दिवाळी गिफ्ट


हुश्श !

सगळी तयारी झाली "दिवाळी-गिफ्ट"ची .

दिवाळीचे सर्व प्रकारचे गोड, तिखट, आंबटगोड पदार्थ..  

पाचपन्नास क्यारीब्यागा भरून झाल्या .

तयार होऊन,

आता नातेवाईक आणि मित्रमंडळीकडे निघण्यासाठी  दाराबाहेर पाउल टाकतो न टाकतो, तोच -
नेहमीचा परिचित उद्गार कानावर आला,

" सगळच मुसळ केरात ! "

साहजिकच मी आश्चर्याने मागे वळलो .....
 
 बायकोने विचारले -
 " अहो, थांबता का दोन मिनिट ? "

मी होकारार्थी मान डोलावताच,

घाईघाईत ती स्वैपाकघरात जाऊन,
 परत बाहेर दाराशी आली ...

तिच्या हातात दिसत होत्या -
"दोन दोन कांदे" असलेल्या छोट्याछोट्या प्लास्टिकच्या पिशव्या !


मोठ्या उत्साहाने ती मला म्हणाली,
"हं , प्रत्येक क्यारीब्यागमधे ह्यातली एकेक पिशवी टाका बरं पटपट. 

विसरलेच होते मी ! "

तिच्या चेहऱ्यावरचे "कृतकृत्य" झाल्याचे भाव निरखत....

 मी दारातच थबकलो होतो !
.

हायकू -पाठमोरी तू 
सळसळणारी तू 
मनात फडा . .
.

भिंतीला कान 
कानात गोळा प्राण 
वाद अबोल . .
.

एक मनात 
दुसरेच जनात 
हेही जिणेच . .
.

पान पिकले 
मन हिरवटले 
नसती नशा . .
.

गुलाबी गाल 
उत्साहाची धमाल 
वेळ गेलेली . .

.

'दु:ख मातेचे -


माझ्या डोळ्यातून

बदबदा वाहणारा 

दिसत नाही, 

कधीच तुला 

धबधबा ..


तिच्या डोळ्यातून 

टपकणारा 

एक थेंब 

टिपण्यासाठी 

मात्र तू 

कसा धावतोस 

तरातरा !

.

'अश्शी बायको ...'


अश्शी बायको खमकी ग
हुकूम नुसते सोडीते
येता जाता नवऱ्याला
घालून पाडून बोलीते ...

अश्शी बायको नंबरी ग
एकटी बसून हादडीते
आपण जेवल्यावरी ताट
नवऱ्यापुढे सारीते ...

अश्शी बायको द्वाड ग
नवऱ्याला झापीते
मित्रासमोर नवऱ्याचा
लायटर पेटवीते ...

अश्शी बायको नाजूक ग
नवऱ्याला धरीते
हाताचे लाटणे करोनी
पाठीवर कणीक तिम्बीते ...

अश्शी बायको नकोच बाई ग
नवऱ्याला लाजवीते
माहेरी धाडू तिलाच ग
एकटी सुखात नांदीते ... !
.

चार चारोळ्या ----

दुर्मिळच-
दुधात साखर म्हणजे काय
अचानक धोधो पाऊस यावा -
जोडप्याजवळ नसावी छत्री
असा क्षण रस्त्यातच न्हावा ..
.

  ध्यान -
देवाचिये दारी
उभा क्षणभरी
ध्यान चपलेवरी
ठेवोनिया !
.

दोघेही -
देवळाबाहेर भिकारी 
माणसाला पैसे मागत असतो -
घरातला माणूस 
देवाला सुख मागत बसतो ..
.

अजब न्याय -
देवाघरचा अजब न्याय
गरिबाला दूर सारतो -
सोनेनाणे अर्पिल्यावर
दर्शनाला त्वरित पावतो !
.

स्वाभिमानपोटात बाळ 
पोरगी पाठीवरी

हातात हात 
एका पोरीचा धरी ...

ठिगळातली ती 
बायको दारोदारी 

पाच पोटासाठी 
" वाढ माये भाकरी - "

स्वाभिमानी धनी 
कुंकवाचा खाटेवरी 

पोटापुरती दारू 
नको कुणाची चाकरी ! 
.

अशीही शुभेच्छा !


 तो अगदी तन्मयतेने वाचत होता -
एका घटस्फोटाच्या निकालाची बातमी !

मधेच त्याला उद्या घटस्थापनेचा दिवस असल्याचे ध्यानात आले .

परत आपण विसरून जाऊ नये,
म्हणून -
त्याने पेपर बाजूला टाकून,
तत्परतेने मोबाईल हाती घेतला -

आठवणीच्या आनंदाच्या भरात 
सर्व मित्रांना घाईघाईत 
मेसेजद्वारे शुभेच्छा दिल्या,

आणि पेपरात डोके खुपसायला तो मोकळा झाला !

पण  -
सर्व मित्र हैराण झाले 
त्याचा मेसेज वाचून -

" घटस्फोटानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा ! "
.

अखेर ते येतिल माझ्या हेच भक्त पाठी - (विडंबन)


(चाल- अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी)                    

अखेर ते येतिल माझ्या हेच भक्त पाठी          
लाख मला देतिलहि शिव्या, करती पण भक्ती  .... 

कथा सुरू करण्याआधी मंडपी बघोनी 
भक्तीला निव्वळ पुरते डोळ्यातिल पाणी  
 मलमपट्टी होते ज्यांच्या दु:ख नित्य ओठी ....

भक्त धुंद येथुनी जेव्हा घरी शांत झोपे  
जीवन वा मरण पुढे ते मला म्हणे सोपे    
पाप पुण्य आख्यानाला खुषीमधे येती  ....

संग येथ ज्यांचा माझा जवळपास वाढे 
भरे खूप पेटी धन ते तरी हाव वाढे 
अलंकार शोधित राहे जीव गळा-पाठी  ....

स्वार्थ मीच पाहे, त्यांच्या कधी नसे कानी 
गूढ मंत्र जे सांगितले पाठ ते करूनी     
जाळ्यातुन माझ्या नाही, त्यास आज मुक्ती  ....
.

तीन चारोळ्या

ध्यानी मनी स्वप्नी -

"किती छान तो गुलाब फुलला"..
कानी कुठुनसा उद्गार आला -
शोध न घेता, तुझाच चेहरा 
माझ्या नजरेसमोर आला ..
.

टोचणी -

झाली सवय झोपण्याची
दु:खाच्या गादीवर मस्त -
स्वप्नात सुखाच्या काट्याची 
टोचणी करतसे त्रस्त ..
.

सखे, तुझा हेवा -

खुणावती त्या नभी चांदण्या 
बघुनी जणू एकमेकीकडे -
'आमच्यापेक्षा चमचमणारी'
पाहुनी म्हणती तुझ्याकडे ..
.