जगायलाही जमतच नाही यमदूताला फुरसत नाही - -[गझल]

मात्रावृत्त-
मात्रा- १६+१६ 
---------------------------------------------------------------
जगायलाही जमतच नाही यमदूताला फुरसत नाही
उरले हाती दिवस मोजणे दु:खाशिवाय करमत नाही ..

होता लोळत धनराशीवर राबत होती नातीगोती
पाठ फिरवता पण नशिबाने क्षणभर सुख रेंगाळत नाही..

चिडते रुसते अन धुसफुसते रागाने कोपऱ्यात पळते
दिसता गजरा दुरून हाती मिठीतुनी मग सरकत नाही..

सुटती बोलत एकमेकाशी समजूतीने वेडे जमता 

जमती जेथे दीड शहाणे कुणी कुणाचे ऐकत नाही..

होते करत ते अंधारात जिवापाडही प्रेमिक काही
उघड्यावर चाळा प्रेमाचा चालू आता बघवत नाही..

बडबडायचा शपथेवर तो पीत नसे पण दारू जेव्हा
ओठी प्याला एक लागता असत्य आता बरळत नाही ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा