नांवात काय आहे !


परदेशात कुठेतरी काही नाटके वगैरे लिहून शेक्सपिअर स्वर्गवासी झाला.  

त्याच्या मागे राहिलेल्या साहित्यामुळे तो अजरामर झाला. तो आता भूतलावर अस्तित्वात नसला, तरी  पदोपदी त्याचे अस्तित्व आपण विसरूच  शकत नाही ! इतर आणखी लाखो साहित्यिकानी  जागतिक साहित्यात  लाखमोलाची भर घातली असेल - नसेलही ! पण  केवळ आपल्या  साहित्यातील एकच वाक्य लोकाना  जन्मभर तोंडी घालायला लावायचे सामर्थ्य एकट्या शेक्सपिअरमधेच दिसून येते !
शेक्सपिअरनंतरच्या एकूणएक लेखकूनी  "नावात काय आहे "चा आधार घेऊनच  साहित्यात पदार्पण केलेले आहे !


खरच नावात काय आहे ? 

पहा, मलादेखील हा लेख लिहिताना प्रश्न पडलाच ना ! उत्तर तर तसे सोपेच आहे-  नावात काहीच नाही  किंवा नावात सर्व काही आहे ! नावात काहीच नसत, तर आमच्या लेखाला समर्पक शीर्षक सुचल नसत..
 आणि मग शेक्सपिअरची कुणालाच आठवणही झाली नसती !

याचाच अर्थ... नावात सर्व काही आहे ! 

नाव ठेवणे म्हणजे 'बारशाचे', आणि नाव ठेवणे म्हणजे ' तुच्छ लेखणे' - हा श्लेष एकट्या नावापासून सुरू होतो. मनुष्य जन्माला आला की, त्याचे हसत हसत बारसे केले जाते आणि त्याला सुरेख नामाभिधान प्राप्त करून दिले जाते. तोच मनुष्य मेल्यानंतरही, आपल्या कर्तबगारीने सु-अथवा कु- प्रसिद्धीने नाव मागे ठेवून जातो ! जन्माला येण्याआधीच बाळाच्या नावाबद्दल कौटुंबिक वातावरणात बरीच चर्चा होते, तर म्हातारा मेल्यावर त्याच्या सवयीबद्दल  नावे ठेवली जातात !

अशी कोणती दुसरी गोष्ट आहे की, जन्माआधी आणि मेल्यानंतरही मनुष्याचे अस्तित्व ठेवून जाते- दाखवते ? "नाव" सोडून कोणतीही दुसरी  गोष्ट नाही. माणसाचे शरीरही नाही अस्तित्वात रहात, बाकीच्या गोष्टीची काय कथा ? उरते ते फक्त "नांव !"

एखाद्या शाळेला नाव द्यायचे असले तर  पुढाऱ्या त  गुद्दागुद्दी  सुरू होते ! एकमेकांचे मुडदे पडले तरी हरकत नाही, पण ' आपलेच नाव झळकले पाहिजे ' ही ईर्षा ! येन केन प्रकारेण ...वगैरे वगैरे !
'लढनेवाले सिपाही और  नाम सरदारजीका ' ही म्हणही नावाबद्दल बरेच काही सांगून जाते ! एखादा पोलीस आपला जीव धोक्यात घालून, चोरांची टोळी पकडतो.  पण  पंख्याखाली आरामात बसणार्‍या त्याच्या साहेबाचेच नाव,आणि अगदी त्या चोरांचे नावही फोटोसकट पेपरात छापून आलेले दिसते !  'नावात काय आहे ' हा शेक्सपियरचा मुद्दा कधीच वाचला नसल्याने, आणि साहेबाशी 'तुमची खुशी-माझा सौदा' ह्या न्यायाने वागावे लागत असल्याने, बिचाऱ्या पोलिसाने  मौन धारण केलेले असते!

"मारावे परी कीर्तिरूपी उरावे-" असे म्हणण्यामागे नावाचेच महत्व अभिप्रेत धरले आहे. मरायचे असते एकाने, आणि त्याचे स्मारक झाल्यावर, त्यावर नाव कोरायचे असते मंत्र्याचे- पुढार्ऱ्याचे किंवा गल्लीतल्या दुसऱ्या  एखाद्या वजनदार व्यक्तीचे ! एका दगडात दोन पक्षी ! कुणाच्या स्मारकावर कुणाचे नाव !

नूतन वधु-वरांचा 'नाव घेण्या'चा प्रसंग  आठवा ! दोघानाही एकमेकांचे नाव माहीत असते, तरी 'नाव घ्या-' म्हणताच, दोघेही लाजून अगदी मोतीचूर होतात ! त्यावेळी उखाण्यात घेतल्या जाणार्‍या नावाचे किती कौतुक होते !

नावांचे प्रकार तरी किती ?  टोपण नाव, लग्नाआधीचे नाव, लग्ना नंतरचे नाव, उर्फ नांव, शॉर्टकटचे नाव ! शाळेत प्रवेश घेताना नाव घालाव लागते . मतदार यादीत नाव घालावे लागते. रेशनकारडावर नाव घालावे लागते. जिकडेतिकडे नाव घालण्याचा प्रसंग आहेच. 


हे झाले माणसाच्या नावाबद्दल !

गावालाही नाव, औषधालाही नाव, रस्त्यालाही नाव, वस्तीलाही नाव ! जनावरानाही नाव, पक्ष्यानाही नाव ! एकंदरीत नावाशिवाय काही असूच शकत नाही ! नावालाही नसले, तरी  नाव हे असावे लागतेच !

महिलामंडळात नावाला विलक्षण महत्व असते ! स्त्रीच्या मूळ नावापासून ते टोपण नावापर्यंत- प्रत्येकाला तिथे पदार्पण करावच लागत ! एकदा टोपण नाव चिटकले की- ' पाठीमागे नाव ठेवण्याचा कार्यक्रम ' गैरहजर महिलेच्या बाबतीत साजरा होतोच !

कुणी चित्रपटरसिक आपल्या सिनेमाच नाव 'अ'च्या बाराखडीत ठेवण्याचा निश्चय करतो, तर  कुणी नाट्यरसिक आपल्या नाटकाच नाव अमूक इतक्या अक्षरातच गुंफण्याचा आग्रह धरतो.
 रोगाची साथ असते तद्वतच नावाचीही साथ  असते ! आपला मुलगा वेडावाकडा आणि वाटेल तसा ओरडू  शकतो,  हे एकदा माहीत झाले की, समस्त आया पोराना कौतुकाने 'हिमेश' म्हणू लागतात ! ती पोरही खुशीत येऊन घरातील भांडी दणादण बडवू लागतात. एकदा संजयच्या साथीत सापडलेली पोर, 'डोळे उघडेपर्यंत ' संजयच्याच नावाचा आग्रहात पडतात ! सदोदित अपयश येत असलेल्या, 'यशवंत' नावाचा दबदबाही थोडा असतो का ? 


नाव घेणे, नाव ठेवणे, नावारूपाला येणे, नाव होणे, नाव पडणे -  कितीतरी वाक्प्रचार आहेत, आपल्या माय- मराठी भाषेत ! प्रत्येकाला स्वतंत्र अर्थही आहे ! नावात अभिनयसामर्थ्य आहे. एकमेकांसमोर एकमेकाला नावाजत, पाठीमागे नाव ठेवायला किती अभिनयकौशल्य लागते ! नावामुळे प्रसिद्धी मिळते. एकदा पेपरात नाव छापून आले की, सर्वमुखी नाव होण्याची दुर्मिळ संधी असते ! नावाला वशिलाही लागतो. एम्प्लोयमेंटच्या यादीत नाव वरवर सरकायला आधार लागतो !

जग जगते आहे-  कशासाठी ? - --- पोटासाठी !

छे !
मग कशासाठी ? 
फक्त आणि फक्त ... "नावा"साठी !

 नाव आहे, तर - पैसा, प्रसिद्धी, मान, सन्मान आहे ! नाव नाही, तर नावालाही काही शिल्ल्क रहाणार नाही !  
नाव व्हायला तशी कारकीर्द असावी लागते, नाव ठेवायला धाडस असावे लागते,  नाव मागे राहायला- आधी नाव मिळवावे लागते !

नावात "यशापयश" आहे, नावात "किर्ती" आहे, "अपकिर्ती"  आहे,  नावात "मानापमान" आहे - म्हणून नावातच सर्वकाही आहे !

कित्ती  'छान लिहिले आहे-' असे  म्हणून, 

आता लक्षात ठेवणार ना, तुम्ही माझे "नाव" !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा