सुट्टी           शिशुशाळेत जाणाऱ्या अजाण बालकापासून ते दुकानदारी करणाऱ्या सुजाण मालकापर्यंत- सर्वांना हवीशी वाटणारी "सुट्टी",  ही मनाला विरंगुळा देणारी अफलातून बाब आहे !

          'मला हे नको, मला ते नको'- असे चिकित्सक वृत्तीने प्रत्येक बाबतीत गरजणारी स्त्री 'स्वयंपाकाला सुट्टी हवी कां ?' असे पतिराजाने विचारताच चट्कन 'होकार'  देऊन मोकळी का होत असेल बरे !

        केशकर्तनालयाचा धंदा, सराफाचा धंदा, किराणा दुकानाचा धंदा, कपडे विक्रेत्याचा धंदा बघा-  प्रत्येक ठिकाणी सुट्टी आहेच ! कुठल्याही धंद्याला सुरुवात करण्याआधीच, आपल्याला सोयीनुसार आणि कायद्याने देखील आठवड्यातून एक दिवस 'सुट्टीचा दिवस' म्हणून ठरवावा लागतो. सुट्टीचा दिवस उपभोगू न शकणारा दुर्दैवी मनुष्य प्राणी या भूतलावर क्वचितच आढळेल ! सुट्टीला काळाचे बंधन नाही. ती क्षणैक असू शकते वा अनंत काळाची चिरकाल असू शकते !

          परवा दूरच्या एका नातेवाईकास मी एका दवाखान्यात भेटायला गेलो होतो. बिचारा दुखण्याने अगदी जर्जर झाला होता . 
मी त्याला विचारले - 
"काय महाराज, दुखण्याला सुट्टी वगैरे काही द्यायचा विचार आहे की नाही मनांत  ? "
त्यावर विनोदाने (माझाच नातेवाईक ना !) तो उत्तरला -
"त्या परमेश्वराला तरी सुट्टी हवी ना , माझ्या दुखण्याच्या सुट्टीचा विचार करत बसायला !"

          या भूतलाच्या छत्रावर एकटा परमेश्वरच दुर्दैवाने जिवंत असेल, जो सुट्टीचे महत्व जाणत नसेल ! आपण 'दिवाळीची सुट्टी'  उपभोगतो. 'दिवाळीची सुट्टी'-  या दोन शब्दांचा विचार केल्यास, सुट्टीमुळे दिवाळीला महत्व आहे कां, दिवाळीमुळे सुट्टीला ? आपल्याला असे दिसून येईल की, सुट्टीमुळेच निश्चित दिवाळीला महत्व प्राप्त झालेले आहे ! 

          "सुट्टी" नसती तर ऐन दिवाळीतच आपल्याला शिमग्याचा सण साजरा करावा लागला असता. कारण पावसाळ्यानंतर हीच सुट्टी सर्वात  जास्त काळाची असते. बहीणभावांची भेट याच काळात होते. फराळाच्या निमित्ताने मित्रमंडळी याच काळात एकत्र जमतात. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात. दिवाळसणानिमित्त जावईबापूना भेटवस्तूचा लाभ होतो. या सुट्टीचा फायदा घेऊन, एखादी तरुणी आपल्यामागे हात धुवून लागणाऱ्या तरुणास 'भाऊराया' असे भाऊबिजेनिमित्त संबोधून, त्याचा 'मामा' बनवू शकते. आणि सुट्टीतील रम्य मधुचंद्राच्या कल्पना-सरोवरात डुंबणाऱ्या बिचाऱ्या त्या तरुणाच्या मनोराज्याला अर्धचंद्र मिळतो !

          त्यानंतर महत्व आहे ते म्हणजे 'उन्हाळी सुट्टी'ला ! ही खरी बाळगोपाळांची सुट्टी ! 'पळती झाडे पहात' बेटे मस्त मजेत 'मामाच्या गावाला' निघतात. मुलांच्या पाठोपाठ या सुट्टीचा आस्वाद घेणारी ती  मास्तरमंडळी ! हां हां म्हणता म्हणता, वार्षिक परीक्षेच्या पेपर तपासणीच्या गठ्ठ्यानी, ती आपली सुट्टीची विकेट पार सीमापार उडवून लावतात !

          माणसाला मरेस्तोवर कष्ट करावे लागतात. हे कष्टाचे जाळे सुखदु:खाच्या धाग्यांनी विणलेले असते. हे जाळे व्यवस्थितपणे विणण्याचे साधन म्हणजे 'सुट्टी' ! सुट्टीच्या सहाय्याने माणूस टप्प्याटप्प्याने प्रगतीपथावर घोडदौड करू शकतो. सुट्टी आहे म्हणून जीवनात राम आहे, जीव आहे. जीवनातील सुट्टीच्या अतुलनीय स्थानाचे महत्व मी तुम्हाला लिहून सांगू शकणार नाही आणि वाचूनही तुम्हाला ते कळणार नाही. अहो, सुट्टीशिवाय जीवन म्हणजे बघा...म्हणजे...अं अं.... फराळाशिवायच दिवाळी समजा  की हो !     

          कोणतेही काम 'पूर्ण' करायचे असल्यास, ते काम अधूनमधून 'अपूर्ण' ठेवावे लागते. मधे सुट्टी घेतली की, ते काम व्यवस्थित पार पडत जाते. त्या कामाला चालना मिळालेली असते. 'काम चालू, रस्ता बंद'ची पाटी वाचली की, आपण समजू शकतो-
 'काय चालू आणि काय बंद' आहे ते ! 

          ही 'सुट्टी'ची प्रथा पार पुरातनकालापासून चालत आलेली असावी ! आजोळी गेलेला भरत रामाला भेटायला, उन्हाळ्याची किंवा दिवाळीची सुट्टी गाठून येत असावा. दुष्यंत राजा देखील रविवारची सुट्टी गाठून शिकारीला गेलेला असताना, रविवारच्या सुट्टीची मौज आपल्या सख्यांसह मनमुराद लुटणाऱ्या शकुंतलेची शिकार बनला असेल ना !

      सुट्टीची प्रथा अंमलात आणणाऱ्या महाभागाचे कौतुक, करावे तेवढे थोडेच आहे ! आपल्या मायबाप सरकारने सुट्टीचे महत्व चांगले जाणले आहे. महिन्यातील दुसऱ्या आणि चवथ्या/पाचव्या शनिवारी सुट्टी सुरू करून, सरकारी कामकाज व्यवस्थेत किती आमूलाग्र बदल घडवला आहे ते आपण पाहतोच ना ! मी तर असे सुचवीन की, आठवड्यातले सातही दिवस सुट्टी जाहीर करावी ! काय हरकत आहे हो ? सर्व कर्मचारी बंधू नेहमी ताजेतवाने रहातील. आपल्या 'छोटया कुटुंबा'समवेत ते वेळ मजेत घालवतील. अशारीतीने ते सदासतेज रहातील. सदा उत्साही राहिल्याने 'आराम हराम है'- हे वचन त्यांना तरी पचनी पडेल. (सरकारला कुठलीच गोष्ट रुचत नाही पचत नाही !) जास्त सुट्टी मिळाल्याने, विश्रांती घेण्याच्या कामाचा वेग निश्चितच वाढेल !

          माणसाला जीवनात बदल हा हवाच असतो. एका गोष्टीला 'बगल' देऊन तो दुसऱ्या गोष्टीत 'बदल' घडवत असतो. घरातल्या कामात एखादी मोलकरीण त्रास देत असेल, तर तिला 'कायमची सुट्टी' देऊन दुसरी मोलकरीण कामासाठी आपल्या घरात आणली जाते. एखादी फ्याशन जुनी झाली की, तिला आपोआप सुट्टी मिळून, नवीन फ्याशन अस्तित्वात येते. 

          सुट्टीची सवय लहानपणापासूनच लागते. सवय म्हणण्यापेक्षा चटक किंवा लळा हे शब्द जास्त योग्य ठरतील ! लघवीची सुट्टी, मधली सुट्टी, खेळाची सुट्टी- हे विद्यार्थी जीवनातील महत्वाच्या घडामोडीचे प्रसंग ! शनिवारची अर्धी सुट्टी, महिनाअखेरची अर्धी सुट्टी- हे विद्यार्थी दशेतले आवडते प्रकार !  एखादी व्यक्ती निधन पावल्यास, दुखवट्यापेक्षा नंतर मिळणारी सुट्टी जास्त आनंददायक वाटते ! मृत व्यक्तीला 'कायमची सुट्टी' मिळालेली असते- तर आपल्याला तिच्यामुळे थोडी तरी सुट्टी मिळावी, अशीच दुखवट्यामागची भावना असते !  

          सुट्टीचा आनंद हाच खरा जीवनातला आनंद. थकल्याभागलेल्या आपल्या जिवाला विश्रांतीमुळे बदल मिळतो. बंधमुक्त जीवन आपण सुट्टीच्या काळात उपभोगू शकतो, जगू शकतो. खरे तर सरकारला मुदतवाढ, नगरपालिकेला करवाढ, व्यापाऱ्याला भाववाढ, सिनेमा-नाटकवाल्यांना दरवाढ जशी आवश्यक वाटते, तशी आमजनतेला सुट्टीवाढ का आवश्यक वाटू नये हो !        

              " आजपर्यंत जगात ज्या काही थोर महान व्यक्ती होऊन गेल्या, त्यापैकी xxx  म्हणजे "- अशाप्रकारचे व्याख्यान केवळ  "सुट्टी"मुळे देता येते. फुल्यातल्या व्यक्तीची आपण आदरपूर्वक जयंती/पुण्यतिथी साजरी करतो. सुट्टीच नसती तर जयंती/पुण्यतिथी कशी काय साजरी करणार  आपण ?  वेळ कधी मिळणार आपल्याला ! सुट्टी मिळते, म्हणून व्याख्यान द्यायला वेळ मिळतो- तर सुट्टी मिळते, म्हणून ते ऐकायला वेळ मिळतो. 

          त्या एका रविवारच्या सुट्टीमुळेतर आपल्याला इतर वारांची नावे लक्षात ठेवायला वेळ मिळतो. एक दिवसाच्या साप्ताहिक सुट्टीमुळे आपले जीवन एक दिवस सुखी होत असते. 

          पुढाऱ्यांची जयंती/पुण्यतिथी, लहानमोठे सणवार, महत्वाच्या घडामोडींचे दिवस, अमुकदिन तमुकदिन वगैरे- केवळ सुट्टीमुळे लक्षात ठेवता येतात ! 

          दिवस उगवतो आणि उगवल्यामुळे मावळतो. पण सुट्टीचा दिवस तो सुट्टीचाच दिवस ! तो एखादाच असतो. म्हणून म्हणावेसे वाटते -              " सुट्टीत खरोखर जग जगते ! " 

          तरी बरे.... आजचा सुट्टीचा दिवस मी- 'सुट्टी' हा शब्द, 'सुटी' असा लिहावा, का 'सुट् टी ' असा लिहावा, का 'सुट्टी' असाच लिहावा; ह्या मतभेदाना चव्हाट्यावर आणण्याच्या विचारास पूर्ण सुट्टी दिलेली आहे ! 
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा