गणपती


१)  
   
बायको आपल्या कमरेवर एक हात ठेवून,
एका हातात लाटणे तसेच धरून तावातावाने,
तव्यावरची पोळी तशीच ठेवून, बाहेर दिवाणखान्यात येउन ओरडली,
" मला काही म्हणालात काय ? "

मी शांतपणे दोन्ही कानावर हात ठेवून,
आपली मुंडी नकारार्थी हलवत म्हणालो,
" ह्या बाहेरच्या गोंगाटापेक्षा मोठया आवाजात,
"मी तुला" काही बोलणे शक्य आहे काय ? "
.

२)   

बरीच सेलेब्रिटीज मंडळी बऱ्याच सेलेब्रिटीज मंडळींच्या गणपतीला भेट देऊन आली.
बरे वाटले !

बऱ्याच वृत्तपत्रांनी, दूरदर्शन वाहिन्यांनी त्या सर्व सेलेब्रिटीज मंडळींचे कौतुक केले .
आणखी बरे वाटले !!

ऋण काढून गणपतीचा सण साजऱ्या करणाऱ्या मंडळींचे,
किंवा झोपडीत किंवा पत्र्याच्या शेडमधील गणपतीचे फोटो झळकले असते तर.....

सोन्याहून पिवळे, असे खुद्द श्री गणेशालाही नक्कीच वाटले असते !!!
.


३)

श्री गणेशाचे भरल्या अंत:करणाने विसर्जन करून आलो.
गणेशाचे दहा दिवसांचे रूप, डोळ्यासमोर तरळताना डुलकी लागलीच.

- आणि दहा दिवसातल्या रोजच्या प्रमाणे श्री गणेश कानाशी पुटपुटून गेले...

" तुमच्या घरातून निरोप घेताना, मला खरेच वाईट वाटले रे .
किती शांतपणे, मन:पूर्वक, भक्तीसंगीतात मी गुंगलो.
धूप दीप नैवेद्य आरत्या सगळ्यात मी दंगलो.
पण ...

तुमच्या घराबाहेर आपण आलो आणि ... उगीचच बाहेर आलो, असे वाटले बघ !

पुढच्यावेळी मी येईन ...

जर ती धांगडधिंगा असलेली गाणी- हिडीस अंगविक्षेप- कर्णकटू वाद्ये नसतील तरच !!
बघ ! तुझे ऐकणार असतील सर्वजण--- तर मी येईन नक्की,
नाहीतर... माझाच सर्वांना कोपरापासून नमस्कार सांग सर्वांना ! "
.


देव नाही देवळात


देव आहे, का देव नाहीच !
एक शंका घुटमळणारी,
सदैव मनाला पोखरत आहे -

देवळाबाहेर लंगडा माणूस
एका आंधळ्याच्या ताटलीत
आदबीने जवळचे नाणे टाकत आहे -

हे असे का, ते तसे का
अपंग नसतांना माझे मन
पंगु बनायला सरावत आहे -

देव जवळून गेला तरीही
रांगेतल्या लोकांसोबत
आस्तिक-नास्तिक चर्चा रंगत आहे !
 

.

राम ... राम ... राम ...



राम... राम... राम... राम ...
माळ घेऊन माझा जप चालू आहे

कानावर बातमी
पेट्रोल डिझेल महागले

राम .. राम .. राम ..
माळ घेऊन जप चालू

कानावर बातमी

कोळसा घोटाळा जलसिंचन घोटाळा

राम . राम.
जप चालू

राम .
सिलेंडरची टंचाई

 
मरा.. मरा.. मरा...
आजकाल माझा जप नीट का होत नाही, माझ्या रामालाच ठाऊक !
 
.

" लता " ...




लता ...
दीदीचा आज वाढदिवस !

तरीच..
' बीस साल बाद ' चे 

ते गाणे 
आज सारखे डोळ्यासमोर ऐकू येत आहे..

"सपने सुहाने लडकपन के, 

मेरे नैनोमे डोले बहार बन के .."

