जीवनाची सांगता ही वाटते भीती मला -


जीवनाची सांगता ही वाटते भीती मला 
ना कुणी ऐकावयाही वाटते भीती मला 

सागरावर का उसळती जीवघेणी वादळे 
का किनारा एकटा ही वाटते भीती मला  

ढोलताशा ऐकुनी मज खूप होतो त्रास हो 
देवळाची शांतता ही वाटते भीती मला  

वाटले घ्यावा विसावा टेकुनी खांद्यावरी 
सापडेना मार्ग काही वाटते भीती मला 

माजलो पैशात लोळत चेहरा सुजला किती 
ओळखेना आरसाही वाटते भीती मला  

जागणे अन् झोपणे हा फरक नाही राहिला 
जीवनाची ओढ नाही वाटते भीती मला ..
.

" चिऊ चिऊ चिडकी - "


बाळ दिसला
हळूच हसला
"ये ये" म्हणाला
खाऊ घे म्हणाला -


चिऊ चिऊ चिडकी
बंद खिडकी
चोच आपट
काचेवर टकटक -

  
बाळाने उघडली
चिऊ चिऊ आली
लाडूचा खाऊ
चोचीने घेऊ -


बाळाने मुठीत
लाडू लपवला
बाळ हळूच
खुदकन हसला -

 

चिऊ चिऊ चिडली
खाऊसाठी रडली
खिडकी बाहेर
"चिऊचिऊ" ओरडली !
.

" आरती कंत्राटदाराची - "


जीव जाई, जीव जाई, कंत्राटदारा
थैली झटकुन खड्डेदुरुस्ती करा ||

साटे लोटे तुमचे जमले असेल
आगाऊ रक्कम घेतली असेल
लाज शर्म थोडी शिल्लक असेल  
नैतिकता काही ध्यानीमनी धरा ||

पावसाळ्यात नेमके खड्डे पडावे 
सगेसोयरे तुमचे त्यात धडपडावे 
विरोधी प्रतिनिधीनी गृही ओरडावे  
खाल्लेल्या पैशावर उपकार करा ||

अपचन अजीर्ण होऊ देऊ नका
डोळ्यावर कुणाच्या तुम्ही येऊ नका
आयकरवाले पहा घालतील  डाका
घरच्या लक्ष्मीची आठवण करा ||   
.

" अंत एका सहनशीलतेचा - "


बायकोने फारच भुणभुण लावली होती कानाशी ...
" मी गायन आणि वादन एकदम शिकणार आहे. "

एक दिवस वाजवायची पेटी घरी आली -
दुसऱ्या दिवशी गायनाचे आलाप सुरू झाले !

पण, तुझे नि माझे जमेना ..., 
या उक्तीप्रमाणे,
पेटीच्या पट्ट्या 
बायकोच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्दानुसार
वाजायला काही तयार होईनात !

- आणि ते गायले जाणारे शब्द
 आपला शब्द पाळायला -
पेटीच्या सुरानुसार पळायला
 काही तयार होईनात !

घरातल्या आम्हा सगळ्यांना
 कान दाबून शब्दांचा अत्याचार सहन करणे
 भागच होते !

काल बायको शहाण्यासारखे म्हणाली -
" अहो, मी आता गाणे आणि वाजवणे बंद करणार आहे ! "

मी आश्चर्यचकीत होऊन पुढे काही बोलण्याच्या आतच,
ती पुढे म्हणाली - 
" म्हणजे,
दिवसभर तुमच्या कानांना त्रास नको,
आणि मलाही सोयीचे होईल ...
म्हणून,
मी आजपासून...
 रात्री तुम्ही सगळे झोपल्यावरच,
पेटी वाजवत गाणे म्हणत जाईन !
चालेल ना हो तुम्हाला ! "
.

धन्य आज दर्शनाने तुझ्या -


नाम जपलं विठ्ठलविठ्ठल, मी तुला पहाया

रोज मूर्ति बघणे छंदच मनातून माझ्या ||


आज दर्शनाने झाली धन्य धन्य काया

डोळियाचं फिटलं पारणं जीव नाही वाया ||


चाल चालुनी शिणली रे जर्जर ही काया

ध्यास घेतला होता मी, काळजामधुनी या ||


तूच ध्यानि तूच मनी रे पंढरिच्या राया

शेवटी मला पावला देवा तूच विठू राया ||


व्हावं सोनं देहाचं ह्या, वाटले मना या

डोळियाचं पाणी माझ्या, गेलं नाहि वाया ||


धन्य आज दर्शनाने तुझ्या पंढरीत मी या

आनंदानं लोटांगण हे पायावर तुझिया ||

.

हायकू -


१)  लहरी वारा  
पानांची सळसळ 
   सशाचा छळ  


२)  ढगांची हूल
पावसाची चाहूल 
  भुई निष्प्राण  


३) वाऱ्याची गती   
निसर्गाची संगती  
    मन बेभान   


४) पाऊस गाणी 
धरतीची कहाणी 
   ऐकते बीज 


५) कावळा पाही  
 चिमणीचं सदन  
   खुनशी मन 

.

" आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी -"
आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी 

हाती टाळ, चिपळ्या, वीणा, एकतारी ..भाळावरी गंध, विठ्ठलनाम छंद 

विठ्ठलस्मरणांत होतो सारे धुंद ..तुळशीवृंदावनाचा डोईवर ना भार 

पेलतो विठ्ठल आमचा हा संसार .. भक्त सारे गुंग मुखात अभंग

भजनात रंग कीर्तनात दंग ..जातीभेदा वारीत नाही हो थारा 

विठ्ठलभावाचा एक सर्वास निवारा ..


उच्चनीच नाही, नाही रावरंक 

सर्वांनाच मोही विठ्ठलनाम एक .. 


"विठ्ठल विठ्ठल"- गर्जता शिस्तीत 

दिंडीला येई जोर, वाडीवस्तीत ..


बाल-वृद्ध चालता चालता वारीत

विठ्ठलाचा जयघोष मुखाने करीत ..


रिंगणात नाचूया, विठ्ठल विठ्ठल 

या रे सारे गाऊ, विठ्ठल विठ्ठल .."जय हारी विठ्ठल"- दिंडी म्हणतसे 

तहानभूक विसरून, धुंदी आणतसे ..जीवनी घडावा वारीचा प्रसंग 

जन्मोजन्मी राहील विठ्ठलाचा संग !.

" बया आज माझी नसे वात द्याया - "

.
 (चाल : प्रिया आज माझी नसे साथ द्याया -)


बया आज माझी नसे वात द्याया
असो बंद डोळे मिटो पापण्या या..  

नको गाणी आता जरा झोपतो मी 
सुरांची तिच्या आज ती हूल नाही 
बयेवीण ना त्रास होईल आता..

किती छान म्हटले तरी त्रास होतो 
जरी कान बंदी तरी बोल येतो 
शिरा त्या गळ्याच्या फुगाव्या किती त्या..

न भांडी धुवाया, न कामा उशीर 
कसा आज हातास येईल जोर 
मुखी यातना रात्र जागेल गाया..  

किती आठवू मी अशा भांडणांसी   
पुरे लाटण्यावीण शब्दांस खाशी  
कशाला उभी ती मनीं महामाया.. !
.

"तृषार्त झाड केविलवाणे " - 1. साथ फुलांनी कधीच सोडली
  पानांनीही संगत सोडली


  खोड उदास उभे थरथरते
  फांद्यांचे ओझे कुरकुरते 

  वाळवी आहे टपून बसली 
  कु-हाडीची धार तापली

  चिऊ काऊ नाही वस्तीला
  उनाड मैना नाही मस्तीला

सुखाचे सोबती पळून गेले
 दुःखाने अवसान गळून गेले

माळावर गाणे रडगाणे 
 तृषार्त झाड केविलवाणे ... 

बाळाचे स्वप्न - (बालकविता) 1. सशाने धरले  सिंहाचे कान
  गरगर फिरवून मोडली मान ।

  शेळीने घेतला लांडग्याचा चावा
  लांडगा ओरडला-धावा धावा ।

  मुंगीची ऐकून डरकाळी कानात
  हत्ती घाबरून पळाला रानात ।

  कासवाने लावली हरणाशी शर्यत
  हरीण दमले मागे धापा टाकत ।

  उंदराने बोक्याच्या पकडून मिशा
  काढायला लावल्या दहा उठाबशा ।

  बाळाने मोजले दोन सात चार
  स्वप्नातच बाळ मोजून बेजार !

'शहरी प्रेम तुमचं, गावरान प्रेम आमचं - '

शहरी प्रेम तुमचं ग्रामीण प्रेम आमचं
एकाच फूटपट्टीवर सांगा कसं मोजायचं ...

