बोट माझे त्या फुलाला एक जेव्हा बिलगले ..[गझल]

बोट माझे त्या फुलाला एक जेव्हा बिलगले
चावण्याला बोट काटे तेथ का सरसावले ..

वाहणारे सतत अश्रू हे तुझ्या नयनांतुनी
वाटले मज पाहता का नायगारे उसळले..

आज सर ती एक हलकी पाहिली दारात मी
अन सखीच्या आठवांनी मन किती हे भिजवले..

दु:ख होते सोबतीला चाललो मस्तीत मी
का अचानक मज सुखाने भेटुनीया दुखवले..

गर्व ज्योतीचा निमाला झुळुक येता एक ती
गर्व ज्योतीला किती या मी जगाला उजळले ..

.

करतो मी वंदन आलो शरण समर्था ..

धरतो मी स्वामी तुमचे चरण आता
करतो मी वंदन आलो शरण समर्था ..

गर्वाचा फुगा भावभक्तीचा फुगवला
गवगवा जनात मी त्याचाच केला ..

पाहिले ना अंथरूण पसरले पाय
कळले नाही यापुढे नशीबात काय ..

हरण गर्वाचे वेळेवर केले तुम्ही
ताळ्यावर मन माझे आणिले तुम्ही ..

पाठीशी तुम्ही मी बिनघोर आता
भिण्याचे कारण मज उरले न आता ..

दु:खाचे निवारण सुखाला आमंत्रण
स्वामी आम्ही धरता तुमचे चरण ..

"श्री स्वामी समर्थ" मनी जप घोळतो
वाट संसाराची मी सहज ही चालतो ..
.

बंडू फेसबु[भु]के

नऊ वाजले - सूर्याची किरणे खिडकीतून तोंडावर आली आणि सकाळ झाली.

नऊचा गजर झालेला ऐकत बंडू उठला.
पटकन आठवणीने तोंड न धुताच, आधी ते फेसबुकात खुपसले......
पाच फोटो आधीच शोधून ठेवले होते...

पहिला फोटो नव्व्याण्णवजणांना ट्याग केला "गुडमॉर्निंग"चा ..
आणि मग तो इतर कामाकडे वळला.

दुपारचे बारा वाजले.-- घाईघाईने वचा वचा चार घास चावले आणि -
दुसरा फोटो फेसबुकावर पंचाहत्तरजणांना ट्याग करून टाकला "गुडनून"चा !

चार वाजता आठवणीने, बायकोने चहाचा कप पुढ्यात ठेवला-
बायकोने दिलेला चहा घट घट घशाखाली ओतला.. 

तिसरा फोटो तयार होताच--- "गुडआफ्टरनून"चा !
झटकन फेसबुकावर पन्नाससजणांना ट्यागला आणि

 बंडू बाहेर पडला ------

दोन तासांनी बंडू घरी परतला, सहा वाजलेले पाहून दचकला -- चटकन फेसबुक उघडले आणि चौथा फोटो पंचवीससाठी सादर ट्याग केला - "गुडइव्हनिंग"चा !

रात्रीे बारा वाजता..बंडूने फेसबुक उघडले आणि हुश्श करत,

"गुडनाईट"चा फोटो मोजून निवडक दहाजणींना ट्याग करून टाकला ... !

----तो उत्साहभराने भल्या सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत आपण टाकलेल्या फोटोवरचे लाईक/ कॉमेंट/ शेअर पाहू लागला ----

फेसबुकावर तब्बल पाच हजारची मित्रयादी असलेला बंडू---
आपल्या मित्र/मैत्रिणींचे जेमतेम वीस लाईक - पंधरा कॉमेंट - दोन शेअर बघतच-------

"आता वाजले की बारा ..." असे स्वत:शी गुणगुणत सुखाने झोपी गेला.
.

कर्ता-करविता तोच...

चहाचा कप हातात देत सकाळी बायकोने विचारले-
"आज एकादशी आहे, उपास का जेवण ?"

का कुणास ठाऊक, पण अंतर्मनाने कौल दिला आणि उत्तरलो-
"उपास !"

"उपास" असल्याने-
अर्थातच दुपारी बरेच उपासाचे खाद्यपदार्थ अस्मादिकांनी हादडले !

मघाशी चार वाजता,

काहीतरी चारामुरा चरायचा म्हणून -
स्वैपाकघरात पाऊल टाकले.
टेबलावर खारी बिस्कीटे, गोड बिस्कीटे इ.(नॉनउपासी खाद्य?) डबे होते.

माझा हात बिस्किटाच्या एका डब्याकडे वळला,

पण नजर मात्र...
साबुदाण्याच्या चिवड्याच्या डब्याकडे वळली !

"विठ्ठला पांडुरंगा, तुलाच रे माझी काळजी बाबा !" - असे म्हणत,
मी चिवडा आनंदाने भक्षण करता झालो,
आणि -
..... माझा उपास अबाधित राहिल्याने परमसंतुष्ट जाहलो !
.

..... || श्री स्वामी समर्थ || ......

संकटसमयी तुझ्या जपाचा
किती किती आधार वाटतो ..

भिऊ कशाला स्वामी समर्था

तुझाच धावा सदैव करतो ..

दर्शन घडते मनात मजला
 
पाठीवर तव हातही फिरतो ..

वाटचाल मी आयुष्याची 
कृपाप्रसादे नीट चालतो ..

ताळ्यावर मज तूच ठेवसी
कधी गर्व ना सुखात होतो ..

संकटहर्ता नित्य तू असशी
दु:खाची न मी पर्वा करतो ..

अवतीभवती अस्तित्व तुझे
जगण्यासाठी श्वासच असतो ..

'श्री स्वामी समर्थ ' जप हा
प्रपंचात मज साहाय्य ठरतो ..
.

चार हायकू

कधी हसावे
कधीमधी रुसावे
जोडी अजोड ..
.

सुनेचे चार
सासूबाईचे चार
डाव घडीचा ..
.

सरले त्राण
चातक गतप्राण
वळीव जोर ..
.



मी मी आणि मी


आयुष्यात नेहमी


पोकळ जिणे ..
.