सकाळी सकाळी तिने
मला "गुड डे"म्हटले -
चार पुडे मी तिला
"गुड डे" बिस्किटांचे दिले -
तोंड तिने माझ्यापुढे
कसे तरी केले ,
सांगा बरे लोक हो
माझे काय चुकले ..
तिला फूल आवडते
पहिल्यांदा जेव्हा कळले -
सूर्यफूल एक मोठे
तिच्या केसात खोवले -
रागारागाने माझ्याकडे
जरी तिने बघितले ,
सांगा बरे लोक हो
माझे काय चुकले ..
गाडीवर फिरते आवडीने
जेव्हा मला कळले -
हातगाडीचे धूड मी
तिच्यासमोर उभे केले -
लालभडक डोळे
तिचे जरी मी पाहिले ,
सांगा बरे लोक हो
माझे काय चुकले ..
आंबटशौकीन आहे ती
माझ्या कानावर आले -
लिंबूपाणी तांब्याभर
तिला प्रेमाने पाजले -
तोंड वेडेवाकडे
जरी तिने केले ,
सांगा बरे लोक हो
माझे काय चुकले ..
तिला प्राण्यांचा लळा
जेव्हा मी जाणले -
पिंजरा उघडून उंदीर
तिच्यापुढे मी सोडले -
दाणदाण पाय आपटत
जाणे तिचे झाले ,
सांगा बरे लोक हो
माझे काय चुकले ..
तिला सिनेमे आवडतात
जेव्हा मला माहित झाले -
रामसे बंधूंचे सिनेमे
खास तिलाच दाखवले -
आवडीने सारे मी
तिच्यासाठीच केले ,
सांगा बरे लोक हो
माझे काय चुकले ..
'बाय बाय टाटा '
एकदा तिने म्हटले -
टाटा मिठाचे पुडे
विकत आणून दिले -
खाऊ की गिळू अशा
नजरेने तिने पाहिले ,
सांगा बरे लोक हो
माझे काय चुकले ....
माझे काय चुकले .... !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा