भुतान दौरा

      काही महिन्याखालीच भुतानचा दौरा करून आलेला पुतण्या, 
पुनःपुन्हा तिथले कौतुक करत होता, तेव्हापासून मलाही त्या रॉयल भुतानचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होत होतीच !
अखेर मित्रानेही मनावर घेतल्याने, ती संधी मिळाली.
रेल्वे आरक्षण, हॉटेल बुकिंग, टूरकार बुकिँग इ. ऑनलाईन कामं 
मित्राच्या अनुभवी सूनबाईने पटापट उरकली.
... [तिथे पासपोर्टची आवश्यकता नाही.. भुतानमधे फिरण्याचे "परमिट" तिथेच घ्यावे लागते!]


निसर्गरम्य भुतानने प्रवेशातच आमचे मन जिंकले !

"फुनशोलिंग" नावाच्या गावातल्या हॉटेलात आम्ही उतरलो होतो.

टूरएजंटमार्फत परमिट काढले. त्यासाठी आपले आधार/मतदानपत्र झेरोक्सप्रत आणि फोटो दिले. प्रत्यक्ष परवानगीपत्र मिळण्यासाठी तिथल्या ऑफिसात आपण त्याच्याबरोबर जाऊन, आपले दोन बोटांचे ठसे देणे आणि फोटो काढणे आवश्यक असते. पूर्ण प्रवासात २/४ ठिकाणी ते चेक केले जातेच.

मनोहारी डोँगरांच्या रांगा, रमणीय हिरवीगार झाडी, 
अधूनमधून रस्त्याकडेची पांढरी फुले उमलवलेली झाडे, 
जणू शुभ्रधवल चांदण्या ल्यालेली भासत होती. 

वळणावळणांनी वेढलेले रस्ते, 
कधी मान दुखेपर्यंत वर निसर्गाकडे, 
काळया पांढऱ्या ढगांच्या हलत्या पुंजक्यांकडे विस्मित नजरांनी पहावे लागे, 
तर कधी उंचावरून खाली खोलवर दऱ्या पाहतांना गरगरून यायचे ! 


एक वेळ तर चक्क उंचावरील ढगातून आमची कार जातांना, 
क्षणभर अंगावर भितीने सर्रकन काटा
 आणि पोटात गोळाही येऊन गेला हो..
वाटले, ढगातून जातांना चालकाला समोरचा रस्त्याचा अंदाज आलाच नाही तर.. आपल्या रसिक वाचक फ्रेँडफ्रेंडणीना नंतर "थोडासा विरंगुळा" कोण देणार !

निरनिराळी दृष्ये पाहताना,
मधूनच नदीचे वाहणारे पात्र डोळ्यांना सुखद गारवा द्यायचे.. 
तळाशी दिसणारे विविध आकारांचे गोटे दगड लक्ष वेधून घ्यायचे !
ठराविक चौकोनी, आयताकृती, उभ्या आडव्या रंगीबेरंगी आकर्षक भिंती
 व पत्र्यांच्या छतांनी आच्छादित सुंदर सुरेखशा इमारती..
फिरत्या प्रवासात मस्त मजा आणत होत्या. 

डोंगरांच्या पायथ्याशीच नाही तर, 
डोँगरांच्या उतारावरच्या इमारती, घरे, वास्तूही चित्ताकर्षक होत्या.

चालकाच्या सौजन्यपूर्ण मार्गदशनाने प्रवासात
वेळेला चहा, कॉफी, शुद्ध शाकाहारी भोजनाची सोय होत होती.

दुसरे दिवशी "थिम्पू" या भूतानच्या राजधानीच्या गावी राहिलो. 
हॉटेल, दुकान, कार्यालय अशाठिकाणी-
 बहुतांशी बाहुलीसारख्या, गोऱ्या गोऱ्या, बारीक डोळ्यांच्या, येताजाता उगाच स्वहस्ते मोकळ्या केसांच्या बटा सावरणाऱ्या महिलांचा कार्यकारी पगडा अधिक प्रमाणात दिसला. 

आरक्षित हॉटेलात शिरताना तर, तेथील महिलाच आमच्या बॅगा सुहास्यपूर्ण वदनांनी स्वागत करत,  पटापट रूमकडे/रूममधून उचलत होत्या.. 
त्या महिलांकडे पाहणाऱ्या आमच्या कौतुकाच्या नजरांकडे, 
आमच्या घरच्या महिला मात्र -
कुत्सित नजरांनी का बघत होत्या कुणास ठाऊक !

त्यानंतरचा मुक्काम "पुनाखा" गावच्या हॉटेलात केला. 

भुतानमधे ठिकठिकाणी सुंदरशा बुद्धमूर्तींनी सजलेली शांत प्रार्थनास्थळे,
 आवर्जून पाहण्यासारखी आहेत. रंगीबेरंगी कलाकुसरयुक्त इमारती लक्ष वेधून घेतात.

पंधराव्या शतकात बांधले गेलेले, नवसाला पावणारे एक मंदिरही पाहिले.

पुनाखा गावातून आमचा मुक्काम "पारो" या आंतरराष्ट्रीय 
विमानतळ असलेल्या गावातील हॉटेलात झाला.

आधी उंचावरील एका व्ह्यूपॉईंटवरून "बर्डस आय व्ह्यू"समान दिसणारे ते विमानतळ पाहिले.
भुतानभेटीत आमचे पंतप्रधान ज्या इमारतीत राहिले, 
तीही चालकाने अभिमानाने दाखवली. 

 

उंच डोंगरावर दिसणारी बुद्धाची प्रसन्नमुद्रेची अतिशय भव्य मूर्ति पाहिली.
वाघाच्या तोंडाची प्रतिकृती एका डोंगराच्या खडकावर दिसते, 
ती पाहून झाली.

विशेषेकरून जाणवली ती, तेथील वाहनचालकांची शिस्त ! 
आवश्यक ते रुंदारुंद रस्ते, ओव्हरटेक न करता, योग्य अंतर राखत, 
शिस्तीत जाणारी वाहने.. पाहणे.. आम्हा बेशिस्त लोकांना तरी दुर्मिळच ! 
आधी पादचारीवर्गाला रस्ता पार करू देण्याची, तिथल्या वाहनचालकाची वागणूक निश्चितच वाखाणण्याजोगी ! 

शांत मुद्रेचे, आनंदी भासणारे, मदतीस तत्पर असे तेथील नागरीक पाहून

समाधान वाटले.

आपल्या भारतीय पाच, दहा, वीस, शंभर, पाचशेच्या चलनातील नोटा
तिथेही व्यवहारात सुरळीत चालत होत्या. कुठेही कसलीही अडचण आली नाही. 
पण..
तेथील हस्तकलेच्या आर्ट क्राफ्टच्या वस्तु तुलनेने खूपच महागड्या.. 
असे आमच्या बरोबरच्या महिलावर्गाचे एकमत झाल्याने- 
आनंदाने आमचे चेहरे आणि खिशातली पाकिटे अंमळ फुगलेले राहिले !

भुतानमधून आम्ही पंचमहाभुते पारोहून पुन्हा फुनशोलिंगमार्गे कोलकत्याला आलो.. पुण्याकडे येण्यासाठी !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा