शिवबा, पुन्हा पुन्हा तू ....

 शिवबा, पुन्हा पुन्हा तू जन्म या महाराष्ट्रातच घ्यावा  

"जय भवानी, जय शिवाजी" जन्म जयघोषात रमावा 


कर्तव्याची जाणिव ठेवत हक्कासाठी धडपड करू  

ध्येय जीवनी बाळगू आम्ही- बडबड कमी, कृतीत उतरू  


एकीचे बळ सर्व जाणुनी, होऊ आम्ही सगळे आनंदी 

परोपकारी होऊ आम्ही, टाळत स्वार्थ साधण्याची संधी  


शिवबा, जन्मलास येथे आहे अजूनही पवित्र माती

राजा पुन्हा अमुच्या नशिबी, हो अमुचा तू छत्रपती   


शिवबा, तुजसाठी मरणारे, पुन्हा जन्मतील इथे मावळे

संधीसाधू लुच्चे फितूर मरतील सगळे डोमकावळे 


नावाचा जयघोष तुझ्या चालू असतो सांजसकाळी

तुझ्याच नावाची भूमीवर गर्जत राहील डरकाळी 


म्हणतो आम्ही स्वत:स अभिमानाने "शिवबाचे अनुयायी"

संकट अडचण दूर सारण्या जीवनी करतो रोज लढाई


हद्दपार केले शत्रूला कधीच आमच्या मनातुनी

"माझा शिवबा" म्हणत जगतो, दूर सारुनी मनमानी 


वेगवेगळे सण, जयंत्या- वाजे डौलात इथे नगारा 

तुतारीत फुंकून प्राण उत्साही गोळा जमाव सारा 


धडपडताना दिसतो जो तो, मिरवत भगवा हाती न्यारा 

शिवबा, करतो मनापासुनी आम्ही तुज मानाचा मुजरा .. !

.