'चकीत झालात ना -'



घरातल्या चटणी पिठले भाकरीचे पंचतारांकित जेवण झाले.

माझ्या प्रशस्त ढेरीवरून, कौतुकाने
आपलाच हात गोलगोल फिरवत,
गुबगुबीत सोफ्यावर लवंडलो...

अंमळ डुलकी लागली.
स्वप्न पडतच होते.

कुठूनतरी अचानक,
एक गोडगुलाबी परी आली,
आणि हळुवारपणे माझ्या तोंडावरून, आपल्या नाजूक कोमल मुलायम हाताने,
जाहिरातीतला "तो" सुप्रसिद्ध साबण फिरवत,
मला विचारू लागली-
"चकीत झालात ना ?"

मी आरशात पाहिले..
किती गोरागोराप्पान झालो होतो म्हणून सांगू !

त्या परीला मी पटकन उत्तरलो, - "आँ, हो !"

"अहो- झोपेतच आरशासमोर उभे राहून काय बडबड चाललीय तुमची ? 

आपला मूळचा रंग थोडाच उजळणार आहे, असे डोळे झाकून, आरशात पहात !
 आणि जसे आहात, तसे छानच आहात ना ? "
..... माझ्या पाठीवर,
आपला प्रेमळ हात थापटत, बायको विचारत होती !

डोळे किलकिले करत मी पाहिले-
अधिकच काळाठिक्कर पडलेला माझा चेहरा बघून,
आरसा मला विचारत होता -

" का रे भुललासी वरलिया रंगा...? "
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा