आई ..

संस्काराची उणीव नाही 
घरात ज्याच्या आहे "आई" ..


संकटसमयी मुखात राही
धावा नेमका "आई आई" ..


घालमेल ती जिवात होई
मनात येते "आई आई" ..


ठेच लागता घाई घाई
तोंडी असते "आई आई" ..


समय कठिण सामोरा येई
स्मरण होतसे "आई आई" ..


मार पित्याचा पाठी खाई
उद्गारातच "आई आई" ..


माता-महती ध्यानी घेई
मुखी असू दे "आई आई" .. 


जन्म माणसा वाया जाई
म्हटले ना जर "आई आई" .. !
.

लग्नपत्रिका



शेतकरी सुगीच्या दिवसांची वाट पहातो, कंपनीचा  कर्मचारी बोनसची वाट पहातो आणि प्रियकर आपल्या प्रेयसीची वाट पहातो ! या तिघांच्याही वाट पहाण्यातली आतुरता, उत्सुकता शब्दानी वर्णन करण्यापलीकडची असते ! तितक्याच, किंबहुना तीहूनही अधिकच तीव्रतेने मी पोस्टमनची वाट पहात असे ! याचाच त्याअर्थी अर्थ असा की - 'मी हल्ली पोस्टमनची वाट पहात नाही किंवा नसतो !'


मी नोकरीला लागण्याआधी, तमाम छंदिष्टांपैकी एक होतो.  मला छंद  होता- 'लग्नपत्रिका' जमविण्याचा !
त्या जमवताजमवता माझेच लग्न जमले आणि मला त्या छंदाशी घटस्फोट  घ्यावा लागला !


प्रत्येक माणसाचे लग्नपत्रिकेकडे पहाण्याचे दोन दृष्टीकोन असतात. पहिला नोकरी व छोकरी मिळण्यापूर्वीचा, आणि दुसरा दोन्ही मिळाल्यानंतरचा ! दोन्ही दृष्टीकोनातला फरक अगदी 'बारसे आणि श्रध्धांजली'  या प्रकारातला असतो.


 प्रत्येक लग्नपत्रिका आधी कुतूहलजनक असते. पोस्टमनने ती  दारात टाकल्याबरोबर,  प्रत्येक लहान मूल आणि ब्रम्हाचारी त्या लग्नपत्रिकेवर तुटून पडत असतो. त्या पत्रिकेवरील तिकीटापासून ते आपल्या घरच्या पत्त्यापर्यंत अक्षर न अक्षर वाचले जाते. पत्रिकेवरील गणपतीच्या निरनिराळ्या पोझेस, त्यातल्या रिसेप्शनच्या  चिठ्ठ्या सर्वजण  आनंदाने पहातात.


मऊ  सुबक कागदापासून ते खडबडीत साच्यातील कागदापर्यंत शेकडो नमुने पहाताना दमछाक होते. पत्रिकेतील मजकुरात- विशेषत: 'इष्ट मित्र-मैत्रिणीसह अवश्य यावे' वाचताना डोळ्यासमोरून असणार्‍या आणि नसणार्‍या हजारो सहचारिणी तरळून जातात !


एकच वधु  आणि एकच वर यांच्या एकुलत्या एक लग्नासाठी, अगत्यपूर्वक निमंत्रण  देणार्‍या त्यांच्या गोतावळ्याची  पाचपन्नास नावे शोधण्यातही और मजा असते. अशा पार्श्वभूमीवर काही पत्रिकेत  शेवटी    '+++ आणि परिवाराच्या शुभेच्छेसह' असे छापलेले उगीच सपक वाटते . कारण वृत्तपत्रात नाव छापून यायला, काहीतरी कर्तबगारी असावी लागते. नाहीतर  आपल्याच ब्लॉकचा खर्च  आपण  करून जाहिरातीला आपलेच पैसे खर्च करून नाव छापण्यात कसला पुरुषार्थ  हो ! म्हणून माझे तर असे मत आहे की, पत्रिकेत एक वेळ वधुवरांचे नाव- फोटो नाही दिले तरी चालतील, पण त्यांच्या नातेवाईकांची नावे त्यांच्या डिग्रीसकट अवश्य छापली जावीत !  वधूवरांच्या पदव्या सर्वाना नाहीतरी माहीत असतातच की !  शेवटी 'नाव छापून येणे'  ह्याचे कौतुक परिवारातील सर्वानाच असणार ना !


मुद्द्याचे सांगायचे राहिलेच !
निरनिराळ्या रंगातल्या, हरतऱ्हेच्या आकारातल्या,  वेगवेगळ्या छपाईच्या लग्नपत्रिका कितीही आकर्षक असल्या तरी, मी आता त्यांच्या वाटेला जात नसतो !  कारण एकच- त्या बिन तिकिटाच्या पत्रिकेची किंमत आता मला  दहा रुपये तरी असते ! तेवढ्या किमतीत माझा एक पेशल चहा, दोन चॉकलेटस किंवा लोटरीचे एक तिकीट मला  मिळू शकते !    अर्थात काही जणांना दहा  रुपयेही स्वस्त वाटतील.  दहा रुपये आहेर द्यायचा आणि घरात आलेल्या दहा पाहुण्यासकट पाच जणांनी जेवायला जायचे...करा हिशेब.. केवढ्याला पडते हो जेवण ! पण  इतक्या कंजूष वृत्तीचा मी नसल्याने, वधूवराना शुभेच्छा देणे आणि लग्नाला जाणेही मी टाळतो ! कारण जेव्हा मी वरीलप्रमाणे दहा रुपयांचा हिशेब करून सौ.ला बरोबर घेऊन, अगत्याने एका लग्नाला हजर राहिलो, त्यावेळी त्या लगीन घाईत माझ्या खिशातले पाकीट त्यातील चारशेवीस रुपयासकट- कापले गेले आणि सौ. च्या नव्याकोऱ्या चपला (किंमत नव्व्याण्णव रुपये )ही गेले ! करा हिशेब. .. केवढ्याला पडले हो  ते लग्न ?
म्हणून म्हणतो- 'दुरून लग्नपत्रिका साजऱ्या' !  लग्नाचे अगत्यपूर्वक आमंत्रण म्हणजे "बळी जाणार्‍या बकऱ्याचा साजशृंगार !


तुम्ही नोकरीत असाल, तर  लग्नपत्रिका  भरपूर येतील. नोकरीत नसाल, तर कुत्र्याच्या लग्नाची पत्रिकाही तुम्हाला येणार नाही !  नोकरीच्या हुद्द्यानुसार तुमच्यासमोरच्या टेबलावर पत्रिकांचा ढीग वाढत जाईल. 'लहानपण देगा देवा- ' म्हणण्यामागील प्रयोजन हेच असते की, पत्रिका वाचायला मिळूनही, लग्न फुकटात अटेंड करायला मिळावे- घरांतल्या  इतर वडीलधाऱ्या  माणसाबरोबर फुकटात !


 नोकरीचा हुद्दा वाढला की, आहेराचा रतीब वाढतो. जो लग्नपत्रिका देतो, त्याला लग्न फायद्यात,  जो पत्रिका घेतो- त्याचा मात्र केसाने गळा कापला जातो ! कारण 'कृपया आहेर आणू नये'असे छापूनही त्याचा अर्थ-  'कृपया आहेराशिवाय येऊ  नये ' असाच वाचणार्‍याने काढायचा असतो !


अनुभवान्ती- लग्नपत्रिका  ही 'टेबलाच्या ड्रावरमधे दडपण्याची वस्तू' असा निष्कर्ष मी काढला आहे ! लग्नपत्रिका  हातात देणारा सस्मित निघून जातो, आणि घेणारा 'आताच  नेमकी आली का महिनाअखेरला ही ब्याद' म्हणत दुर्मुखतो ! कारण  लग्नसराईत इतके मित्र आणि नातेवाईक उपटतात की कुणाच्या लग्नाला जावे आणि कुणाच्या नको, हे ठरवताना नाकी अगदी दहा येतात !  बर, गेलो तरीही आपली योग्यता आहेरावरूनच ठरवली जाणार ना !  ही पत्रिका म्हणजे 'असून  अडचण नसून खोळंबा' ठरते !


सारांश एकच-  लग्नसराईचे  दिवस आले की, मला नेमका फ्लूचा अट्याक येतो आणि दारात पोस्टमनच्या हातात पत्रिका दिसली की, मला हार्टअट्याक जाणवतो !


आता लग्नसराई सुरू..
फ्लूची लक्षणे दिसत आहेतच  आणि हृदयाची धडधड वाढत आहे...
आणि "लग्नपत्रिका" माझ्या  हातात  देण्यासाठी-
 दारासमोर पोस्टमन उभाच आहे !
.

नांवात काय आहे !


परदेशात कुठेतरी काही नाटके वगैरे लिहून शेक्सपिअर स्वर्गवासी झाला.  

त्याच्या मागे राहिलेल्या साहित्यामुळे तो अजरामर झाला. तो आता भूतलावर अस्तित्वात नसला, तरी  पदोपदी त्याचे अस्तित्व आपण विसरूच  शकत नाही ! इतर आणखी लाखो साहित्यिकानी  जागतिक साहित्यात  लाखमोलाची भर घातली असेल - नसेलही ! पण  केवळ आपल्या  साहित्यातील एकच वाक्य लोकाना  जन्मभर तोंडी घालायला लावायचे सामर्थ्य एकट्या शेक्सपिअरमधेच दिसून येते !
शेक्सपिअरनंतरच्या एकूणएक लेखकूनी  "नावात काय आहे "चा आधार घेऊनच  साहित्यात पदार्पण केलेले आहे !


खरच नावात काय आहे ? 

पहा, मलादेखील हा लेख लिहिताना प्रश्न पडलाच ना ! उत्तर तर तसे सोपेच आहे-  नावात काहीच नाही  किंवा नावात सर्व काही आहे ! नावात काहीच नसत, तर आमच्या लेखाला समर्पक शीर्षक सुचल नसत..
 आणि मग शेक्सपिअरची कुणालाच आठवणही झाली नसती !

याचाच अर्थ... नावात सर्व काही आहे ! 

नाव ठेवणे म्हणजे 'बारशाचे', आणि नाव ठेवणे म्हणजे ' तुच्छ लेखणे' - हा श्लेष एकट्या नावापासून सुरू होतो. मनुष्य जन्माला आला की, त्याचे हसत हसत बारसे केले जाते आणि त्याला सुरेख नामाभिधान प्राप्त करून दिले जाते. तोच मनुष्य मेल्यानंतरही, आपल्या कर्तबगारीने सु-अथवा कु- प्रसिद्धीने नाव मागे ठेवून जातो ! जन्माला येण्याआधीच बाळाच्या नावाबद्दल कौटुंबिक वातावरणात बरीच चर्चा होते, तर म्हातारा मेल्यावर त्याच्या सवयीबद्दल  नावे ठेवली जातात !

अशी कोणती दुसरी गोष्ट आहे की, जन्माआधी आणि मेल्यानंतरही मनुष्याचे अस्तित्व ठेवून जाते- दाखवते ? "नाव" सोडून कोणतीही दुसरी  गोष्ट नाही. माणसाचे शरीरही नाही अस्तित्वात रहात, बाकीच्या गोष्टीची काय कथा ? उरते ते फक्त "नांव !"

एखाद्या शाळेला नाव द्यायचे असले तर  पुढाऱ्या त  गुद्दागुद्दी  सुरू होते ! एकमेकांचे मुडदे पडले तरी हरकत नाही, पण ' आपलेच नाव झळकले पाहिजे ' ही ईर्षा ! येन केन प्रकारेण ...वगैरे वगैरे !
'लढनेवाले सिपाही और  नाम सरदारजीका ' ही म्हणही नावाबद्दल बरेच काही सांगून जाते ! एखादा पोलीस आपला जीव धोक्यात घालून, चोरांची टोळी पकडतो.  पण  पंख्याखाली आरामात बसणार्‍या त्याच्या साहेबाचेच नाव,आणि अगदी त्या चोरांचे नावही फोटोसकट पेपरात छापून आलेले दिसते !  'नावात काय आहे ' हा शेक्सपियरचा मुद्दा कधीच वाचला नसल्याने, आणि साहेबाशी 'तुमची खुशी-माझा सौदा' ह्या न्यायाने वागावे लागत असल्याने, बिचाऱ्या पोलिसाने  मौन धारण केलेले असते!

"मारावे परी कीर्तिरूपी उरावे-" असे म्हणण्यामागे नावाचेच महत्व अभिप्रेत धरले आहे. मरायचे असते एकाने, आणि त्याचे स्मारक झाल्यावर, त्यावर नाव कोरायचे असते मंत्र्याचे- पुढार्ऱ्याचे किंवा गल्लीतल्या दुसऱ्या  एखाद्या वजनदार व्यक्तीचे ! एका दगडात दोन पक्षी ! कुणाच्या स्मारकावर कुणाचे नाव !

नूतन वधु-वरांचा 'नाव घेण्या'चा प्रसंग  आठवा ! दोघानाही एकमेकांचे नाव माहीत असते, तरी 'नाव घ्या-' म्हणताच, दोघेही लाजून अगदी मोतीचूर होतात ! त्यावेळी उखाण्यात घेतल्या जाणार्‍या नावाचे किती कौतुक होते !

नावांचे प्रकार तरी किती ?  टोपण नाव, लग्नाआधीचे नाव, लग्ना नंतरचे नाव, उर्फ नांव, शॉर्टकटचे नाव ! शाळेत प्रवेश घेताना नाव घालाव लागते . मतदार यादीत नाव घालावे लागते. रेशनकारडावर नाव घालावे लागते. जिकडेतिकडे नाव घालण्याचा प्रसंग आहेच. 


हे झाले माणसाच्या नावाबद्दल !

गावालाही नाव, औषधालाही नाव, रस्त्यालाही नाव, वस्तीलाही नाव ! जनावरानाही नाव, पक्ष्यानाही नाव ! एकंदरीत नावाशिवाय काही असूच शकत नाही ! नावालाही नसले, तरी  नाव हे असावे लागतेच !

महिलामंडळात नावाला विलक्षण महत्व असते ! स्त्रीच्या मूळ नावापासून ते टोपण नावापर्यंत- प्रत्येकाला तिथे पदार्पण करावच लागत ! एकदा टोपण नाव चिटकले की- ' पाठीमागे नाव ठेवण्याचा कार्यक्रम ' गैरहजर महिलेच्या बाबतीत साजरा होतोच !

कुणी चित्रपटरसिक आपल्या सिनेमाच नाव 'अ'च्या बाराखडीत ठेवण्याचा निश्चय करतो, तर  कुणी नाट्यरसिक आपल्या नाटकाच नाव अमूक इतक्या अक्षरातच गुंफण्याचा आग्रह धरतो.
 रोगाची साथ असते तद्वतच नावाचीही साथ  असते ! आपला मुलगा वेडावाकडा आणि वाटेल तसा ओरडू  शकतो,  हे एकदा माहीत झाले की, समस्त आया पोराना कौतुकाने 'हिमेश' म्हणू लागतात ! ती पोरही खुशीत येऊन घरातील भांडी दणादण बडवू लागतात. एकदा संजयच्या साथीत सापडलेली पोर, 'डोळे उघडेपर्यंत ' संजयच्याच नावाचा आग्रहात पडतात ! सदोदित अपयश येत असलेल्या, 'यशवंत' नावाचा दबदबाही थोडा असतो का ? 


नाव घेणे, नाव ठेवणे, नावारूपाला येणे, नाव होणे, नाव पडणे -  कितीतरी वाक्प्रचार आहेत, आपल्या माय- मराठी भाषेत ! प्रत्येकाला स्वतंत्र अर्थही आहे ! नावात अभिनयसामर्थ्य आहे. एकमेकांसमोर एकमेकाला नावाजत, पाठीमागे नाव ठेवायला किती अभिनयकौशल्य लागते ! नावामुळे प्रसिद्धी मिळते. एकदा पेपरात नाव छापून आले की, सर्वमुखी नाव होण्याची दुर्मिळ संधी असते ! नावाला वशिलाही लागतो. एम्प्लोयमेंटच्या यादीत नाव वरवर सरकायला आधार लागतो !

जग जगते आहे-  कशासाठी ? - --- पोटासाठी !

छे !
मग कशासाठी ? 
फक्त आणि फक्त ... "नावा"साठी !

 नाव आहे, तर - पैसा, प्रसिद्धी, मान, सन्मान आहे ! नाव नाही, तर नावालाही काही शिल्ल्क रहाणार नाही !  
नाव व्हायला तशी कारकीर्द असावी लागते, नाव ठेवायला धाडस असावे लागते,  नाव मागे राहायला- आधी नाव मिळवावे लागते !

नावात "यशापयश" आहे, नावात "किर्ती" आहे, "अपकिर्ती"  आहे,  नावात "मानापमान" आहे - म्हणून नावातच सर्वकाही आहे !

कित्ती  'छान लिहिले आहे-' असे  म्हणून, 

आता लक्षात ठेवणार ना, तुम्ही माझे "नाव" !
.

माझ्या गावात कधी आता -


माझ्या गावात कधी आता 
माझा मामा रहात नाही -
आजोळी जाण्याचा त्यामुळे 
प्रसंग कधी येतच नाही......

धूर सोडणारी झुकझुक गाडी
साधे झाडही दिसत नाही 
शहरात राहिला मामा आता 
त्याला नोकरी मिळत नाही ... 

वेळ नसल्यामुळे तो 
मला कधी बोलवत नाही 
मामी सुगरण आहे का
त्यामुळेच माहित नाही... 

वर्षात कधीतरी एकदाच
शिकरण-पोळी खाते म्हणे - 
एवढे मात्र ऐकून आहे
बाकीच काही ठाऊक नाही...

मामाची रंगीत गाडी नाही 
मामाची उंचउंच माडी नाही 
लपली काळाच्या पडद्याआड
आजी बरळते काहीबाही.... 


माझ्या गावात कधी आता 
माझा मामा रहातच नाही ! 
.

संसार ...तुझा नि माझा !



दोन दिवसांचा धुणी-भांड्यांचा हा ढीग साठलेला. वीज बंद पडलेली. 
येते म्हणून...ऐनवेळी, सकाळी धुणी-भांडीवाल्या मोलकरणीने दांडी मारली. 
मग नोकरीवाल्या बायकोचीही नाइलाजाने एक दिवस दांडीच !
बायकोचा राग त्या बिचाऱ्या धुण्यावर ! 
सात्विक संतापाने ती जोरजोरात एक पिळा आपटत म्हणाली,
" इकडची काडी तिकड उचलून द्यायला नको. 
इथलही काम करा- तिथलही करा, घरी तेच दारी, मदतीच्या नावाने बोंबच ! "

तिच्या रागाकडे दुर्लक्ष करून, शक्य तितके गोड हसत, मी म्हणालो,
" हे बघ, आता चिडचिड करून उपयोग आहे का ? 
मी काय म्हणतो, ते ऐक जरा शांतपणे- "

धुणे थांबवत, तिने होकारार्थी मान डोलावून पुढे बोलायला परवानगी दिली.

मी म्हणालो, 
" हे बघ ! तू ही धुणी-भांडी पटापट आटपेपर्यंत, मी पेपरवाचन संपवतो.
नंतर मी तुला ग्यास पेटवून देतो, तू तेवढं स्वैपाकाचं बघ.
स्वैपाक झाला की मला सांग, मी तांब्या-पेला-पाण्याचे बघतो.
तू पानं वाढून घे. दोघं निवांत जेवण करू. कसं ? "

बायकोने नकळतच आपली मुंडी हलवली . 
एक हात स्वैपाकघराकडे दाखवत, मी म्हणालो, 
" तुझी उष्टीखरकटी काढून होईपर्यंत, 
मी फेसबुकातलं माझं काम आटपून घेतो.
सगळी आवराआवरी झाल्याबरोब्बर मला बोलाव.
चट्कन येऊन मी खट्कन ग्यास पेटवतो, 
तू झट्कन चहा केलास की दोघं मिळून पट्कन तो पिऊन टाकू- 
तेवढाच आपल्या दोघांच्याही जिवाला विरंगुळा. होय की नाही ? " 

उत्तरादाखल बायकोचे चेहऱ्यावरचे बदलते भाव मी पहात होतोच.
 बोलणे रेटत मी म्हणालो, 
"अग, आपला संसार आपण दोघांनी मिळून नीट करायचा नाही- तर कुणी ?
हं , आत्ता मला काही सांगत बसू नकोस बरं का. 
आटप लौकर. तुझं झालं की सांग मला-
हा पेपर वाचून काढतो आणि ग्यास पेटवतो की नाही, बघच तू ! "

माझी 'तडजोडीची अजब भाषा' ऐकत, सगळा राग विसरून-
हातात धुण्याचा पिळा तसाच धरून बायको घरभर हसत सुटली झालं !
.

" शुभ हस्ते - "



गेल्या महिन्यात, मी माझ्या एका मित्राबरोबर पैज लावली. पैज तशी साधीच होती. 

संपूर्ण महिन्यातले कुठलेही एका दिवसाचे वर्तमानपत्र घ्यायचे आणि,
 त्यात " xxxxxx यांचे शुभ हस्ते xxxxxx चा समारंभ उत्साहाने पार पडला "--- असे वाक्य छापून  आलेले नाही, असे मित्राने मला दाखवून द्यायचे !

अर्थात परवाची पैज मीच जिंकली-  आणि मित्राच्याच "शुभ हस्ते " मी पैजेची रक्कम स्वीकारली, हे वेगळे सांगणे नलगे !

माझी ती  रोजचीच सवय आहे म्हणा ना ! सकाळी चहाच्या कपाबरोबर,  हातात वर्तमानपत्र " डोळी  लावायला " (- 'तोंडी लावायला'च्या धर्तीवर) हवेच असते. अधाशीपणाने मी प्रथम कुठे काय कार्यक्रम-समारंभ-उद्घाटन झाले आहे, ते पहातो आणि नंतर ज्या व्यक्तीच्या 'शुभ हस्ते' तो कार्यक्रम आहे, त्या व्यक्तीचे नाव पुन्हा पुन्हा पाठ करत  राहतो.
 येथे एक मुद्दा स्पष्ट करावासा वाटतो की,  मी 'विष्णूसहस्रनामाचा' जप बहुतेक विसरतच  असतो ! कारण सध्या  परिस्थिती अशी आहे की, स्वर्गातल्या व्यक्तीपेक्षा भूतलावरील व्यक्तीनाच आवाहन केलेले स्वहितकारक ठरते !  परमेश्वरापेक्षा पुढारी लवकर पावतो,  हा सामान्य जनतेचा विश्वास आहे. म्हणून ' पती हाच परमेश्वर'च्या चालीवर 'पुढारी हाच परमेश्वर'चा कानमंत्र  आम्ही नेहमी जपतो.

प्रत्येक मातेला आपले रडके पोर प्यारे असते, तद्वतच प्रत्येकाला आपला हात 'शुभ हस्त' वाटत असणारच. असे  असतानाही, सर्वानी मिळून "अमूक यांचे शुभ हस्ते" म्हणणे, हे आपले हात 'अशुभ' असल्याचे सिद्ध करणे नव्हे काय ?

एखाद्या खिसेकापूचे हात इतरेजनाना 'अशुभ' वाटत असले, तरी  ते त्याला स्वत:ला 'लक्ष्मी प्राप्त करून देणारे'च वाटत असतात, म्हणजे पर्यायाने 'शुभ' वाटत असतात ! एकीकडे खिसेकापूच्या हस्तलाघवाचे  कौतुक करायचे आणि दुसरीकडे वर्तमानपत्रात बातमी छापताना  मात्र त्याच्या 'शुभ हस्ते' हे शब्द गाळायचे , हा काय न्याय झाला ?

हल्ली कितीतरी सहकारी संस्थांचे 'गोंधळ-व्यवहार' चालू  असल्याचे उघडकीस येत आहे.  'विना  सहकार नाही अपहार' हे पदोपदी घडत आहे, तेव्हां या संस्थांचे  उद्घाटन ज्या सन्माननीय xxxxxx रावजी साहेबाचे 'शुभ हस्ते' झालेले असते, त्या हस्तांची  सांगड या गोंधळाशी कशी बरे घालावी ? एखाद्या प्रसंगी, 'शुभ हस्ते' फुटणारा नारळही नासका निघतो, त्यावेळी ते हात 'शुभ' असतात काय !

या सर्व गोष्टीवरून- एकच सिद्ध होते की सत्ताधारी, वजनदार, श्रीमंत व्यक्तींचेच हात नेहमी 'शुभ हस्त' असतात; इतरांचे फक्त  कार्यक्रमानंतर टाळ्या बडवण्यापुरते असतात !

एखाद्या केश कर्तनालयाचे उद्घाटन असो, एखाद्या साडीसेंटरचे ओपनिंग असो किंवा बांगड्यांच्या कारखान्याचा रौप्यमहोत्सव असो, तेथे 'शुभ हस्ता'चे आगमन ठरलेलेच असते.  हे 'शुभ हस्त' मोठे कल्पक असतात, बर का !  वारा वाहील त्या दिशेला पाठ फिरवण्यात तरबेज असतात ! समजा, एखाद्या ठिकाणी काही कारणाने नासधूस- दंगल- जाळपोळ झाली आहे,  अशा ठिकाणी (आम्ही नेहमीच्या सवयीनुसार-) वर्तमानपत्रात "xxxxxxचे शुभहस्ते सदर कार्यक्रम  व्यवस्थित पार पडला" अशी बातमी दिली की, ते शुभ हस्त गरम व्हायला तयारच ! याचा अर्थच असा की, तापलेल्या तव्यावर पोळी चांगली भाजली तर ती आमच्या 'शुभ हस्ते',  करपली तर मात्र, ती  इतरांच्या अशुभ हस्ते  ! 

सर्वांचे हात सारखेच असतात. आपले कर्तृत्व त्याना शुभ किंवा अशुभ बनवते, हे मानणारे समाजात फारच विरळ ! बहुतेक साऱ्यांची  वृत्ती अंधानुकरणाचीच   असते !
एखाद्या दुकानदाराने स्वत:च्याच हाताने  आपल्या दुकानाचे उद्घाटन करून पहावे ! एखाद्या पंगुत्व-निवारण  केंद्राने अपंग व्यक्तीच्या हाताच्या  साहाय्यानेच सुरूवात करावी. झुणका भाकर केंद्राचे  उद्घाटन एखाद्या भिकाऱ्याच्या   शुभ हस्ते करावे ! पण असे कदापि होणे नाहीच !  आमची गुलामगिरीची भावना आम्ही एवढ्या लौकर नष्ट होऊ देणार 
नाही ! आमची  चमचेगिरी, लांगूलचालन कदापि आम्ही नष्ट होऊ देणार नाही ! आमच्या साहेबांचे, आमच्या मालकांचे, आमच्या पुढाऱ्याचे  हात तेवढे 'शुभ हस्त' आहेत आणि आमचे स्वत:चे हस्त मात्र करंटे, अशुभ आहेत, हे आम्हा सर्वाना मान्यच आहे ! हे  'शुभ हस्ता'चे हांजी हांजी करणे, कधी थांबणार आहे-    कुणास ठाऊक !
  
जे हात खरोखरच शुभ असतात, ते काही न बोलता कार्य करत असतातच. पण जे हात शुभ असल्यासारखे 'वाटतात',  ते  काहीही बोलत नसतात आणि करतही  नसतात ! समाजही  ज्यांचे हात शुभ ठरवतो (- खरे तर ते वाटतही नसतात !) ते शुभ हात, प्रत्यक्ष कार्यक्षमतेच्या नावाने शून्य..
 पण  बोलबाला मात्र खूपच करतात !

ज्या व्यक्तीच्या शुभ हस्ते उद्घाटने अनेक, अगणित त्या व्यक्तीचा मोठेपणा अस्तित्वात जास्त जास्त मानला जात असतो.  अर्थात, आज शुभ असणारे उद्या असतील, याची शाश्वती नसतेच !

 एखाद्या जेलचे उद्घाटन जन्मठेपेच्या कैद्याच्या शुभ हस्ते करणे - जेवढे सयुक्तिक, तेवढेच शिमग्याच्या होळीभोवती, एखाद्या विरोधी पक्षनेत्याच्या शुभ हस्ते शंखध्वनीने  उद्घाटन करणे योग्य नव्हे काय ? पण  योजकस्तत्र दुर्लभं !  

आमच अस म्हणणे आहे की, एखादा समारंभ यशस्वी झाल्यावरच, त्याचा  उद्घाटन समारंभ साजरा करावा, म्हणजे 'शुभ हस्ते' या म्हणण्याला काहीतरी अर्थ राहील !  नाहीतर  प्रचंड धरणाचे उद्घाटन आधी करायचे -आणि त्याचे पाणी न मिळताच, लोकानी  'पाणी पाणी' करतच प्राण सोडायचे-  या असल्या 'शुभ हस्ते' झालेल्या उद्घाटनास लोकानी  अशुभच  ठरवल्यास, चुकते कोठे ?

हा लेख दिवाळी अंकात छापून  आला, तरच आम्ही म्हणणार की, संपादकाचे 'शुभ हस्ते' आमचे नाव छापून  आले म्हणून ! अन्यथा आमच्या 'शुभ हस्तां'ची आम्ही शिमग्यापर्यंत वाट पहाणारच ना !
.


थोबाड


जबडा, चेहरा, तोंड, मुख, मुखचन्द्र - वगैरे वगैरे जबरदस्त शब्दानी अभिप्रेत असणारा,
 सर्वात सोपा शब्द म्हणजे  " थोबाड ! "

धिंगाणा असो, मारामारी असो अथवा दंगामस्ती असो - फोडण्यासारखी , निदान  तसा दम देण्यासारखी, शिवी म्हणजे  " थोबाड फोडीन ! "  समस्त साहित्यप्रकारात हा वाक्प्रचार वापरला जातो. ' थोबाड ' या शब्दात काहीतरी आगळीवेगळी जादू आहे. हा  शब्द उच्चारताच- आपल्याला विद्रूप, वेडावाकाडा, भलामोठा, प्रशस्त जबड्याचाच 'चेहरा' आठवतो..


'थोबाड' हा शब्द नुसता उच्चारा की हाताच्या मुठी लगेच वळल्याच म्हणून  समजा ! ज्याला घरातला साधा लाडू फोडता येणार नाही, असा खत्रूड इसमदेखील गुद्दागुद्दीवर  येताच, 'थोबाड फोडण्या'ची भाषा बोलू लागतो. थोबाडाच्या  अंगी वीररस उत्पन्न करण्याची शक्यता असावी .


आपला तो सुरेख  'तोंडावळा' आणि दुसर्‍याचे ते "थोबाड''- अशीच  सुरेख समजूत, भूतलावरचा मनुष्यप्राणी करून घेत असतो. प्रियकर आणि प्रेयसी प्रेमभंगाआधी गुलुगुलू   गप्पागोष्टी करीत असतात. एकमेकांच्या  मुखकमलाशी चुम्बाचुंबी करत  असतात. पण प्रेमभंगानंतर तेच युगुल शाब्दिक झोंबाझोंबी करून एकमेकांचे 'थोबाड' जन्मात कधीच न पहाण्याची प्रतिज्ञा  करतात !

 
'थोबाडा'चा सर्वत्र संचार असतो. 

रामायण काळातहि  राम-रावणाच्या युद्धात वानर आणि राक्षसानी एकमेकांची थोबाडे फोडल्याचा दावा केला.  रामाने ( का  लक्ष्मणाने ? -) शूर्पणखेचे नाक तोडून, तिचे थोबाड विद्रूप केल्याचे सांगतात.  वास्तविक, त्याला हात -पाय-गळा तोडता येत होते, तरी पण त्याने कटाक्षाने  'थोबाड' विद्रूप करण्याचाच का बरे प्रयत्न केला असावा ? 
कारण 'थोबाडा'चे महत्व !

रामायण काळातलाच दाखला कशाला हवा !  हल्लीच्या स्टंटपटात देखील खलनायक नायकाला (जादूगाराप्रमाणे-) ' इकडचे थोबाड तिकडे' करण्याचीच भाषा बोलत असतो ! तुम्ही जरा बारकाईने विचार कराल तर असे आढळून येईल की, 'थोबाड' हा खरोखरच एक भारदस्त शब्द आहे !  भांडणात एखाद्याला तुम्ही नुसतेच म्हणा - 

" काय समजलास साल्या, थोबाड सडकीन ! "  तुमचा प्रतिस्पर्धी, नामोहरम झालाच समजा.

मराठी भाषेत ह्या शब्दाचे अनन्यसाधारण महत्व आहे. 'थोबाड हिंग खाल्ल्यासारखे करणे' हा वाक्प्रचार  'दुर्मुखले  दिसणे 'ला किती समानार्थी आहे ?  खरपूस मार देणे- या वाक्याचे ' थोबाड रंगविणे ' हे किती सुटसुटीत रूप आहे ना ! येता-जाता दुसऱ्याला हिणवण्यास्तव किंवा दुसर्‍याचा वरचष्मा सहन होत नसल्यास, अथवा एखाद्याला गुर्मीत  बोलायचे झाल्यास- तुम्ही फक्त 'आरशात पहा जरा थोबाड ' असे म्हणा.  दुसर्‍याचे तोंड खाली झालेच समजा !


आपण सांगितलेल्या एखाद्या घटनेवर कुणाचा विश्वास नसला किंवा आपल्याच सत्यतेचा तिसर्‍याला दाखला द्यायचा असला की आपण म्हणतो-  " वाटल्यास त्याच्या थोबाडावरच रुजूवात करून देतो ".  हा सूर्य, आणि हा जयद्रथ म्हणण्यापेक्षा, हे असे म्हणणे किती सोप्प आहे ना !


तुम्ही कधी डिटेक्टिव्ह कथा वाचता का ?  वाचत नसल्यास, वाचून पहा-  त्यातले हिरो प्रतिस्पर्ध्याला इतके बदड बदडतात की  त्याचा चेहरा नेमका 'थोबाड वेडेवाकडे' होण्याकडेच वळतो !  यावरून- फोडता येण्यासारखा, रंगवता येण्यासारखा,  वेडावाकडाही करता येण्यासारखा-  असा जो अवयव आपला आहे, त्यालाच थोबाड म्हणतात आणि तो अवयव कितीही कठीण असला तरी लवचिकच असल्याचे सिद्ध  होते !


बाप कितीही प्रेमळ असला तरी तो चिरंजिवाचे लाड किती काळ सहन करील हो ?  चिरंजीव आवरेनासे झाले , भोकाड पसरून कंठशोष करू लागले की, बाप ऊर्फ पित्यामधला 'माणूस' जागा होतो आणि तो ह्मखास गराजतो - ' कार्ट्या, गप्प बसतोस का  फोडू थोबाड आता ! "


दिवाळी दोन दिवसावर आली, फराळाची जय्यत तयारी झाली की, घरात आनंदाचे भरते येते. अशावेळी आपल्याला, अगांतुक पाहुण्यांचे पत्र  (सहकुटुंब सहपरिवार-) येत असल्याबद्दल  आले की, सर्वांची 'थोबाडे' कशी 'पाहण्या'लायक दिसतात !  महिना अखेरचा दिवस आला की, एखादा सेवक हमखास लाचार बनतो आणि अजीजीने  आपल्यापुढे थोबाड वेन्गाडून उसन्या पैशांची मागणी करतो !  शिक्षक वर्ग न ऐकणार्‍या मुलाच्या तोंडात नक्कीच थोबाडीत देतात !  काही जणांना फारच लोचट शेजारी भेटतात. ते काळवेळ पहात नाहीत, लाज लज्जा  शरम बाळगत नाहीत-  वाट्टेल त्या वेळी, वाट्टेल त्या वस्तुसाठी, ते  'थोबाड पसरतात.'


ह्या "थोबाड पुराणा"मुळे मला मात्र फक्त  दोघांचेच कौतुक वाटते... 

पहिला आपला नापित  आणि दुसरा मेकप करणारा ! जगात ह्या दोनच वल्ली  अशा आहेत की, त्या 'मी मी' म्हणणाऱ्याचे 'थोबाड' (आरशात ) पहायला' लावतातच; आणि 'थोबाड' अक्षरश: रंगवतातच !

सुट्टी आहे म्हणून दिवाळी आहे. दिवाळी आहे म्हणून फराळ आहे. आणि फराळ आहे, म्हणून चांगल आहे. तद्वतच शरीर आहे म्हणून अवयव आहे, अवयव आहे त्यापैकी एक थोबाड आहे .. 
आणि ते आहे म्हणूनच, हे "थोबाड पुराण" वाचून आपल्याला आनंद मिळत आहे... नाही का  !
.  
 

नशिबाचे भोग -



" फुलू दया ना मला जरा ,
बघू दया ना जग जरा -
तुम्ही सजीव, मीही सजीव 
कळून घ्या भावना जरा -"

एक कळी स्फुंदत होती ,
वेलीजवळ मी असताना -
मन आपले उलगडत होती 
हितगुज माझ्याशी करताना !

" काही करू शकत नाही 
जगाविरुद्ध जाता येत नाही - 
मरणाऱ्याला जगवते जग 
जगणाऱ्याला मारते जग -"

...केविलवाणे होत म्हणालो ,
दु:ख जाणूनही कळीचे .
खिन्न हसून ती वदली .. 
" नशिबाचे भोग ज्याचे त्याचे ! "
.

शंभर


" या !  शंभर वर्षे आयुष्य आहे तुम्हाला- अगदी नाव काढल्याबरोबर हजर झालात ! " 
- अशा  प्रकारचे स्वागत रोज  कुणाच्यातरी घरी कुणाचे तरी होत असतेच !
यात स्वागताचे काही नवल नाही, परंतु 'शंभर' या शब्दाचे आहे ! दुसऱ्यांना  'शंभर'च वर्ष आयुष्य का दान करतात,  नव्व्याण्णव किंवा एकशेएक किंवा इतर कोणत्या अंकाचे आयुष्य का  दिले जात नाही ?


" शंभर " हा आकडा खराच कुतूहलजनक आहे .
 

अर्थात पुरातनकालापासूनच याची प्रसिद्धी असणार ! रोजच्या जीवनात सर्वात जास्त उपयोग केला जाणारा, हाच एकमेव अंक असावा. ऋषीमुनी किंवा तत्सम वडीलधारी मंडळी लहान मंडळीना आधी 'आयुष्यमान भव !' हा आशीर्वाद देत असावीत. कालांतराने 'शंभरा'चे महत्व पटल्याने तो आशीर्वाद ' शतायुषी  भव!' असा बनला. महाभारतातील गांधारीला कदाचित, केव्हातरी 'शतपुत्रा सौ. भव' असाच आशीर्वाद  मिळाल्याने, शंभर कौरव तदनंतर जन्मास आले. त्याअर्थी  'शंभर' या आकड्यात, शंभर टक्के काहीतरी गूढ चमत्कार असावा !

पुराणकाल लोटून 'शेकडो' वर्षे लोटली, पण आजच्या आपल्या सरकारनेही बरोबर 'शंभर' पैशांचाच एक रुपया का बरे बनविला असावा ?  क्रिकेटच्या खेळात 'शंभर' धावा पूर्ण करण्यास आणि 'शंभर' बळींची संख्या गाठणार्‍यास मानाचे पान का  बरे मिळते ?  आंब्याच्या सीझनमधे मंडईत  पाऊल टाकले, तर तुम्हाला 'शेकडा' याच भावाने, एकशेवीस आंबे मिळतील ! परीक्षेत प्रत्येक विषयाचा पेपर, 'एकावर दोन शून्ये 'इतक्या मार्कांचा का असतो, व त्यातीलच एखादे शून्य आपल्या 'पेपरी' पडत असते. परीक्षेत मिळणाऱ्या  गुणांची टक्केवारी देखील 'प्रती शत'च काढली जाते.

एकंदरीत 'शंभर' हा अंक कुणाच्याही नजरेतून सुटलेला नाही !  मिळेल त्या संधीला तो उपयोगात आणला जातो. माणसाच्या आयुष्यात 'सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वता एवढे' हे तत्वज्ञान 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे ' याच शब्दानी पुरेपूर अर्थपूर्ण वाटते  ! लहान मुलगा मोठ्याना नेहमीच सांगतो, " मी मोठा झाल्यावर, रोज शंभर रुपये पगार मिळवणार !"  किंवा  " मी आता खाऊच्या पैशातून शंभर रुपये जमवणार आहे !" लहान मुलानाही 'शंभरा'चेच काय कौतुक वाटत असते, कुणास ठाऊक ! रहस्यकथेतील डिटेक्टिव्हदेखील बातमीदाराला बक्षिसी म्हणून चक्क 'शंभर' रुपयाची नोटच देऊन टाकत असतो !

साहित्य घ्या किंवा राजकारण घ्या, सर्वत्र 'शंभर'चाच प्रभाव पडलेला दिसतो. ऐतिहासिक भाषेत बोलावयाचे झाल्यास 'अमुक राजा तमुक शतकात झाला' असे आपण म्हणतो. तर भौगोलिक भाषेत असे म्हणतो की, गेल्या 'शंभर' वर्षातील भूकंपच्या धक्क्याच्या नोंदीत असली नोंद कधी नव्हती ! शंभर वर्षाहून कमी आयुष्याची माणसेदेखील 'गेल्या शंभर वर्षात असला दुष्काळ पडलाच नव्हता', असा दाखला देताना ऐकून अचंबा वाटल्याखेरीज राहात नाही !

या शतकातील 'शंभरा'चा सरकारवरील आणखी परिणाम म्हणजे मेट्रिक  वजनमाप पद्धतीचा पुरस्कार ; त्यातही एका मीटरचे शंभर सेंटीमीटर होतात, तर एका क्विंटलचे नेमके 'शंभर'च किलोग्राम होतात !  म. गांधींच्या जयंतीचे 'शंभरा'वे वर्ष किती उत्साहाने साजरे केले गेले ! बँका  व पोस्ट यांचे व्याजाचे दरही दरसाल दर'शेकडा' याच पद्धतीने आकारले जातात. आपला भारत देश एकविसाव्या दशकात  वा एकविसाव्या सहस्रात  स्वतंत्र  न होता, योगायोगाने तो विसाव्या 'शतका'तच स्वतंत्र झालेला आहे !

'शंभरा'ची साथ  भयंकरच पसरलेली आहे ! एखाद्या गोष्टीची वस्तुस्थिती पटवून द्यायची असल्यास, शंभर टक्क्यांच्याच खात्रीचाच आधार घ्यावा लागतो. दुकानदाराला आपला 'शंभर' नंबरी माल  असल्याची 'शंभर' टक्के खात्री गिऱ्हाइकाला द्यावी लागते ! फडतूस चित्रपटाचा 'शंभरा'वा दिवशी किती थाटात साजरा करतात ! मजनू आपल्या लैलाला "सौ साल पहले भी प्यार"  असल्याची खात्री देतो , पण प्रेमभांग झाला की, त्याच मजनूच्या दिलाचे "सौ तुकडे" झालेले आपल्याला आढळतात ! श्रीकृष्ण शिशुपालाच्या शंभर अपराधांचीच वाट पहात होता, त्या नंतरच त्याने शिशुपालाचे मस्तक सुदर्शनचक्राने  धडावेगळे केले. त्यावरूनही कदाचित 'शंभर वर्षे भरणे' म्हणजे मृत्यू समीप येणे - हा वाक्प्रचार प्रचारात आला असावा !

जेवण झाल्यावर, मी अभ्यासाला लगेच बसलो की, आमच्या तीर्थरुपांचा आवाज चढत असे -

 " शंभर वेळा सांगितले की , जेवण झाल्यावर 'शतपावली' करीत जा- म्हणून! " 
आणि मग शतपावली म्हणून मला  हजार पावले इकडून तिकडे फिरावे लागत असे !

वयाची 'शंभरी' गाठणे, हा पराक्रम अलीकडे 'शंभरा'त एखाद्यालाच जमतो. ते निरोगी, निकोप प्राकृतीचे लक्षण  होय. त्यामुळेच दैनंदिन जीवनात 'शंभरा'चे महत्व वाढत असावे !

आणखी एक गंमत म्हणजे, 

तुम्ही 'शे' म्हणा किंवा 'शेकडा' समजा, 'शतक' असे लिहा अथवा 'एकावर दोन शून्ये' मांडा-- 
त्या सर्वांचा अर्थ एकच -  " शंभर " !  

.

बंद बंद . सगळ बंद .. फक्त ...!


तब्बल सलग तीन दिवसांची सुट्टी -

आनंद पोटात माज्या माईना .. माईना !

सूड घेण्यासाठी,
आपणही पाहुणे म्हणून कुणाला तरी ताप द्यायला जाऊ,
असा दुष्ट हेतू मनात आला . आणि तो दुष्ट हेतू लगेच,

 अमलात आणायचा ठरवला. शुभस्य शीघ्रं !

बायकोला प्रवासासाठी तयार व्हायला सांगितले .

पाच मिनिटांत तयार होतेच म्हणणारी बायको....
पाच तासात कशीबशी तयार झाली .

दाराला कुलूप लावले... !

आणि तिने विचारायला सुरुवात केली -
" अहो, मी ग्यास बंद केलाय ना ? "

मी - " हो, मघाशीच बघितला, तू बंद करताना..."

बायको - " त्या कपाटातलं लॉकर बंद केलं का व्यवस्थित ?"

मी - " हो, मी तुझ्या हातात चंद्रहार देऊन, व्यवस्थित बंद केलंय..."

बायको - " पण बाथरूममधले नळ -"

मी - " हो, बंद केलेत सगळे..."

बायको - " टीव्ही कनेक्शनचं बटन बंद केलं ? "

मी - " अग, आपण ती रोजची भिकार सिरीयल पाहिल्यावर नाही का, 

बंद केल मी स्वत: ! "

बायको - " फ्रीजच दार बंद केलय ना नीट ? "

मी - " थंड पाण्याची बाटली घेऊन, नीट बंद केलंय ."

बायको - " आता बंद करायचं काही राहिलं नाही ना ? "

मी - " राहिलं आहे ना - "

बायको - " आता अजून काय राहिलं बाई बंद करायचं... ? "

मी - " आपलं तोंड !! "
.

उरली फक्त आठवण ..


बहरलेला वृक्ष होतो,
एकदा मी छानसा
गळुन गेली फूल पाने..
एकटा मी हा असा !

नाचती पक्षी कसे
बघुनिया खांद्यावरी
खेळताना होइ मजला
हर्ष माझ्या अंतरी -

फूल फळ हुंगावया
जमति जेव्हां पाखरे -
हृदय माझे भरुनिया
जातसे तेव्हां खरे

सावली शोधावया
पांथस्थ ते येती कुणी -
बाहु पसरुन स्वागताला
धन्यता वाटे मनीं

आज काही नाही उरले
भोवती माझे इथे -
एकटा मी दु:ख माझे
सांगतो मजला इथे !
.

आपलेच तोंड अन् आपलाच धोंडा !


सकाळी सकाळी...
 "हजरजबाबी बायको"बरोबर
का बाहेर पडलो कुणास ठाऊक !
बरोबर येण्याचा आग्रह करून,

 अगदी तोंडावर धोंडा पाडून घेतल्यासारखे...
आता  वाटतेय .

सांगतो ..


सविस्तर सांगतो तुम्हाला - - -

तर...
 सकाळी प्रभात फेरीसाठी आम्ही दोघे बाहेर पडलो .
रस्त्याच्या कडेला त्यावेळी,
एक गाढव जोरात, आपल्या स्वत:च्या छानशा सुरात, ओरडू लागले होते .
मी जुनाच वाचलेला किंवा ऐकलेला विनोद आठवून,

 जरा ऐटीतच    बायकोला म्हणालो,
" तुझा नातेवाईक इथं का गातोय ! "

बायकोच ती !


आलेली सुवर्णसंधी सोडून,
 गप्प कशी बसेल-
ती ताडकन उद्गारली -
"भावजी ऐकतच नाहीत ना !
भावजीना कित्तीवेळा सांगितलं;
असं घराबाहेर येऊन,
 गात जाऊ नका म्हणून !"
. . .

कशासाठी .. फोटोसाठी !


आम्हा नवराबायकोत आजवर भांडण झालेले - - -
ऐकण्यात, पहाण्यात आले नसेल तुमच्या !

आमचे वैवाहिक जीवन एक(च)मताने चालू आहे...

बायकोने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त,
छायाचित्र काढण्यासाठी आग्रहाने नेले.
छायाचित्रासाठी आम्ही दोघे (अंतर ठेवून-) ऐटीत उभे राहिलो.

तिची नेहमीचीच सवयीची- प्रसन्न विजयी मुद्रा -
आणि मी हसण्याच्या (केविलवाण्या-) प्रयत्नात !

नेमके माझ्याकडे पहात छायाचित्रकार म्हणालाच ,
"काका, आणखी थोडे हसा की !"

बिचकत बिचकतच...
आधीच विचारलेले बरे,
ह्या सद् हेतूने मी बायकोला विचारले,
" हसू शकतो ना मी आता...
 

फोटोसाठीतरी ? "

.

तुम मुझे खून दो .....


इंग्रज गेले ,
आजादी मिळाली,
पण आपल्याच सरकारकडून,
सामान्य माणसाचे रक्तशोषण चालूच आहे !

कशासाठी ही आजादी ?
कुठे आहे ते स्वातंत्र्य ?
कोण आहे आज स्वतंत्र ?
कुणाला आहे देशासाठी अभिमान ?

सगळेच लाचार, लाळघोटे, स्वाभिमानशून्य, कणाहीन, स्वार्थी  !
सत्तेसाठी - पदासाठी - खुर्चीसाठी हपापलेले  !

कुणाला आहे का खरीच काळजी  -
सामान्य जनतेची, कामगाराची, कष्टक-याची,बळीराजाची  ?
खायला पुरेसे अन्न नाही, प्यायला पायपीट केल्याशिवाय पाणी नाही, 


अंगावर ल्यायला धडूते नाही  ?

काय उपयोग झाला -
आम्ही दिलेल्या रक्ताचा आणि तुम्ही आम्हाला मिळवून दिलेल्या 

स्वातंत्र्याचा ...................? ,

" तुम मुझे खून दो , मैं तुम्हे आजादी दूंगा .." असे म्हणून,


" - नेताजी सुभाषचंद्र बोस - ",

तुम्ही म्हणून आमच्यातून निघून जाउनच, खरे स्वतंत्र झालात !

आज तुमची आठवण होत आहे ....

आपणास विनम्र वंदन ! ! !
.

गातेस घरी तू जेव्हां...


(चाल: नसतेस घरी तू जेव्हां-)

गातेस घरी तू जेव्हां
जीव सुटका-सुटका म्हणतो,
शांतीचे विणता धागे
संसार नेटका होतो !

छत भंगुन वीट पडावी
हल्लाच तसा ओढवतो -
ही पाठ कणाहिन होते
अन् चेहरा बारका होतो !

ये घरमालक दाराशी
हळु गावे तो खडसावे -
खिडकीच्या आपटुन दारा
तो बोंबा मारून जातो !

वळ पाठी उमटवणाऱ्या
मज स्मरती मास्तर, शाळा -
वेताने मज बडवावे
मी तसाच बघ थरथरतो !

तू सांग बये मज, काय
मी सांगू घरमालकाला ?
गाण्याचा तव जल्लोष
माझ्यासह किरकिर ठरतो !

ना अजून झाला तंटा
ना ताळतंत्रही सुटले
तुज "गाऊ नको-" म्हणताना..
गाण्यातच सामील होतो !!

.  .  .

पिंकी आणि परी



परीने विचारले, पिंकीला -
' आमराईत यायचं का तुला ?
मोराचा पिसारा पहायला
मोराबरोबर नाचायला ! '

पिंकी गेली पटकन
मोर आला झटकन -
पिसारा फुलवला मोराने 
मान हलवली तोऱ्याने !

पिसाऱ्यातले सात रंग
पिंकी मोजत झाली दंग -
जांभळा तांबडा....पिंकी म्हणते 
कौतुकाने परी ती हसते !

" झोपेत किती बडबडते -
दिवसा सारखी धडपडते ! "
- आई पुटपुटे पिंकीपाशी
ओढते चादर खस्सदिशी !

" मोराचा पिसारा गेला कुठे ?
परी होती- गेली कुठे ! "
कुठली परी, कुठला मोर -
डोळे चोळता, आई समोर !

.

घराणेशाही आणि आमचे नेते !




आमचे येथे घराणेशाही आम्ही स्वत:हून आणलेली नाही होsssss !

...... तुमच्याच बळावर,
तुमच्याच जिवावर - 
पण,  वारसा हक्काने ती आमच्यापर्यंत चालत आलेली आहे ..
त्याला आम्हीतरी काय करणार !!

तुम्ही स्वत:ल ओळखू शकत नाही ....
तुम्हाला ते जमतच नाही,
त्याला आम्ही काय करणार ?

पण ,
आम्ही पुरते ओळखले आहे ,
 तुम्हा सगळ्यांनाच ... !!!

कुठल्याही राज्यातले तुम्ही असा,
गुपचूप मुकाट्यानेच ह्या देशात बसा !

तुमच्यापैकी एकाने तरी धाडस केले आहे -
आमच्या विरुद्ध बोलण्याचे ? 
एकाने तरी कधी  कर्तृत्व दाखवले आहे -
आमच्या विरोधात जाण्याचे ?

धमक असूनही,
 नुसतीच बांडगुळे तुम्ही  ! 

एक लाथ पुरेशी नाही वाटली , 
दुसरी खाण्यास लगेच तयार !

स्वाभिमान असूनही, तो  वेळोवेळी गहाण टाकण्यातच ,
 तुमचा अव्वल क्रमांक !

प्रत्येक वेळी आमच्या पुढयात लाचारी !

आमच्यापुढे पुढेपुढे करण्यात वाकबगार !

स्वत:ची धमक असूनही, हांजी हांजी करण्यात तत्पर ! 

आम्हाला हत्ती तुम्हीच बनवले...
बसा आता नुसते  भुंकत -
 आमच्या घराणेशाहीच्या नावाने  !!!

.

कालाय तस्मै नम:


 

" उद्यापासून आम्ही ..

अंगभर कपडे घालणार - - -  " 

--- शाळेतून आल्यावर, मुली

आपापल्या मम्मीला सांगत होत्या -


पार्लरमधून आलेल्या मम्म्या,

'छान छान' म्हणत,

लो नेक अन् शॉर्टस्मधली 

आरशात स्वत:ची फिगर -


मागेपुढे पहात....

माना डोलावत, 

ऐकत होत्या !

.

गोड गोड बोला ..



काल एकदाची संक्रांत संपली वाटते !

आज सकाळी नाष्टा मेजावर आला . 

मस्त गरम गरम पोह्याचा,
पहिला घास तोंडात घातला....... . 

- आणि मी बायकोला विचारलं ,

" अग, आज पोह्यात मीठ घालायचं विसरलीस का ? "

काल गोड गोड बोलणारी,

 ती लाडूबाई उत्तरली ,

" रोजच तुमची कुरकूर ! 

तो दारावरचा भिकारी बघा ..... 
कालचं आज, 
कसलंही, काहीही वाढलं तरी-
आशीर्वादच देत असतो - 
" देव तुमच्या मालकाचं भलं करो- ! "

.

ठणठणाट ...




स्वैपाकघरात असलेल्या बायकोला,
मी सकाळी चहा पीत असताना,
 जरा मोठ्याने म्हणालो -

" अग, सकाळी जागा झाल्याबरोबर,
चांगलं तोंड दिसलं बघ आज.
नक्कीच आजचा दिवस चांगला जाणार माझा ! "

हसत हसत बाहेर दिवाणखान्यात येऊन , समोर बसत,
ती खुषीत येऊन म्हणाली -
" अय्या, खरंच !
पण मी तर...
 स्वैपाकघरात होते - 
तुम्हाला मी कधी दिसले ?" 

"अग, तू दिसली नाहीसच !
पण तो आरसा आहे ना, त्यात मी डोकाव..."

--- माझे वाक्य पूर्ण होण्याआधीच, 
बायको किती रागावलीय - - -
ते, स्वैपाकघरातल्या भांड्यांच्या आवाजावरूनच मला कळलं !

.

बढती !



हपीसातून घरी आलो...
माझा हसरा चेहरा पाहून,
बायकोने विचारले,
" काय मिष्टर,  आज काहीतरी  विशेष घडलय वाटतं  ऑफिसात ?
बढती वगैरे ? "

मी आनंदाने उत्तरलो,
"अग, किती मनकवडी आहेस तू !
मला पदोन्नती मिळाली - ती पण ...
माझ्या बहिरेपणामुळे !"

बायकोने आश्चर्याने विचारले,
" बहिरेपणामुळे .. नीट सांगाल का जरा ? "

मी उत्तरलो, " हो हो. बहिरेपणामुळे !
मला 'खास-वरिष्ठ-लेखनिक' म्हणून नेमण्यात आले आहे...

'" तक्रार विभागा'"त !"

. . .

आमचे वेंधळ्यांचे साहित्यसंमेलन -



उत्साहाच्या भरात कोण कुठे वहात जाईल ...
काही सांगता येत नाही .

पाण्याचा खळाळता प्रवाह न  पोहता येणाऱ्याला आकर्षित करतो ..

आणि नको तेच.. 
हमखास घडलेले दिसते !

पण उत्साहाच्या बहरात.....,


मुक्याला काठी .. 

दृष्टीहिनाला कर्णयंत्र ..
 कर्णबधिराला चष्मा ..
आवश्यक असतात -
अशा  समजुतीने ...  
ते   देऊ करण्याचे धाडस - - -

 फक्त वेंधळा मनुष्य-स्वभावच करू जाणे !      


साहित्यिकात असे वेंधळे असल्याचे दिसून आल्यावर ..

आश्चर्यालाही धक्का बसतो. 

तशाप्रकारचा  ठराव मांडणारा सूचक,

त्याला अनुमोदन देणारा अनुमोदक,
आणि त्याला टाळ्यांच्या कडकडाटात मंजुरी देणारे समस्त साहित्यिक !

वा वा वा !


कित्ती छान आमचे वेंधळ्यांचे साहित्यसंमेलन !!


. . . 

दोन पायांचा घोडोबा ..



टॉक्डॉक् टॉक्डॉक् आला दौडत
अबलख माझा घोडा - 
आई बाबा आजी आजोबा
सरका रस्ता सोडा !

दोनच पायांच्या घोड्याची
घरभर भरभर घाई 
पटपट सगळे दूर पांगती
खुषीत येते आई !

हातांचा हा लगाम धरुनी
वेगाला मी आवरतो 
ऐटित मागे पुढे डोलुनी
घर-मैदानी वावरतो ! 

घोडोबा मी घरी लाडका
खेळायाला पुढे पुढे - 
शंभर टक्के परीक्षेत गुण
अभ्यासातहि सदा पुढे ! 

...

नि:शब्द ...मी !



तुला भेटल्यावर मी 
एकही शब्द बोललो नाही !

अगदी स्वाभाविक आहे 
तुझा नंतरचा रुसवा फुगवा ;

सांगू का खरेच सखे , 
तुला पाहताक्षणीच -

नुसतेच पहावेसे 
वाटत राहिले...शब्दांनाही !

. . .

आ बैल मुझे मार ..



नवीन वर्षाच्या -
पहिल्या महिन्याच्या - 
पहिल्या रविवारचा -
मस्त दिवस !

नाष्टा, चहापाण्यानंतर ,

बायकोशी गप्पा सुरू झाल्या.
मी तिला म्हटलं, 
" आज तू मला मस्तपैकी एक थाप मारून दाखवायची ;
मी तुला चक्क एक हजारची,
एक छानशी साडी घेतो की नाही बघच ! "

हजरजबाबी बायको !


पट्कन उद्गारलीच,

" आता असे शब्द फिरवू नका हं मिष्टर -
तासाखाली तर,
तुम्ही दहा हजारची साडी घेतो ..., 
म्हणाला होता की हो ! 
लगेच विसरलात वाटतं ? "

यालाच म्हणतात -

'आ बैल मुझे मार !'
.

संसार



घराघरात चालतो खेळ 
आंधळ्या कोशिंबिरीचा 
मेळ नसतो कधी 
कुणाला तिथे कुणाचा !

तो म्हणतो- माझ्यामुळे 
ती म्हणते- माझ्यामुळे !
दोघे आमने सामने 
दुरावलेली दिसती मने ...

डोळ्यावरची पट्टी 
कुणीतरी काढत -
सत्य समोर दिसतं 
मनातच कुढत !

एकमेकाशिवाय हा 
रथ नाही ओढायचा.... 
क्षण येतो आयुष्यात 
एकमेकांना जोडायचा !

.     .     .

साम्य !



दूरदर्शनवर –
सयामी जुळ्यांचा कार्यक्रम बघता बघता,
बायको डोळे विस्फारत उद्गारली -

"
कित्ती विलक्षण साम्य आहे ना,
त्या जुळ्यांच्या वागण्यात ? "

मी म्हणालो,
 " त्या जुळ्यांच साम्य जाऊ दे !
 ते तर दोघेच आहेत !
आपण घरात चारजण असून,

आपल्यातही एक अनोखे साम्य आहे ना ? "


विस्मित होत बायकोने विचारले,
" कसले साम्य आहे हो ? "

मी स्पष्टीकरण दिले,

"
थोरल्या चिरंजिवांना कॉलेजचा कंटाळा,
धाकट्या युवराजाना गृहपाठाचा कंटाळा,

नवरोजीना ऑफिसच्या कामाचा कंटाळा,
 आणि-----"

बायकोने सात मजली हास्य करीतच,
माझं वाक्य पूर्ण केले.....
"
बाईसाहेबाना घरकामाचा कंटाळा ! "

.     .     .

दैव देते अन् .....



सकाळच्या उबदार सोनेरी किरणात,

 प्रभातफेरी काढावी असा विचार करून, 
घराबाहेर पडलो. 

खिशात भ्रमणध्वनी ठेवला -
आणि इतरांनी आपली चांगली गाणी ऐकू नयेत, 
ह्या शुद्ध स्वार्थी विचारांती, 
कानांत आवश्यक ती साधन सामग्री अडकवली !

" एक बार आजा आजा आजा आsssssजा .... 
झलक दिखलाजा ".......

मी आणि हिमेश दोघेही एका भेसूर सुरात गात चाललो होतो.

मधेच एक कुत्रे कुठून तरी केकाटत आले...

 आणि नेमके माझ्याच पायात कडमडले...

आणि मी रस्त्यातल्या दगडाला ठेचकाळून,
समोरच्या खड्डयात पडून,
चारदोन बरगड्या मोडून,
दवाखान्यातल्या खाटेवर पडून..

" सुहाना सफर और ये मौसम हसीन ...." गाणे ऐकत आहे !

सकाळची शुद्ध हवा खाण्यासाठी बाहेर पडलो काय, अन् -


.     .     .

पुरुषार्थ



किती जणांचा धावा केला 
कुणी न तेव्हां धावत आला 

किती दमले मी टाहो फोडुन 
रडले कुढत अपुल्याच मनातुन 

जपण्याचा मी प्रयत्न केला 
शीलाच्या माझ्या ठेव्याला 

दुर्दैवाचा घाला पडला
नशिबी दुर्योधन धडपडला

जगास फुटला नाही पान्हा
धावत नाही आला कान्हा

सुन्न-खिन्न टाकून मी मान
पुरुषार्थाचा बघत अपमान ! 


. . .

अवघाची संसार ...


काय तर म्हणे २५ वर्षे सुखाने संसार केला !

कसं शक्य आहे ?

कधी विनाकारण भांडलात ..... ?

मुळीच नाही .
कधी रुसलात दोघापैकी कुणीतरी एक ....?

 कधीच नाही .
कधी बिन मिठाची भाजी ताटात पडली तुमच्या ....?

 अजिबात नाही .

कधी चित्रपटाला उशिरा गेलात ....?

मुळीच नाही .
दूरदर्शनच्या रिमोटवरून भांडलात .... ?

कधीच नाही .
तुझी सासू माझी सासू -

या विषयावर वाद घातला .....? 
अजिबात नाही .

आणि तरीही भलतेच धाडस करून म्हणता  ?

"  २५ वर्षे आम्ही सुखाने संसार केला ! "

 सुखाचा म्हणजे .......
नक्की कसा संसार केला हो ? 


.          .          .