आई, अशी कशी ही दिवाळी !


आई, अशी कशी ही दिवाळी
येते पटकन, सरते  झटकन, 
अभ्यासाला पुन्हा जुंपते 
दहा दिवस का जाती चटकन !

फराळाच्या डब्यात मोठ्ठ्या 
गोड गोड का तसेच उरते ?
 चकली चिवडा चट्टामट्टा  
पोटामध्ये भरकन जिरते !

भुईचक्र अन् टिकल्या आता
कंटाळा मज येइ उडवता -
धमाल दिसते मोठया हाती
बॉम्ब नि रॉकेट आवाज करता !
 
सुट्टी असते किती ग हट्टी 
ठरल्या दिवशी येते जाते -
मित्रमंडळी गोळा होता
धमाल अमुची मनीं  रहाते !
  

दिवाळी संपुन सुट्टी संपता
जुनाट दिसती नवीन कपडे...   
आई, सांग ना दिवाळीस ग
बारा महिने थांब, तू इकडे !

  .

" किती काळ राहसी, उभा विटेवरी रे ...! "


किती काळ राहसी, उभा विटेवरी रे
ठेवोनिया आपुले कर कटीवरी रे ||

कधीतरी आपुले कर पुढे करी रे
आम्हा पामरांना जवळ करी रे ||

दुरूनी पाहुनी शिणले डोळे रे
चाल चालुनिया पायात गोळे रे ||

आस दर्शनाची नित्य लागते रे
ओढ प्रपंचाची सुटत नाही रे ||

घरी बसतो रे, दर्शन दे रे
हात पाठीवरी तुझा असू दे रे ||

मागणे शेवटी, माझ्या जिवाचे रे
सोडी तू विटेसी- माझ्या घरी ये रे ||
.

कसाबला फाशी ...


गरम गरम वाफाळत्या चहाचा कप माझ्या हातात..
तोही मस्त उबदार थंडीच्या जाणिवेत..
हव्या हव्या वाटणाऱ्या क्षणी ?
वा !
पण खरोखरच बायकोने अगदी अशीच सुवर्णसंधी....
आज सकाळी सकाळी,
 ठीक ७ वाजून ३१ मिनिटांनी
आणली खरी !
बायकोबद्दलच प्रेम इतकं उफाळून आलं होतं, म्हणून सांगू !

चहाचा पहिला घोट घेतला आणि....
बायकोकडे सहेतुक पाहिलं -
तिच्याही ते लक्षात आलं...
मुळातच ती हुषार, शहाणी, हजरजबाबी, समयसूचकत्व जाणणारी, मनकवडी आहेच मुळी !

चहात नेहमीपेक्षा "चौपट साखर" घातलेली !

माझ्याकडे पहात, बायको उत्तरली -
"एवढ्या सकाळी पेढे कुठून आणू... ?

अहो, कसाबला आताच फाशी दिल्याची बातमी ऐकली ! "
.

स्त्री जन्मा ही तुझी ....


" अहो, चला जेवायला,
 आज तुमचा "आवडता पदार्थ" केलाय ! "
कालच रविवारी दुपारी,

 बायकोचा असा इतका छानसा स्वर कानावर आला ......आणि,

विचारांची वीज 

माझ्या डोक्यात चमकून गेली....
 

कामाच्या रामरगाड्यात,
इतकं राब-राबून,
इतरांच्या बारीकसारीक आवडी निवडीदेखील लक्षात ठेवण-
कसं काय जमतं हो,
ह्या आई-बहीण-बायको ...

समस्त स्त्रीवर्गाला ?

आणि आपला पुरुषवर्ग किती स्वार्थी  !

कधी तरी आपणही,
 त्यांचे काम हलके करावे,
त्यांनाही काही आवडीनिवडी असतील,
त्याही कधी दमत असतील ..

ह्याचा नुसता विचारदेखील न करता,
त्यांना येता जाता दमात घेत रहातो ना !
 .

हायकू -


१.
     उत्साही माळी
मोसम पावसाळी
         रोपटी चूप ..

२.
    झाडाचे पान
गळते अवसान
     पाला पसार ..

३.
     ढग नभात
बरसात ढंगात
     मोर रंगात ..
.
 
 

दोन भुते ..


एक बाभळीच्या काट्यावर बसलेले,
दुसरे त्याच झाडाच्या डिंकावर चिटकलेले,
दोघांच्या गप्पा रंगात आलेल्या...

पहिल्याने दुसऱ्याला विचारले,
" ह्या जगात कसे काय आपण ? "
दुसरा उत्तरला -
" फाजील विश्वास !
चार चाकीतून चाललो होतो.
देवावर हवाला ठेवून झोपलो.
चालकाने गाडी ह्या झाडावर आदळली, 

तो बाहेर पडून वाचला ! "

दुसऱ्याने पहिल्याला विचारले,
" आपण कसे काय ? "
पहिला उत्तरला -
" विश्वास !
दुचाकी चालवत होतो.
देवावर विश्वास ठेवून, राम राम म्हणत, निघालो .
गार झुळकीने मधेच डुलकी लागल्यावर,

 ह्या झाडावर दुचाकी आदळली.
मित्र नास्तिक असल्याने वाचला ."

एकूण काय, 

भुते देखील इतरावर जबाबदारी ढकलण्यात तरबेज असतात !
.

बिनडोक


तो....
शोकयात्रेत सामील होणार,
 हे माहित असूनही...

त्याच्या बिनडोक मैत्रिणीने, 

आपला एक फोटो 
आपल्या मित्राला संदेशांतून पाठवला .

तिला वाटले, 

आपला मित्र आता,
"'सुंदर - छान'"
- असा काही तरी शेरा देईल !
 

मित्र बिचारा... दिवसभर दु:खात शोकयात्रेत सामील झालेला होता.
 

त्याने त्या मैत्रिणीच्या फोटोखाली लिहून उलट उत्तर दिले- 

"   भावपूर्ण  श्रद्धांजली  ! "

" जीवनात ही घडी .."


लग्नात शिवलेला,
लग्नापुरता शिवलेला,
लग्नानंतर...

कपाटात व्यवस्थित घडी घालून ठेवलेला,
तो एकुलता एक कोट !

फक्त लग्नाच्या दिवशीच-
तो दिवसभर माझ्या अंगावर मिरवत होता,
आणि मीही दिवसभर...
त्याच्यासंगे,

 दिमाखात मिरवत होतो !

सासुरवाडीची ती एकुलती एक भारीतभारी आठवण !

किती वर्षे उलटली आहेत, त्या घटनेला ..
पण अजूनही कपाट उघडले की,
मी नेहमी गुणगुणत असतो-

"   जीवनात  'ही घडी '  अशीच राहू दे......."

.

बडबड आणि बायको


बडबडीशिवाय मजा नाही,
बायकोशिवाय बडबड नाही,
हे भलतच त्रांगड आहे !


दिवाळी संपली !

दिवाळीमुळे,
किती दिवाळे निघाले ..
ह्यावरून आम्हा दोघांची वार्षिक खडाजंगी,
नेहमीप्रमाणे सुरू झाली.


तासभर वादावादी, रुसवाफुगवी, आकांडतांडव वगैरे -
सर्वकाही झाल्यावर,
" आता मी तुमच्याशी दिवसभर बोलणारच नाही -"
असा निर्वाणीचा इषारा देत चिडून,
सवयीने बायको तरातरा....
स्वैपाकघरात नेघून गेली.


बायकोचा स्वभाव नवऱ्याला माहित नाही,
असे दृष्य विरळच...


चकार अक्षर तोंडातून न काढता,
मी शांतपणे दिवाळी अंकात तोंड खुपसून बसलो !


दोनच मिनिटांनी,
बायको बाहेर डोकावत म्हणाली-

" काय हो, मला काही म्हणालात काय ? "
.

" हिंदु-स्थानी वाघ "


विश्वाला पोरके "बाळ" का करूनिया गेले ?

नुसते मोठे नावाला का जगती ह्या उरले !

तूतू मीमी होईल, जगती पोकळीस भरण्या -

डरकाळी वाघाची कानी पुन्हा ऐकणे कुठले !

