ते माझे घर

माझे ते घर.. ते माझे घर
कुठे कसे हरवले ते घर 
प्रभातसमयी पुढे दिसतसे 
सुरेख रांगोळी अंगणभर ..

घरासमोरी प्रशस्त अंगण 
अंगणात तुळशीवृंदावन
निरांजनी त्या तेवत वाती 
शांत उजळती प्रकाशज्योती ..

सुंदर छोटे उदबत्तीघर 
सुवास पसरे सारा घरभर
हात जोडुनी प्रार्थित सुस्वर  
जाती निनादत ते गल्लीभर  ..

इवल्याशा त्या वाटीमधली 
साखर दाणेदार चिमुटभर
वाटीमधल्या प्रसादास्तव    
"तू तू मी मी" होतसे गजर .. 

माया जमली जीवनात जी 
घेतला मोठासा मी फ्ल्याट  
अंगणाविना सुनासुना तो 
उरले उदास जीवन त्यात ..

"ते हात"ही मजला दुरावले 
मायेने पाठीवर जे  फिरले  
ते मायेचे जीर्ण पांघरुण 
आता घरात नाही उरले ..

माझे ते घर.. ते माझे घर
कुठे कधी हरवले ते घर ......!
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा