आनंद लुटू अवघेजण

आज पहाटे पहाटे साडेचार वाजता साखरझोपेतून अचानक जाग आली.

नेहमीप्रमाणे फेसबुकाचे तोंड न पाहता वेगळे काहीतरी करायचे ठरवले.

मोबाईल घेतला.
हेडफोनचे एक टोक त्यात खुपसले .
दुसरी दोन टोकं माझ्या दोन कानात .

गाण्यांचा विभाग शोधला आणि यादीवरून बोट फिरवले.
माझे डोळे झाकून ठरवले.
कुठल्याही एका गाण्यावर बोट थांबू दे.
ते प्रथम ऐकायचे......

आणि काय सांगू मित्रहो -

लता आणि भीमसेनजी माझ्या कानात आपले प्राण आणून गाऊ लागले.
जणू काही माझ्या एकटयासाठीच.

अहाहा .. आधीच पहाटेची शांत वेळ आणि कानात हे गाणे ऐकायला ...

...." बाजे रे मुरलिया बाजे रे
अधर धरे मोहन मुरली पर
होंठ पे माया बिराजे... "

तुम्हाला सांगितल्याशिवाय कसा बरे राहीन ..

"आनंद लुटणे" म्हणजे आणखी दुसरे काय असते हो ?
 

.

चैन बेचैन

महिनाअखेर सुरू झाला .
मध्यमवर्गाची "चैन" आठवली .

पगाराच्या दिवशीचा पहिला आठवडा ....
खिशातल्या नोटा बाहेर दाखवत,
दुनियेला फाट्यावर मारत,
मस्त मजेत खाऱ्या काजूवर ताव मारणे .

दुसरा आठवडा.... पुढचा हिशेब आठवत,
किसमिसाचे तोबरे भरणे .

तिसरा आठवडा-
इकडे तिकडे बघत, हळूच पुडीतले शेंगदाणे मोजत चरणे ...

आणि...................

शेवटच्या आठवड्यात -
पोरांच्या बरोबरीने जिभल्या चाटत आवडीने लेमन गोळ्या चघळणे !

खरय ना ?
.

बगळे


सगळे बगळे
आगळे वेगळे..

कामापुरते
गळ्यात गळे..

काम होताच
पकडतात गळे..

एका पायावरती
टपलेले बगळे..

दोन पायावरचे
धूर्त काही बगळे..

स्वार्थ असता
काढतात गळे..

सत्ता दिसता
दाबतात गळे..

संधी मिळता
ओढतात गळे..

केसाने मग
कापतात गळे.. !
 
.

कवितेचा मोर

कवितेची भट्टी जमली मजला
पाव किलो "श्वास" गोळा केला ..

अर्धा किलो "यातना" त्यात ओतल्या
पाऊण किलो "वेदना"ही मिसळल्या ..

एक किलो "जखमा" शोधून ठेवल्या
दीड किलो "मलमपट्ट्या" वर लावल्या ..

दोन किलो "प्रेम" हळुवार साठवले
अडीच किलो "अश्रू" त्यात गोठवले ..

तीन किलो अशुद्ध, चार किलो शुद्ध
रांगेत ठेवले एक मीटर शब्द ..

एवढा मसाला उत्साहाने जमवला
थोडाही कंटाळा नाही मी केला ..

रसिक/अरसिक थोडे आले समोर
नाचवला माझ्या कवितेचा मोर .. !
.

'विरोधाभास -'

एखाद्याने म्हटले 'अरे '
दुसरा नक्की म्हणतो 'का रे '..

एक आणतो बासुंदी घडा
दुसरा टाकतो मीठखडा..

एखादा 'वा छान ' म्हणतो
दुसरा शेरा 'भंकस ' हाणतो ..

एक आनंदे टाळ्या वाजवी
दुसरा बंद पाडण्या वाजवी..

असे एखादा 'किती छानसा '
दिसतो दुसरा 'असातसा '..

एका दगडाचा 'देव ' बनतो
दुसरा मात्र 'दगड 'च राहतो..

सूरत नियत नको एकसमान
पारखावे कैसे साधू-सैतान..!

.

बूमरँग

बातमी वाचली..
आणि बायकोच्या ज्ञानात थोडीशी भर घालावी म्हणून,
मी घाईघाईत स्वैपाकघरात डोकावलो.

बायकोचे दोन्ही हातानी धबाधब कणिक तिंबणे चालू होते.
एका बाजूला लाटणे, दुसऱ्या बाजूला पोळपाट होता. 
सावध पवित्रा आणि सुरक्षित अंतराची काळजी घेऊन,
मी तिला म्हणालो-

" अग, हे बघ !
आपल्या इस्रोने 

त्या कोट्यावधी किलोमीटर अंतरावरच्या मंगळ ग्रहावर,
यशस्वीरीत्या यानाची पाठवणी केलीय आणि मंगळाची माहिती आणली,  बरं का ! "

आपले कणिक तिंबण्याचे कार्य यशस्वीरीत्या चालूच ठेवत,
बायकोने प्रत्यक्ष घाव न मारताही,
एक शाब्दिक तडाखा मला हाणलाच -

" तुम्हीच बघत बसा ! जग कुठल्या कुठे चाललय .
तुम्हाला मेलं साध, 

अर्ध्या फर्लांगावरच्या मंडईत चालत चालत जाऊन,
कोथिंबिरीच्या चार काड्या आणायचे किती जिवावर येतंय ! "

मी खालमानेने आणखी हाल नकोत,
या सूज्ञ विचाराने खालमानेने हॉलमधे परतलो .


.

काटा रुते कुणाला

मी फूल तोडण्यासाठी
हलवले जरा फांदीला..
" हळूच सांभाळून रे.."
आवाज फुलातून आला -


दचकलो.. हाय..थोडा मी ,
बोटातच घुसता काटे..

हुंदके फुलाचे काही
टपकले पाकळ्यांवाटे ..
.

बिन पाण्याने

श्रावणानंतरचा रविवारचा दिवस,
निवांत दिवस !

डोक्यावर आणि हनुवटीवर केसांचा भारा वाढलेला...
म्हटलं चला-
आज सगळा भार उतरवून टाकूया !

केसांची वाट लावायची ठरवल्याने,
पावलांनी आपोआप केशकर्तनालयाची वाट धरली

नाभिकमित्राने बाटलीतून पाण्याचा मस्त फवारा उडवला....
वाटलं....
बहुतेक आसारामकडे होळी साजरी करून आला असावा !

डोक्यावरच्या केसांची वास्तपुस्त झाल्यावर,
 त्याने गमतीने विचारले,
"साहेब, दाढी पाण्याने का बिनपाण्याने ? "

मी उत्तरलो -
" घरी आणि ऑफिसात,

 आमची बिनपाण्याने होतेच -
निदान इथे तरी पाणी वापरा ! "
.

आम्हाला जमणार नाही

दारिद्र्यात खितपत पडणे
आम्हाला जमणार नाही..

सत्ता पद खुर्ची सोडणे
आम्हाला जमणार नाही..

सत्यअहिंसाशांती रुचणे
आम्हाला जमणार नाही..

शिष्टाचार पाळणे कधी
आम्हाला जमणार नाही..

सुसंस्कृत सदाचारी असणे
आम्हाला जमणार नाही..

घोटाळ्यावाचून जगणे
आम्हाला जमणार नाही..

भाषणात आश्वासन गाळणे
आम्हाला जमणार नाही..

रात्री हेवेदावे दिवसा एकी
आम्हाला जमणार नाही..

लांगूलचालन सोडणे कधी
आम्हाला जमणार नाही.. !
.

नसते वेड हे मला लागले

दार घराचे उघडे माझ्या
असेच होते कधीतरी 
दारातुन डोकावुन गेली
कशी अचानक हळूच परी ..

ती डोकावुन गेली एकदा
मी अस्वस्थच कायमचा  
पुन्हा कधी येईल परी ती
मनात क्षण नित उत्सुकतेचा ..

थोडे हलले दार घराचे
वाटे आली असेल का ती
निराशाच येई परि पदरी
दुसरे निघते कुणीतरी ..

डोकावणे ते तिचे एकदा 
दुखणे ठरले मज कायमचे
नसते वेड हे मला लागले   
नेहमी बाहेर डोकावण्याचे ..
.

घरोघरी


मी बर माझ घर बर
कशाला नसती उठाठेव
घरात करत बसाव
निवांत आपल देव देव ..

तुमच तुमच्यापाशी
आमच आमच्यापाशी
कशाला करायची हो
इतरांची नसती चौकशी .....

आलेच हं दोन मिनिटात
शेजारच्या की-होलात डोकावून
डोळे जरा लावून अन
कान थोडे भिंतीला लावून ..

हीच बोंब घरोघरी -
म्हणायची नेहमीच घाई
....आमच्या तरी कधी घरी
अस्स काही नसत बाई .. !

.

पैज

बायको माहेरी गेली की, माझ्या अंगावर काटा येतो.
(....सासरी असली की गुलाब असतो, हे वेगळे सांगायलाच हवे काय !)

जुन्या मैत्रिणी भेटल्यामुळे,
ती माहेराहून येताना बरोबर हमखास काहीतरी नाविन्य घेऊन येतेच .

परवा गेली होती आणि येताना "पैज" नावाचे नाविन्य घेऊन आली.
उठता, बसता, चालता, बोलता, हलता, डुलता ..
प्रत्येक गोष्टीला...
पैज लावण्याची नवी खोड तिला लागली .

मी चिडूनच तिला म्हणालो-
"अग, सारखी सारखी काय पैज लावतेस?"

ती त्यावर उत्तरली --
"बरं बाई,राहिलं!
यापुढ कध्धी पैज लावणार नाही,मग तर झालं !"

मी उलट विचारले -
"हे  तुझे म्हणणे तरी मी कशावरून खरे समजायचे ?"

हसत हसत ती म्हणाली -
"कशावरून म्हणजे?
मी सांगतेय ना म्हणून !
अगदीच खोटं वाटत असलं माझं म्हणण तर...
... लावता का पैज ? "
.

आयुष्याची तब्येत

एखाद्या सुट्टीदिवशी-

चल ग,
जरा बागेत फिरून येऊ.
जाम कंटाळा आलाय.
आठवड्यात काम, काम, काम !
मागची सुट्टीही तशीच गेली-
थोडस फ्रेश होऊन येऊ . .
बर वाटेल बाहेरच्या वातावरणात ....

नको रे .
आज गुरुवार आहे.
आज माझा उपास आहे .
मंदिरात जाऊन येऊ.
उशीर लागला तरी हरकत नाही,
मागच्या गुरुवारीपण,
जमलेच नव्हते ना आपल्याला जायला तिकडे !

...... कुरबुर आणि मनस्ताप वाढल्यावर,
जेवणाच्या वेळा अयोग्य झाल्या तर ,
आयुष्याची तब्येत

 कशी जपणार ही दोघं भविष्यात ?
.

माणसातला देव

बऱ्याच दिवसांनी तो आपल्या मित्राच्या घरी आला होता.

"काय रे, आज कशी काय वाट चुकला इकडे ?" - मित्राने विचारले.

" आज शुक्रवार ना, संतोषीमातेच्या मंदिराकडे निघालो होतो.
म्हटल, आज निवांत आहे जरासा, मारावी चक्कर तुझ्याकडेही-"

 - तो थकल्या चेहऱ्याने म्हणाला.

गप्पाटप्पा झाल्या.

चहानाष्टापाणी झाले.

मित्राची म्हातारी, थकलेली आई बाहेर आली.

तिच्याबरोबरही त्याने दोनचार घरगुती गोष्टी शेअर केल्या.

तिच्या पायावर डोके टेकवून,
"बराय येतो, काकू." - असे म्हणत, तो आल्या दिशेने परत निघाला.

मित्राने पृच्छा केलीच- "अरे तू तर संतोषीमाता मंदिराकडे जाणार होतास ना ?
मग परत घराकडे ...?"

तो हसत हसत उत्तरला-
"तुझ्या घरीच आत्ता संतोषीमातेचे दर्शन घेतले ना.
खूप बरे वाटले.
पुरेसे आहे तेवढे !"
.

उपमा

माझ्यासमोर बसलेल्या,
 त्या रसिकाच्या एका हातात माझे पुस्तक होते...
आणि -
पुढ्यातल्या मेजावर उपम्याची बशी होती !

तो रसिक अचानक माझ्याकडे
आपली निर्विकार नजर टाकत उद्गारला -
"वा, वा... काय छान उपमा आहे हो !"

- मी अंमळ माझी कॉलर ताठ करून, 

सावरून बसलो.

पण -

पुस्तकातील मी लिहिलेली एखादी उपमा वाचत वाचत तो पुटपुटला..
की तोंडातल्या उपम्याचा घास चावत चावत पुटपुटला.......

मला कळायला काहीच मार्ग नव्हता !
.

ती आणि सटवी

दुष्काळात कधी ती
पुढ्यातल्या परातीत
प्राक्तनाचे पीठ मळत असते ..

आसवासकट कधी ती
उद्याच्या चिंतेत
घशाखाली आवंढा गिळत असते ..

बिनपाण्याची बघत शेती
अनवाणी शिवारात
तळव्याची जखम पिळत असते ..

वाट बघत धन्याची
मनातल्या मनास
नशिबाला कोसत छळत असते ..

पोराबाळांच्या जन्माची
आठवण करत
कणाकणाने तनात जळत असते ..

तिला तसे पहात सटवी
खदखदा हसत
पुढच्या खोपटात पळत असते .. !
.

ताटाखालच मांजर

सकाळी सकाळी एका हातात चहाचा कप -
आणि दुसऱ्या हातात इंग्रजी पेपर धरून,
बायकोसमोर उभा होतो.

बायको इंग्रजीत शिजलेली- पण मराठीत एकदम कच्ची !
ती कधी नव्हे ते, "मराठी नॉव्हेल" वाचायचा "प्रयत्न" करत होती.

बायकोने अचानक पुस्तकातून आपली नजर काढून -
माझ्याकडून रोखून पाहत,
मला विचारले-
"अहो, 'ताटाखालच मांजर' म्हणजे काय हो ? "

मला जोराचा ठसका लागला,
हातातला पेपर निसटून खाली पडला...
- आणि कपातला सगळा चहा त्या इंग्रजी पेपरवर सांडला.
(.....माझ्याबद्दलची बातमी सर्व इंग्रजानाही कळली की काय ?)

मी खाली पाहत, अंगठ्याने फरशी टोकत उद्गारलो -
"आज्ञाधारक नवऱ्याला, बायकोच्या 'ताटाखालच मांजर' म्हणतात !"

माझं म्हणणं बायकोला पटलं !
(- नको त्या गोष्टी लगेच कशा काय पटतात, ह्या बायकांना देव जाणे.)
आणि तिने पुन्हा आपली दृष्टी पुस्तकात खुपसली.

मी माझी नजर पोतेरे शोधण्याकडे वळवली ..........
.

सवय दु:खाची

का रे देवा, 
असे मला
दु:खाच्या "सीटबेल्ट"ने
माझ्या जीवनरथात
जखडून ठेवले आहेस-
मी चुकून कधीतरी
सुखाच्या खाईत
लोटला जाईन... म्हणून ?
इतकी काळजी नकोच,
मला जागोजागी
उचक्या लागतात,
दु:खाच्या आठवणींच्याच !
दु:ख
इतके पचनी पडत आहे....
चुकून सुख वाट्याला आले,
तरीही
मला भीती वाटत असते
ती अपचनाचीच !
.

अंतिम सत्य

जागोजागी मेनका असती
जोगीभोगी अवतीभवती..

नरमादी या दोनच जाती 
नर आसक्ती स्त्रीवर सक्ती ..

आपण सौंदर्याची खाण
स्त्रीजातीला पुरती जाण ..

पदर ढळला तोल न ढळला 

विश्वामित्र  कुठे आढळला . . !
.

लहरी

प्रेयसी
बरोबर असताना,
पाऊस
येतच नाही..


प्रेयसी
बरोबर नसताना,
हमखास
येऊन जातो -


वाण नाही
पण त्याला
गुण लागले
असावेत प्रेयसीचे.....


नको तेव्हा
तोंड दाखवायचे..
हवे तेव्हा नेमके
गुल व्हायचे .. !

.