत असतो . .
.

जरी भाकरी होती 
शिळीच ती पुढ्यात -
भिजत सतत होती 
आसवांच्या कालवणात ..
.

जेव्हा समोर अचानक तू येतेस 
माझ्याकडे पाहून गोड हसतेस -
भांड्याला कल्हई केल्यासारखा 
क्षणात माझा चेहरा उजळवतेस ..
.

|| श्री गुरुदेव दत्त ||


प्रसन्न श्रीदत्ताची मूर्ती
उभी राहता नयनापुढती ..

दु:ख संकटे क्षणात सरती
आनंदाला येते भरती ..

तीन शिरे कर सहा शोभती 
देती अपुल्या मनास शांती ..

चार श्वान हे अवती भवती
आठवण वेदांची जणु देती ..
    
गोमाता पाठीशी उभी ती
कामधेनु पृथ्वीही संगती ..

दंड कमंडलु त्याग प्रचीती
औदुंबरतरु छायेखालती ..

गुरुदेवासी जाणुन स्मरती
समाधान नित चेहऱ्यावरती ..

गजर दत्तनामाचा करती
वाट सुखाची सदैव धरती ..
.

मी तो एक .. हमाल -


"अग एsssss ,
किती जड आहेत या ब्यागा...
शिवाय या तीन चार पिशव्या ? "

- बायकोला तिच्या माहेरी आनंदाने सोडायला निघालेला मी..
तरीही जरासा त्राग्याने ओरडलोच .


"अहो, मग त्यात इतक किंचाळायला काय झाल " 
- बायको सगळ्या नगावर नजर फिरवत उद्गारली .

"अग पण- 
इतकी ओझी बरोबर घेऊन जाण्याची,
 काही आवश्यकता आहे का ? "
- महाकाय तोफेपुढे अंमळ नमते घेऊन, 

थोड्याशा नरमाईच्या पण समजावणीच्या स्वरात मी म्हटले .

ती शांतपणे उत्तरली-
"मी एकटी जाते, तेव्हा एखादीच ब्याग बरोबर नेते की नाही ?
आता अनायासे तुम्ही सोबत आहात .. म्हणून मग ....!"


तिची विजयी मुद्रा चुकवत,
 माझ्या चपलेत पाय सरकावत,

मी मुकाट्याने पुढे निघालो ...
.

स्व भाव

एका शासकीय कार्यालयात कामाला वाहून घेतलेला मित्र ..

सेवाभावी, निष्कपटी वृत्ती असलेला .

आपण बरे आपले काम बरे. 

मित्रमंडळ बोटावर मोजण्याइतकेच.
नातेवाईकमंडळी कामापुरती जमणारी.


... त्याची सेवानिवृत्ती जवळ आलेली आहे. 

समाजसेवा, इतरांना मदत करणे नाही.
इतरांच्याकडून तशी अपेक्षा बाळगणे नाही !


छंद कसलाही नाही.
टीव्हीची नावड.
सिनेमाकडे ढुंकूनही पाहत नाही.
कथा, कादंबरी, मासिक इ. पैकी खास आवड कश्शाचीच नाही.
घरात पडणाऱ्या पेपरखेरीज अवांतर वाचन नाही.


सवय लावण्याचे प्रयत्न निष्फळ .


आजचा दिवस कर्तव्य करण्यात पार पाडला, 
एवढाच काय तो आनंद !

नवीन तंत्रज्ञानापासून चार हात दूर राहण्यात,

असुरी आनंद.
मोबाईल कामापुरता म्हणजे .. 

आलेला फोन घेणे व कामापुरता इतरांना करणे !
कार्यालयात कामापुरतेच संगणकाचे ज्ञान प्राप्त करून घेतलेले .


..... सेवानिवृत्तीनंतर कशी आणि कशासाठी 
जगत असतील अशी माणसे !
.

कशाला शोधतो आहे उगा मी वाट चुकलेली.. [गझल]

कशाला शोधतो आहे उगा मी वाट चुकलेली
असावी तीहि जाताना कधी कोठे हरवलेली

करावी लागते आहे उद्याची काळजी आता
वरिस सोळा फुलावानी सुखातच पोर हसलेली

कसे नजरेतुनी हुकले कधीकाळी जरा नाते
दिसे का वैरभावाची पुन्हा जाणीव जपलेली

तुझ्या डोळ्यात मी थोडे लपावे ठरवतो जेव्हा
नजर मजला तुझी दिसते कशी आधीच झुकलेली

ठरवतो एक मी जेव्हा कधी काही करायाचे
ललाटीची कशी देवा असे तू रेघ पुसलेली ..
.

छानशी करतो अपेक्षा - [गझल]

छान मी करतो अपेक्षा स्वप्न बघण्याचे बिलोरी
आडवी येऊन नियती दाखवी का ते अघोरी

मिळवण्यासाठीच सत्ता चालु का हुजरेगिरी ती
प्राप्त होता पद कसेही वाढते नक्की मुजोरी

काय वर्णू साठलेल्या वेदनांची थोरवी मी
वेदना वाटून घ्या ही फोडुनी माझी तिजोरी

थोर आहे आज पैसा सत्यही झाकावयाला
दाखला खोटाच मिळवी न्याय घेण्याला टपोरी

मागताना दान देवाला सुखाचे नेहमी मी  
टाकली झोळी सदा का भरुन दु:खाची शिदोरी

का मनाला हौस होती शोधण्याची राक्षसाला
शोधताना नेमका का आरसा आला समोरी ..
.

'महिला..महिला..महिला.......'

महिला..महिला..महिला.......

आमच्या जुन्या कोत्या अर्धवट विचारानुसार .....

महिलेने अमुक करू नये / महिलेने तमुक करू नये ...
महिलेने हे वाचू नये / महिलेने हे धर्म पाळावे पाळू नयेत ..
महिलेने तसे वागू नये / महिलेने असे वागू नये ........

किती किती अनिर्बंध निर्बंध हो हे महिलेवर ?

...... जिच्यावाचून हे जग राहूच शकत नाही
जिच्यावाचून घरात घास मिळतच नाही
जिच्यावाचून जीवनाचे पान उलगडत नाही
जिच्यावाचून पुरुषाचे जीवन "अर्धांग" ...
नव्हे तर.... अर्धांगवायु झाल्यासारखेच ..
आहे .

सगळ्या अटी / नियम /प्रतिबंध महिलेबाबतच आवर्जून का बरे ?

काळ बदलत चालला आहे , हे फक्त मालिका पाह्ण्यापुर्तेच ?

काळ बदलतो आहे, हे फक्त पुस्तका/नाटका/कादंबऱ्यापुरतेच का ?

....... महिला पुरुषाइतकेच नाही तर,
कांकणभर जास्तच काम करू शकते,
हे सर्वांना माहितही आहेच !
 

कोणताही व्यवसाय/नोकरी/शेती/रोजगार ....
सर्वच क्षेत्रात ती त्याच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर आहे !


पूर्वीची पुरातनकालाची दृष्टी अजूनही अंधुक ठेवून,
काही प्रवृत्ती तसेच जगणार आहेत, असे वाटते.....

ज्यांना स्वत:लाही पुढे सरकायचे नाही आणि
 महिलेलाही दडपशाही दाखवून,
एक पाऊल मागेच ठेवायचे आहे... असे दिसत आहे. 

तिला पुढे जाऊ द्यायची तर बात सोडाच !

........ काळाबरोबर पुरुषाने बदलले पाहिजेच !

महिलेच्या सुधारणेच्या आड येणाऱ्या वृती/प्रवृत्ती/विकृतीला दूर करण्याची वेळ आहे..

आमच्या सोयीस्कर असणाऱ्या /वाटणाऱ्या
 परंपरा/रूढी/संस्कार/रीती/रिवाज-
 ह्या गोंडस नावाखाली होणारा महिलेचा छळ थांबला गेलाच पाहिजे !!!

सुधारणेपासून दूर राहू इच्छिणाऱ्या
 सर्वच वृती/प्रवृत्ती/विकृतीचा त्रिवार निषेध .......... .

तीन चारोळ्या -

'सुगंधी स्मरण -'

येउन गेली झुळूक वाऱ्याची
हळूच सुगंधी मोगऱ्याची -
करून गेली आठवण आपल्या
पहिल्या विसरलेल्या भेटीची ..
.                                      'शुभरात्री-'

                                 मनाच्या पणतीत आता रात्रभर
                                शब्दांचे तेल ठिबकत राहणार -
                                विचाराची वात निवांत जळणार
                                काव्यस्फूर्ती प्रकाशत राहणार ..
                                                                  .'शब्दपक्षी -'' 

पक्षी उनाड शब्दांचे
बंदिस्त करू मनात किती -
मिळताच संधी पहा ते
मनपिंजऱ्यातून उधळती ..
.

व्यसन स्वप्नाचे

का स्वप्नाचे व्यसन लागले
दिवसाही ते आवडू लागले ..

रात्र तरी ती असे सुखाची 
वाट लागली का दिवसाची ..

नजरेसमोर येतेच सखी
दिवसरात्र छळतेच सखी ..

सहन न होते कुणा न कळते  
दु:ख मनीचे मनात जळते ..

न येता समोर भेटे स्वप्नी
सखी लावते पिसे का मनी .. 

एकमेकांना भेटू आपण 
म्हटल्यावरही दुराव्यात पण..

आतुर झालो भेटाया मी
स्वप्न पाहतो दिवसाही मी ..

.

गाठले आभाळ मी जरि पाय खाली रोवतो - [गझल]


कथा चौथऱ्याची


"अग ए, 
जरा हळू हळू -- 
सावकाश हं -----"
- असे मी म्हणेपर्यंत,
घाईघाईत बायको त्या चौथऱ्यावर चढली सुद्धा !


माझ्या काळजात धस्स्स्स झाले -

कारण घडू नये ते घडले आणि
शेवटी काय व्हायचे ते झालेच .....


सगळ साबणाच पाणी-
अंगणातल्या हौदाजवळच्या दगडी चौथऱ्यावर साठलेले होते !


तिने ते चुकून पाहिले नव्हते ,

सर्रर्रर्रकन पाय निसटला --

नशीब बायको नेमकी धुण्याच्या पिळ्यावर पडली !


नाहीतर डायरेक्ट तशीही मोक्षप्राप्तीचीच शक्यता ...


काही म्हणा,
केवळ धुण्याच्या पिळ्यामुळेच
डोके शाबूत आणि जीव सलामत राहिला !
नसती पीडा की हो -
..... तो चौथरा कायमचा काढून टाकायचाच विचार करतोय मी आता !

 .

'जीवन -'


चंद्रकिरणांची शीतलता
सूर्याला मागावी लागते

चंद्र उगवल्यानंतर का 

सूर्योष्णता हवी असते 

असते तेव्हा नकोसे वाटते
नसते तेव्हा आसक्ती दाटते

मानवी मनाचे गूढ न कळते
रहस्य जीवन जगण्याचे ते ....
 .

सोकावला बिलंदर गाली गुलाब दिसतो - [गझल]

सोकावला बिलंदर गाली गुलाब दिसतो
बघताच मी तयाला हल्ली झकास फुलतो

पैशात तोलतो मी प्रत्येक माणसाला
भलताच भाव हल्ली माणूसकीस चढतो

आहे जनी खरा तो सत्पात्र कौतुकाला
शेजार निंदकाचा का राहण्यास बघतो

सांगावयास न लगे काही मला सखे तू
झाला सराव इतका मौनात अर्थ कळतो

का पावसास इथला पैसा असत्य दिसला    
वाटेल त्यास जेव्हा तेव्हाच जोर धरतो ..
.

हसलो जर मी तोही हसतो .. [गझल]

.

टोचत होते झोप अनावर का स्वप्नांचे भाले.. [गझल]


टोचत होते झोप अनावर का स्वप्नांचे भाले
शरणागत मी अंथरुणावर जागे होणे झाले 


गप्प बसा म्हटले मी होते माझ्या जरि शब्दांना
मौनातुनही बोलत अश्रू नयनातून निघाले 


मंत्र तंत्र नवसातुनही पदरी नाही काही
बाबाची होताच कृपा ती जन्मास जुळे आले 


एकी दाखवता दु:खांनी कवटाळत मज देही
घाबरुनी का माझ्यापासुन सुख ते दूर पळाले 


झाल्या भरुनी झोळ्या त्यांच्या माझ्याही दानाने
मागितल्यावर दान कधी मी चक्क नकार मिळाले ..

.

भांडण धुलाई

बायकोसमोर
शर्ट फडकवत मी म्हणालो-


" बघ !

 अशी मस्तपैकी पांढरीशुभ्र धुलाई....
 नेहमी व्हायला हवी ! "

बायको शांतपणे उत्तरली -

" आज धुण्याला बाई आली नाहीय.
त्यात आपले सकाळी झालेले भांडण...
विसरलात वाटतं ?
कपडे धुताना,

 जरा नेहमीपेक्षा जास्त-
मीच आपटले पिळले असतील ना !
.

होता जिवंत तेव्हा सहवास टाळलेला - [गझल]

होता जिवंत तेव्हा सहवास टाळलेला
खांद्यावरून आता जयघोष चाललेला


दु:खात वाढ माझ्या त्यांच्या सुखास भरती
जगण्यास तोच त्यांना आधार लाभलेला 


आसक्त लेखणी ती होताच कागदावर
कवितेस हर्ष भारी अवतार घेतलेला


होताच वेदनांशी जवळीक उघड माझी
नात्यात का दुरावा वाढीस लागलेला


अश्रूहि गोठलेला दुष्काळ हा सभोती 
विझवू कशात वणवा शेतात पेटलेला 

थेंबात वेदनेच्या भिजवू कसे कुणा मी
दु:खात आपल्याही प्रत्येक नाहलेला ..

 .

तृप्तास्मि |

अsssssssब्ब...

मस्त तुरीच्या डाळीचे वरण

टोम्याटोची झकास कोशिंबीर ---

..... घरीच अशी फर्मास महागामोलाची
 पण
चविष्ट पक्वान्ने मिळायला लागल्यावर ...

गिळायला कोण जातय हो-

 त्या पंचतारांकित हॉटेलात !
.

पुरुष दिन आणि दीन पुरुष

ह्या बायकांची नजर म्हणजे अगदी घारीपेक्षाही,
एकदम तेज आणि तीक्ष्ण असते बुवा .....


सकाळी सकाळी
 बायको माहेरवाशिणीचे सुख उपभोगून घरी परतली .

दाराच्या आत पाऊल टाकले आणि
 इकडे तिकडे पाहत, डोळे विस्फारत उद्गारली -

" काय मिष्टर, कालच्या "पुरुष दिना"निमित्त,

 भरपूर गोंधळ घातलेला दिसतोय घरात ? "

......... खर तर संपूर्ण वर्षात नव्हते, 
इतके आटोकाट निकराचे प्रयत्न करून,
मी आवरून, स्वच्छ टापटीपीने घर सजवले होते !


तरीही - बायकोने असे उद्गार काढावेत,,,, 
म्हणजे आश्चर्य नाही का !

माझी अचंबित नजर पाहून ती पुढे म्हणाली -
" एवढे स्वच्छ घर गेल्या तीनशे चौसष्ठ दिवसात,

 कधी दिसले नव्हते,
तेव्हाच मला संशय आला ! 

मित्रमंडळ गोळा करून, 
 काल खेळणे, खाणेपिणे यथेच्छ झालेले दिसतेय, 
खरे की नाही ? "

आ वासून मी पाहत राहिलो .......
.

ओढ मनाची - [गझल]

नसते माहित घडते तरिही नकळत मजला काही तरी
उलथापालथ होतच असते थोडी चाहूल मना जरी 


येणारच तू आशा त्याला मोहरते ते उत्सुकपणे
इकडे तिकडे मन भिरभिरते लावुन डोळे रस्त्यावरी 


लगबग त्याची तुज भेटाया अपुरी शब्दातुन सांगणे
करणे नाही इतरांसाठी नसती चुळबुळ धावा करी 


दिसुनी येता माझ्याआधी तुझिया ओढीने धावते
मृगजळ असता मिळतो साठा जणु पाण्याचीच विहिर खरी 


आली दोनच मिनिटासाठी कळते त्याला ना आवडे
जरि संभाषण होई तोंडी का मन व्रत मौनाचे धरी ..

.

एकरूप

हास्यातून सखे तुझ्या ग उमलतात बघ कशी फुले
स्पर्शातून सखे तुझ्या ग पसरतात सुवास फुले

विलोभनीय हे हास्य तुझे लावतसे का मला पिसे
बघत रहावे रात्रंदिन तव सुंदर ह्या मुखड्यास असे    

दिवसाही जवळीक तुझी पसरवते चांदणे इथे 
चांदण्यातुनी धुंद होतसे वातावरणही रम्य इथे 

करात घेउन तुझा कर सखे गाईन प्रीतीची गाणी
भटकत मन मोकळे करूया आपण दोघे राजा राणी  

जाऊ विसरुन जगास सगळ्या राहू केवळ मी अन तू
जगास दिसू दे प्रेम आपले जिथे तिथे मी अन तू  

जाऊ डुंबुन प्रेमसागरी देहभान विसरून सखे
होऊ गुंतुन एकरूपही तनामनाने ये ग सखे ..

' सुवर्ण ' संधी


बायकोबरोबर बाजारातून कुठे जायची पण चोरी झाली हो .. !

लक्ष्मीपूजनाआधी तासभर जरा फिरायला म्हणून,
आम्ही दोघे बाहेर गेलो होतो.

रोषणाई बघत बघत,
 सराफकट्ट्याजवळून जात होतो.

दुपारच्या अनारसे तळणामुळे बायकोला होणारा त्रास उफाळून आला-
आणि ती रस्त्यावर खोकत सुटली .

मी काळजीच्या स्वरात विचारले -
" काय ग, इतका खोकला येतोय,
गळ्यासाठी काही घ्यायचं का ? "

खोकत खोकत,
 जणू काही सुवर्णसंधी साधतच ,
एका सराफ दुकानाकडे हात करून ती उद्गारली -

" सोन्याची एक चेन !"
.

बालकाची कैफियत -


देवाने तुम्हाला दिला चेहरा
त्रासिकपणा दाखवायला का ?
.....आनंद कधीतरी दिसू द्या !

देवाने दिले तोंड तुम्हाला  
फक्त शिव्या देण्याला का ?
.....आमची स्तुती करा जरा !

दिले देवाने डोळे तुम्हाला  

रागावून पाहण्यासाठी का ?
.....कौतुकाच्या टाका नजरा !

देवाने हात दिले तुम्हाला
पाठीवर मारण्यासाठी का ?
.....थोड्या मायेनेही फिरवा  !

पाय दिले देवाने तुम्हाला  

मारण्यासाठी फक्त लाथ का ?
.....नतमस्तक त्यावर होऊ कसा  !

देवाने दिले पोट तुम्हाला 
केवळ खाण्यासाठी का ?
.....आनंदही माझा त्यात साठवा !

पाठ दिली देवाने तुम्हाला 
कायम दाखवण्यासाठी का ?
.....उचलून साखर-पोते करा !

देवाने दिले कान तुम्हाला 
रडणे आमचे ऐकण्यासाठी का ?
.....बडबडगीतही आमचे ऐका !

बोटे दिलीत देवाने तुम्हाला
कानाखाली वाजवायला का ?
.....गुदगुल्या करून थोडे हसवा !
 
देवाने दिली मान तुम्हाला
दुसरीकडे वळवण्यासाठी का ?

.....छानसे कौतुक करत डोलवा !

देवाने दिले सगळे आपल्याला 
दुरुपयोग करण्यासाठी का ?
......हसत खेळत राहूया जरा  !!

.

पाच चारोळ्या -

'लागली कुणाची उचकी-'

जेव्हां जेव्हां तुला मी 
विसरायचे मनांत ठरवले -
तेव्हां तेव्हां उचकीने
बेत माझे मनांत जिरवले ..
.

'काडीमोड अन् घरोबा -'

जमले नाही कधी सुखाशी 
"काडीमोड" घेतला तयाने -
संधी साधून त्याचक्षणी 
"घरोबा" जमवला दु:खाने ..
.

'सवय  -'

जोडिले मी हात
शांतपणे देवापुढे - 
प्रार्थिले त्यालाच
"लक्ष दे चपलेकडे" ..
.

'वृक्षतोड -'
जागाच होता चंद्र रात्रभर
विचारले मी त्याला कारण -
वदला "निंबोणीचे झाड
दिसले नाही, फिरलो वणवण" . .
.

'जीवन मरण -'

जोवर मजला जमते आहे
घ्यावे फुलासारखे जगून -
ना तर अंती राहणे आहे 
निर्माल्यासारखे पडून ..
.

नाती जी गळेपडू ठोकरून झाली .. [गझल]

 माझी मदत अनेकांना करून झाली
होणारी परतफेडहि विसरून झाली

झोळी पुण्याची माझी गळत राहिली
पापी लोकांची झोळी भरून झाली

होती त्यांच्या डोळ्यासमोर जी कुरणे
सत्ता मिळता ती सगळी चरून झाली

गंगेतून चार डुबक्या मारुन झाल्या
यात्रा चारी धामी घाबरून झाली

हिशेब पाप नि पुण्याचे करत राहिलो
लबाडलुच्चांची यादी स्मरून झाली

दमत गेलो घालघालुनी गळ्यात गळा
नाती जी गळेपडू ठोकरून झाली ..
.

तुजला पुसता मी शब्दांनी देशी उत्तर तू मौनाने - [गझल]

तुजला पुसता मी शब्दांनी देशी उत्तर तू मौनाने
शिकलो मौनाची ती भाषा छानच झाले सहवासाने  

ना अडला रथ संसाराचा दोघे भक्कम चाके आपण
होता पाहत वरुन विधाता प्रवास आपला ग रस्त्याने

सुखदु:खांशी जोडत नाती जगलो जगात या एकीने
बांधत गेलो सांधत गेलो नाती सोबतसंबंधाने

माझ्या जाता तोलाला तू सावरलेही वेळोवेळी
तोल साधला संसाराचा होता तितक्या तू पैशाने

मानू त्याचे आभार किती जमली जोडी ही दोघांची
'भिऊ नको तू मी पाठीशी' सावरलो त्या संदेशाने ..
.

लीला दाखवी खट्याळ कान्हा

अधरावर धरी बासरी हरी
लागे चाहुल गोपिकाघरी
धाव अंगणी पुकारा करी
चला ग शोधू कुठे श्रीहरी ..

इकडे तिकडे शोधत गोपी
एकेमेकीला हळू विचारी
कुठे ग मुरलीवाला कान्हा
ऐकू येईना कानी बासरी ..

वृक्षाआडुन पाहतो हरी 
गोपीमुद्रा कावरीबावरी
हसुनी धरी बासरीस अधरी 
मधुर सूर जाई कानावरी .. 

भारावत गोपिका नाचती
फेर धरुनिया सूरतालावरी 
लीला दाखवी खट्याळ कान्हा  
क्षणि नसल्यापरि क्षणी समोरी ..
.

राघूस आज मैना न्यारीच वाटली ही - [गझल]

राघूस आज मैना न्यारीच वाटली ही
ठरवून भेट नव्हती प्रेमात आपली ही

टोकास आज ह्या मी टोकास त्या ग तूही
रस्त्यातली दुरीही मिटणार चांगली ही

हातात हात आला पहिलीच भेट होता
किति घालमेल तुझिया डोळ्यात चालली ही

लाटांत खेळताना त्या सागराकिनारी
थरथर शिवाशिवीची आकंठ रंगली ही

मानून कृष्ण मजला राधेत कल्पिले तुज
बघ कल्पनेत काया हर्षात नाहली ही ..
.

का का का

का नेमके होत राहते तसे
ठरवतो जेव्हा जेव्हा मी असे ठरवलेले असते व्हावे जसे
फिसकटत जाते तेच कसे बघत राहतो घडेल जसजसे
घडत राहते पण वाट्टेल तसेनाही कळत घडतेच का असे
का न घडते मज पाहिजे तसेवाटते जेव्हा जिंकावे मी असे
फासे नेमके उलटे पडती कसे ..

.

" ह्याप्पी दसरा ......! "

"ह्याप्पी दसरा ----!" - असे कानावर शब्द आले,
 किंवा ,
वाचायला मिळाले की ------


डोळ्यांसमोर येते अशी व्यक्ती की, 

जिने -


डोळ्यांवर गॉगल लावून
गळ्याला मस्त टाय लावून
तोंडात चिरूट धरून
वुलन चा कोट पहनून-


.......कमरेखाली मस्तपैकी धोतर नेसले आहे !
.

तूर डाळ

बायको म्हणाली -
"अहो, उद्या दसरा..
थोडीफार काहीतरी खरेदी करायलाच हवी ना, सणा निमित्त.. ?"

बायकोला "नाही" म्हणणे,
शक्यच नव्हते.

चार वाजता आम्ही दोघे मिळून ..
पायपीट करत -

सोने चांदीचे दागिने मिळतात ना...
त्या सराफबाजारापलीकडच्या,
टीव्ही फ्रीज शोरूम जवळच्या,
पॉश फर्निचरच्या दुकानांच्या गल्लीजवळ असलेल्या,
मॉडर्न कारबाजारनजीकच्या,
स्वस्त किराणा स्टोर्ससमोर लागलेल्या-
ह्या भल्यामोठ्या रांगेत तासभर उभे राहून...

पाव किलो तूरडाळ खरेदी करून आलो एकदाचे !

थोडीशी महागच होती, पण - उद्या आणखी दुप्पट महाग झाली तर ?

काय करणार -
नैवेद्यापुरता वरणभात तरी हवाच न करायला ..

सणासुदीला बायकोला नाराज करायचे जिवावर आले होते अगदी ... !

उद्या वरण शिजवेपर्यंत..
बायको तुरीची डाळ एका बशीत,
शोकेसमधे सर्वांना दिसेल,
अशी ठेवणार आहे म्हणे !
.

शांतीचे प्रतिक

बायकोने आवाज दिला.
"अहो, आजचा पांढरा रंग लक्षात आहे ना ?"

अनुभवी प्रामाणिक आज्ञाधारक नवरा असल्याने,
मीही तत्परतेने उत्तरलो -
"अग, हा बघ.. तास झाला की तयार होऊन मी,
देवळात तुझ्याबरोबर यायला !"

पाच मिनिटात तयार होत्तेच की, म्हणणारी बायको
तब्बल सव्वा तासानंतर तय्यार होऊन समोर आली एकदाची ...
आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.

पांढरे बूट, पांढरा टीशर्ट, पांढरी प्यांट, 
पांढरे डोके झाकण्यासाठी पांढरी क्याप,
पांढरा रुमाल... वगैरे वगैरे माझ्या परीने मी म्याचिंग केले होते.
तरीही बायको पुटपुटलीच-
"--तरी रात्री केसांना डाय करा म्हणत होते मी !"

टकलावर उरलेल्या दहा बारा केसांना डाय करून,
मी माझा स्मार्टनेस कितीसा बदलणार होतो हो ?

पण कुरकुर करणे हा तिचा जन्मजात स्वभाव,
मी तीस/पस्तीस वर्षात बदलण्यास असमर्थ ठरलो होतो हे नक्कीच !
असो.

बायकोने डोक्यावरच्या पांढऱ्याशुभ्र गजऱ्यापासून,
 ते खाली पांढऱ्या चपलापर्यंत,
आपले म्याचिंग परफेक्ट सवयीनुसार जमवले होते.
संधी साधून मीही अंमळ पुटपुटलोच -
"म्याचिंगच्या फंदात तू तुझे हे लांबसडक काळेभोर केस,
डाय लावून पांढरे केले नाहीस,
हे बाकी छान केलेस हो !"

बायकोची बडबड बरोबर असल्याने,
मी फक्त पांढऱ्याशुभ्र ढगात तरंगत होतो.

रस्त्यावर इकडे तिकडे पाहिले तो काय..
माझेच डोळे पांढरे होण्याची वेळ आली !

जिकडे तिकडे........ श्वेतवसनधारी, पांढऱ्या डोक्यातल्या,
पांढऱ्याच पांढऱ्या पऱ्या दिसून येत होत्या हो !

--- पण पांढरा रंग हा शांतीचे प्रतिक असल्याने की काय ....
कानावर पडणारा 
त्या पांढऱ्या जगातला कलकलाट मात्र अगदीच असह्य होत होता !!
.

जय जय अंबे, जय जय दुर्गे -

जय जय अंबे जय जय दुर्गे, 
मजवरती कर तू कृपा ग माते,
ठेव सुखी सगळ्यांना ..

सत्वर मजला पावलीस जेव्हा केला नवस मी तुजला   
सुख शांती भरभराट वैभव दिसले दारी मजला
शिर ठेवुनिया चरणी तुझिया ,करते अर्पण भावना ..

दुष्ट कामना दूर ठेवण्या दे तू मज सद्बुद्धी
कधी न होवो माझ्या मनी ती अविवेकाची वृद्धी
कर हे जोडुन करते वंदन ,सारुनिया ग विवंचना ..  

जगण्या जगती धनसंपत्ती नकोच भ्रष्टाचारी   
कुठे दिसो ना वैरभावना निंदा द्वेषही भारी   
आई जगदंबे तुजसी अंबे , शरणागत मम भावना ..    

.

दुर्गे दुर्घटना भारी

सकाळी चहाचा कप घेऊन बायको समोर आली.....

मी पहात राहिलो आणि शेवटी उद्गारलो-
"वा, किती छान दिसतेय ग तुला ही निळी साडी ! अगदी मस्त !"


तशी ती (संधीचा फायदा घेत-) म्हणाली -
" अहो, आटोपताय लवकर.
आपल्याला रुपाभवानीच्या दर्शनाला जायचं ना ? "


नाही म्हणणे शक्य तरी होते का ! 
आधीच धोंडा डोक्यावरून पायावर पाडून घेतला होता .....

मी विचारले-
"अग पण.. नवरात्रातले दिवस .. गर्दी मी म्हणत असणारी .. पुन्हा कधीतरी जाऊया की .. निवांतपणे .. मी कुठे नाही म्हणतोय का ?"


चतुर हुशार चाणाक्ष बायको उत्तरली -
"आज निळ्या रंगाचा दिवस..
तुम्ही म्हणताय ना ..'मी छान दिसते आज ' म्हणून !
मग आजच जायचं हो.. कितीही गर्दी असू दे..
देवळात सुंदरशी जागा बघून,
मला एक छानपैकी सेल्फी काढायचाय !
फेसबुकावर कधी एकदा अपलोड करीन असे झालेय !......"
.

आलीया भोगासी-

आज सकाळी जागा झाल्याबरोबर,
त्याने प्रथम फेसबुक उघडून ... 

न विसरता-
एकेकाळी त्याच्या दिलाची बेहतरीन लाजवाब धडकन असणाऱ्या .. त्याच्या आवडत्या...

"रेखा"ला शुभेच्छा दिलेल्या आहेत... !

(आजही ती त्याची आवडतीच आहे----
पण-- जाहीरपणे कबूल करू शकत नाही तो .. !)

 बायकोपासून-
सकाळपासून तो आपले तोंड चुकवत आहे..
कारण...त्याला धाडसाने वागता येत नाही..

आताही त्याच्या दिलाची धडकन वाढलेलीच आहे ..
पण ती निव्वळ बायकोच्या भीतीपोटी !

आला का आज वांधा !!

कुणास ठाऊक ..... पण,
बहुतेक आपल्या बायकोच्या लक्षात आले नाही, 

असे त्याला तरी वाटतेय..

काल बायकोचा वाढदिवस होता- तो ..
कधी नव्हे ते -- तो नेमका विसरून गेला होता ...
------ हे आता त्याच्या लक्षात आले आहे .!

बायको पुढ्यातल्या फेसबुकात तोंड खुपसून बसलेली आहे .....
त्याची चुळबूळ वाढत चालली आहे !

.   

तीन हायकू


१.
पाऊस आला
भिजवत निघाला
मने दोघांची ..
.


२.
किती चिखल
नसती दलदल
राडे मनात ..

.
 
३.
गर्दीच गर्दी
शोधत आहे वर्दी
बकरा एक ..
.

वेडी आशा

आहे वाव सुधारणेला
खूपच तुझिया आयुष्यात
दाखव सुधारणा करून 
करू नकोस तू चुकाच ग -

"वा वा ..छान" म्हणती सारे
कुणी न दाखवी चुका तुला
हसती पाठीमागे तुझिया
ठेवत नावे तुलाच ग -

कौतुक करणे.. मान हलवणे
रीत जगाची आहे इथली
वेळेवर करण्या सावध 
कुणी न येईल पुढे कधी ग -

खूषमस्करे  यांची जात
चुका पाहता हसती मनात 
उधळत वरवर कौतुकसुमने
कुरापती मग हळूच ग -

वाटेल कटू माझे सांगणे 
आज तुला हे मनातुनी
सुधारणा झाल्यावर बघ
होशिल तृप्त तू मनात ग -

घेई मनावर ..वाढव वाचन 

'षुद्ध अशुद्ध 'थांबव नर्तन
धडे घेऊनी योग्य ठिकाणी
दाखव सामर्थ्य शब्दांचे ग ..
.

साठी बुद्धी नाठी -

त्या दिवशी सकाळी सकाळी-
नुकताच पावसाचा चार थेंबांचा शिडकावा होऊन गेलेला.

आदल्या दिवशी संध्याकाळी मॉर्निग वॉकला जाणे जमले नव्हतेच.

म्हटले चला, आता छान हवा पडली आहे ..
आताच उरकून घ्यावा सकाळचा तरी मॉर्निंग वॉक !

पाऊस नव्हता त्यामुळे "प्यार हुआ इकरार हुआ .." गुणगुणत निघालो.

रोजच्या पेन्शनरच्या कट्ट्यावर बसलो .
मस्त मजेत हसत खिदळत गप्पाटप्पा हाणल्या इतरांशी.

तासाभराने निघालो.......

काही लोक माझ्याकडे वळून वळून पाहत होते.

मनात म्हटल- खुशाल पाहू देत..
आपली प्रसन्न मुद्रा त्यांना पुन्हापुन्हा पहायची असेल कदाचित !

दारात पोचताच,
बायकोने नेहमीच्या सवयीने डोळे विस्फारून माझ्याकडे पाहिले,
आणि ती उद्गारली-
" अहो हे काय.. हातात दोन दोन छत्र्या कुणाच्या आहेत ?
तुम्ही बाहेर निघालात, तेव्हा जवळ असू द्यावी,
म्हणून ही दाराजवळ ठेवलेली छत्री-
तुम्ही बरोबर न्यायची विसरून गेला होतात न !"

गप्पा संपण्याच्या नादात, आपलीच समजून-
मी कट्ट्यावरच्या दोन छत्र्या एका हातात एक,
अशा उचलून घेऊन आलो होतो !

साठी बुद्धी नाठी ..
असे उगाच नाही शेक्सपिअरने म्हटले !
.

त्या स्मरणाची ऐसी तैसी

सकाळी सकाळीच चहाचा कप हातात देऊन,
अखंडबडबडव्रती बायको म्हणाली -

" किती दिवस झाले माहेरी गेले नाही,
दोन दिवस जाऊन यावे म्हणते मी..
तेवढीच जिवाला विश्रांती ! "

...........बायको माहेरी गेली आहे.

- - - दोन दिवस माझ्या जिवाला आणि कानाला मस्त विश्रांती !
 

................

दोन दिवसांचा माहेरवाशिणीचा आनंद उपभोगून,
अस्मादिकांची अखंडबडबडव्रती सौभाग्यवती पुनश्च,
माझ्या कर्णेंद्रियाभोवती पिंगा घालायला
स्वगृही अवतीर्ण झाली ..

आल्या आल्या चपला कोपऱ्यात भिरकावल्या..
जणू काही मी सांगितलेले एखादे कामच !

पर्स कॉटवर फेकली..
माझी एखादी विधायक सूचना जणू अंमलात न आणण्यासाठी,
दुर्लक्षित करण्यासारखी !

दणकन कॉटवर बसकण मारली .
'हुश्श' म्हणत माहेरी घेतलेली विश्रांती-
स्वमुखावाटे हलकेच बाहेर पसरली.

माझ्या चेहऱ्याकडे आश्चर्याचा कटाक्ष टाकत ती चित्कारली -
"हे काय हो ?" - असे म्हणत,
तिने माझ्या दोन्ही कानातले कापसाचे बोळे काढून टाकले !

........ त्याक्षणी मला माझ्याच मूर्खपणाचा इतका संताप आला म्हणून सांगू -

म्हणजे गेले दोन दिवस-
माझ्या विस्मरणाच्या आगंतुक आगमनामुळे
तिच्या अनुपस्थितीतही
मी काही एन्जॉय केले नाहीच की हो !

परिस्थिती जैसी की वैसीच थी !
.

""" - उलगडा - """

 रोज रात्री
"किती हे डास -
सारखेसारखे
मलाच का चावतात मेले -"
ह्या मत्सरी उद्गारांमागचे रहस्य ...?


बसल्याबसल्या
अगदी सहजच -

एकवार पाहिले मी
पडवळासम
माझ्या शरीरयष्टीकडे ;

एक नजर टाकली मी
भोपळयासम
फुगलेल्या तिच्या आकृतीकडे -

क्षणात झाला मला उलगडा .... !मस्त मजेत  गुणगुणणाऱ्या 

पण -
रुधिरशोषणास्तव
हपापलेल्या डासांबद्दल
माझी कधीच
तक्रार का नसते !
.

"फेसबुक = आंतरराष्ट्रीय वाहतूक"

 प्रोफाईल = सीसी टीव्ही

लाईक/कॉमेंट/शेअर = सुरळीत प्रवास

नोटिफिकेशनस = खड्डे

ट्याग = खड्ड्यातला गचका

अनफ्रेंड = यू टर्न

ब्लॉक = नो एन्ट्री

पोक = धडक

गेमरिक्वेस्ट = हादरे

कॉपीपेस्ट = टोलधाड

आपलीच पोस्ट = एकेरी वाहतूक

दुसऱ्याची कधीतरी = अपघात

आवडते लेखन = ग्रीन सिग्नल

नावडते लेखन = रेड सिग्नल

फोटो पोस्ट = पिवळा सिग्नल

चित्रकाव्य = बेधडक

मैत्रिणीची पोस्ट = फास्ट ट्रयाक

मित्राची पोस्ट = ओव्हरटेक

गद्य पोस्ट = उड्डाणपूल

पद्य पोस्ट = स्पीडब्रेकर

चाट ऑन = ट्राफिकजाम

चाट ऑफ = सामसूम
.

लावून निघालो शब्दांना मी धार - (गझल)

लावून निघालो मी शब्दांना धार
टीकाकारावर करण्या मी त्या वार

कसलेही नाही खपले माझे काव्य
जरि हिंडत होतो वणवण मी बाजार

मागत मी होतो अल्प सुखाचे दान
दु:खातच दिसला जो तो मज बेजार

कौतुक ना होते कानी कोठे आज
निंदेचा जडला संसर्गी आजार

उपदेशहि माझा ऐकतसे जग बहुत
धर्मासी जागत ऐकेना शेजार ..
.