असंख्य आली, पुन्हा पुन्हा, वादळे इथे -

गेले उडुनी पाचोळ्यासम, कोण कुठे !

 सामर्थ्याने "हिंदु-स्थानी वाघ" झुंजला होता.. 

कुणा न होती, भीति कुणाची- "पाठीराखा" होता !

.  

लाडू - एक शस्त्र !


कौरव-पांडवांचे युद्ध फार जोरात झाले होते,
असे म्हणतात.
दोन्ही पक्षांचे सैनिक वर्मी मार बसून मेले,
असे म्हणतात.
वर्मी म्हणजे अगदी मर्मावर अचूक ठिकाणी,
असे म्हणतात.
दिवाळी संपल्यावर काही आठवड्यानी ते युद्ध संपले,
असे म्हणतात !

असेही म्हणतात की,
वर्मी घाव घालून मारायला,
आणि ते योग्य रीतीने फेकून,
योग्य त्या मर्मावर बसायला..

आमच्या भटारखान्यातल्या
सध्याच्या आचाऱ्याच्या पूर्वजांनीच
ज्या शस्त्राचा वारेमाप वापर त्या युद्धाच्या वेळी केला होता..
त्याला म्हणतात..

" ला डू ".

........आजही ते शस्त्र
काही घराघरातून पहावयास मिळते,
असे म्हणतात !!!
.    

आली दिवाळी---


आली दिवाळी..
आठवा दिवाळीचा फराळ -

शेवेसारखे बारीक लांबसडक केस,
लाडूसारखे गोबरे गाल,
करंजीसारख्या कमानदार भुवया,
कानात शंकरपाळ्याचे चौकोनी टोप्स,
नाकात चकलीच्या नथीचा आकडा,
चिवड्यासारखे चुरचुरीत बोलणे,
अनारशासारखी गोल बटबटीत बुब्बुळे....
अशी "ती" समोर दिसली की,

समजायचे---
 "आली दिवाळी" !

सगळीकडे आसमंतात आनंदीआनंद भरून राहिलेला,
तिच्याकडे पहात,
 दिवाळीचा फराळ आठवत रहातो,
आणि तोंडाला पाणी सुटते !
.

रांग.. रांग.. रांग ..


" मी देखील गरीबीतूनच वर आलो आहे - "
असे वर तोंड करून सांगणाऱ्या,
एकाही पदाधिकाऱ्याला/सत्ताधिकाऱ्याला/मंत्र्याला...

खेड्यातून २/४ किलोमीटर अंतरावरून पाणी आणणाऱ्या स्त्रिया,
पाण्याच्या हापशावर लागलेल्या घागरींच्या रांगा,
रेशनला मिळणारा निकृष्ट माल,
त्यासाठी देखील करावी लागणारी सामान्य जनतेची मरमर,
जीवनावश्यक वस्तूंसाठी लांबलचक रांगा...
ह्या संबंधी वृत्तांत/ दृष्ये/ माहिती कुठूनही मिळत नसेल काय ?
आणि मिळत असेल तर,
त्यावर हे सर्व महोदय..
 काही ठोस उपाययोजना करत असतील काय....
याची शंकाच वाटत आहे !

कारण-
 आजवर गरीबीतून वर आलेल्या,
एकाचा तरी फोटो,
"असल्या रांगेत" कुणाला दिसला आहे काय ?
.

फेसबुकाचा झटका -


मित्राबरोबर चहा पिताना,
फेस्बुक पहात पहात,

तो खुर्चीवर बसल्याबसल्याच
धाड्कन खाली कोसळला..

समोर फेसबुक लॉगीन केलेले तसेच----

मित्राने वहिनीला विचारले -
"वहिनी, काय झाले हो ह्याला एकदम ?

वहिनी शांतपणे उत्तरली,

" हे किनई,  इतरांच्या सगळया पोस्टला न चुकता,
लाईक/ कॉमेंट/ शेअर करत बसतात... चोवीस तास !

आणि मग...,

एखादे लाईक ह्यांच्या पोस्टला चुकून कुणी दिले की,
हर्षवायूचा असा झटका ह्यांना येतो !"
.

अडकित्ता ..खलबत्ता ...


आज सकाळी सकाळी
बायकोने चहाच्या कपाबरोबर,
एका थाळीत चकल्या आणि लाडू ठेवले.

मी दिवाळीच्या सुखद सुरुवातीकडे
आश्चर्याने पाहू लागलो .
पण धीर धरून तिला विचारले,
" अग, मागच्या वर्षीप्रमाणेच सर्व पदार्थ केले आहेत ना हे ? "
अत्यंत उत्साहाच्या भरात ती उद्गारली,
" प्रश्नच नाही.
अगदी मागच्या वर्षीप्रमाणेच ! "

मी शांतपणे उत्तरलो,
" मग तो मागच्या वर्षी चकल्याचे तुकडे केलेला अडकित्ता....
आणि लाडू फोडलेला खलबत्ता....
 कुठे आहेत ?
आण की जरा ! "
.

धाडसी आणि पुळचट ...!


बायको एकदाची माहेराहून परत आली.
तिच्या हातचा नाश्ता आणि गरमागरम चहा .. अहाहा !
डुलकी नाही लागली तर नवलच ..

लागली डुलकी-
 आणि नेहमीप्रमाणे बसले स्वप्न आमच्या मानगुटीवर ..
आता ते स्वप्न,
मी तुम्हाला सांगितल्याशिवाय मला राहवणार नाही,
आणि तुमची चुळबुळ ते ऐकल्याशिवाय थांबणार नाहीच !

..... माझ्या स्वप्नात २०१४ च्या निवडणुका झाल्या,
आणि एक "धाडसी मुख्यमंत्री" अस्तित्वात आले.
एका हातात गदा आणि दुसऱ्या हातात धारदार तलवार घेऊन,
ते सगळीकडे गर्जत फिरू लागले-

" मी पूर्वीसारखा "पुळचट मुख्यमंत्री" राहिलो नाहीय आता !
उद्यापासून प्रत्येकाला...
महिन्याला पाच ग्यास सिलेंडर,
पाच रुपये किलोने साखर,
दहा रुपये लिटरने पेट्रोल,
पंधरा रुपये ग्रामने सोने .....वगैरे वगैरे जीवनावश्यक वस्तू देणार ..
 जर कुणी तसे त्या भावाने दिले नाही तर ..
माझ्या हातात शस्त्रे आणि माझ्या मंत्र्यांच्या हातात वस्त्रे आहेत ...
तशीच वेळ आली तर,
आम्ही धाडस दाखवून,
ती जमेल तिथे टाकून, आम्ही पळून जाऊ शकतो, समजलं का ? "

...... " अहो, सिलेंडर सिलेंडर काय ओरडताय दिवास्वप्नात ?
चला, उठा जेवण तयार आहे ! "
- असे म्हणत बायकोने माझा स्वप्नभंग केलाच !

आपले मायबाप सरकार तरी दुसरे काय करतेय म्हणा !!!
.

" पहिला चहा ... "


पहिल्यांदाच बायको माहेरी गेलेली,
पहिल्यांदाच बाहेर जाऊन,
 चहा प्यायचा कंटाळा आलेला,
चहा आयता मिळाला तर प्यायला जमतोच.....
पण आपल्याला चहाची एवढी चाहत आहे,
तर बघू या म्हटलं ..करायला तरी जमतोय का ते !

ग्यास शेगडीजवळ गेलो, बटण फिरवले,
लाईटरचा आवाज केला.. चुटुक फुटुक
ग्यास पेटवला.. जाळ झाला भ्डाक करून.....,
बटण फिरवून तो बारीक केला,
जमला निदान ग्यास पेटवायला तरी !

चांगला एक कप भरून चहाचे पाणी गरम करायला भांड्यात ठेवले,
साखर गोड असते... पाव चमचाच टाकली,
चहा एकदम स्ट्रॉँग हवा..चांगली तीनचार चमचे चहा-पावडर टाकली,
पाणी उकळले.. बुडबुडबुडबुड .. लालभडक झाले .
ग्यास बंद करून पाण्यात एक कप दूध घातले..

पहिल्यांदाच केलेला
पहिल्या चहाचा
पहिला कप ....
पहिलाच घोट ,
पहिल्यांदाच तोंड कडू ...
अरारारारारारा !

पहिल्यांदाच...
रोजच्या सकाळच्या,
बायकोच्या हातच्या पहिल्या चहाच्या कपाची आठवण झाली हो !

पहिल्यांदाच ठरवून टाकले,


 बायकोच्या  हातचा सकाळचा पहिला चहा पिल्याशिवाय,
तिला माहेरी पाठवायचे नाहीच !!!

.

अर्धांगी ...!


कार्यालयात-
सेवानिवृत्तीच्या दिवशी...
संबंधितांचे टोलेजंग सत्कार होतात,
जंगी भाषणे होतात.

" ह्यानी अमुक छान काम केले,
ह्यांच्यामुळे तमुक काम सोपे झाले ",
- असे कौतुकपर गुणगौरव शब्दातून व्यक्त होतात.

माझाही असाच..

 सत्कार समारंभ झाला.
आणि मी संध्याकाळी उत्साहात घरी परतलो ..

उद्यापासून... 

कामाची कटकट संपली ह्या आनंदातच  !

बायकोने पदराला हात पुसतच,
घरात छानसे स्वागत केले आणि उद्गारली -

" बरं झालं बाई, 

तुम्ही एकदाचे रिटायर झालात ते !
ही घरातली कामं--- 

एकटीला कितीही लौकर उरकायची,
म्हटली तरी, आटपतच नव्हती हो...
उद्यापासून तुम्ही मदतीला असणार.. ते एका दृष्टीनं बरच झालं ! "

मी आssssss वासूनच तिच्यापुढे उभा !!!
.

मी - एक नंदीबैल !


ही बायको म्हणजे अजब रसायन आहे.
कुठल्या वेळेला माझी गोची करून टाकेल,

 सांगता येत नाही .
माझ्या चेहऱ्यावरचा बुरखा कधी टरकन फाडील,

 सांगता येत नाही ...

दिवाळीचे वेध लागत आहेत .
फराळाच्या सामानाची यादी तिने माझ्या हातात कोंबली.
वर दम देत गरजली ...
" सगळं निवडक घेऊन या ,
स्वस्त आणि मस्त पाहून या ,
नाहीतर द्याल..

 बारा हजारांसाठी लाखभर दुकानात ! "

इथपर्यंत ती मला बोलली ते ठीकच होतं ..
शेवटचं घरोघरी बोललं जाणारं वाक्य फेकलंच की माझ्या तोंडावर ...

" नुसती नंदीबैलासारखी मान हलवू नका माझ्यासमोर ! "
 
ह्या तिच्या वाक्यावर मी काय केलं असणार ?
जे तुम्ही करता तेच ..

"हो" म्हणून मुंडी हलवली,
 आणि बाहेर पडलो पिशव्या घेऊन !!!
.

उतावळा नवरा..


उतावळा नवरा..
 त्याला कुणीतरी आवरा !

उगाच आपल्या मित्रमंडळीत बसून,
फुशारक्या मारत बसतो..

बायको ---
उठल्यापासून सकाळी
सडासारवण, रांगोळी
तुमच्या आणि पोरांच्या अंघोळी
सकाळची कामं हातावेगळी
करूनच-
न्याहारी, स्वैपाक, जेवण, डबे, दप्तर, इस्त्रीचे कपडे, मोजे, रुमाल-
आणखी इतर काय काय कामाची कमाल-
न कुरकुरता करत असते !

नवरा ---
फक्त टेहाळणी करत,
तिच्यावर डाफरण्याचे काम
इमानेइतबारे करत असतो !
शान मारत,
सगळे आयते झाल्यावर/ मिळाल्यावर,
कामावर म्हणून पळ काढतो ...

पुन्हा संध्याकाळचे रहाटगाडगे
बायकोच्याच जिवावर चालू रहाते..

....आणि न केलेल्या कामांची यादी ऐकवत,
पुन्हा नवरोजी हुश्श करायला मोकळेच !

दिवसभर राबराबणाऱ्या बायकोला
विश्रांती, आयता चहाचा कप मिळण्यासाठी ....

रहाटगाडगे उलटे कधी आणि कोण फिरवणार हो...... ???
.

लहानपण - मोठेपण -


सर्वांच्या लहानपणी -

" तू रडला नाहीस, 
शांत बसलास, 
दंगा नाही केलास तर,
तुला खाऊ / चोकलेट /गोळी / हवा तो पदार्थ /खेळणे देईन ! ",
 
हे वाक्य कानावर इतक्या वेळेला पडले आहे की.......

नंतर मोठेपणी -

इतरांकडून आपले काम 
निमूटपणे करून घ्यायला,
अशी लालूच दाखवायची 
सर्वांना इतकी सवय लागली की....,

लाचखोरी, भ्रष्टाचार असले शब्द 
कानावर येऊ लागले आहेत !

सर्वांचे लहानपणच जर .....? ? ?
.

मी आणि माझे देवदर्शन...


शिस्तीत देवाचे दर्शन घ्यायला,
बऱ्याच वेळेला देवळात गर्दी असली तरी,
मी रांगेत उभा रहातो .
 
देवाघरचे दलाल "तातडीच्या दर्शना" संबंधी,
चौकशी वगैरे करून जातात ..
मी पूर्णपणे त्याकडे दुर्लक्ष करतो.

रांग जसजशी पुढे सरकते,
तसतसे मन जास्त
देवाच्या अस्तित्वाबद्दलच साशंक होत जाते ..
कारण माझ्या खूप मागे असणारे,
माझ्या आधीच-
देवासमोर निवांत माथा टेकताना दिसतात !

माझा प्रवेश गाभाऱ्यात होतो ..
आणि मी भक्तीभावाने देवासमोर डोके टेकवतो -
त्या क्षणीच माझ्या पाठीवरून हात फिरतो ...

क्षणभर वाटून जाते..
साक्षात देवाने आपल्या पाठीवर.... ????????????

पण डोळे चांगलेच उघडतात ...
देवाचे दलाल
त्यांच्या नियमानुसार,
माझ्या पाठीवर हात फिरवत -
"हं.. चला.. सरका.. पुढे लवकर, लवकर ! "
असे वस्सकन ओरडत असतात !

माझ्या मागे -
सुटातले आणि पैठणीतले जोडपे उभे असते ....... !

देवावरचा विश्वास डळमळीत होऊन,
मी खिन्न मनाने गाभाऱ्यातून परत फिरतो !

....कारण मी इतक्या श्रद्धेने देवाच्या पायापाशी असतो की ,
खरा देव तिथे असता तर ..
त्यानेच  मला मिठी मारली असती !!

पण देवच कमनशिबी ..
देवा ऐवजी चांगल्या भक्तांची पारख-
आजकाल पुजारी आणि दलाल मंडळीनाच
दुर्दैवाने सर्वात जास्त आहे !!!
.

ग ची बाधा...


" ग ची बाधा "...

मी- मी-- आणि मी---
कुणी विचारलं नाही तरी,
आपलच घोडं दामटायचं पुढं !

मी असा आहे
अन् मी तसा आहे,
माझ्यासारखा शहाणा, 

तुम्हाला शोधून सापडणार नाही !
( अरे बाबा, तुझ्यासारखा शहाणा "शोधायला" 

आम्ही येडे का खुळे ?..
 तू समोर असलास की, 

आम्हाला आपोआप कळतच की  रे, तू किती दीड.... ! )

प्रत्येक वेळेला "मी"चं टुमण किंवा,
 "मी"ची टिमकी वाजवायची आवश्यकता आहे का ?

 आत्मपरीक्षण तरी करून बघा ..
पण मनुष्य स्वभाव म्हटलं की,
तेही अशक्यच !
 सर्व गुणदोष आलेच..
पण त्यातल्या त्यात-

 सर्वात घातक बाधक हाच दोष-
 

... ग ची बाधा !
एकदा तिची लागण झाली की,
 समजावे-

..अति तेथे माती !
.