सात चारोळ्या ----

'खरे मीलन -'

दोन थेंब तुझ्या आसवांचे 
गालावर आले ओघळून -
एकुलते एक माझे हृदय 
त्यातच गेले विरघळून ..
.

'अरे देवा -'

दगडातून मूर्ती साकारणारा 
पैसा पैसा करतच मरतो -
दगडातून निर्मित देव 
निवांत पैसा गोळा करतो ..
.

'लेकराची माय -'

डोळियांची निरांजने 
आसवांचे तेल तयात -
जपून ठेविते माऊली 
प्रकाश अपुल्या हृदयात ..
.

'हसरी जखम -'

दिला गुलाब तिच्या हाती 
मिळे गोड स्मितातून पावती -
टोचे काटा बोटास माझ्या 
हसतो मधुर रुधिरथेंबही किती . .
.

'सुखाचेच सोबती-'

दु:ख वाटत हिंडत होतो
याचक एकही दिसला नाही -
सुख जेव्हा वाटत होतो 
एकही दु:खी उरला नाही ..
.

'रांग -'

डोळ्याच्या डॉक्टरपुढे 
अविवाहितांची रांग -
कानाच्या डॉक्टरपुढे
विवाहितांची रांग ..
.

'वेड्या जिवाची वेडी ही माया -'

दुरावलेल्या वासरासाठी 
गोठयात हंबरणारी गाय असते -
वाट चुकलेल्या लेकरासाठी 
घरात क्षमा करणारी माय असते ..
.

वसा राजकारणाचा

इकडे तिकडे 
मिळून दाटीने
नेत्यांनी 
नुसतेच मिरवणे-

आभास नुसता
गरजण्याचा
वास्तवात 
न बरसणे -

आकाशात
जमलेल्या 
ढगांना
कुणीतरी सांगणे ..

पृथ्वीवरच्या
राजकारणाचा
वसा तुम्ही 
कधीच न घेणे ..

वसा तुम्ही 
कधीच न घेणे .. !
.

तीन हायकू


1.
कावळा काळा
पुतळ्यावर चाळा
स्तब्ध पुतळा ..


2.
खूष प्रेक्षक 
हसरा विदूषक
कढ मनात ..


3.
पाणीच पाणी
झोपडीतही पाणी
कोरडे डोळे ..

.

एक दोन एक दोन

एक दोन एक दोन
आभाळात चमकते कोण ..

तीन चार तीन चार
ढगांत गडगड झाली फार ..

पाच सहा पाच सहा
पाऊस जोरात आला पहा ..

सात आठ सात आठ
गारा पडल्या पाठोपाठ ..
नऊ दहा नऊ दहा
ओंजळीमधे मोजून पहा ..

अकरा बारा अकरा बारा
कमी झाल्या पाऊसधारा ..

तेरा चौदा तेरा चौदा
चकरा मारल्या पावसात कितिदा ..

पंधरा सोळा पंधरा सोळा
होड्यांसाठी कागद गोळा ..

सतरा अठरा सतरा अठरा
होडयांची शर्यत जमली जत्रा ..

एकोणीस वीस एकोणीस वीस
पहिल्या नंबरला मोराचं पीस ..
.

शोकांतिका

जगाच्या अंतापर्यंत 
अस्तित्वात आहेत 
जोपर्यंत ....

दोन पक्ष -

...चर्चा 

भांडणे 
मतभेद
पक्षांतर
तडजोड
निलंबन
फुटाफूट
हातघाई
मोडतोड
तोडफोड
कुरघोडी
कुरापती
घुसखोरी
वादावादी
भ्रष्टाचार
लाचखोरी
हाणामारी
ओढाओढी
हमरीतुमरी ...


आणखी
बरच काही
घडत राहणार -


फक्त
घडणार नाही ...
दोन पक्षात कधीही-


" जनकल्याणासाठी एकी ! "
.

हेवा


शाळा सुटल्यानंतर 

पाऊस ओसरल्यानंतर

सुरू होतो 

मुलांचा किलबिलाट



रस्त्यातून साचलेल्या 

पाण्याच्या डबक्यातून 

धबक धबक धबक 

पाण्याचा आवाज करत



मुलीमुले हर्षोल्हासात

नाचकाम करत 


एकमेकांच्या अंगावर 

तुषार फवारे कारंजी 

उडवत तुडवत भिजवत



इतर सगळे जग 

विसरून जाऊन 



स्वत:च्याच जगात

धिंगाणा मजा दंगामस्ती

करत करत करत...............



