माय मराठी


अगदी साधी आणि क्षुल्लक वाटणारी सत्य घटना आहे. . . 

पण मुळापासून तितकीच विचारमंथन करायला लावणारी !

शेजारच्या कुलकर्ण्यांचा सहा वर्षे वयाचा (इंग्रजी माध्यम) नातू 

घरात क्रिकेट खेळत असताना, 
मी त्याला म्हणालो-
"अरे, हळू खेळ, घड्याळाला चेँडू लागेल हं !"

हातात बॅट उगारलेली धरूनच तो उद्गारला, 

"अंकल, चेँडू म्हणजे ?"
.

कर्तव्यनिष्ठ

 सकाळी सव्वासात वाजता
 "सोलापूर निलंगा" यष्टीत "लातूर"ला जाण्यासाठी बसलो.

नेहमीप्रमाणे हक्काच्या ठिकाणी "मोफतच्या खाण्यापिण्यासाठी-
" ठराविक ठिकाणी, म्हणजे "आशीव" या स्थानकावर...
कर्तव्यनिष्ठ, दक्ष वाहक चालकाने यष्टी थांबवली.

तिकीट घेतल्यानंतरचे उरलेले तीन रुपये,

 वाहकाला माझ्याकडून एकवार मागून झाले होतेच.
वाहकाकडून "नंतर", हे अपेक्षित उत्तर म्या पामराने ऐकले.

खाणेपिणे झाले. यष्टी निघाली.

दोनतीन मिनिटानीच,
पाठीमागून एक फटफटीवाला 

भरधाव वेगाने आमच्या यष्टीपुढे आला.....
आणि आमची यष्टी गचकन थांबली की हो !

फटफटीवाल्याने वाहकाला त्याचे "तिकिट फाडायचे यंत्र" ताब्यात दिले !

आमचा कर्तव्यनिष्ठ वाहक
आपले "तिकिट फाडायचे यंत्र" खाण्यापिण्याच्या नादात,
हॉटेलातच विसरला होता !
.

पाखरांनो, रुसला किती रे -


पाखरांनो, रुसला किती रे
फिरुनी का येत नाही रे ..

निसर्गाहातचे खेळणे मी
त्याने दिले तर, देणार मी ..

निसर्ग रुसला, मी न रुसलो
फूल, फळ, पाने- न उरलो ..

भरभरून दिले, होते जेव्हा
आज रुक्ष, फुलणार केव्हा ..

टेकला फांदीवर जर तुम्ही
संतोष जपेन हृदयात मी ..

मी उजाड, जग तुमचे उजाड
मी एकटा, निष्प्राण ताडमाड .. 


.

'नरेंद्र -'


वाणी तेजस्वी रविकिरण
वर्तन शीतल शशीकिरण

उस्फूर्तशी नम्रता दिसे
केविलवाणे नाटक नसे

सेवाभावी चित्ती सुविचार
हेवादेवा मुळी न कुविचार

पदस्पर्श असे योग्य स्थानी
दुर्लक्ष नसे अयोग्य स्थानी

मनास जिंकी लाख ठिकाणी
तुसडेपणा न दाखवी कोणी

येणाऱ्याचे स्वागत असते
द्वेषाला ना स्थान दिसते

जाणवे प्रचीती दिव्यत्वाची
ही तर पुरती ओळख त्याची . .

.

बॉसची बायकोगिरी


"अहो, काही स्वप्नबिप्न पडलय का तुम्हाला ?
असे का ओरडताय झोपेत ?"
- बायको माझ्या तोंडावरचे पांघरूण खस्सदिशी ओढत,
मला विचारत होती.

मी खरोखरच स्वप्न पहात होतो तर...

त्याचे असे झाले .

ऑफिसात माझी आणि बॉसची चांगलीच खडाजंगी जुंपली होती.
सारखा वाट्टेल तसा डाफरत आणि गुरगुरत होता तो माझ्यावर !
म्हणे-
"हेच का केले नाही, तेच कसे करायचे राहिले.
कामात नीट लक्ष देतच नाही तुम्ही...!"
वगैरे वगैरे .

शेवटी तोल जाऊन, मीही त्याच्यावर उलट ओरडलो होतो -
" हे बघा साहेब, मी काही तुमचा नवरा नाहीय,
तुमच सगळ मुकाट्याने ऐकून घ्यायला !
अगदी बायकोसारखे तुम्ही काय वाट्टेल ते बोलताय ....
किती किती ऐकून घ्यायच आणि सहन करून घ्यायचं मी ?
हे काही घर नाही, बायकोच्या इशाऱ्यावर नाचवेल तसे मी नाचायला ..
ऑफिस आहे समजलात ? "
.

चार चारोळ्या -


१.
      "तऱ्हेवाईक -"

वस्त्र नात्याचे सुंदरसे 
गेलो विणत मी इकडून तिकडे -
नातेवाईक त-हेवाईक ते
उसवत होते तिकडून इकडे . .
.२.

            "तोल -"

वाटतो संसाराचा तराजू
जर रहावा समतोल
दोघांनी वेळीच एकमेकांचा
सावरत रहावा तोल !

..
 
३. 

        "व्यसन -"

व्यसन सिग्रेट दारूचे
नाही कुणाच्या हिताचे -
असावे व्यसन जीवनात
हृदयी माणूस जोडण्याचे ..
...


४.  
       
           "आयुष्य फुगा -"
 

वाट चाला काळजीपूर्वक फुगवत
चांगल्या सवयी भरत आयुष्याचा फुगा  -
दुर्व्यसनाची एकच टाचणी क्षणार्धात
आयुष्याच्या फुग्याची वाट लावते बघा ..

....

उफराटी ही गंमत ऐशी

 "राणी" म्हणती तुजला सारे, भांडी घासत चाळीत फिरशी
नाव सांगशी "राजकुमार", "भाकर वाढा-" दारी म्हणशी ..


 नाव ठेवले "अजिंक्य" तुझे, कायम अपयश कधी न सरशी
किती छान ग नाव "हर्षदा", खिन्न उदासच आम्हास करशी ..   

कसे तुझे ग नाव हे "शीतल", चिडका बिब्बा म्हणवून घेशी
"शांती" ही पण बहीण तुझी, गोंधळ गडबड करत हिंडशी 


नावातच चैतन्य तुझ्या  सदा आळसामधे लोळशी
शोभत नाही नाव "निर्भया", झुरळ पाहुनी धूम ठोकशी ..

"अमर" तुझे रे नाव कसे, मरणाच्या दाढेतच फिरशी
नाव "हरी" परी मुखातून ,अपशब्दांची धार ओतशी ..

नाम तुझे "रणजीत" तरी - कायम तू पळपुटाच दिसशी
नाव घेउनी "खुशालराव", नेहमी चिंताक्रांतच असशी ..

नाम तुझे ग "अबोली" कसे, अखंड बडबड चालू ठेवशी 

नाव "मंगला" परी चांगला विचार ना तू कधीच करशी ..

"विजय " तुझे रे नाव ठेवले , सदा पराजय पत्करशी
दु:ख सदोदित चेहऱ्यावरती, "आनंद" नाव का मिरवत फिरशी ..

"बजरंगा" रे ब्रह्मचारी तू , चार मुले घेऊन हिंडशी
"कार्तिक" नाव तुझे ,पण- भार्या घरात दोन ठेविशी ..

नाम घेउनी "भिकारदास", डनलॉप गादीवरती लोळशी  
"सत्यवान" हे नाव घेउनी, नेता बनून असत्य बोलशी ..
 

"प्रेमा" नाव ग किती छानसे , का तू द्वेषारोपण करशी
नाव "सुमन" पण घरोघरी ,निंदा करत गल्लीत हिंडशी ..

"स्मिता" नाम तू धारण करशी - कायम रडुबाई का असशी 

नाव "कोकिळा "छान घेउनी.. कर्कश स्वरात किती ग गाशी   ..

"गजानना" तू बुद्धीदाता- सही न जमता, अंगठा ठोकशी
नाव "भीम" पण  वजन किलोचे , उचलत  घामेघूम तू होशी 


"काय आहे नावात ?"..वदला,तो शेक्सपिअर परदेशी  
उफराटी ही गंमत ऐशी , नावातूनच घडते कैशी ! 

.

आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे


(चाल: आज चांदणे उन्हांत हसले, तुझ्यामुळे-)           

आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे
नात्यातून बघ अंतर पडले, तुझ्यामुळे ...   
               
घाव अंतरी बसतच होते
घर खरोखर सुखात होते                                    
खर्चातून हैराण जाहले, तुझ्यामुळे ...

उसनवारीचे द्रव्य जमविले
व्याजच होते भारी कसले
द्र्व्यास्तव ते सर्व भांडले, तुझ्यामुळे ...   

उगाच माझी होती दैना
खाली पाकिट मार्ग सुचेना
वादातून दाताड विचकले, तुझ्यामुळे ...

सदनि या जरी होती शांती
पाहुणे परंतु येता बोंब ती 
आज शंख तरि मीच ठोकले, तुझ्यामुळे ...
.

लाटणे घेत हाती ------

"लाटणे घेत हाती.."

लाटणे घेत हाती
सोडीना ती पाठ 
अर्ध्या संसाराची 
सोडू कशी वाट ... 

भांडणे पाहण्या
चाळ जमा होते
त्यांच्या रिकाम्या घरी
होई शुकशुकाट ...   

खाष्ट दुष्ट सारे 
नातेवाईक ते  
साधुनिया संधी
न बसती मुकाट ... 

चुकविता प्रहार 
तिच्या लाटण्याचा 
किती बयेचा त्या
वाढे थयथयाट ... 

मनी खंत करतो 
कुठली तडजोड   
भांडी फेकाफेक
झेला पाठोपाठ  ... !
.

मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी


(चाल- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी)

मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी 
अर्ध्यावरती नाद सोडला मतदानावर पाणी ... | धृ |

नवरा वदला "मला ग नाही, नावाची ती आशा 
माझ्या नावापुढेच आहे 'मयत' खुणेची रेषा "
का भार्येच्या डोळा तेव्हा भरून आले पाणी ..... अर्ध्यावरती

भार्या वदली बघत एकएक यादीमधला फोटो
"उद्या पहाते दुसऱ्या आपुल्या प्रभागात मी फोटो "
पण नवऱ्याला नव्हती खात्री दूर बसे जाऊनी .......अर्ध्यावरती....

तिला विचारी नवरा- 'का हे नाव असे खोडावे ?
आयोगाने पुसण्याआधी आम्हास का न पुसावे !'
भार्येला ना उत्तर सुचले, झाली केविलवाणी........अर्ध्यावरती ..

का नवऱ्याने मिटले डोळे 'शाईखूण' दिसताना
का नवऱ्याला त्रास वाटला मतदान ते बघताना
बोटावरती नजर टाकितो अपुल्या उदासवाणी .......अर्ध्यावरती ....

.

चार चारोळ्या ----

बोलघेवडे -
बोलघेवडे गर्जत जाती
मर्दुमकी पूर्वजांची नेहमी -
कष्टाळू कर्तव्यच करती
कधी न गरजता, "मी" "मी" "मी" ..
.

सुगंधी सवय -
बागेजवळुन जाता जाता
नजर मोगऱ्यावर तिकडे -
तुझी आठवण सखे, नेमकी
का व्हावी ग, मज इकडे !
.

वा रे नास्तिक-
बुरखा नास्तिकतेचा लेऊन
फुकाच टेंभा मिरवतो तो -
'अरे देवा'चा धावा पटकन
संकटात का करतो तो ..
.

शाईनिंग -
बाबा, बुवा, माँ, महाराज
जनतेच्या जिवावर शाइनिंग मारतात
 स्वत: लेऊन सोन्याचे साज  
भक्ताच्या गळ्यात गंडेताईत सारतात !
.

गेले पान मनास शिकवुनी


अशाच एका सायंकाळी 

बसलो होतो झाडाखाली ..भविष्य चिंतित आयुष्याचे 


भूत घेउनी वर्तमानाचे ..वादळ ते घोंघावत आले 


विचार सैरावैरा धावले ..काही कळेना काय करावे 


वादळी मना कसे सावरावे .. ....गळले पुढ्यात पिवळे पान 


झाडावरुनी खाली छान ..उगाच चिंता नकोच मनी


गेले पान मनास शिकवुनी ..क्षणात आहे- क्षणात गायब 


ईश्वर लीला किती अजब ..समाधान चित्तात रहावे


पुढ्यात आहे त्यात रमावे . .! .

आय क्यू वाढत आहे

नुकताच नवीन मोबाईल घेतला होता, तेव्हाची कथा .

बायको म्हाणाली होती -
"स्वैपाकाला आज थोडा उशीर होणार आहे.
जेवणाचे ताट मांडल्यावर बोलावते ."

मोबाईल हातात घेतला .
हेडफोन कानाला लावला .

दोन्ही कान बंद !
आळीपाळीने रफी, लता, मुकेश कानात जीव ओतून गाऊ लागले .....

अस्मादिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली !

बायको समोर येऊन काहीतरी बडबडू लागली असे मला वाटले .

मी विचारले-
"काय ग , वाढलं का ताट ?"

तशी बायको आपल्या स्वत:च्याच कानावर हात ठेवून उद्गारली-
"केवढ्याने ओरडताय हो ?
जेवायला चला, म्हणून तर मी सांगत होते ना मिनिटभर !"

आमच्या दोघांचे मोठे चढ्या सुरातले आवाज ऐकून नातू समोर आला .
माझ्या दोन्ही कानात मी कोंबलेले गट्टू त्याने पटकन काढले.

मला समजावत तो म्हणाला -
"अण्णा, आज्जीला वाटल तुम्हाला ऐकू येत नसाव, 

म्हणून ती मोठ्याने बोलली.
पण हे कानाला लावणाऱ्याला वाटते की, दुसऱ्याला ऐकूच येत नाही..
म्हणून तुम्ही गाण्याच्या आवाजापेक्षा मोठ्या आवाजात बोललात !

"अस होय .." पुटपुटत मी जेवायला निघालो .

हल्लीच्या नातवाला जेवढ मोबाईल/कंप्युटरमधल कळत,
तेवढ आजोबाला कळत नाही हो ! 

व्हेरी शार्प जनरेशन हं ...

तुम्हाला आला का असा कधी गमतीदार अनुभव ?
.