कातडीचा रंग गोरा पाघळू मी लागलो - (गझल)

कातडीचा रंग गोरा पाघळू मी लागलो
रंग काळा का मनाचा शक्यता मी विसरलो

आपली म्हटले जयांना ती दुजांना खेटली
शक्य होते टाळणे जी का तयांना भेटलो

बासरीवाचून कोणी पाहिले कृष्णास का
सोबतीला ना सखे तू अर्धमेला जाहलो

चार थेंबांनी भुईला पावसाने भिजवले
बीज आशेचे मनी मी पेरुनीया बहरलो

आरसाही राहिला ना हाय पहिल्यासारखा
दाखवी तो रूप भलते वेगळा ना वागलो ..
.

करतो प्रार्थना गजानना

करतो प्रार्थना गजानना
सद्बुद्धी दे सकलजना .. ।धृ।

हेवादावा विसरुन जावा
भांडणतंटा कुठे न व्हावा 
द्वेषवैर हा भाव मिटावा
हात जोडतो गजानना .. ।1।

जातिभेद ना कुठे दिसावा
रंक राव हा भेद नसावा
प्रेमभाव सगळ्यात वसावा

हेच मागणे गजानना .. ।2।

गर्वाला मज्जाव असावा
सुविचाराला भाव असावा
सुसंगतीला वाव असावा
चरणी विनंती गजानना .. ।3।
.

जाळे पुढे पसरण्या विसरून कोण गेली - [गझल]


जाळे पुढे पसरण्या विसरून कोण गेली,

माशास या उचलण्या विसरून कोण गेली


एका स्मितातुनीही घायाळ मज समजता

उपचार पूर्ण करण्या विसरून कोण गेली


काहूर स्पंदनांचे ह्रदयात माजवूनी

हृदयासनात बसण्या विसरून कोण गेली


नयनात भावसुमने हलकेपणी उमलता

नजरेमधून टिपण्या विसरून कोण गेली


घेऊन मीलनाच्या चंद्रासमोर शपथा

बाहूत मज बिलगण्या विसरून कोण गेली .

.

पाच चारोळ्या -

'नेता -'

बिसलरीसाठी आमचा नेता
कसा नेहमी तळमळतो - 
थेंब आसवांचे बळीराजा 
भाकरीसोबतही गिळतो ..
.


'लोका सांगे ब्रम्हज्ञान -'

भाषण भीषण दुष्काळावर 
ऐकुनिया श्रोते गहिवरले -
ढेकर नेत्याची नंतर
ऐकुनिया सारे बावरले ..
.


नेते -

जागायाचे ज्या नेत्यांनी
सभागृही ते डुलक्या घेती  
ज्यांना झोप पाहिजे त्यांची
सदैव नेते झोप उडवती !
.


शहाणे बगळे -

दोन शहाण्यांचे भांडण आगळे
दिवसा पाहतात वेडे सगळे -
राजकारणी ते नेते बगळे
रात्री घालतात गळ्यात गळे ..
.


'नेता मुखवट्यातला  -'

जो असतो तसा तो नसतो 
तो दिसतो तसाही तो नसतो -
तो नक्की कसा असतो 
ह्या अंदाजातच आपण फसतो ..
.

डाव मोडणे सदैव जमते - (गझल)

डाव मोडणे सदैव जमते
घाव घालणे सदैव जमते

दोष आपले खुशाल झाकत
नाव ठेवणे सदैव जमते

सोबतीस जर धुसफुस होई

वाट अडवणे सदैव जमते

हात ना पुढे कुणा सहाय्या
पाय ओढणे सदैव जमते

कौतुकास का मुकाट तोंडे
दात विचकणे सदैव जमते ..
.

तीन चारोळ्या -

१)

'चेहरा -'

तू असल्यावर माझा चेहरा 
स्वच्छ पुसलेला आरसा असतो -
तू नसतेस तेव्हाच सखे 
पारा उडालेला आरसा दिसतो . .
.


२)

'काकदृष्टी-'

बागेमधली सुंदर फुले 
दाखवली सगळी मी त्याला - 
कौतुक करणे दूर राहिले 
'निवडुंग कुठे' विचारुनी गेला ..

. .


३)

'खात्री -'


रडायचे दु:खात मला जर 
असतो आधार तुझाच खांदा -
खात्री आहे मला रे दोस्त 
शेवटी पहिला तुझाच खांदा . .

. . .

वजनदार उपास

येता जाता येरझाऱ्या घालत, 
बायको आरशापुढे उभी राहत होती .
स्वत:ला डोळे भरून न्याहळत होती .

न राहवून शेवटी मी विचारलेच -
" आज आरशाला कशी काय संधी ब्वा एवढाssssss वेळ ? "

ती पुन्हा आरशात पाहत उत्तरली- 
" काय करू समजत नाही . 
बघा ना, वजन कित्ती वाढतच चाललय ! "

मी म्हणालो-
" तू तर श्रावणात सोमवारी महादेव, मंगळवारी अंबाबाई, 
गुरुवारी दत्त, शुक्रवारी संतोषी माता देवीचा, 
शनिवारी शनीचा/मारुतीचा, रविवारी खंडोबाचा...
असे कितीतरी उपास करत असतेस ना .. 
शिवाय पंधरा दिवसाच्या, त्या दोन एकादशा आहेतच उपासाच्या !"

ती मला मधेच थांबवत म्हणाली-
" उपास करतेय ना ? मग वजन कमी नको का व्हायला ? "

मी म्हटले-
" हो ना ! वजन कमीच व्हायला पाहिजे ग !
पण तुझे हे सगळे उपवास.. म्हणजे खाण्याचे पदार्थ दुप्पट खास ! 
वजन कमी व्हायचे असेल तर, मुळात कमी खायला पाहिजे ना ?
तुझे उपासाचे ढीगभर पदार्थ आणत आणत ......
हे बघ माझेच वजन कमी होत चाललेय ! "
.

योगायोग ?

बरेच महिने झाले,
या ना त्या कारणाने,
जेवणात आवडीच्या भाकरीचा योग काही येत नव्हता !

काल बायकोने जेवणात नेहमीप्रमाणेच
 आमटी, पोळी, भात, वांग्याचे मस्त भरीत आणि छानशी पालेभाजी केली होती .

तरीपण मी म्हणून गेलोच -
"आज तरी भाकरी पाहिजे होती ! "

बायको उत्तरली -
"भाकरी ताटात पडायलाही,
 नशीबात असाव लागत.. बर का !"

. . . आज एका मित्राचा फोन आलाः

" गजानन महाराजांच्या पोथीच्या
पारायणाच्या समाप्तीनिमित्त,
उद्या दुपारी तुम्ही उभयता 
भाजीभाकरीच्या प्रसादासाठी
आमच्याकडे यायच आहे ! "
.

कुणाच्या कांद्यावर कुणाचे बोजे


(चाल- कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे )

कुणाच्या कांद्यावर कुणाचे बोजे ..

कशासाठी उतरावे दर शेतातून 
बळीराजे राबती शेती जीव ओतून 
जगतात बळे रानी मनात कुढून 
तरीच घरी येतात कांदे हे ताजे ..

शेत सारे पडीक ते पाणी न मिळून 
रोप जाते दुष्काळात गळून मरून 
पिकासाठी घेती कर्ज ब्यांकेत जाऊन 
ठरती ते कर्जबुडवे नोटीसही गाजे ..

खंत त्याला शेतातही विहीर न साधी 
व्यापाऱ्याची गोणी भरते चंगळवादी 
दलालांची पोळी भाजे शेत पेटे आधी 
घेत दोरी आत्महत्या झाडावरी गाजे ..

.

एक कांदा झेलू बाई, दोन कांदे झेलू

एरव्ही -

मंडईतल्या
कांद्यांच्या कट्टयाकडे
ढुंकूनही न बघणारी 
बायको ...

हल्ली -

मंडईतून जाताना,
इतकी टक लावून...

कांद्यांची पोती 
डोळे भरून बघत असते की ..

जणू सराफकट्ट्यातील शोकेसमधले
सोन्याचांदीचे दागिनेच बघत आहे !
.

जय कंकालेश्वर

दुपारी एक वाजता 'पुणे ते बीड' यष्टीत बसलो आहोत.

सव्वा पाच वाजले असले तरी, 
'अखंडबडबडव्रती' अर्धांगी 
काहीतरी बडबड नक्कीच करत असावी, 
असा मला दाट संशय येतोय !

साहजिकच,
'कशावरून' असे तुम्ही विचारणार-
मला ही खात्री आहे !

माझ्याकडे तिरपा कटाक्ष टाकत,
मान हलवत,
तिच्या तोँडाच्या अविरत सतत अखंडपणे 
हालचाली चालूच आहेत ना हो !

मी एक वाजताच,
तिकीट काढल्यापासून,

माझ्या कानात गाणी ऐकण्यासाठी,
मोबाईल चालू करून,
हेडफोनच्या वायरी अडकवून बसलोय ... 

आणि गाण्यांच्या तालावर मुंडी हलवतोय..

तिला गोड गैरसमजात वाटत असणार की, 
मी तिच्या बोलण्याला प्रतिसाद देतोय !

एकुण काय तर............ दोघेही खूषच !

अजून अडीच तासांचा तर प्रश्न आहे,
देव करो -
मोबाईलची ब्याटरी तेव्हापर्यंत टिको  
आणि तिच्या लक्षात हे न येवो !
.

चारोळ्या -

'भक्ती भाव-'

देवा तुझी किती 
अगाध रे लीला -
मी तुझ्या पायाशी 
ध्यानी मात्र चपला ..
.

'अगतिक -'

देवळातल्या देवाच्या  
पायावर हात मी ठेवत आहे -
देवाशपथ, खरं सांगतो  
शंभर टक्के मी नास्तिक आहे ..
.

तीन चारोळ्या -

काट्यांचे पसरून अंथरुण
झोपायाची सवय जाहली -
पसरली कुणी अंथरुणावर
फुले नेमकी टोचु लागली . .
.

काय करावे समजत नाही 
सभा गाजवून येतो मी -
बायको समोर दिसताक्षणी 
मान का खाली घालतो मी ..
.

कौतुक करायला कशी 
जीभ आमची कुरकुरते -
निंदा चघळायला मात्र 
चारचौघात चुरचुरते ..
.

बहाणा

विरहाची परमावधी 
झाल्यानंतरच्या,
आपल्या पहिल्या भेटीत -

तू 
डोळ्यात कचरा गेल्याचे
निमित्त सांगतेस,
आणि -

पदराच्या टोकाने 
डोळ्याच्या कडा
हळुवारपणे
टिपून घेतेस -

खरं सांगू ?

तुझ्या 
अश्रू लपवण्याच्या 
त्या बहाण्याला -

मनापासून 
दाद दिल्याशिवाय 
राहवतच नाही ..
.

तो बाप


इच्छा असते, वेळच नसतो 
मनात खूप हुरूप असतो

कौतुक करावे वाटत असते 
पाठीवर थाप द्यावी वाटते

लाडक्यांचे उत्साहात चाळे
गैरहजेरीतही उत्सुक डोळे

कर्तव्य असते घरादारासाठी 
नीतीनियम असतात पाठी

टुकार काम करायचे नसते 
चुकार होऊन चालत नसते

तन असते दंग ऑफिसात 
मन असते गुंग संसारात

तारेवरची अजब कसरत 
कुणा मुखी येऊ नये हरकत

तिकडे फार जपायचे असते 
इकडे तर सांभाळायचे असते

बाप रे बाप, किती हा ताप 
धावपळीत आवरत संताप

तरीही हसत खेळत तो बाप 

तोलत असतो कर्तव्याचे माप ..
.

फुटकी जवळ न कवडी माझ्या खिशात आता ..[गझल]

फुटकी जवळ न कवडी माझ्या खिशात आता 
कोणीच येत नाही माझ्या घरात आता

उपदेश फार तोंडी कोणी न कार्यकर्ते 
गोंगाट मात्र उरतो एका सुरात आता 

आरंभशूर जमती मदतीस ना कुणीही 
बेकार पळपुट्यांची नाही ददात आता 

परमेश्वरास घाली का साकडे कुणी ते 
जपण्यास वेळ नसता बुडता पुरात आता 

वाटे न योग्य देणे नशिबास दोष काही 
सामर्थ्य मनगटाचे वाढे मनात आता ..
.

दोन चारोळ्या -


(१)

'कोडे-'

ऑफिसात गरजणारे 'वाघ'
येता घरात बायको पुढे -
एकदम का बनतात 'शेळी'
हे न उलगडणारेच कोडे ..

.

(२)

'ह्याला संसार ऐसे नाव-'

ऑफिसला उशीर.. ताणाताणी वाढते
नवरा उपाशी.. बायको रुसते -
नवरा आल्यावर, सुनसानी शमते
मोगऱ्याचा गजरा.. घरदार हसते ..

.