तुमचं प्रेम शहरी, प्रेम कधीच नसतं
आमचं प्रेम ग्रामीण, ते मनातच ठसतं ...

तुमच प्रेम भिरभिरत्या फुलपाखरासारख
आमचं प्रेम कायम चिकटणाऱ्या गोचिडासारख ...

बागेतून गुलाबाच्या, तुमचं प्रेम दंगतं
फडातून उसाच्या, आमचं प्रेम रंगतं ...

तुमचं प्रेम फसतं, शरीरबाह्य सौंदर्यात 
आमचं प्रेम घुसतं, थेट एकदम काळजात ...

असेच मुळूमुळू रडे, ऐकतो तुमच्या प्रेमात 
एक घाव दोन तुकडे, होतात आमच्या प्रेमात  ...

प्रेम तुमचं वाढतं कुंडीतल्या बोन्सायसारखं  
प्रेम आमचं वाढतं शेतातल्या आम्रवृक्षासारखं ...

गाता प्रेमगाणी जशी प्रेमात तुम्ही इलू इलू
लावणी आणि तोडणी तशी प्रेमात आमची गुलूगुलू  ...

प्रेम तुमचं बसतं शरीराच्या रंगावर  
प्रेम आमचं हसतं रापलेल्या अंगावर ...

दिसते प्रेम तुमचे कुरवाळायला हात हातात  
असते प्रेम आमचे जोडीने राबायला कष्टात ...

प्रेम तुमचं असतं गाडीवरचं पिज्झा बरगर 
प्रेम आमचं तव्यावरचं खमंग पिठलं भाकर  ...

चॉकलेट आईस्क्रिमात तुमचं प्रेम घोळतं  
मिर्चीच्याच ठेच्यात आमचं प्रेम लोळतं ...

पंचतारांकित हॉटेलसारखं असेल तुमचं प्रेम
लई भारी ढाब्यापेक्षा कमी नाही आमचं प्रेम ...

तुमच्या प्रेमात कधीकधी उडतो बार फुसका
आमच्या प्रेमाचा असतो झ्याक गावरान ठसका...

राजाराणीचीच असते तुमच्या प्रेमात जोडी  
सर्ज्याराजा ही बनते आमच्या प्रेमात गोडी ...

शहरी प्रेमात तुमच्या उरते एक काडीमोड
ग्रामीण प्रेमात आमच्या पुरते एक तडजोड ...

तुमचं शहरी अजब प्रेम नक्की बसतं कुणावर 
असतं आज हिच्यावर दिसतं उद्या तिच्यावर ...

असलं हे जरी ग्रामीण प्रेम आम्हाला कळतं
येकाच कारभारनीमुळं ते समद्या खोपटाला उजळतं ...  
.

'हे अघटित घडले कैसे हो -' 1. मन माझे हे, किति रमले हो,त्या दत्तगुरुस पाहून हो
  हे अघटित घडले कैसे हो ।।


  त्रिशूळ धरुनी एक कराने, चक्र दुजा हाती धरिले,
  कमंडलूसी एका हाती, शंखा करि दुस-या धरिले,
  त्या कमळासी धरि बोटात, ती गदा उभी थाटात हो ।।

  भाव मुखावर सात्विक पाहुन, हरपून गेले भान हो,
  त्रिमुखासह कर सहा ते पाहुन, डोळे गेले दिपून हो,
  ती पाठीशी उभी गाय अशी जणु भार जगाचा पेलुन हो ।।

  चार वेद ते उभे समोरी श्वानांच्या रूपात पहा,
  राजस मुद्रा पहात गुरुची बनले शांतीदूत पहा,
  पदकमलांवरी शिर झुकवुनिया करु वंदन त्रैमूर्तीस हो ।।
  .

'आमची दिंडी -'
दिंडी चालली ही दोघांची
आमची नवराबायकोची...

तुळशीवृंदावनापासुन ती
देवघराच्या कट्ट्यावरती...

दोघे आम्ही दुखणेकरी
सुखदुःखाचे वाटेकरी...

असेल अमुचा विठ्ठलहरी
देईल दर्शन घरच्याघरी...

विठ्ठलनाम मुखी जपतो
स्वप्नीध्यानीँ विठूस स्मरतो...

विठ्ठल मनात तनात घरात
चिंता नसते मुळीच उरात... 

विठ्ठल भिनला चराचरात
कशाला जाऊ पंढरपुरात...


दिंडी आमची ही दोघांची

विठ्ठलनामाच्या स्मरणांची !

.