जाहला, तो वेडा बेजार.. ! [विडंबन]

[ चाल- विठ्ठला, तू वेडा कुंभार ..]

अपुल्या नवऱ्यावर तू करसी टीकेचा भडिमार 
जाहला, तो वेडा बेजार.. !

भांडीकुंडी, कचरा सारा, तोच आवरतो सर्व पसारा
आरामच मग मिळे तुज खरा 
तुझ्या कॉटवरच्या मांडीला, असे तोच आधार .. !

तुझे भांडणे खूप आगळे, भांडण्यातले भाव वेगळे 
तुझ्या मुखीचे शब्द ना कळे 
मनास तुझिया मिळते शांती, तया मनी अंगार .. !

तूच बोलसी, तूच गप्पसी, कुरवाळसी तू, तूच ढकलसी 
न कळे,, भांडुन काय साधसी  
देसी पाकिट परी काढसी तयातलेच हजार .. ! 
.

गर्वाचे घर .. (बालकविता)

एक होता सुंदर कावळा
एक होता सुरेख बगळा

होता पांढराशुभ्र कावळा 
होता काळाकुट्ट बगळा

गर्व झाला दोघांना रंगाचा
आपल्या छान छान पंखांचा

आकाशात घेत होते गिरक्या
एकमेकांच्या घेत घेत फिरक्या

बोलता बोलता धडकले पटकन 
जमिनीवरती आदळले झटकन 

कावळा पडला डांबरी खड्ड्यात
पडला बगळा चुन्याच्या घाण्यात

दोघे एकमेकांना पाहू लागले
बघता बघता हसू लागले

झाला पांढराशुभ्र बगळा 
काळाकुट्ट झाला कावळा

दिसताच आपले रंग बदलले
गर्वाचे घर खाली झाले.. !
.

तीन चारोळ्या

१.
सैरभैर अती 
अंगणी चिमण्या 
दाण्यास टिपण्या 
आतुरती..
.

२.
निसर्ग कोपला 
हिमवर्षावात 
चहाच्या कपात 
बुडालो हो ..
.

३.
जिकडे तिकडे 
धुक्यात पहाट 
लोकरीचा थाट 
वर्णू किती ..
.

आज शांतता घरात ती न येथ स्वामिनी... (विडंबन)

[चाल:  तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी --]

आज शांतता घरात ती न येथ स्वामिनी
ना शांती जोडप्यात बेबनावही मनी ....

ती असताही तयास खंत रोज भांडणे 
दोघांनी अनुसरले मौनातच दंगणे
तो मनात कुंठतोच तीहि खंगते मनी ....

दोघे घरि राहताच शांति राहते कुठे     
तो न मागे, ती न मागे, वाद घालती इथे   
दोन प्रेमी या घरात, प्रेम ना करी कुणी ....

त्या पहिल्या भेटीच्या खास आठवू खुणा
वाटते मनात त्यास कंठ दाटतो पुन्हा
प्रीत का न ये जुळून भांडत्या घरातुनी ....
.

तिच्याच काढत आठवणी हरवत जातो-- [गझल]

तिच्याच काढत आठवणी हरवत जातो 
डोळे बसल्याबसल्या मी भिजवत जातो..
.
गर्दी असता दोघेही होतो भांडत  
एकांतात मनाची मी जिरवत जातो..
.
डाव रंगतो चुरशीचा दोघांमधला  
आनंदी तिजला बघण्या फसवत जातो..
.
वाट तिची बघता बघता मी हुरहुरतो 
मनातल्या खेळात मला लपवत जातो..
.
जोडी तुझी नि माझी ही युगायुगांची  
ताठ मान माझी करुनी मिरवत जातो..
.

देवालयात ना मी श्रीमंत देव भजतो--- [गझल]

वृत्त- आनंदकंद  , मात्रा- २४ 
लगावली-  गागाल गालगागा गागाल गालगागा 
अलामत- अ ,  गैरमुरद्दफ 
-------------------------------------------------------
देवालयात ना मी श्रीमंत देव भजतो     
मी झोपडीतल्या त्या गरिबांत रोज रमतो.. 
.
पोटात एक त्यांच्या ओठात अन्य काही 
गोटात मी शिरूनी त्यांच्यातलाच बनतो..
.
हाती गुलाब माझ्या हसतो जरा जरा मी 
काटाच मत्सरी तो बोटात खास घुसतो..
.
दिसता समोर तो जर तोरा हिचा किती हो 
पूर्वेस तोंड करते तो पश्चिमेस असतो..
.
मन मात्र त्याच वेळी चपलांस शोधते का 
जोडून हात जेव्हा मी देवळात बसतो..
.

गर्दीत चालताना कोठेतरी हरवतो... [गझल]

वृत्त- आनंदकंद ,   अलामत- अ 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
मात्रा-  २४  ,   गैरमुरद्दफ 
--------------------------------------------------
गर्दीत चालताना कोठेतरी हरवतो 
एकांत पाहुनीया मजलाच मी गवसतो ..
.
विश्वास ठेवतो मी नात्यातलेच सारे 
गोत्यात आणल्यावर डोळ्यांस मी उघडतो..
.
धरतीस आस भारी पाऊस पाहण्याची 
महिमा कलीयुगाचा दुष्काळ तो बहरतो..
.
बाहेर पाहतो मी खिडकीतुनी मनाच्या 
हमखास नेहमी का तव चेहरा मिरवतो..
.
झाले विणून धागे प्रीतीत आज सारे 
बहुमोल वस्त्र हाती घेऊन मी विहरतो ..
.