बोकड आणि कविता


बोकडाजवळचा कसाई
कवितेपुढचा समीक्षक
काही फरक वाटतो का ..

सुरा परजत
कातडी ओढत
कसाई तयार असतो ..

कीस पाडत
शब्दाचा एकेक
समीक्षक काही वेगळा नसतो ..

बें बें करीत
पुढ्यातला प्राणी
शरणागत होतो कसायाला ..

छिन्नविछिन्न
आपली कविता होताना
हुंदका दाटतो कवीमनाला ..

ह्याची सुरी
त्याची कापूगिरी
दोघांचाही आनंद आसुरी ..

दोघासमोर
"बहुत अच्छा" "वा वा"
म्हणणारे उभेच असतात ..

बोकड काय
किंवा कविता काय
दयामाया दाखवणारे दुर्मिळ दिसतात . .


.

सात चारोळ्या -------

केले स्वागत प्राजक्ताने 
सुगंध वाऱ्यासोबत धाडून-
निरोप प्रेमळ दिधला त्याने
छान फुलांचा सडा घालून ..
.

काड्या मोजक्या सुखाच्या
पाने असंख्य दु:खांची-
विधात्याने बनवली अजब 
पत्रावळ आयुष्याची..
.

कायदे करण्यास असती 
उत्सुक ते आमच्यासाठी-
पळवाटा शोधण्यात आम्ही 
तत्पर ते मोडण्यासाठी..
.

कळते न ज्यातले काही
हमखास भाष्य त्यावर -
औषध मिळेल कोठे 
या मानवी स्वभावावर ..
.

कागदाचे अंगण प्रशस्त समोर
शब्दांच्या धारा टपटप झरती - 
नाचायला अधीर लेखणीचा मोर
कवितेचा पिसारा झपझप वरती ..
.

काटे आहेत म्हणून 
गुलाबाने फुलू नये का -
आठ्या आहेत चेहऱ्यावर 
स्मित आणू नये का ..
.

किती हा उन्हाळा, लागले
रिकामटेकडे कण्हायला -
घाम गाळत कष्टकरी लागले
ओझे उन्हाचे उचलायला ..
.

तीन चारोळ्या ---

दु:खाच्या ढुमढुम तालावर 
कसरत करणारा डोंबारी मी -
सुखाच्या डगमग दोरावर 
तोल सावरणारा संसारी मी..
.


दिलास जन्म माणसाचा 
मानू किती उपकार देवा- 
देऊन सुख माझ्या वाट्याला 
कुणा न वाटू देऊस हेवा..
.


देवाघरचा अजब न्याय
गरिबाला दूर सारतो -
सोनेनाणे अर्पिल्यावर
दर्शनाला त्वरित पावतो !
.

फरक

आपला स्वभाव
कित्ती सारखा आहे -
तू नेहमी म्हणतेस . .

तू रुसलीस की -
मी तुला हसवण्याचा
प्रयत्न तरी करतो . .

मी रुसलो की -
तू हसवणे विसरून
आसवांशी जवळीक साधतेस !
.

मम्मीडॅडी ... आईबाबा ...


मम्मीडॅडी आज घरोघर
नित्य आणती पिज्झा बर्गर..


आरोग्याची चिँता वरवर
पोटदुखी दारात बरोबर..


सत्वहीन ते क्षणैक रुचकर
बदलत आहे काळ खरोखर..


गरीब होते सुखामधे घर
मातीची चव असे तोंडभर..


सत्वयुक्त ती चटणी भाकर
आईबाबासह वाटे भयंकर..
.

चमत्कारच....पण गोळीचा !


सकाळ झाली .


मी जागा झालो, तो थोडासा कण्हतच.
बायकोने कपाळावर हात ठेवला आणि किंचाळली - "अगबाई !"


सर्व घरदार जागे झाले -


मुलाने तापमापकनळी माझ्या तोंडात खुपसली
म्हणाला -"एकशेएक ताप आहे !"

बायकोने

 पट्कन देवीचा अंगारा माझ्या कपाळाला लावला..

थोरल्या सुनेने

 स्वामी समर्थाचा अंगारा लावला..

धाकट्या मुलाने

 कुठल्याशा अप्पामहाराजाचे भस्म लावले..

धाकट्या सुनेने

 साईबाबाच्या फोटोपुढची उदी लावली..

थोरल्या मुलाने

 भक्तमहाराजाची विभूती लावली..

भावाने

 रामरक्षा म्हणायला सुरुवात केली..

बहिणीने

 कुठल्यातरी पोथीत तोंड खुपसले..

मी विभूतीउदीअंगाराभस्मावगुंठीत माझे कपाळ धरून,

होतो तसाच कण्हत राहिलो . . .

सर्वांना विचारले -" झाले का तुमचे सगळे ?"

एकसमयावच्छेदेकरून सर्वांचे उत्तर आले -"हो !"

थोरल्याला जवळ बोलावले आणि म्हणालो-
"आता सर्वांनी मिळून महामृत्युंजयजप सुरू करण्याआधी,
फ्रीजमधली ती तापाची गोळी आणि पेलाभर पाणी दे ."

पाणी पीतपीत, गोळी घशाखाली ढकलली आणि -

दहाच मिनिटांत पुन्हा मस्त घोरायला लागलो !

.

'सावध सावध-'


वारक-यांच्या केंद्रस्थानी
गिटारवाला करतो आहे ,
जयघोष विठ्ठलाचा
तारस्वराने किँचाळत...


न जाणो कमी वस्त्रांकित
षोडशबाला गाईल भजन ,
मायकल जॅक्सनच्या धर्तीवर
वारक-यांच्या संगतीत...


काळाची ओळखा पावले
ही "परंपरा", ना धांगडधिंगा -
वारीत रमू द्या वारक-यांना
टाळमृदुंग चिपळ्यांच्या तालात...
.

'चकीत झालात ना -'



घरातल्या चटणी पिठले भाकरीचे पंचतारांकित जेवण झाले.

माझ्या प्रशस्त ढेरीवरून, कौतुकाने
आपलाच हात गोलगोल फिरवत,
गुबगुबीत सोफ्यावर लवंडलो...

अंमळ डुलकी लागली.
स्वप्न पडतच होते.

कुठूनतरी अचानक,
एक गोडगुलाबी परी आली,
आणि हळुवारपणे माझ्या तोंडावरून, आपल्या नाजूक कोमल मुलायम हाताने,
जाहिरातीतला "तो" सुप्रसिद्ध साबण फिरवत,
मला विचारू लागली-
"चकीत झालात ना ?"

मी आरशात पाहिले..
किती गोरागोराप्पान झालो होतो म्हणून सांगू !

त्या परीला मी पटकन उत्तरलो, - "आँ, हो !"

"अहो- झोपेतच आरशासमोर उभे राहून काय बडबड चाललीय तुमची ? 

आपला मूळचा रंग थोडाच उजळणार आहे, असे डोळे झाकून, आरशात पहात !
 आणि जसे आहात, तसे छानच आहात ना ? "
..... माझ्या पाठीवर,
आपला प्रेमळ हात थापटत, बायको विचारत होती !

डोळे किलकिले करत मी पाहिले-
अधिकच काळाठिक्कर पडलेला माझा चेहरा बघून,
आरसा मला विचारत होता -

" का रे भुललासी वरलिया रंगा...? "
.

खेळ रोजचा -


या रे मुलांनो, या रे या
पाकिस्तानात जाऊया
कुख्यात कुणी तो आहे म्हणे
त्या दाऊदला पाहूया . .

दिसला जर तो आपल्याला
पकडून आणू आपण त्याला
ना दिसला तर जाहीर करू
'पुढच्यावेळी धरू त्याला' . .

खोटारडे सरकार पाकडे
म्हणते दाऊद ना इकडे
निषेध खलिते धाडूया
खेळ हा रोजच खेळूया . .
.

तू दिसलीस की-



तू दिसलीस की,
जाणवली ती गार झुळूक
उन्हात आली कशी अचानक..

तू दिसलीस की,
उबदार वाहतो वारा
गारव्यात हा कसा अचानक..

तू दिसलीस की,
झरझरते झिमझिम
भिजवाया दोघास अचानक..
.

दोन चारोळ्या


(१ )

"आर्ट ऑफ लिव्हिंग"साठी 
मी आयुष्यभर धडपडलो -
"आर्ट ऑफ लव्हिंग"मधे 
का आयुष्यभर गडबडलो ..

.

(२ ) 

आठवणींच्या गराड्यात
"दत्त" म्हणून उभी राहतेस -
सगळे देव विसरून 
जप तुझाच करायला लावतेस ..

.

जामीन


घोटाळा केल्यावर ...
जामीन मिळतो

कारखाली माणसे चिरडल्यावर ...
जामीन मिळतो

प्राणघातक शस्त्रास्त्र बाळगल्यावर ...
जामीन मिळतो

भ्रष्टाचार केल्यावर ...
जामीन मिळतो

तरीच ..

आरोपी तुरुंगवासात असले तरी...
 घाबरत नाहीत !

आणि ..

आम्ही तुरुंगाबाहेर राहूनही...
 भित्रे ते भित्रेच !!
.