दहा चारोळ्या ----------

मधुमेही हिसका -
मधुमेह झाला आपल्याला 
हे त्याला समजल्यापासून 
 सावरला नाही तो अजून  
गोड बोलण्याच्या धसक्यातून !
.

स्वच्छता -
मनाच्या काचेवर 
शिंतोडे सुविचारांचे चार -
पुसून टाकता आले 
सगळे सहजपणे कुविचार ..
.

कर्जत-कासारा -
माझ्या नजरेला द्या नजर
जरी पुन्हापुन्हा तू म्हणतेस 
आधी सांग मला खरोखर 
नक्की कुणीकडे तू बघतेस !
.

सुखाचे सोबती -
माझी दु:खं वाटत होतो
एकही याचक दिसला नाही -
सुखं वाटण्या आरंभ केला
एकही दु:खी उरला नाही ..
.

बाटली जुनीच -
मागच्या वर्षीचाच शोधा खड्डा 
वृक्षारोपणास.. नवा कशाला -
उशीर होतो पुढच्या कार्यक्रमाला
घड्याळात पाहत नेता म्हणाला ..
.

जादुई अंगाई -
मिटून डोळे पडलो निवांत 
झोपणे लवकर जमले नाही -
अंगाई आईची आठवत 
कधी झोपलो कळले नाही ..
.

जागरूक -
मी आणि चप्पलचोराने
नवस केला 'जागृत' देवाला 
देव माझ्याआधीच पावला 
'जागरूक' चप्पलचोराला 
.

चिंब चिंब -
मुसळधार पावसाने जरी 
घरातच दोघांना बसवले -
मनातल्या गुजगोष्टीनी 
चिंबचिंब त्यांना भिजवले !
.

आशा -
मुरले आहे दु:ख चांगले
बरणीमधल्या लोणच्यासारखे -
तवंग सुखाचा दिसेल कधीतरी
मनास वाटत आहे सारखे ..
.

पापी पेट का सवाल -
मोजत बसलो असतो मीही 
चंद्रचांदण्या सखीच्यासोबत -
विसरायला तहानभूक, पण 
नाही अन्नाचा कण सोबत ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा