दत्त दिगंबर, दत्त दिगंबर” सारे नाम जपू या

 “दत्त दिगंबर, दत्त दिगंबर” सारे नाम जपू या 

आपण भजनी दंगून जाऊ आता

तल्लीन होऊ टाळ्या वाजवू त्याचे स्मरण करू या

आपण भजनी दंगून जाऊ आता ..


तीन मस्तके सहा हात हे शोभुनी दिसती छान

दत्त दिगंबर नाम स्मरणी डुलते आपली मान

नाद घुमे त्या जयघोषाचा रंगत त्यात जाऊ या

आपण भजनी दंगून जाऊ आता ..


वसुंधरा ही उभी घेउनी गोमातेचे रूप

चार वेदही उभे भोवती श्वान किती अप्रूप

छान साजरे उभे ध्यान हे डोळे भरुनी बघू या

आपण भजनी दंगून जाऊ आता ..


चक्र सुदर्शन एका हाती शंख तो दुसऱ्या हाती

हाती धरले त्रिशूल कमंडलू भस्म लावले माथी

दर्शन घेता गुरुदत्ताचे धन्य धन्य होऊ या

आपण भजनी दंगून जाऊ आता ..

.

चारोळ्या - - - -

परदेशातील पोरेबाळे 

ना त्यांना ढुंकूनही पुसती-

मायबाप स्वदेशातले 

अश्रूत तुकडे भिजवत बसती  !

.

शॉपिंग चालू असताना प्रिये 

तुझी काया मोहरत असते -

मात्र पाकीट रिकामे होताना 

माझी काटकसर घाबरत असते !

.

सापडले जुन्या कपाटात 

गुलाबी कागद अनेक -

असंख्य आठवणी मनात 

उसळल्या एकामागे एक !

दोन चारोळ्या..

कुजबुज अपुली हळू जरी  

प्रिये,वारा कान टवकारतो-

जगास प्रेमगीत आपले

दंगामस्ती करत ऐकवतो..

.


तुझे माझे पटत नाही 

माहित दोघातल्या शब्दांना  -

मनाचे जुळते मनाशी 

हे कुठे ठाऊक त्या शब्दांना..

.





गझल -

एकेकाळी तिचा गुलाबी कागद माझ्या हाती पडता 

मजकुर सांगू शकलो होतो डोळे मिटुनी मी न वाचता 


सावरशी तू किती कितीदा बटांस अपुल्या गालावरच्या

मजा पण कशी मनास वाटे बटांसवे त्या हळू खेळता 


सापडलो मी पुरात होतो पण घाबरलो कधीच नव्हतो 

का डगमगलो आसवांस पण डोळ्यांमधल्या तुझ्या पाहता 


चूक तुझी जर सापडली मी तयार असतो रागवायला 

पण गडबडतो खळी तुझी ती गालावरची बघता बघता 


माझ्या हाती गुलाब ताजा कधी एकदा दिलास तू जो 

दरवळतो तो मनात माझ्या अचूक अजुनी तुलाच स्मरता 

.