सर्वांच्या तर्फे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा -

" ह्या जगाचा अंत होवो ..

पण लतादीदीची गाणी ,
पुढच्या जगातही ऐकायला मिळोत !!! "
 

.

आरसा.... नाही मित्रच !



मला आरसा खरोखरच आवडतो.

तो माझ्याबद्दल
आपलं खरखुरं
प्रांजळ मत
कसलीही भाडभीड न ठेवता
रोखठोक स्पष्टपणे
तोंडावरच सांगून टाकतो.

 
तोंडापुढे एक -
 
आणि पाठीमागे दुसरच बोलणाऱ्याशी..
 
त्यामुळेच माझ कधी जमत नाही !
.

भावनिका


    १.       टुक टुक 

सर्व चांदण्या अवती भवती
किती पहा त्या सतावती -
धरण्या जातो जर मी हाती
दुरून मजला टुकटुकावती !
 

.

                                      २.      खरा चेहरा

फुटला हा आरसा का असा
तुकडे पडले इकडे तिकडे -
चाचपून का बघतो आहे
माझ्या मी चेहऱ्याकडे !
 
.

कानठळ्या


काय करावे तेच समजत नाही !
रात्रभर गणपतीचे देखावे पहातो .
साहजिकच सकाळी उशीरा जागा होतो.
 

कुठे काही वाजतंय का ..
काहीच उमजत नाही .
कानाचं अस्तित्वच जाणवत नाही .
कान बधीर झाल्याचे जाणवतात .
चुकून कानात बोळे घातलेत की काय असाही भास होतो.

दुपारी डुलकी घेता घेता, 

श्री गणेश पुन्हा कानाशी पुटपुटून गेल्याचा भास झालाच..

" त्या समोरच्या समईतल्या कापसाच्या वातीचे, 

जरा मोठ्ठेसे दोन बोळे करून-
 माझ्या दोन कानात घालतोस का ? 
डोळे बंद करून घेऊ शकतो,
 ...कानाला माझे हात लावू शकत नाही ना....
 ह्या मोदक आणि फुलांमुळे ! 
चतुर्थीपासून आता माझ्या विसर्जनापर्यंत... 
नाही रे हे सगळ सहन होणार ! "
 

.

दोन भावनिका -



१.      बिचारा साई -

त्यानी बसवले सोन्याच्या चौकटीत
साध्यासुध्या फकीर साईला -
त्यानी बघितले दुरून ऐटीत
गुदमरलेल्या गरीब साईला !
.
 




२.     दलालीतला देव !

आर्त दिली हाक देवा
तरी नाही तो भेटला -
दलालास फळविता
मुकाट्याने तो भेटला !

.

समांतर



                                    आपण दोघे
                                    रस्त्यावरून चालत राहिलो
  

                                    आपण दोघे
                                    आयुष्यभर चालत राहिलो -
 

                                    आपण दोघे
                                    जीवन जगत राहिलो
 

                                    दोघांचे रस्ते मात्र -
                                    समांतर ... !
 

                                    हे समांतर रस्त्यात,
                                    

                                    सुरुवातीलाच समजून 
                                    घेतले असते तर !
 

.

नवा खेळ !

 
अहो बाबा -
आपण आता नवा खेळ खेळू या ना हो

आधी मी तुमच्यावर रागावल्यासारखे करणार
मग तुम्ही मला मारल्यासारखे करणार ...

अरे बाळा -
आम्ही मोठ्ठे लोक तर नेहमीच असला खेळ खेळतो की रे
   कुणीतरी आमच्यावर काहीतरी आरोप करतात
      मग आम्ही राजीनामा दिल्यासारखे करतो
         मग ते आम्हाला तुरुंगात पाठवतात
            आम्ही तिथे जाऊन आल्यासारखे करतो
 
.... आणि मग ते सगळे मिळून,
 आमच जंगी स्वागत करतात !
.

मै कहां हूं ?



त्या फालतू नटांच्या अभिनयाला
दाद का देतात कुणास ठाऊक !
 

इस्पितळात शुद्धीवर आला की,
तो हमखास पहिला प्रश्न विचारतोच -
" मै कहां हूं ? " .
आणि लोक त्याला दाद देतात ....

अरे ह्याsssट ...
 

मला आठवतय -
मीही इस्पितळात जन्माला आल्याबरोबर,
मोठ्ठ्यानं भोकाड पसरून विचारल होत -
" मै कहां हूं ? "

माझा अभिनय पाहायला 

सर्व "निष्णात" डॉक्टर जमले होते....
हे त्या नटांना कुठे ठाऊक आहे !
 

.

अरे संसार ...


सकाळी सकाळी..
 चहाच्या चाहुलीच्या निमित्ताने
माझी एखादी चक्कर चोरपावलांनी स्वैपाकघरात ( - हल्लीच्या भाषेत 'किचन'मधे ) होते.
बायको स्वत:शीच

 "उंच माझा झोका", "बहारो फूल बरसाओ","जीवनात ही घडी "
 असली गाणी गुणगुणत असली की समजावे ...
 

आज फक्कडसा चहा मिळणारच !

पण बायकोचे मुकाट्याने, शांतपणे कामकाज चालू असले,

 तर मात्र..
 

असह्य आणि जीवघेण्या शांततेपाठोपाठ
कोणते संकट उद्भवणार,
ह्या विचारानेच मी अर्धमेला झालेला असतो !

मित्रानो, 

ह्यालाच म्हणतात .. "संसार "
उगाच नाही म्हटले कुणीतरी -
"अरे संसार संसार , जसा चहा ग्यासवर ....

सिलेंडर मधेच संपले वाटते..
 

.

अभिनेत्री


बस्स्स !
 हसण सोडलं तर
ती एकदम माधुरीच,
 

दिसण सोडलं तर
हुबेहूब हेमा मालिनी,
 

रुसण सोडलं तर
डिकटो स्मिता पाटील,
 

फुगण सोडलं तर
प्रती हेलन,
 

तोंडावरचे मुरुमाचे खड्ड्डे सोडले तर
आपली शर्मिला टागोरच,
 

थोडेफार पांढरे केस आणि सुरकुत्या सोडल्या तर
रेखा कामतच,

अंगावर कपडे असले तर ...

अरे बाबा, ते तरी कशाला राहू देतोस...?
 

.

पोटदुखी -


आमचे डॉक्टर मित्र एकदम भारी.
नुसते त्यांचे बोलणे ऐकले,
तरी अर्धे दुखणे कुठल्या कुठे पळून जाते !
परवा दवाखान्यात गेलो.
"या-बसा -" झाल्यावर,
मी म्हणालो,
" थोडसं पोटात दुखू लागलंय ."
पोट तपासून झाल्यावर, 

तपास-नळी पुन्हा हातात खेळवत ते म्हणाले-
 

" फेस्बुकावर जास्तवेळ बसण्याचा परिणाम आहे.
आणि इतरांना 

आपल्यापेक्षा कॉमेंट्स लाईक्स जास्त मिळाल्या की,
 अस दुखणारच ! ......"
.

राजकारण राजकारण ...


संपली रविवारची सुट्टी . 
आज सोमवार .. 
शाळा सुरू झाली ...
 
मुलानो,
परवाचा गृहपाठ लिहून आणला का ?
बघू जरा, 
तुमच्या पालकांनी काय काय दिवे लावले आहेत !

 
क क कोळशाचा , 
ख ख खाणीचा , 
ग ग गोंधळाचा , 
घ घ घोटाळ्याचा ......

 
वा वा ! 
शाब्बास मुलानो.. 
आणि पालकानो !!
  
चला, छान अभ्यास केल्याबद्दल आजपासून
आपल्या संसदेच्या शाळेला बेमुदत सुट्टी !

जा , खेळा सगळे बाहेर जाऊन आता - 
 
       राजकारण राजकारण ....
.

मैत्री ...



मैत्री म्हणजे घाई गडबड नाही
मैत्री म्हणजे काही धडपड नाही
 
मैत्री म्हणजे उदार उसनवारी नाही
मैत्री म्हणजे दारोदारी नाही
 
मैत्री म्हणजे दारात नाही
मैत्री म्हणजे बाजारात नाही
मैत्री म्हणजे देवघेव नाही
मैत्री म्हणजे देवदेव नाही
मैत्री म्हणजे आकाश नाही
मैत्री म्हणजे पाताळ नाही
मैत्री म्हणजे वरवर नाही
मैत्री म्हणजे घरघर नाही
मैत्री म्हणजे तिरकसपणा नाही
मैत्री म्हणजे भंकसपणा नाही....

मैत्री म्हणजे आहे तरी काय ?
मैत्री अनुभवायचीच चीज हाय !
.

मनुष्य स्वभाव ! ?


मनुष्य स्वभाव कसा आहे ?

 

" अ ह्या पहिल्या मनुष्याने,
 

दुसऱ्या ब ह्या मनुष्याला,
 

चांगले म्हटले की,
 

तिसऱ्या क ह्या मनुष्याला..
 

ब चा मत्सर वाटतो,
 

आणि क विनाकारणच
 

अ बद्दल मनांत आकस ठेवतो ! "


 तर मित्रांनो,
 

असा आहे बरं मनुष्य स्वभाव !

पटलं तर ........

.

चार चारोळ्या -




१. कुणाच्या खांद्यावर -

             जगतांना सगळे मजला म्हणत
                         "
आम्ही तुझे- , आम्ही तुझे- "
             मरतांना ऐकले पुढचे शब्द

                         " -
वाहिले ओझे , - वाहिले ओझे " !

 २. फरक -
                         फरक नाही काही पडत
                         सुखात तुझ्या येण्याने -
                         दु:ख मला बिलगून रहाते
                         उरात तुझ्या जाण्याने !

              
३. समाधान- 
             देणा-याने झोळी समोरच्याची पहावी
             घेणा-याने
ओंजळ देणा-याची पहावी -
             दोघांची
संतुष्ट देवघेव पाहून
             पहाणा-याने
समाधानाची ढेकर द्यावी !


४. पौर्णिमेचा चंद्र -
             आकाशाकडे टक लावून
                        ते पौर्णिमेचा चंद्र पहातात -
                        मी तुझा चेहरा पाहून
                        घेतो पौर्णिमेचा चंद्र हातात !

.

गणेशोत्सव .. मी .. लोकमान्य टिळक ..


मी डुलकी घेता घेता अचानक..
आपले लोकमान्य टिळक..
माझ्याशी कानात 
अगदी हळू आवाजातच
पुटपुटलेले मी स्वत: ऐकले -

 
" मी सुरू केलेल्या आणि साजरा केलेल्या -
माझ्या गणेशोत्सवात कधीच न केलेला,
कधीच न ऐकलेला-
हा धांगडधिंगा कोण आणि कधीपासून करत आहे ..? "
 
मी खडबडून जागा झालो..
आणि मुकाट्याने
कानात बोटे घालून -
तोंड बंद ठेवून -
डोळे मिटून ..
घरातल्या घरात बसलो ..
 
अळी मिळी गुप् चिळी !!!
 
.

भावनिका...



१)      

शिते  आणि भुते -

कवने केली 
तुझ्या स्तुतीची
जमले अवघे 

जग हे जागे -
दर्शन न मिळे 

भरता रागे
गेले पळुनी 

जग ते मागे !

.....

          
२)

            आई  आणि बाप -

            बापाने उगारलेला 
हात सोडत नाही
            निरंतर व्रणानी 

भरलेली आपली पाठ -
            आईने
उगारलेला 
हात सोडत नाही  
                       नंतर तिच्या अश्रूनी 
भिजलेली आपली पाठ !


.

व्रात्यटीका ..



                               १)                                  
                                             बाथरूम  सिंगर -

                                        
                                              बाथरूम सिँगर तो असतो
                                              घरात गातो सुरात गातो -
                                              कपडे असताना तो गातो
                                              नसताना जोरातच गातो !
.


                             २)
                         दर्शन -
                           

                          महादेवाचे दर्शन घेण्याआधी
                                                        
नंदीचे दर्शन घडावे लागते -
                                                        
महा-देवाच्या दर्शनाआधी
                                                        
एजंटाचे दर्शन घ्यावे लागते !



                  ३) 
                      
                        चेष्टा  -

                                            "टुणटुण आली ", म्हणता तुम्ही
                                            बघुनी माझ्या देहाला -
                                            चेष्टेत कधी मी म्हटले का
                                            " आला बघा, चिम्पांझी आला " !
.

हे श्री गणेशा ,


हे श्री गणेशा,

"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय "
ब्रीद बाळगणाऱ्या,
कर्तव्यतत्पर असणाऱ्या,
वेळप्रसंगी चोवीस तास राबणाऱ्या,
तहानभूक विसरणाऱ्या,
कामातून दांडी मारायला न मिळणाऱ्या ...

माझ्या समस्त पोलीसबांधवांना मी तर आम्हांसर्वांच्यातर्फे
"गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा" देत आहेच...

पण तूही तुझे,
"सुखकर्ता दु:खहर्ता"
हे ब्रीद कायम ठेवून, त्यांच्या पाठीशी सदैव रहावेस ..
ही दोन्ही कर जोडून तुझ्या चरणी नम्र प्रार्थना !!!
.

विस्मरण..आठवण..


विसराळूपणा ..

छे ! वैताग आणलाय बुवा ह्या विसराळूपणाने !

बायकोने काम सांगितले .. नेमके विसरतो ,
मित्राच्या पोस्टला लाईक करायचे .. नेमके विसरतो ,
मैत्रिणीला शुभेच्छा द्यायची .. नेमकी विसरतो ,
बॉसला नेमक्यावेळी शिव्या द्यायच्या .. हमखास विसरतो ,
सहकाऱ्याला थाप मारून एखादे काम टाळायचे ठरवतो .. न विसरता विसरतो !

काही उपाय असेल, तर सांगाल काय ह्या विसराळूपणावर ?

अरेच्चा .. एक सांगायचे विसरलोच की सर्वांना ..
" २०१४ मधे 'लोकांनी' मतदान करायचे आहे "

हे विसरणारे कुणी मतदार असतील,
मी त्यावेळीमात्र आठवणीने आठवण करून द्यायला तयार आहे !
.

स्मरणशक्ती .. बोफोर्स..


मी एक साधासुधासरळमार्गी माणूस !

व्यवहारातले छक्केपंजे समजत नाहीत.
राजकारणातले डावपेच उमजत नाहीत.

यापुढे फक्त "स्मरणशक्ती" पक्की टिकवण्यासाठी उपयोगी पडणारी,
औषधे शोधत राहणार..गोळा करणार..प्रचार करणार..

जगातले "लोक" मूर्ख आहेत ..
याचा मला नुकताच साक्षात्कार झाला आहे.


ते आजचे घोटाळे आज विसरतात असे नाही,
तर ..
भूतकाळातले घोटाळे देखील भविष्यकाळात अगदी सहज विसरतात !

स्मरणशक्तीवर जडीबुटी, मलम, काढा, अर्क, गुटी, सायरप ..
जे जे औषध मिळेल, त्याचे मी डोस पाजत राहणार आहे !

औषध मिळेपर्यंत ..

मला कुणी समजावून सांगेल काय ..

ते "बोफोर्स" "बोफोर्स" म्हणतात, ते काय आहे हो ?
.

बगळा आणि नेता..


                      बगळा पांढराशुभ्र असतो.
                                    बगळा धूर्त असतो.
                                     बगळा आपले सावज अचूक पकडतो.
                                      आणि कार्यसिद्धीनंतर सगळे "विसरून" पुन्हा,
                                        पहिल्यासारखाच स्थितप्रज्ञ दिसतो !

                     नेता पांढराशुभ्र . . .

                                    पुढच सगळ मीच सांगत बसू काय ?
                                   .

विसराळू ...


हा हा हा हा ..

इतकं मोकळ मोकळ वाटत म्हणून सांगू !
नाहीतर...
जबरदस्त टेन्शन आलं होत हो .

परवाच्या भानगडी,
कालचे घोटाळे,
मघाचे लफडे...

हे सगळे म्हटलं लोकांच्या लक्षात राहिले,
तर कसं होणार आपलं ... ?

पण ..
एकदम माझ्या अचानक लक्षात आले हो -
लोक म्हणजे कोण हो ?
शेवटी सगळे "मी" मिळूनच बनणार नं "लोक" ..!

माझ्यासारखेच सगळे मूर्ख आणि विसराळू देखील !

बघा, सगळे लोक विसरून गेले की नाही मला ..
आणि माझ्या कुटील, घातकी, अतिरेकी कारवायाना !!!
.

वेळ ...

वेळ ...

कुठल्याही गोष्टीची " वेळ " फार फार महत्वाची असते.
म्हणजे एखादी घटना, गोष्ट
योग्य त्याच वेळेवर झालेली, घडलेली, जपलेली,
जाणलेली शोभून दिसते- आवश्यक असते,
 हे लक्षात येणे फार उत्तम !

लग्नाचा मुहूर्त योग्य वेळी साधला पाहिजे ..
उद्याचे काम आज करा,
 हा उपदेश उद्याच्या मुहूर्तासाठी आज पाळून चालेल ?

ऑपरेशनची वेळ डॉक्टरानी सांगितलेली योग्य ..
तिथे आपण "आज -आत्ता- ताबडतोब " चा हेका धरणे योग्य आहे ?

मला कामाची खूप खूप आवड आहे..
म्हणून कार्यालयात चोवीस तास घालवणे, 
मूर्खपणाचे नाही का ठरणार ?

बायकोला साड्यांची आवड आहे ..
एकाच वेळी चार साड्या खरेदी करणे आणि एकदम दोन नेसायला लावणे,
हा वेडेपणा नाही काय ?

काळ-वेळ न पाहता झिंगणारा बेवडा ,
अंथरूण पाहून पाय न पसरता- वेळी अवेळी मटका लावणारा,
खिशात दमडा नसतांना जुगार खेळणारा,
चार चौघात वेळ काळ न पाहता बिडीचे झुरके ओढणारा,
ह्या असल्या व्यसनी लोकांना वेळेचे महत्व पटवून द्यावे काय .. देत बसल्यास कुणाच्या वेळेचा अपव्यय होणार आहे हो ?

शहाण्याला शब्दाचा मार वेळेला दिलेला बरा ..
उधळलेल्या जनावराला योग्य वेळीच चाबकाचे फटकारे लगावलेले ठीक ..
मूर्खाचा नाद वेळीच सोडलेला चांगला ..

आपला शहाणपणा आणि दुसऱ्याचा मूर्खपणा वेळीच जपलेला ...?

एखाद्या मित्राचा वाढदिवस ठराविक दिवशी आहे,
हे माहित असतांना,
 "आगाऊ"पणाने शुभेच्छा देण्यात काय हशील ?
अगदी विसरूनच, लक्षात नाही राहिला तर,
 कालांतराने क्षमायाचना करून शुभेच्छा देण्याची वेळ साधणे - 
ही देखील मैत्री जपण्याची कलाच !

अरेच्चा .. नेहमीप्रमाणेच काळवेळ न बघता बरळत सुटलोच की --
 इतरांना वेळेचे महत्व समजावून सांगता सांगता, 
मला स्वत:ला ते कधी कुठल्या मुहूर्तावर समजणार कुणास ठाऊक ?
.