-- पावसा रे पावसा,

असाच येत जा रे 

त्या चिमुकल्या जिवांना

आनंदी ठेवायला ...



- आणि त्या दंगमास्तीचा

मला वाटणारा हेवा 

आणखी वाढू द्यायला !
.

म्हणी छत्रीच्या

१. छत्रीपुरती मैत्री ..
२. छत्री लहान पाऊस महान ..
३. मैत्रीण पाहून छत्री धरावी ..
४. पाऊस पाहून छत्री उघडावी ..
५. काखेत छत्री अन गावभर खात्री ..
६. गरीबाच्या छत्रीला सतराशे ठिगळे ..
 ७. पाऊस पडायला अन छत्री फाटायला ..
८. छत्री उघडायला अन पाऊस थांबायला ..
९. पाऊस दाखव नाही तर छत्री परत कर ..
१०. पावसात भिजणाऱ्याने छत्री मागू नये ..
११. पावसात भिजला अन छत्री मागत बसला ..
१२. छत्री ज्याच्या हाती, पाऊस त्याच्या माथी ..  
१३. ज्याच्या हाती छत्री त्याच्याशी करावी मैत्री ..
१४. छत्री काही उघडेना, अन् पाऊस काही थांबेना ..
१५. छत्री उघडतो हातात अन् भिजू म्हणतो पावसात..
१६. हातात उघडी छत्री अन पाऊस थांबल्याची खात्री ..
१७. छत्री झाकली म्हणून पाऊस पडायचा राहत नाही ..
१८. ज्याची छत्री फाटली त्याची पावसाची हौस फिटली ..
१९. पाऊस आहे तर छत्री नाही, छत्री आहे तर पाऊस नाही ..
२०. पावसात भिजत बसली अन छत्री लहान म्हणून रुसली ..
२१. रंकापाशी नाही छत्री अन रावाशी करायची म्हणतो मैत्री ..
२२. भिजायचे तेवढे भिजून बसले अन् छत्री लहान म्हणून रुसले ..
.

प्रपंच- एक रंगमंच

वरवर वाटणार नाही, जाणवणार नाही, विश्वास बसणार नाही ,
इतका घनिष्ट आणि जवळचा संबंध आहे बरं का -
वय, प्रेम, अनुभव, जीवनाचा !

एक विलक्षण नाजूक भावनिक गुंतागुंत आहे , 
या सगळ्यांमधे !

वटपौर्णिमेच्या दिवशी-
आम्हा नवराबायकोच्या प्रेमाला खूपच भरती आली होती.

काव्य, शास्त्र, विनोद, गप्पाटप्पा यांना नुसता बहर आला होता !

आणि -
प्रथेनुसार / रीतीरिवाजानुसार,
दुसरे दिवशी सकाळी सकाळी,

'आज चहा कुणी करायचा ?'......

या क्षुल्लक कारणावरून विनाकारण आमचे दोघांचे भांडण झाले !

दुपारपर्यंत कसाबसा अबोला टिकला...

दुपारी बायकोच्या माहेरची मंडळी घरात हजर !

साहजिकच आम्हा दोघांनाही,
सुतकी चेह-याच्या नाटकातल्या भूमिकेतून,
बाहेर पडणे भागच होते !

टेबलावरचा पसारा आवरत मी गुणगुणू लागलो -
"आनंदी आनंद गडे ..
इकडे तिकडे चोहीकडे ..."

तर फक्त दोन मिनिटात,
सौँदर्यप्रसाधन आटोपून बायको हसतमुखाने 
सर्वांसमोर हजर !
.

आला रे..पळा -

मान करुनिया
ताठ आपली
कविता माझ्या  
वाचत सुटलो.. 

इतरां मुळी न 
कळते कविता 
समजही त्यांना
देऊ लागलो.. 

अभिमानाने
इकडे तिकडे 
बाड कागदी 
मिरवू लागलो..

कुणी न म्हटले 
तरी "मी कवी"
ओळख अपुली 
देऊ लागलो.. 

मित्रमंडळी 
दूर का पळती -
नवल मनी मी 
करू लागलो ! 
.

पहिला पाऊस पडता आठवे

पावसातल्या सायंकाळी 
आपण दोघे झाडाखाली 
होती छत्री हाती माझ्या 
नजरभेट दोघांची झाली..

"बघ, मी भिजते आहे रे..." 
नजर तुझी का थरथरली 
नजरेमधला भाव ओळखत 
छत्री मी दोघांवर धरली..

भिजलो अर्धा मी, तू अर्धी 
अर्धा मी, अर्धी तू ओली 
जवळिक अपुल्या दोघामधली  
आपसूक का वाढत गेली..

पहिला पाऊस - पहिली जवळिक -
पहिली वहिली ओळख अपुली 
पहिला पाऊस पडता आठवे 
जोडी जमली  कायम अपुली ..
.

आस पावसाची

पाऊस पहिला थेंबही पहिला 
शहारा मातीमधला पहिला..

ओल्या ओल्या मृद्गंधाने 
दरवळत जावे सातत्याने..

थेंबसरी मातीत पडाव्या 
भूमातेने ग्रहण कराव्या..

हिरवळ येईल दरवळ राहिल 
फुलाफुलांतुन परिमळ वाहिल..

बघत नभात काया थरथरे 
शेत कोरडे नजर भिरभिरे..
.

ह्या मोबाईलवर, ह्या फेसबुकवर, शतदा प्रेम करावे

रविवारचा दिवस. 
निवांत दिवस .
पावसाचे चिन्ह . 
घरातच बसावे वाटले.

बायकोने भांडण उकरून काढले. 
जोरात म्हणाली -
"जेवायला बाहेर जाऊ या कुठेतरी !"

झालं . 
वादावादी जोरात सुरू.

वैतागाने मी म्हणालो -
"मी जातो आता कायमचा हिमालयावर निघून..!"

पट्कन पण शांतपणे बायको म्हणाली -
"खुश्शाल जा हो .
पण तिथे मोबाईलची रेंज नसली तर,
चडफडत बसाल बर...!
कारण येता जाता पोस्ट टाकली की,
लाईक कॉमेंट ट्याग पोक बघायची सवय तुमची !
एकवेळ मला सोडून रहाल तिथे.
पण--- तुमच्या त्या स्टेटसला ?"

बायकोने अगदी वर्मावरच घाव घातला की राव !

झक मारत छत्र्या घेऊन निघालो,
दोघेही बाहेर हादडायला !

पण आता मस्त गुणगुणत चालत होतो - 
"ह्या मोबाईलवर, ह्या फेसबुकवर, शतदा प्रेम करावे .."
.

पहिला पाऊस

एवढा परिणाम ह्या पहिल्या पावसाचा होईल,
असे वाटले नव्हते हो .

कुठे रिमझिम,
कुठे चार थेंब, 
कुठे सरीवर सरी .

कुणाला सुचतेय कविता, 
कुठे शिजतेय चारोळी, 
कुठेतरी दोनोळी .

हर्षोल्हास, रोमांच, हुरहूर, शिरशिरी
दाटून येताहेत मनामनात .

कुठे वाफाळलेला
गरमागरम चहा हातात असेल.

कुणी खिडकीतून बाहेर डोकावून उल्हसित मनाने 
टपटपणाऱ्या धारा पाहत असेल.

कुण्या घरात
कांद्याच्या भज्यांच्या वास 
दरवळत असेल.

कुण्या दारात 
चिल्लीपिल्ली मनसोक्त
चिम्बून घेत असतील स्वत:ला .

एखाद्या ओल्या अंगणात 
भगिनी मंडळ 
"चल ग सये, भिजायाला... भिजायाला.." 
म्हणत फेरही धरत असेल .

एखादा छत्री विसरलेला नतद्रष्ट
"आला का नको तेव्हाच हा पाऊस" 
पुटपुटत चडफडत झाड/ निवारा/ आडोसा शोधत असेल.

एखादा हौशी 
माझ्यासारखा चिरतरुण म्हातारा 
गंमत म्हणून का होईना 
पण "पहिला पाऊस" म्हणून
आनंदाने हुरळून जाऊन 
चार थेंब अंगावर ओतून घेत असेल.

.... पहिल्याच पावसाच्या या छेडुनी ग तारा 
मोहून टाकतो हा मी आसमंत सारा ..
.

अचानक


कधी नाही ते चारपाच मित्र त्याच्याकडे आले.

आले ते आले-
कसला निरोप न देता,
कुणाला न सांगतासवरता,
फोनबिन काही न करता,
अचानकच आले !


मोठमोठ्या आवाजात गप्पा टप्पा सुरू झाल्या .
हास्याचे फवारे उडवता उडवता,
" आज आम्ही निवांत आहोत !"
- त्या चारपाचजणांनी एकमुखाने सांगितले.

"अरे वा, खूपच छान ! हे एक बरे केले..
निवांत वेळ काढून आलात .
धम्माल करत बसू आपण आज सगळे मिळून !
आता हिला आधी पटकन,
 नाष्ट्यासाठी म्यागी करायला सांगतो ...."
- असे त्यांना तो म्हणाला.

आणि -
तो दिवाणखान्यातून,
स्वैपाकघरात बायकोला सांगून,
बाहेर येईपर्यंत ..............


दिवाणखाना रिकामा झालेला होता !
.

स्वामीस शरण

स्वामीस शरण 
धरावे चरण
खचित कल्याण
होई आयुष्याचे ..

स्वामीस शरण
नामात स्मरण
जगण्यास कारण
नित्य प्रपंचाचे ..

स्वामीस शरण
विभूती धारण
जीवन तारण
पुण्य संचयाचे ..

स्वामीस शरण
संकट हरण
सुखात मरण
दान समर्थाचे ..
.

हे वटवृक्षा

हे वटवृक्षा -

माझी तुझ्यापाशी काहीही "इतर मागणी" नाही ..

फक्त -
तिच्यासारखी चांगल्या स्वभावाची बायको

 शोधूनही मिळणार नाही.
खूप छान स्वभाव आहे रे तिचा ....


सोशिक/मनमिळाऊ/त्यागी/काटकसरी/व्यवहारी/

चतुर/वेळेवर बडबडी/स्वागतदक्ष/कामसू/कष्टाळू/
उत्तम सहचारिणी/सुखकर्ती/
दु:खहर्ती/सर्वसुगुणसंपन्न अशी ती आहे.

...... म्हणून तर,
आजचा दिवस-

ती तुझ्यापाशी काय मागेल ते देण्याची कृपा कर !

मला तरी... 
ती सोडून दुसर काही नकोचय !

तिने "सात"च नाही .."सत्तर जन्म" जरी-
माझ्यासह रहायची तयारी दाखवली तर ...


माझी त्याला मुळीच ना नाही,
इतके ध्यानात असू दे !
.

सात जन्मांचे आरक्षण


बायकोला मघाशीच समोर बसवून,
थोडक्यात मी हे लांबलचक प्रवचन दिले -


"हे बघ, ह्या जन्मात,
तुझ्यासाठी सर्वकाही मी खरेदी करू शकलो नाही.
तुझ्या सर्व मागण्या स्थळ काळ वेळ स्थिती परिस्थितीमुळे,
पूर्ण करू शकलो नाही.
तुझ्या प्रत्येक गोष्टीत "हो" ला "हो" म्हणू शकलो नाही.
माझा स्वभाव हा असा तापट/मितभाषी/काटकसरी वगैरेवगैरे राहणारच आहे.
एका दिवसात, मी तो बदलू शकत नाही.
आता तशी इच्छाही नाही.
माझ्या स्वभावाला औषध नाही.
हे सगळे नीट ध्यानात घेऊनच आज वडाकडे जा-
आणि तुला काय आणि किती हव ते मागून घे.
माझे काहीही म्हणणे नाही.
सर्वस्वी तुझ्यावर मी निर्णय काय घ्यायचा ते सोपवतो......!"


प्रतिक्रियेसाठी मी तिच्याकडे पाहत राहिलो.

मला वाटले.....,
आता पुन्हा रोजच्यासारखे वडाला फेऱ्या मारण्याआधीच,
वादाला चांगलेच तोंड फुटणार .


पण काय सांगू तुम्हाला ..

नऊ वारीत छानपैकी नटून थटून बसलेली ती,
नाकातली नथ नीट बसवत,
पैठणीवरच्या मोराचा पदर ठाकठीक करत
ती चक्क अशी काही लाजली आणि -


" इश्श्य ! स्वारींचे इकडून काहीही म्हणणे झाले,
तरी स्वारींचे आरक्षण आमच्याकडून आणखी पुरेपूर सात जन्मासाठी,
करण्याचा अस्मादिकांचा मानस ठाम आहे बर......."


- असे काहीसे मोठ्या स्वरात पुटपुटत ती मुद्पाकगृहाकडे धावली -
गरम गरम चहाचे चषक आणण्यास्तव !


........ तोवर पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने,
मला साखरझोपेतून पूर्ण जाग आलेली होती म्हणून बरे !
.