कुंजविहारी हसे का मनी -


कुंजविहारी हसे का मनी -
निद्राधीन ती राधा बघुनी

नयनी उतरे शाममुरारी
हळूच नकळत स्वप्न होऊनी

स्वप्नामधली राधा बावरी
गेली सगळे सत्य समजुनी

हसे खुदुखुदू झोपेमधुनी
खट्याळ कृष्णाची मोहिनी

देशी रे किती त्रास तू मजला
वदते राधा जात मोहुनी

मोरपीस मग अलगद गाली
कान्हा हसतो लबाड फिरवुनी

खोड्या वाढता म्हणते राधा
जा तू आता निघून येथुनी

स्वर राधेला गोड ऐकवी
मुरलीधर हळु पावा काढुनी

नयने उघडी राधा अपुली
मधुर सूर ते पडता कानी

आत्ता होता कुठे कन्हैया 
शोधत हसते घरभर फिरुनी

लबाड आणि खट्याळ लीला
आठवे राधा स्वप्नी रंगुनी ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा