घोषणा भरताच कानी अधिर जनता मूर्ख असते.. [गझल]

घोषणा भरताच कानी अधिर जनता मूर्ख असते
घागरी हाती रिकाम्या खंत कोणालाच नसते

शेकडो कामेहि त्यांची पूर्ण सगळी जाहलेली
त्यात एखाद्या चुकीचा शोध का मन घेत बसते

परवडे ती एकवेळा साप सरड्यांचीहि मैत्री
दंश करणे रंग बदलत मानवाची वृत्ति डसते

तव तयारी पाहताना रूपगंधा व्हावयाची
जाहिरातीची ग संधी हळुच वाऱ्याला गवसते

जीव दुर्दैवीहि काही घालण्या ना फाटकेही
तोकड्या अन फाटक्यांची रोज फ्याशनवाढ ठसते ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा