आई, अशी कशी ही दिवाळी !


आई, अशी कशी ही दिवाळी
येते पटकन, सरते  झटकन, 
अभ्यासाला पुन्हा जुंपते 
दहा दिवस का जाती चटकन !

फराळाच्या डब्यात मोठ्ठ्या 
गोड गोड का तसेच उरते ?
 चकली चिवडा चट्टामट्टा  
पोटामध्ये भरकन जिरते !

भुईचक्र अन् टिकल्या आता
कंटाळा मज येइ उडवता -
धमाल दिसते मोठया हाती
बॉम्ब नि रॉकेट आवाज करता !
 
सुट्टी असते किती ग हट्टी 
ठरल्या दिवशी येते जाते -
मित्रमंडळी गोळा होता
धमाल अमुची मनीं  रहाते !
  

दिवाळी संपुन सुट्टी संपता
जुनाट दिसती नवीन कपडे...   
आई, सांग ना दिवाळीस ग
बारा महिने थांब, तू इकडे !

  .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा