कॉलबेल


        किर्रर्रर्रssss
        "हं ! आलोच हं !" असे म्हणत मी त्वरेने पुढील दाराकडे धाव घेतली. एक दार अर्धवट उघडूनच विचारले- "कोणय ?"
काहीच उत्तर आले नाही. पुन्हा दार उघडून समोर, आजूबाजूला पहिले, पण कोणीच आढळले नाही. 'म्हणजे भासच झाला तर --' असे पुटपुटत दार लोटले. दिवाणखान्यातील रेडिओचे बटन आणखीनच पिळले . तसा आवाज घुमू लागला.
"नैना बरसे----बरसे--" . पण असा भास होण्याची ही तिसरी खेप होती !
        त्याचं अस झालं- बरेच दिवस येणार, येणार म्हणून गाजत असलेली 'कॉलबेल' अखेर काल आमच्या घराच्या प्रवेशद्वारावर विराजमान झाली होती. आमचे घर एकंदरीत पाच खोल्यानी युक्त होते. खोल्याही मोठ्या असल्याकारणाने जेवणाच्या वेळेस आमची मोठी पंचाईत व्हायची . कारण सर्वजण मिळूनच एक पंगत आटपत होतो. पुढच्या बाजूची खोली व स्वैपाकघर यांच्यामधे दोन खोल्या होत्या.     

        आमची जेवणासाठी पंगत बसली की, पुढचे दार साहजिकच बंद असायचे. नेमके त्यावेळेसच यायची कुणाला ना कुणाला तरी बुद्धी होई. येणारी व्यक्ती मग धाड धाड दार वाजवी, नाही तर कडी खटखटावीत असे. मग अर्धे लक्ष जेवणात तर अर्धे बाहेर अशी त्रेधा उडे !

        ह्यासाठी एक 'कॉलबेल' (डोअरबेल) बसवण्याची व्यवस्था करण्यात आली. शिवाय नेहमी 'बंद'च्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणारी कोयनेची वीज नुकतीच आली होती. त्यामुळे कॉलबेलची सोय एकदाची झाली.

        कॉलबेल आमची व घरही आमचेच, त्यामुळे सर्वांनाच तिचे कौतुक ! बाहेरच्या लोकांनी बेल वाजवण्याऐवजी आमच्या घरातच आळीपाळीने ती वाजवण्यास सुरुवात झाली . शेवटी आमच्या पिताजींनी 'आणीबाणी' पुकारल्यावर 'बेल'चा मारा कमी झाला. तरी अधून मधून छुपे बार होत होतेच !

        खर म्हणजे मलाच 'कॉलबेल'च भारी कवतिक ! कोण्या एका नातेवाईकाचे परवा लग्न असल्यामुळे आमच्या घरची सर्व मंडळी काल सायंकाळीच तातडीने रवाना झाली होती. गृहखाते व इतर सर्व खाती माझ्यावर सोपवली गेली. मी सतत तीन मिनिटे बेल दाबूनच घरची अधिकारसूत्रे हाती घेतली. माझ्या लहान कानात सारखा एकच आवाज घुमू लागला होता - "किर्रर्रsssss....".

        रात्री झोपल्यावरही मला दोनतीनदा कोणीतरी बेल वाजविल्याचा भास झाला. मागाहून लक्षात आले की, तो रातकिड्यांचा आवाज होता !

        लहानपणाची अचानक आठवण आली म्हणून सांगतो. आमच्या शाळेतील हेडमास्तरांच्या टेबलावर एक घंटी होती. ती वाजवून शिपायाला सारखे बोलावण्यात येई . त्याला तसा त्रास देण्यात त्यांना मनस्वी आनंद होई. पण नंतर तो शिपाईही त्यांना सवाई भेटला. हेडमास्तरानी घंटी वाजवली तरी तो लक्ष देईनासा झाला. मग हेडमास्तर दोन-चारदा घंटी जोरात बडवायचे आणि ओरडायचे - "अरे शुंभा ---". मग तो शुंभ एका हाताने टोपी लगबगीने सारीत हेडमास्तरांच्या खोलीत जायचा.

        "काय रे शुंभा ? घंटी ऐकू आली नाही का तुला ?" - हेडमास्तर विचारत. तसा तो म्हणायचा- "साहेब, आपली ही कॉलबेल ऐकल्याबरोबरच आलो नाही का !" हेडमास्तर मग परत एकदा कॉलबेल बडवून त्याला जाण्याची सूचना देत. कारण त्यांचे स्वत:  घंटी बडवणे एवढेच काय ते काम असे !

            'कॉलबेल'ची प्रथा फार पुरातनकालापासून चालू आहे. कॉलबेलचे कार्य एकच, ते म्हणजे 'आवाज' देणे. फक्त तिच्या स्वरूपात वरचेवर बदल घडत गेले आहेत.

        'दवंडी पिटणे' हा कॉलबेलचाच एक मूळ प्रकार . न्यायप्रिय जहांगीर बादशहाच्या न्यायमंदिरावर  एक घंटा अडकवली होती. एका मरतुकड्या घोड्याने याच 'कॉलबेल'च्या जोरावर न्याय मिळवून घेतला नव्हता काय ? राजे लोक आपल्या दरबारात निघाले म्हणजे आधी टोल देण्याची व्यवस्था करत असत. देवाची पूजा चालू असताना आपण घंटी वाजवतो ती कशासाठी ? (माझ्या मते -) देवाला नैवेद्य खाण्यास बोलावण्यासाठी ! (- पर्यायानेच आपण नैवेद्य खाण्यास परवानगी मागण्यासाठी !) म्हणजेच देवादिकानीही 'कॉलबेल'चा उपयोग करून घेतला आहे.  शिमग्याच्यावेळी कॉलबेलच्याच एका प्रकाराचा (ठणाणा बेल ?) उपयोग करून सर्वाना एकत्र आणण्यात येते. देवळाच्या गाभाऱ्यातील घंटा वाजवूनच आपण 'मी आलोय' अशी देवाला सूचना देत असतो. कित्येक सावकार इनामदारांच्या घरावर दोरी अडकवलेली असायची. ती ओढायची . म्हणजे त्यांच्या घरातली घंटा शंखध्वनी करत असे. हाही कॉलबेलचा एक नमुनाच !

        'कॉलबेल'चे एवढे 'जनरल क्नोलेज' सांगून- "किर्रर्र किर्रर्र ----" अशी दोनदाच बेल दाबली गेली व मी ओळखले की आपला (- म्हणजे माझा) दोस्त 'बाळ्या' आला . (नाही तरी बंडूचा दोस्त दुसरा कोण असणार ?) "थांब रे साल्या-" असे म्हणत मी दार उघडले तो- 'बाळ्या'ऐवजी एक छत्रीधारी 'बाळी ' समोर उभी ! मला काय बोलावे तेच सुचेना. तेवढ्यात तिनेच मला विचारले- "काकू आहेत का घरात?" मी चाचरतच उत्तर दिले- " अं.. आहे- नाहीत, नाहीत त्या घरात. कालच गावाला गेल्या आहेत !" "बरं, मी येऊन गेले म्हणून सांगा त्यांना" असे म्हणून ती निघून गेली. मला तर ती अनोळखीच होती. ती निघून गेल्यावर मग लक्षात आले की, 'वह कौन थी ' म्हणून सांगायचे काकूंना ? कपाळावर हात बडवून घेतला झालं ! मी आणि बाळू - दोघात दोनदाच बेल दाबण्याचा करार ठरला होता, त्याचा हा परिणाम होता. परंतु ती 'बाळी' बहुधा बहिरी असावी , असा माझा अंदाज आहे. देव करो नि माझा अंदाज खरा ठरो !

        ती एक गंमत झाली . दुसरी अशी- मी दात घासत बाथरूममधे उभा होतो. तेवढ्यातच बेलचा आवाज आणि पाठोपाठ 'साहेब साहेब ' अशा आरोळ्या जोरात ऐकू आल्या. म्हणून दार उघडले. समोर एक पागोटे उभे ! मी त्याला सुनावले- "पाव्हनं, जोरात ओरडा तरी नाही तर ही बेल तरी जोरात दाबा !" तो निर्विकारपणे मला म्हणाला- 'यानरी अप्पा ? पाटील साहेबरु -" म्हणजे माझ्या खेकसण्याचा उपयोग काय झाला हो ! तो आमच्या शेजारच्या पाटलाकडे आला होता. "मसणात गेले तुझे पाटील साहेब !"- असे मी म्हणणार इतक्यात दस्तूरखुद्द पाटलांनीच त्याला तिकडे हाक मारून घेतले आणि मी वाचलो.

        पत्र द्यावयास आलेल्या पोस्टमामानेही कमालच केली होती बघा! आमचे एक पत्र आले होते. ते मी हातात घेऊन घरात वळलो, तोच- किर्रर्र आवाज आला म्हणून मी कोण आलय ते पाहण्यासाठी परत बाहेर वळलो . पाहतो तो पोष्टमन उभा ! मला म्हणतो कसा- "कशी वाजते ते फक्त सहज पाहिलं साहेब !" आमच्यातला 'साहेब' जागा झाला व "ठीक आहे, पुन्हा वाजवू नका "- असे त्याला म्हणालो.  मी दुसर काय करू शकणार होतो, नाहीतरी !

        शेजारची मुले तर येताजाता बेल गंमत म्हणून दाबून पळून जातात. त्यांच्यावर सारखे ओरडत बसण्यापेक्षा मला किर्रर्र आवाज ऐकणेच आवडते बुवा !

        वाचकहो ! माझ्या ह्या किर्रर्रची किरकीर ऐकून तुमचे डोके मात्र -----
किर्रर्र .... !

.     

         
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा