अंगाईगीत

आठ दिवस झाले .

बायकोला निद्रानाशामुळे झोप येईना .

डॉक्टरकडे जाऊन आलो.

झोपेच्या गोळ्या घेऊन झाल्या .

तरीही हिचे डोळे दिवसरात्र टक्क उघडेच !

आज सकाळी एक मस्तपैकी "अंगाईगीत" खरडले.

दुपारी जेवण झाल्याबरोबर, तिला ऐकवायचे ठरवले.

जेवण झाले .

ती अंथरुणावर लोळत पडली होती.

मी तिला म्ह्टल-

"हे बघ ग, आज सकाळीच मी खास तुझ्यासाठी-
एक अंगाईगीत लिहून तयार ठेवलेले आहे.
ऐकवतो तुला मी आता निवांतपणे !"

....... हातात कागद धरला आणि -
ते अंगाईगीत वाचण्याआधी,

मी सहज तिच्याकडे नजर टाकली !

ती चक्क घोरायला लागलेली होती की हो आधीच !
.

तलवार टांगती कायमची

थरथरते काया का माझी 
चाहूल लागता ती मरणाची ..

काल आहे तो नाही आज
उद्यास ना शाश्वती आजची .. 


कालचक्र हे फिरत राहते
चिंता तरी का मनी रोजची .. 


डरपोकाने भीत रहावे
बेडर वृत्ती न जमायची .. 


ठिणगी इवलीशीही पुरते
गंज जाळण्या कापसाची ..


ओझे जिवाचे, घेउनी जगतो
तलवार टांगती कायमची ..


जीव एवढा- भीती दाहक
न मरता, असंख्य मरणाची .. 


वारा हळु जरी वहात आला
थरथरती पाती का गवताची . . !

.

सवय


मागील वर्षी गुलबर्गा येथे मावसभावाकडे गेलो होतो.

बरोबर अर्थात बायको होतीच.

गप्पा मारता मारता,

 उत्सुकतेने बायकोने त्याला विचारले-
"काय हो, तुमच्या कर्नाटकच्या एमएसईबीचं लोडशेडिंग किती तास असत  ? "

मावसभाऊ हसतच उद्गारला  -
"वहिनी , आमच्याकडे एमएसईबीचं लोडशेडिंग कसे असेल ?"

बायकोची ट्यूब लौकर पेटली नाहीच !
 

 त्याला कळत नसल्यासारख समजून ,
 बायकोने प्रतिप्रश्न केला-
" कर्नाटकातले हे एवढे मोठे शहर असूनही, 

इथे एमएसईबीचा वीज पुरवठा होत नाही ?"

त्या प्रश्नावर मी आणि मावसभाऊ का हसत होतो,

हे काही तिला लौकर कळलच नाही .

शेवटी मावसभावाने खुलासा केला -
"आमच्याकडे एमएसईबी नाही, केएसईबी आहे ना ! 

पण लोडशेडिंग नाही. "

.

दोन चारोळ्या -

' नजरकैद - '

अपुल्या पहिल्या भेटीतली 
नजर आठवते अजुन मला -
मिटून घेऊन हळूच पापण्या
दडवलेस तू त्यांत मला ..
.

'नयनधारा -'

आज अचानक दिसता साजण 
प्रेमाची पहिल्या झाली आठवण -
मनांत गोठवल्या गारांची 
नयनांतून झरझर केली पाठवण ..
.

मतदानाच्या यादीमधली ऐका घोळकहाणी


मतदानाच्या यादीमधली ऐका घोळकहाणी
निवडणुकीच्या धामधुमीतल्या मतदानावर पाणी

मतदारराजा ऐटीत गेला करण्याला मतदान
यादीत अपुले नाव न बघुनी झाला तो हैराण


मतदारराणी खूष जाहली पाहुन यादीत नाव
राजाच्या तो उरावरी का बसला जबरी घाव


शाई लावुन मिरवत आली तर्जनीस ती राणी
कौतुक घरात जो तो करतो राणीचे मिरवूनी


तपासली ना यादी आधी राजाची का चूक
राणी हसली राजाची ती जाणुनिया घोडचूक


संपुन गेली वेळ मताची राजा हातास चोळी
चडफड नुसती मनात, घेई मौनाची ती गोळी


राजा वदला उद्या करूया तक्रार आपण दोघे
म्हणते हसून राणी "राजा,येणार नाही संगे !"


तोंड फिरवुनी दोन दिशाना बसले राजा राणी
निवडणूक राहिली बाजुला घरात घोळकहाणी . .


.

स्मरणशक्ती


मी सगळ्या जगाला विसरून,
नेहमीप्रमाणे संगणकात तोंड खुपसून बसलो होतो.

तरीपण,
बायको इकडेतिकडे घाईघाईत येरझाऱ्या घालत होती,
त्यामुळे माझे लक्ष थोडेफार विचलीत होतच होते.

शेवटी न राहवून मी तिला हटकलेच-
"अग, माझ्यापुढे का सारखीसारखी मिरवतेस अशी ?"

बायको क्षणभर थांबली आणि उत्तरली -
"अहो, 'स्मरणशक्ती कशी वाढवावी', 

या विषयावर मी एक छानसा लेख सकाळी पेपरात वाचला होता.
मी त्याचे कात्रणही काढून ठेवले होते हो -
तुमचं संगणकावरच काम झाल की,
ते तुम्हाला द्यायच म्हणून !


पण मी ते कुठ ठेवलय -
हेच नेमक मला आता आठवेनासे झालेय !"
.

प्रथम तुज पाहता

तुझा नकार पचवूनही
इतर होकारांच्या वेळी ..

तुझ्या घरातल्या
चहा-पोह्यावेळची . .

खाली रोखलेली तुझी
ती नजर ..

अंगठ्याने उकरत असलेली
ती जमीन . .

तुझ्या घरासमोरून जाताना
आजही कशासाठी ..

माझ्या मनात
घर करून राहते ..

तुझी ती नजर
अन ती जमीन . . !
.

निरोप


सागरतीरी जोडा अपुला

हात घेउनी हाती बसला -

निरोप घेताक्षणी सखे
विचारलेस तू का ग मला -

"भेट ही शेवटची अपुली ,
वाईट वाटते काय तुला" -

बरे वाटले होते मजला
कारण सागर तो साक्षीला -

दु:ख जाहले किती मला
कसे ग सांगू सखे तुला -


जाणिव होताच सागराला

जवळ निरोपाचा क्षण आला -

अश्रूंच्या त्या लाटेमध्ये
माझे अश्रू मिसळुन आला . .
.

घर



स्वच्छता टापटीप असलेल
कागदाचा कपटा न पडलेल ..

जागच्याजागी वस्तू असलेल
खेळणी इतस्ततः न विखुरलेल ..

खुर्च्या सोफा नीट ठेवलेल
माणसांची वर्दळ नसलेल ..

नवरा-बायकोची चिडचिड नसलेल
ताई-दादाची दंगामस्ती नसलेल ..

म्हाताऱ्यांची खॉकखॉक नसलेल 
"छानस घर" आहे का तुम्ही पाहिलेल ..

निर्जीव वास्तूत शुकशुकाट असलेल
त्याला का म्हणायच, "घर" आपल . . !

.

प्रामाणिक

                    ऑफिसमधून येऊन घरी नुकताच कॉटवर पहुडलो होतो. परंतु आमच हे सुख कुठल बघवतय दुसऱ्यांना ! इकडून हुकूम सुटला- "हे पहा, अजून अर्धा तास रेशनच दुकान उघड आहे. घरात चहाला साखर नाहीय ! लवकर जा आणि घेऊन या !" धडपडत उठलो झालं ! गरज होती ना चहाची !

                       पण अशावेळी सर्वच गोष्टी कुठल्या वेळेवर व्हायला ? कार्ड, पिशव्या, पैसे, सायकल या साऱ्या गोष्टी जमवण्यापासून तयारी. ज्वारी आणावयास म्हणून शेजारच्या राघूअण्णांनी गेल्या आठवड्यात नेलेल कार्ड, त्यानी शेजारधर्माला जागून अद्याप परत केलेलं नव्हत. पोरांनी शाळेला नेलेल्या पिशव्या, घरी यायची वेळ झाली होती. दारात स्टँडला लावलेली सायकल आमच्या मेहुण्यानी लंपास केली होती. आपलीच सायकल, आपलाच मेहुणा. सांगतो कुणाला ?

                   मी पुन्हा कॉटवर येऊन आरामात तक्क्याला टेकून बसलो. तेथूनच ओरडलो- "सायकलसकट सर्व वस्तू आधी एकत्र जमव, तोपर्यंत मी उठणार नाही बर का ग !"

               माझ्यापेक्षा दुप्पट जोराने आतला आवाज कानावर आदळला- "मला तेवढाच धंदा नाही बर का हो ! संध्याकाळचा स्वैपाक आटपायचा आहे." त्यापाठोपाठ दोन चार भांड्यानीही आवाज करून, आतून आलेल्या आवाजाला अनुमोदन दिले !

                  इतक्यात- "अण्णा, सायकल मोडली, मोडली", असे ओरडत धाकटे युवराज शंखध्वनी करत कॉटजवळ आले. पुन्हा मी उठलो (आराम हराम है ना !). दारातून पाहिलं- आमचे मेहुणे सायकलच्या चेनशी कुस्ती खेळत होते. त्यांना आधी राघूअण्णांकडे पिटाळले व चेन बसवली. धाकट्या युवराजांच दप्तर फेकून, पिशवी मोकळी केली. तेवढ्यात थोरले युवराज आलेच. त्याचंही दप्तर काबीज केलं. कार्ड, पिशव्या नि सायकल या तिन्ही गोष्टी अस्मादिकानीच जमवल्या !

                        शर्ट-पायजमा अंगात चढवला आणि सौ.ला चहासाठी आधण ठेवण्याची सूचना देऊन घरातून बाहेर पडलो. सायकलवर टांग मारली. चहाची इतकी तलफ आली होती की बस्स ! पण हॉटेलात जाऊन पंधरा पैशांचा गुळाचा चहा घेणे, खिशालाही परवडणारे नव्हतेच ! शिवाय एक तारखेला अजून आठ दहा दिवस अवकाश होता.

                  "आर ए बाबा, डोळ फुटलं का र तुझ ?" - असे शब्द कानावर येताच, चहाची तलफ क्षणार्धात नष्ट झाली. काय घडल हे पाहण्याच्या उद्देशाने मी इकडे तिकडे पाहिले. मी चक्क एका भाजीवालीला सायकलने ढकलले होते. भाजी पार इतस्तत: विखुरली होती. "ह्या इसमाने आज जरा जास्तच घेतली असावी !"- अशा संशयाने सर्वांच्या नजरा माझ्याकडे लागल्या होत्या. माझा 'कारकुनी' चेहरा अधिकच केविलवाणा झाला ! न उतरता मी सायकल तशीच दामटली !

                   रेशनदुकान येताच हायसे वाटले. गर्दी विशेषशी नव्हतीच. माझा नंबर लवकर लागला. पावती घेतली व पैसे देण्यासाठी खिशात हात घातला मात्र-
खिशातून पैशाऐवजी, रिकामा हातच बाहेर काढला. कारण गडबडीत पँटऐवजी पायजमा घातला, त्याचा हा परिणाम ! पावती व कार्ड दुकानात ठेवून, पुन्हा घराकडे निघालो. दारातच सौ.चे स्वागत कानावर आले- "पैसे राहिले वाटते न्यायचे ." काही न बोलता मुकाट्याने घरात शिरलो. हँगरवरची पँट खसकन ओढली. दोन्ही तिन्ही खिसे नीट चाचपले. पण छे ! खिसे रिकामेच होते. बुशशर्टचेही खिसे पाहिले. कागदाच्या तुकड्याशिवाय काहीच आढळले नाही.

                    "अग ए - " म्हणत, तणतणत स्वैपाकघरात गेलो. "पैशाच पाकीट घेतलस का ग ?" - तिला विचारले.

                         "मी कशाला घेत्येय ? पहा इकडे तिकडे, ठेवलं असेल तुम्हीच कुठेतरी !" सौ.चे उत्तर.

                      शहाण्यासारखा विचार करून, आधी सौ.ची पर्स हातात घेऊन, त्यातले पाच-सहा रुपये घेतले आणि परत दुकानाकडे निघालो ! म्हटल पाकीट नंतर शोधता येईल !

                     दुकान बंद व्हावयास आल होतंच . पट्कन रेशन ताब्यात घेतल, पैसे दिले आणि निघालो. वाटेत विचार केला. पाकीट तर खिशात नक्कीच असल पाहिजे पँटच्या. कारण सौ.ने फारतर त्यातले पैसे काढून घेतले असते. मुलेही कधी पँटला हात लावत नाहीत. त्यामुळे त्यानी पाकीट घेणेही अशक्यच. ऑफिसातून निघालो, त्यावेळी पाकीट खिशातच होत. विसरण्याची शक्यता नाही. हां ! एखादेवेळेस सिगारेटच्या दुकानात विसरलं असेल.

                   मी सायकलचा रोख पानपट्टीच्या दुकानाकडे वळवला. "या साहेब." पानपट्टीवाल्यान स्वागत केलं. मी "माझ पाकीट दुकानात विसरलं काय ?" याची चौकशी केली. सिगारेट घेताना मी पाकिटातूनच पैसे काढून दिले होते.

               "वा साहेब ! विसरला असतात, तर घरी आणून दिल असत की तुमच्या !"

                    तेही खरच होत म्हणा ! कारण तो पूर्णपणे परिचित होताच मला. खरंच कुठे गेल बर मग माझ पाकीट ?

                       घरी आल्यावर सर्व कपडे, कोनाडे शोधले. सर्वांकडे नीट चौकशी केली. पण पालथ्या घड्यावर पाणी. कुणीच पाहिलं नव्हत माझ पाकीट . आता मात्र माझा धीरच खचला. पाकिटात सुमारे वीसएक रुपये तरी सहजच होते. सकाळीच एका मित्राकडून, उसने म्हणून नेलेले पैसे त्याने परत दिले होते. तेवढ्यात सौ.ने 'साखरे'चा चहा टेबलावर आणून ठेवला. मी तो घेतला, पण तेव्हा तरी मला तो गुळाचाच वाटला ! सुन्न होऊन मी आरामखुर्चीवर बसलो. मुलेही चिंताक्रांत चेहरा घेऊनच अभ्यासाला लागली. सौ.ने मात्र मला उपदेश केला- "अहो तुम्ही तरी काय करणार त्याला ? आपल्याच नशिबात नव्हते ते पैसे, असे समजा ."

                      "पान वाढली आहेत. जेवून घ्या !" - सौ.चा हुकूम सुटला. निराश अंत:करणानेच आम्ही सर्वजण जेवायला बसलो. जेवण अर्धेमुर्धे होताच माझ्या आडनावाने कुणीतरी खिडकीतून हाक मारली. "कोणाय ?" असे विचारत सौ.ने दार उघडल. आम्ही आपल जेवतच होतो ! एवढ्यात सौ. माझे पाकीट हातात घेऊनच आली.

                 "माझ पाकीट !" मी हर्षातिरेकानेच ओरडलो.

                 "आधी पोटावर लक्ष द्या, मग पाकिटावर !"- सौ. म्हणाली. पण सौ.च्या असल्या विनोदावर लक्ष देण्याइतका मी शुद्धीवर नव्हतोच मुळी ! भरभर जेवण करू लागलो होतो मी- कधी न जेवल्यासारखा . बाहेर सौ. कुणाशीतरी बोलत होती. माझ्या कानावर थोडे थोडे शब्द येत होते.

                 "पानपट्टीच्या दुकानाजवळ पाकीट सापडलं. पाकिटावर नाव, पत्ता होता. म्हणून आलो !" - लहान मुलाचा आवाज येत होता.

                "थांब हं ! चहा घेऊन जा बर का !" - असे त्याला सांगून, सौ. स्वैपाकघरात आली. तिचीही कोण धांदल उडालेली दिसत होती. मीही सर्वांना उद्देशून म्हणालो- "बघा ! आजच्या युगात असा प्रामाणिकपणा कुठे आढळायचा नाही. पाकीट चांगल्याच्याच हाती पडल म्हणून बर ! नाहीतर चुरमुरे फुटाणे खात बसावे लागले असते आठवडाभर ! जगात अजूनही अशी प्रामाणिक माणस आहेत, म्हणून चाललय बर हे जग !" इतक्यात मला जोराचा ठसका लागला.

                "अहो, सावकाश जेवा आधी नि मग भाषण ठोका !" सौ.ने दटावले. चांगला तांब्याभर पाणी प्यालो. हात धुतले नि मग बाहेरच्या खोलीत आलो. बारा तेरा वर्षांचा एक मुलगा चुळबुळ करत उभा होता.

                "बस रे इथ !" मी त्याला म्हणालो.

                "नको. जातो मी ! अंधार जास्त पडतोय !" तो म्हणाला.

                त्याला बळेच खुर्चीवर बसवले. मी पाकीट उघडून पाहिले . एकोणीस रुपये व थोडीशी चिल्लर ! सर्व ठीक होते. एक अधेली त्याच्या खिशात मी बळेच कोंबली.  त्यासरशी तो फारच भेदरला !

               "अरे, असा घाबरतोस काय इतका ?" - मी समजावणीच्या सुरात त्याला म्हटलं . मी त्याची आणखी चौकशी करणार, इतक्यात सौ.ने चहाची कपबशी आणली. त्याने "कशाला कशाला ?" म्हणत चहा संपवला. तो उठला व "नमस्कार, येतो मी !" म्हणून निघाला. मीही त्याच्या पाठीवरून हात फिरवून "असाच प्रामाणिक रहा हं, बाळ" म्हणत शाबासकी दिली. त्याची चौकशी करायची राहूनच गेली.

                      तो गेल्यावर मग मजेत आमच्या गप्पा-चर्चा सुरू झाल्या. थट्टा-मस्करी सुरू झाली. आपापले मनोरथ, विचार कसे खुंटले होते, पाकीट नसण्यामुळे - याची सर्वांनी चर्चा केली. पाकिटामुळे सर्वांच्याच जिवात जीव आला होता. एखादे पारितोषिक लढाईत जिंकून आणल्याप्रमाणे, सर्वजण वारंवार पाकिटाकडे पाहत होतो. एखादा तास सहज झाला !

                    "अय्या ! मला कीर्तनाला जायचं आहे की साडेआठला ! विसरलेच होते मी !" सौ. मधेच उघून उभी राहिली आणि टेबलाजवळ गेली.

                  "घड्याळ हातातच राहू दिलंय वाटत आज-" अस म्हणून तिने माझ्या हाताकडे पाहिलं.

                    "म्हणजे ?" मी ओरडतच कॉटवरून उठलो. टेबल व टेबलाचे खण पालथे घातले. पण छे ! घड्याळ नव्हते.जेवण्याआधी मी वेळ पाहूनच टेबलावर रिस्टवॉच ठेवल्याचे मला पक्के स्मरत होते. हातात तर घड्याळ नव्हतेच !

                अचानक माझ्या डोळ्यांसमोर मघाच्या "त्या' मुलाची चुळबुळ व त्याचा भेदरलेला चेहरा उभा राहिला.

               मी त्याच्या खिशात हात घालताच- तो दचकल्याचे मला आता जाणवले. पण आता काय उपयोग ?

               प्रामाणिकपणाने पाकीट मिळवले गेले, पण रिस्टवॉचची धोंड बसली होती ! वर पुन्हा साखरेच्या चहाचा कप.

              "छे ! या जगात प्रामाणिकपणा राहिला नाही, हेच खर !" असा विचार मनात आला.

.
(पूर्वप्रसिद्धी: २१/०७/१९६८. रविवार सकाळ)
.                        

मुक्तछंदी


असाच एक छंदीफंदी
असाच एक मुक्तछंदी ..

अक्षरापुढे जोडून अक्षर
होऊ पाहतो मुक्तानंदी ..

विचार मांडून शब्दातून
कविता रचण्याची संधी ..

वाचो कुणी वा ना वाचो
माझा मी होतो आनंदी ..

कवितेला कवटाळुन मी
करून ठेवतो मनात बंदी ..

प्रतिभेची करतो आराधना
मी महादेवापुढचा नंदी .. !

.

आप जैसा कोई जिंदगीमे आये....

                     पगाराचा दिवस उगवला अन मावळला ! संध्याकाळचा सूर्य स्वत:च क्षितिजरेषेच्या मीलनाने लालबुंद होऊ पाहत होता. पहिलटकरणीचे स्वागत ज्या उत्साहाने माहेरी होत असते, त्या उत्साहात प्रत्येक 'मिळवता' पुरुष आपल्या घराकडे पगाराच्या प्रसन्न सायंकाळसमयी निघालेला असतो ! मीच कसा अपवाद असणार ? पार्क मैदानाजवळ मोगऱ्याचा गजरा घेताच माझी पावले घराकडे झपझप निघाली !

        दाराच्या चौकटीतच पॉलिस्टरची फिकट गुलाबी साडी व म्याचिंग पोटिमा (खर म्हणजे 'ढेटिमा'!) ब्लाउज परिधान करून अगदी 'कशी करू स्वागता'च्या स्टाईलने अस्मादिकांची सौभाग्यवती सुहास्यवदनाने सामोरी आली ! डोक्यावरील सैलशा शेपट्यातला गुलाब तिच्या गालजोडीशी स्पर्धा करायला आसुसला होता ! प्रत्येक दिवाळसणासाठी जावई जसा टपून बसलेला आढळतो, तशी अवस्था पगाराच्या दिवशी सौ.ची झालेली आढळते !

           आमच्या लग्नाला दहा वर्षे होऊन, एकमेकांच्या सहकार्याने पाळण्याच्या सर्कशीची कसरत मोजून तीनवेळा आम्ही केली होती ! पण तीनवेळा ती पाळी चुकली, तरी एक तारखेला अस्मादिकांच्या अशा 'सुहास्य'मय स्वागताची पाळी
दहा वर्षात अद्याप चुकली नाहीच !

        तिच्या सुहास्याला शक्य तितक्या कारकुनी-स्मिताने प्रत्युत्तर देत मी घरात प्रवेश मिळवला. बटाटेवड्यांचा खमंग वास आसमंतात दरवळत होताच. गनिमाने आघाडी तर चांगलीच उघडली होती. दारूगोळा ठासून भरला होता. निमूटपणे मी रुमालातला 'गजरा' तिला दाखवून 'पांढरे निशाण' फडकावले ! वड्यांचा हल्ला परतवण्यास माझी जीभ मोर्चे बांधू लागली आणि सुमारे पंधरा मिनिटानंतर.....

        निवांतपणे वॉश घेऊन मी कॉटवर पेपर चाळत पडलो होतो. तेवढ्यात स्वैपाकघरात भांड्यांची उतरंड कोसळल्याचा आवाज आला. पेपर बाजूला टाकून मी त्वरेने आत गेलो. खर तर 'भूत भूत' म्हणूनच मी ओरडणार होतो, पण मघाशी चुळबुळ करणारी जीभ आता का स्थिर झाली कुणास ठाऊक ! समोरच्या अलौकिक दृश्याने माझे डोळे विस्फारले गेले !

        भांडी-कप-बशा-चमचे-थाळ्या या साऱ्यांचा खच इतस्तत: पडला होता. मी काहीवेळापूर्वीच आणलेला गजरा चोळामोळा होऊन निर्माल्यवत पडला होता. आणि या साऱ्या गबाळात सौभाग्यवती 'कडकलक्ष्मी'च्या अवतारात उभी ! डोक्यावर मिरवणारा गुलाब एखाद्या 'मेलेल्या' प्रेताप्रमाणे निश्चेष्ट होऊन तिच्या पायाशी पडला होता. केसाच्या प्रेमळ शेपटाने आता घट्ट बुचड्याचे रूप धरण केलेले होते, एक हात            
 कमरेवर आणि दुसरा हात 'लाटणेधारी' बनला होता !

        मघाच्या शांत पार्श्वभूमीवर आताचा हा उग्र तमाशा पाहून वाटलं तिच्या पार्श्वभागावर एक सणसणीत लाथ ठेवून द्यावी ! पण तो मोह मी क्षणार्धात टाळला, अन्यथा माझी लाथ लचकण्याखेरीज दुसर काय घडल असत !

        सौ.ला निमूटपणे शरण जात ऑफिसात हेडक्लार्कला (कामापुरता) जसा मृदू आवाजात किंचाळतो- तसा, मी वदलो-
"काय झालं राणीसरकार ! एखादा उंदीर अथवा झुरळ तर नाही ना दिसले आपल्याला कुठे ? झुरळाची मिशी टोचली नाही ना कुठे ? उंदराचे शेपूट तर लागले नाही ना कुठे ? "

        पण ती (महामाया ?) गप्पच उभी ! भर दिवसा तिच्या अंगाला स्पर्श करण्याच्या दुर्मिळ संधीने मी तिच्याजवळ जाणार, एवढ्यात- बहुधा माझा कुटील हेतू ओळखून ती चंडिका डाफरली -
"दूर व्हा ! पुढे याल तर खबरदार !"

मी- "अग पण एवढ - "

"एक शब्द बोलू नका ! या अशा अवतारात मी मुद्दामच उभी राहिलेय !" ती खेकसली.

मी डिवचले- "कशासाठी ?"

"मी तुमचा निषेध करतेय !" आपले टपोरे डोळे गरगरा फिरवत ती ओरडली.

"अग पण कारण तरी सांगशील की नाही (-माझे आई !)"

"मला आधी सांगा, माझ्या निषेधाची नोंद तुम्ही घेतलीय का ?"

"अर्थातच ! वाटल्यास 'अक्कलहुषारीने, राजीखुषीने, नशापाणी न करता, डोके ताळ्यावर ठेवून' सट्यांपपेपरवर तसे लिहून देऊ का ?"

ती चिडली- "फालतू बडबड पुरे !"

 पहा म्हणजे झाली की नाही कमाल ? विनोद करणारा जातो जिवानिशी नि ऐकणारा म्हणतो फालतू बडबड ! विनोदी लेखकांची कुचंबणा करणाऱ्यांचाही खर तर निषेध करायला हवा !

        तलवारीचे वार सपासप करावे तसे लाटणे माझ्यापुढे फिरवत ती (कैदाशिण ?) आणखी जवळ आली. त्यावेळी तिचे तसे रूप पाहून, एकाहून एक वरचढ विशेषणे मला स्मरणात येऊ लागली होती. परंतु स्थलसंकोचास्तव ती सारीच्या सारी विशेषणे इथे छापणे केवळ अशक्य आहे ! गरजू नवऱ्यानो, क्षमस्व !

        ती म्हणाली- "थट्टा-विनोद करण्याची ही वेळ नाहीय. मी रियली सिरीयसली तुमचा खराच निषेध करतेय !"

        आज सकाळी बहुतेक कुठल्यातरी पेपरात 'निषेध' विषयावरचा अग्रलेख तिने वाचला असण्याची शंका माझ्या मनाला चाटून गेली. मी संथ स्वरात म्हणालो- "ठीक आहे !"

        माझ्याकडे एक विजयी स्मित फेकून ती कडाडली- "आज घरी कशाला आलात ?"

        नेहमीच्या सवयीने 'झक मारायला' असे शब्द माझ्या ओठावर आले होते, पण त्याचक्षणी पंधरा मिनिटापूर्वीची 'गुलाबी सुहास्यवदना' अशी सौ. डोळ्यासमोर उभी राहिली ! स्वत:ला सावरत मी उद्गारलो-
"आपण आधी कॉटवर बसून निवांत बोलू म्हणजे काही वाटाघाटीची शक्यता-"
त्यावर ती थोड्या खालच्या पट्टीत किंचाळली- "पण कॉटवर काही दगाफटका (उर्फ चावटपणा ! हे सूज्ञास सांगणे न लगे !) नाही करायचा काही. तर माझी तयारी आहे !"

        एका हाताने पिंजारलेल्या झिंज्या सावरत दुसऱ्या हाताने- खाटिक सुर परजतो त्या थाटात- लाटणे फिरवत ती माझी मानगूट पकडल्यागत बाहेरच्या खोलीत आली !

        आम्ही दोघे 'कॉटस्थ' झालो. शेवटी अक्कलवंतालाच गरज असल्याने काही काळानंतर  मीच बोलायला सुरुवात केली.
"का ग अबोला , का ग दुरावा
अपराध माझा असा काय झाला ?"

        तिनेही ताबडतोब धमकावले-
"भुला नही देना सैया
आज पहली तारीख है !"

        अशारीतीने उभयपक्षी 'संगीत' वाटाघाटीना प्रारंभ झाला. वातावरण थोडेसे निवळले. म्हणून मी डायलॉग फेकला- "आखिर कहना क्या चाहती हो !"

"पगाराचे पैसे कुठे आहेत ?" तिने आपल्या थंड नजरेने मला पुरते न्याहाळत थोड्याशा कठोर स्वरात (म्हणजे नक्की कसे कुणास ठाऊक ! पण वाचायला बरे वाटले ना ?) विचारले. मी मुकाट्याने कॉटवरून उठलो. हँगरवर टांगलेल्या पँटकडे निघालो.

        "थांबा !" - तिने आपल्या भेदक आवाजात हुकूम सोडला. मी 'हँडसअप' करून मागे वळलो. तिने लगेच फायरिंग सुरू केले. "तुम्ही बाथरूममध्ये असतानाच मी पँटशर्टचे खिसे तपासलेत. दोन रुपयांची एक नोट आणि दहा पैशांच्या तीन नाण्यांखेरीज इतर काही नाहीय त्यात !"

        "बाप रे !" - मी मनातच पुटपुटलो. सी.आय.डी.खाते एका कुशल नि कर्तबगार महिलाधिकारणीला मुकल्याची चुटपूट मला लागली. माझे मौन पाहून सौ. त्वेषाने उसळली- "कुठल्या मित्राला दिलाय सगळा पगार उसना ?"

        मी गुळमुळीत उत्तरलो- "कुणालाच नाही !"

        "मी खर्च करते, म्हणून दुसऱ्या कुणाजवळ ठेवलाय ?"

"मुळीच नाही !" मी शांतपणे म्हणालो.

"मग कुठल्या वाईट व्यसनात उडवला ?"

या बयेन आता मात्र कहरच केला हं ! मी जरा रागानेच ओरडलो-
"इतकी वर्षे आपण संसार केला
हेचि फल काय मम तपाला ,
सोन्यासारखी तीन मुले आपल्याला
तरी संशय का मनी आला ?"

त्यावर बेडरपणे ती सौभाग्यवती उद्गारली कशी- "उगाच गाण्यामधे ओरडू नका. नऊ वर्षे आणि अकरा महिने न चुकता एक तारखेला तुमचा पगार मला मिळत आलाय ! आजच का असे व्हावे मग ? आणि हे पहा- खिसेकापूने पाकीट मारल्याची थाप पचणार नाही, आधीच सांगून ठेवते !"

        "म्हणजे एक तारीख असूनही, मी घरी आल्याबरोबर पगाराचे पाकीट तुझ्या हातात आले नाही, म्हणून हा तुझा निषेध (उर्फ मूर्खपणा !) आहे तर !" - असे पुटपुटत मी रेडिओ लावून कॉटवर आरामात हातपाय पसरले. ('चावट' वाचकासाठी खुलासा- सौ.ने तेथून उठण्याची आधीच तत्परता दाखवलेली होती ! सौ.चा चेहरा भलताच चमत्कारिक झाला होता, मी तिच्याकडे जळजळीत नजरेने पहात म्हटले-
"हे पहा सौभाग्यवतीबाईसाहेबमहोदया ! असे बिनबुडाचे आरोप करणे खर म्हणजे आपला आजवरचा सुखी संसार लक्षात घेता चांगले नव्हे ! त्याबद्दल मीच तुझा निषेध करायला हवा ! इतकी बेछूट बडबड नि आक्रस्ताळी विधाने करायला तू काय स्वत:ला विरोधी पक्षाची पुढारीण समजतेस ? पण जाऊ दे. मी तुझ्यासारखा क्षुद्र मनाचा नाही. अग, तू मला नुसते विचारले असतेस तरी मी सगळा प्रकार सांगितला असताच ना !"

        एव्हाना तिच्या वर्तनाची शहानिशा होऊन, माझी बाजू भक्कम ठरून मी बेफिकीर झालो होतो. कधी नव्हे तो माझा आवाज 'चढू' लागला, अन तिचा चेहरा 'पडू' लागला. दोघानाही एकमेकांचा नवीन अवतार पहायला मिळाला. मोठ्या रुबाबात मी एक वाक्य फेकले- "मी शुद्ध प्रेमाने आणलेल्या गज-याची तू इकडे इतकी दयनीय अवस्था करशील याची, हे स्त्रिये, मला कल्पांतापर्यंतही  कल्पना आली नसती, तस्मात् मी तुझा त्रिवार धिक्कार करतो !" यावर सौ.ची अपेक्षित प्रतिक्रिया मला पहायची असल्याने मी डोळे मिटून स्वस्थपणे पडून राहिलो !

        वादळ थांबून, पावसाच्या सरी कोसळल्यागत तिच्या डोळ्याला धारा लागल्या. कुठलेही रबर तुटेपर्यंत ताणू नये, असा सूज्ञ विचार करून डोळ्यानीच मी तिला जवळ येण्याची खूण केली. हातातले लाटणे बाजूला ठेवून, डोक्यावरचा 'शिरपेच' त्यातल्या त्यात व्यवस्थित करत खाली मान घालून सौ. समोर बसली. मला वधूपरीक्षेची आठवण आली. पुन्हा एकदा मी तिला मनातून 'पसंत' केलं. इतकी शालीन, आज्ञाधारक, सोज्वळ वगैरे अर्धांगी मला एकट्यालाच मिळाल्याने माझा ऊर अभिमानाने भरून आला ! त्या अभिमानाच्या भरात होणाऱ्या मोहाला मी कटाक्षाने टाळले. मी समजावणीच्या स्वरात म्हटले- "अग, आज एक तारीख आहे, हे मी विसरलो असे वाटले तरी कसे तुला? तस असत तर महिन्यातला एकुलता एक गजरा मी आणला असता का ?"

        "पण मग आज पगार कुठे -"

               "ह्या महिन्यापासून पगारवाटपाची पद्धत बदलली आहे ."

               तिच्या पापण्या कुतुहलाने फडफडल्या. तिची पाठ हळुवारपणे थापटत (निम्मा गड सर केला होता ना मी !) मी सांगू लागलो- "आजवर पगाराची रक्कम 'रोख' मिळत होती. पण यापुढे ज्याच्या त्याच्या बँकखात्यात पगाराचे पैसे 'जमा' करणार आहेत."

        "ते का म्हणून ?" तिने विचारले.

        "कॅशिअरना एकाच दिवशी बर्डन पडू लागले म्हणून ! आम्ही सर्वानी मिळूनच असा निर्णय घेतला. ज्याला लागतील त्या दिवशी प्रत्येक कर्मचारी आपल्या खात्यातून पैसे आवश्यकतेनुसार काढून घेईल." मी समजावून सांगितले.

        माझ्या उत्तराने तिचे समाधान झाले. मुलांना शाळेतून यायला अजून वेळ असल्याने तिचा हात प्रेमाने माझ्या 'टकला'वरून (उगाच कशाला खोट सांगू !) फिरू लागला.

        "आणि त्यामुळेच माझ्या खिशात दर महिन्याप्रमाणे पाकीट भरलेले नाही ! तू सुतावरून असा स्वर्ग गाठशील याची मला सुतराम कल्पना नव्हती ! मी आपला आपल्या नाकासमोर आणि तेही सरळ पाहत चालणारा एक सभ्य कारकून ! तुमचा तो "निषेध- फिषेध" आम्हा पामरांना कसा कळणार ?....एक तारखेच्या पगाराचे अप्रूप तुम्हा बायकांना इतके वाटते ?"

        त्यावर सौ.ने "चुकले हो मी !" म्हणत चक्क माझे पाय धरले की हो ! नंतर माझ्या कानाजवळ आपले तोंड धरून ती पुटपुटली - "यापुढे मी महिलामंडळ आणि वर्तमानपत्र यापासून कायम चार हात दूर राहणार गडे !"
त्यावर मी लगेच "मग अजून अर्धा तास जवळ ये ना गडे !" म्हणत               
तिला जवळ ओढले.

        थोड्या वेळाने....कपाटातून माझे चेकबुक काढून एक 'चेक' मी फाडला. त्याची पावती सौ.ने लगेच 'च्युक' करून दिली !

        मी तिचा मुखचंद्र अलगद माझ्या करांजलीत धरताच, आमचा रेडिओ गाऊ लागला-

"आप  जैसा कोई मेरी जिंदगीमे आये ......."

.

(पूर्वप्रसिद्धी: संचार.रविवार.३०/०३/१९८६)
.    
                        
 

लॉटरी

             लांबलचक झिपऱ्या वाढलेल्या, कित्येक महिने त्यांना तेल पहावयास मिळाले नसावे, अर्धी खाकी चड्डी आणि वर मळकट सदरा- अशा अवतारात 'तो' माझ्यासमोर बसलेला होता ! हाताचे तळवे आणि बोटांची नखे काळपट दिसत होती. लांबूनही त्याला 'बूटपॉलिशवाला' म्हणून ओळखणे अवघड गेले नसते. त्याचा अवतारच होता तसा !

        त्याच्या चेहऱ्याकडे आणि माझ्या हातातल्या 'तिकीटा'कडे मी आळीपाळीने पाहत होतो. माझ्या कुतूहलमिश्रित नजरेला त्याच्या अंतरंगाचा ठावठिकाणा घेणे जमेनासे झाले होते !

        "साहेब, मी खरच सांगतोय, या तिकिटावर माझा काहीही हक्क नाही" - तो पुन्हा पुन्हा मला बजावत होता.

        माझी मन:स्थिती द्विधा झाली होती. हातात आलेली लक्ष्मी लाथाडू नये म्हणतात, पण ही चक्क 'लुबाडलेली लक्ष्मी' ठरली असती ! माझ्या हातात त्या मुलाने दिलेले एक लॉटरीचे तिकीट होते आणि माझ्या टेबलावर पसरलेला वृत्तपत्राचा कागद त्या तिकीटाची किंमत 'एक लाख रुपये' असल्याचे सांगत होता ! माझ्या मनाच्या विचारांच्या झोक्याची आंदोलने क्षणाक्षणाला वाढतच चालली होती.

        "हे बघ बाळ, रुपया तुझा होता. लॉटरीच्या एजंटकडून तू तिकीट विकत घेतलस . पेपरात नंबरही तूच पाहिलास, तेव्हा या तिकिटाचा मालक तू स्वत: एकटाच आहेस." - मी त्याला समजावणीच्या स्वरात म्हटल .

        "मुळीच नाही साहेब. मी तिकीट विकत घेतल असल, तरी तो रुपया माझा नव्हता." त्याने केविलवाण्या चेहऱ्याने सांगितले.

        "म्हणजे ? कुठे चोरीबिरी तर केली नाहीस ना !" मी चिडूनच विचारल.

        "छे छे ! चोरी नाही केली साहेब."

        "मग ?"

        त्याच्या चेहऱ्यावर सांगाव की नाही, अशी चलबिचल स्पष्ट दिसत होती. मी हातातल तिकीट पेपरवेटखाली व्यवस्थित ठेवलं आणि खुर्चीवरून उठलो. त्याच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवत म्हणालो, "बाळ, मला तुझ्या घरातल्या वडील माणसासारखा समज."


      तो उसळून म्हणाला -"तुमच्यासारख्या देवमाणसाची नख पाहण्याचीदेखील लायकी नाही साहेब माझ्या घरच्या माणसांची, साहेब !"

        "सांग सांग. मुळीच घाबरू नकोस, मी दुसऱ्या कुणालाही काही सांगणार नाही."- मी त्याला म्हणालो.

        "आपल्या बँकेसमोरच्या कोपऱ्यावरच मी बूटपॉलिशचा धंदा करतो, साहेब."
        मी उद्गारलो- "मला ठाऊक आहे ते !"

        बँकेचे साहेब आपल्यासारख्या य:कश्चित पोराला ओळखतात, या जाणिवेन तो किंचित्काळ सुखावलेला दिसला. डोक्यावरचे केस डाव्या हाताने उलट्या पंजाने मागे सारत तो म्हणाला- "तो शनवारचा दिवस होता. तुमच्या बुटाना मी पॉलिश केले. तुम्ही मला आपल्या पाकिटातून पाच रुपयाची नोट काढून दिली. मी तुम्हाला चार रुपये सत्तर पैसे परत-"

         "तू पैसे परत दिलेस आणि मी ते पाकिटात न मोजता ठेवले."- मी मधेच म्हणालो.

        तो खाली मान घालून म्हणाला-"तो तुमचा मोठेपणा झाला साहेब. मी तुम्हाला चार रुपये सत्तर पैसे देण्याऐवजी तीन रुपये सत्तर पैसेच परत दिले होते."

        "अरे मग एखाद्या रुपयाच काय एवढ मनावर घेतलस तू ?" - माझ्यातल्या 'मोठेपणा'न प्रौढीन विचारल. 

        "तुम्ही गडबडीत निघूनही गेलात. मी रोज हिशेब ठेवत असतो. त्यामुळे एक रुपया तुमच्याकडून जास्त आल्याचं मला त्या संध्याकाळीच समजल. मी घरच्यांना ते सांगितल . मला त्यानी शाबासकी दिली आणि कुणालाही न कळू देण्याबद्दल सुनावलं. साहेब, आजवर कुणाच्या नव्या पैशालाही मी फुकट हात लावला नाही. पण-"

        त्याच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागल. तशातच तो बोलू लागला, "मी रुपया परत करणारच म्हणून घरच्यांना सांगितल. मला आईन त्याबद्दल खूप शिव्या दिल्या, तिथे बाकीच्यांचं काय सांगू ? मोह फारच वाईट ! एकदा रुपया परत करावा वाटे, तर एकदा वाटे बँकेच्या साहेबाला एक रुपयाची काय किंमत ! शेवटी विचार करून- मारुतीच्या पायाशपथ  सागंतो साहेब, मी त्याच रुपयाच हे लॉटरीच तिकीट घेतल होत आणि पेपरात नंबर पाहून पहिल्यांदा तुमच्याकडेच आलो."

        काही कळण्याच्या आतच त्याने माझे पाय धरले. बुटावर पाण्याचा शिडकावा चालूच होता !

        "साहेब, खरच मी चोर नाही हो. तुम्हाला वाटतो का मी चोरासारखा ?" - तो मला विनवणी करून विचारत होता.

        "उठ बाळ, उठ ! तू चोर तर मुळीच नाहीस, पण तुझ्यासारखा मनाने श्रीमंत तर कुठेच सापडणार नाही साऱ्या शहरात ." मी त्याला हाताला धरून उठवले.

        त्याच्याच नावावर मी बँकेत खाते उघडून, त्याच्या सल्ल्याने त्या रकमेचा विनियोग करण्याचे मनात पक्के ठरवले. लाखमोलाच्या तिकिटापेक्षा अशी लाखमोलाची अंत:करणे परमेश्वराने निर्माण केली, तर काय बहार होईल, याचा विचार करण्यात वेळ जात असतानाच-

        "साहेब, तुमच्या डोळ्यात पाणी ?" - तो बूटपॉलिशवाला विचारत होता.

 आणि ....मी ओल्या हाताने 'मुदत ठेवी'चा फॉर्म शिपायाकरवी मागवण्यासाठी घंटी वाजवली.
.

(पूर्वप्रसिद्धी: स्वराज्य शनिवार १७.०९.१९७७)
.

             

         

असाही एक खून -


             मोरगावला वासुदेव आणि नामदेव हे दोघे एकमेकांचे लहानपणापासूनचे मित्र ! एकमेकांना काहीच वावगे वाटू नये, अशी त्यांची जिगरी दोस्ती. शाळेत एकदा वासुदेवाच्या शेंडीला कुणीतरी गाठ मारली होती. रागाने लालबुंद झालेला वासुदेव सापडेल त्याला यथेच्छ बुकलत सुटला होता. शेवटी नामदेवाची पाळी आली. खाली मान घालून नामदेव म्हणाला- "मी चुकलो, पुन्हा कधी चेष्टा करणार नाही !" वासुदेव क्षणार्धात निवळला. टेबलाजवळ जाऊन त्याने सर्व मुलांची माफी मागितली. नामदेवाने त्याला कडकडून मिठी मारली.
असे हे दोन मित्र काळाबरोबर आपली मैत्री वाढवतच होते.

        अभ्यासात दोघांची चुरस असायची. कधी नामू पहिला, तर कधी वासू पहिला. कधी त्याच्या उलट, पण दोघांच्यामधे तिसऱ्याकुणाचा नंबर कधी आला नाही. खेळायच्या तासाला दोघेही तुल्यबळ प्रतिस्पर्धी- त्यामुळे खेळात औरच मजा ! दोघे एकाच संघात असणे, केवळ अशक्यप्रायच. तरी एकमेकांबद्दलचा द्वेष कधी कुणाला जाणवला नाही. खेळापुरता खेळ, तेवढ्यापुरताच दोघात हार-जीत- अशी ही दोन्ही गुणी बाळे मोठी झाली. दोघांच्याही ओठावर मिसरूड फुटू लागलं होतं . दोघानाही जाणवू लागल होत की, आपण आता कुणीतरी समजदार मनुष्य झालो आहोत !

        शालेय जीवन संपले !

        आयुष्याच्या नव्या वाटा शोधायचं जिकीरीच काम ठरवायचं वय आल ! वासुदेव आणि नामदेव दोघे एकत्र बसले. कॉलेजजीवन दोघांपैकी एकालाच शक्य होते. वासुदेवचे मामा सोलापुरात राहत होते. ते आपल्या भाच्याला शिक्षणासाठी ठेवून घेण्यास तयार होते !  नामदेव परिस्थितीन तसा गरीब, पण वासुदेव स्वभावाने त्याहून गरीब. वासुदेवने नामदेवला आपल्याबरोबर येण्याचा आग्रह चालवला. आग्रह इतक्या थराला गेला की, वासू म्हणाला- "नामू , जाऊ दे ! कॉलेज शिकून तरी काय फायदा ? तू येत नाहीस, तर मीही सोलापूरला जात नाही !" नामूने त्याची कशीबशी समजूत काढली. चार हितोपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. ज्याला शिकण्याची व्यवस्था आहे, त्याने ज्ञानार्जन कसे करत राहावे, व ज्याचे शिक्षण मर्यादित आहे, त्याने त्यातूनच विकास कसा साधावा- यावर भलेमोठे व्याख्यान नामूने दिले.
       
        वासूला आपल्या गरीब मित्राची बौद्धिक पातळी हिमालयाहून उंच भासू लागली व मनाची श्रीमंती तर कुबेराच्याहून अपार असल्याचे आधी अनुभवलेच होते !

        पाहता पाहता दहा वर्षे निघून गेली ! दोन्ही मित्र आपापल्या व्यवसायात रममाण झाले.

             एके दिवशी रात्रीच, एक पोलीस फौजदार हाताखालच्या तीनचार शिपायांबरोबर मोरगावला काही कामानिमित्त आले. आल्याआल्या त्यानी पोलीसपाटलाला बोलावणे धाडले. जेवणखाण झाल्यावर तास दोनतास कामाबद्दल चर्चा झाली. दुसरे दिवशी सकाळी उजाडताच, पोलीसपाटलाचा कोतवाल नामदेव मास्तरकडे फौजदाराच्या हुकमाच्या तामिलीसाठी पळाला. त्याने मास्तरला निरोप दिला- "फौजदार सायबाने पटदिशीन तुमास्नी बोलीवलय !"

        मास्तर नुकतेच झोपेतून उठून, चुळा भरत होते. शर्ट टोपी अडकवून ते चावडीकडे घाईघाईत निघाले. चावडीजवळ हीsss गर्दी जमलेली. जो तो उठतोय आणि विचारतोय- "काय आक्रीतच घडलय म्हनायचं का वो ?"

        चावडीच्या पायरीशी मास्तर उभे राहिले. फौजदार साहेब चावडीतच येरझाऱ्या घालत होते. मधूनच आपल्या पल्लेदार मिशाकडे हाताचा पंजा उलटा वळवत होते. थोडी राखलेली दाढी व डोळ्यावरचा चष्मा त्यांच्या रुबाबदार देहयष्टीला आणखीनच भारदस्तपणा आणत होता. त्यानी मास्तरकडे एक नजर टाकली. थोडीशी त्रासिक मुद्रा करत ते चावडीतूनच आपल्या बुलंद आवाजात गरजले- "या गावातले मास्तर ना तुम्ही ?"

    नामदेव मास्तर नखशिखांत थरथरले. एक आवंढा गिळत म्हणाले- "हो, मीच मास्तर आहे."

        फौजदाराने मास्तरला चावडीत वर येण्याची खूण केली. स्वत:ला कसेबसे सावरत मास्तर वर गेले. आता पुढे काय घडणार, ह्या कल्पनेने सर्वांची उत्सुकता, भीती एकाचवेळी ताणली गेली ! आपल्या शिपायांकडे व आजूबाजूच्या गावकऱ्यांकडे आपली भेदक नजर टाकत फौजदार गरजले- "मास्तर, आम्ही तुमच्यावर खुनाचा आरोप ठेवतोय !"

        मास्तरने फौजदारसाहेबापुढे चक्क लोटांगण घातले. ते बघून फौजदार ओरडले- " उठा उठा ! हे शोभत नाही तुम्हाला. करुनच्या करून वर असा हा कांगावा आणखी ? आठवता का जरा - दहा वर्षाखाली याच गावातून, तुम्ही आपल्या "वासुदेव" नावाच्या मित्राला येथून हाकलले. त्यानंतर कधी कुणाला दिसलाय का तो ? बिचाऱ्याच्या "मैत्रीच्या भावने"चा तुम्ही खून केला मास्तर, खून ! आणि हो- तसा खून तुम्ही केल्यामुळेच, आज तुमच्यापुढे हा फौजदारचा पोशाख अंगावर चढवून मी इथे उभा आहे, समजलात का ?"

        एव्हाना मास्तरांचे डोळ्यातले अश्रू फौजदारांचे पाय ओलेचिंब करून राहिले होते. त्यांचे शरीर आनंदातिशयाने संकोचले.

        "वासुदेव-" म्हणत मास्तरांनी उठून फौजदारसाहेबाला मिठी मारली. एवढा मोठा तो फौजदार ! पण त्याचाही चष्मा घळघळा पाझरू लागला !

        फौजदार-मास्तरांच्या मिठीमुळे दोघांच्या डोळ्यातले अश्रू एकजीव होऊ लागले. त्यानी सर्वांच्या साक्षीने विशुद्ध मैत्रीची ग्वाही दिली !
.


(पूर्वप्रसिद्धी : सोलापूर समाचार. रविवार .०७/१२/१९७५)
.    
                            

चार ओळी मनातल्या

१)  'पश्चात्ताप-'

तेव्हां- मी हुरहुरत होतो
लग्न तिच्याशी "व्हावे" म्हणून-
आता- मी कुरकुरत असतो
लग्न तिच्याशी "झाले" म्हणून !

.
 

२)  'पिकते तिथे-'

आई असते ज्याला तो
वृद्धाश्रम शोधत असतो -
आई नसते ज्याला तो
देऊळ बांधत बसतो . .

.


३)  'ज्याचे त्याचे नशीब-'

'भाकर वाढ माये' आर्तस्वरात
पुकारा बाहेर होत होता -
'पुरे' म्हटले तरी पंगतीत आत
आग्रह जोरात होत होता . .

 

.

शिकार

                              "बसप्पा, ए बसप्पा !"
     - बंडूने टेबलावरील घंटी बडवल्यावर, तोंडाने शिपायाला हाका मारायला सुरुवात केली. डोक्यावरची टोपी गुडघ्यावर ठेवून स्टुलावर बसलेला बसप्पा एका हाताने आपले डोके कराकरा खाजवत बसला होता. साहेबानी आपल्याला बोलावल्याचा आवाज त्याच्या कानात कसाबसा शिरला. पटकन डोक्यावरची टोपी पुढा-याच्या टोपीसारखी कलती ठेवून, चपलेत पाय अडकवून 'आलो साहेब' अशी आरोळी ठोकतच तो बंडूच्या केबीनमधे शिरला.

"साहेब, आपण मला बोलीवलात ?" बसप्पाने विचारले.

"होय साहेब, मी तुम्हालाच बोलावलं बर का !" चिडूनच बंडू उत्तरला.
       
                   पेकाटात लाथ बसलेल्या कुत्र्याची मुद्रा धरण करून बसप्पा एकदम 'चूप' झाला ! पण त्याच्या कानांना थोडेसे कमी ऐकू येत होते, त्याला तो तरी काय करणार म्हणा ! बंडूला तो हे सांगणार कसे ! नाहीतर बंडूने त्याचे नाव 'बहिरप्पा' ठेवायला कमी केले नसते.

              एक रुपयाची नोट खिशातून काढून ती बसप्पापुढे धरत बंडू म्हणाला- "हे बघ, पोस्टात जा. ऐंशी पैशांची कार्ड घेऊन वीस पैसे परत आण !"

        ती नोट हातात घेऊन तिची घडी घातली व बसप्पा खोलीबाहेर निघाला.

        "वेंधळाच आहे लेकाचा !" स्वत:शीच पुटपुटत बंडूने समोरच्या उत्तरपत्रिकेच्या गठ्ठ्यात तोंड खुपसले.

        बंडू धडपडे 'महाराजा महाविद्यालया'त 'बायोलॉजी विभागा'चा प्रमुख होता. तो एमेस्सीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. त्या मानाने त्याला हे प्रमुखपद लवकरच मिळाले होते. दिसण्यात तो रुबाबदार होता. नवीन कपड्यांचा त्याला फार षौक. फ्रेंच राज्यकर्त्याप्रमाणे त्याने गालावर केसांचे कल्ले राखले होते. चालू फ्याशनचा तो भोक्ता होता !

        अशा या बंडूची महाविद्यालयात इतरांवर छाप न पडेल तरच नवल !
पी.डी.पासून लास्ट इयरच्या विद्यार्थी-विद्यार्थिनीचा घोळका सदैव त्याच्या अवतीभवती असे ! किंबहुना गोपीतला कृष्ण अशी त्याची चेष्टा त्याचे सहकारी करत !

        या घोळक्यानेच बंडूचा सारा घोळ झाला. त्याच्या बायोलॉजी विभागात दोन डेमोनस्ट्रेटर्स होत्या. मिस सुनंदा कावळे नि दुसरी मिस कुंदा सावळे !

        सुनंदा कावळे ही महाविद्यालयाच्या प्राचार्याची कन्या ! रंग काळाकुळकुळीत, दोन दात ओठांच्या सदैव पुढे येण्याच्या स्पर्धेत टपलेले, आखूड केसांना लांबलचक गोंडे बांधलेले ! (बंडूला 'त्या'कडे पाहून म्हशीच्या शेपटाची आठवण होई !) असे एकंदरीत 'ध्यान' (हा बंडूचा खास शब्द!) होते ते !

        ह्या उलट कुंदा सावळे ! काळीसावळी पण स्मार्ट शरीरयष्टी होती तिची. चुणचुणीत व टपोरे डोळे असलेली 'कुंदा' पहिली की, बंडूला 'विजय स्वीट होम'मधील 'कुंदा'ची आठवण व्हायची व नकळत त्याची जीभ ओठावरून फिरायची !

        ह्या त्रिकुटात गंमत अशी झाली होती की, सुनंदा कावळे टपली होती बंडूच्या प्रेमावर, तर याची गंधवार्ता नसणारा बंडू पडला होता कुंदा सावळेच्या प्रेमात ! सदैव विद्यार्थ्यांच्या घोळक्यात असणारा बंडू अक्षरश: वैतागला होता. दोन सविस्तर मनाची होत होती !

        बंडूने आज मनाचा निश्चय केला होता. काही झाले तरी आज कुंदाची गाठ घ्यायचीच ! गेले दोन तास त्याने उत्तरपत्रिकांचा गठ्ठा बाजूला फेकून दिला होता. एक चिठ्ठी त्याने प्रयत्न करून लिहिली होती. "आज ठीक सव्वाचार वाजता कँटीनजवळच्या बागेत ये.-बंडू "

        हे साधे सुटसुटीत वाक्य लिहायला त्याला पाचसहा कागदांची रद्दी वाया घालवावी लागली. पुन्हा पुन्हा आपली चिठ्ठी तो वाचत होता. पूर्ण समाधान झाल्यावर त्याने ती पाकिटात घातली. इकडे तिकडे कोणी नाहीसे पाहून, त्याने पाकिटाचे हळूच चुंबन घेतले. आता कुंदा भेटली की बस्स ! तिची 'शिकार' झालीच !

        बसप्पा डुलत डुलत बंडूच्या केबिनमधे शिरला. "साहेब, ही घ्या दोन कार्ड आणि ऐंशी पैसे परत !" दहा पैशांची आठ नाणी त्याने बंडूच्या पुढ्यात टाकली व तो हातातली कार्ड बंडूला देत म्हणाला.

        "बसप्पा, मी तुला आठ कार्ड आणायला सांगितली होती ना ?" - बंडूने विचारले .

        "नाही ! दोन कार्ड नि ऐंशी पैसे परत आणायला सांगितले होते साहेब !" डोक्यावरची टोपी नीट करत बसप्पा उत्तरला. ह्या मूर्खाशी हुज्जत घालण्यात काहीच अर्थ नाही, असे बंडूला वाटले. त्याने टेबलावरचे पाकीट उचलले. ब्स्प्पाला तो म्हणाला - "आता हे तरी काम नीट कान देऊन ऐक जरा ! हे पाकीट म्हत्वाचे आहे. 'प्रॅक्टिकल' हॉलमधे सावळे म्याडमना हे पाकीट देऊन ये. "

        बसप्पाने पाकीट घेतले. तो निघाला. "दुसऱ्या कुणालाही देऊ नकोस हं !" - पुन्हा एकवार बंडूने बजावले. "होय साहेब !" - असे म्हणत आपली मुंडी हलवत बसप्पा 'प्रॅक्टिकल' हॉलकडे निघाला.

        चार वाजून दहा मिनिटांनी बंडू सर्वांना चुकवून कँटिनजवळच्या बागेत आला. आंब्याच्या झाडाखाली त्याने आपला हातरुमाल पसरला आणि त्यावर त्याने अलगद बैठक मारली.

        एकेक सेकंद त्याला एकेक युगासारखा भासत होता ! त्याच्या डोळ्यासमोर कुंदाची मोहक मूर्ती उभी राहिली. बगिचात चिमणा-चिमणीचे एक जोडपे एकमेकाशी हितगुज करत बसले होते. काही रम्य कल्पना मनात येऊन बंडूने क्षणभर डोळे मिटले......

        दुसऱ्याच क्षणी त्याचे डोळे गच्च झाकले गेले ! "अरेच्चा, अगदी वेळेवर आली की ही !"- असे म्हणत त्याने हळुवारपणे आपल्या डोळ्यावरील हात बाजूला काढले. एका हाताने चक्क त्या हाताच्या मालकिणीला पुढे ओढले आणि स्मित करत तिच्याकडे पहिले !

        "बाप रे !" -असा उद्गार बंडूच्या तोंडून स्वाभाविकपणे बाहेर पडला. समोर दिसत असलेली, ती 'कुंदा' नव्हती- ती 'सुनंदा' होती ! तिचे ते पुढे आलेले दोन दात सुळ्यासारखे आपल्या छातीत कुणीतरी खुपसत असल्याचा त्याला भास झाला !

        "तू... तू.... तुम्ही ! इथ कशाला आलात ?" बंडूने कसेबसे विचारले.

        "तुम्हीच मला आमंत्रण पाठवले होते की बसप्पाकडून !" आपल्या पोलक्यातून ते 'पाकीट' बाहेर काढत सुनंदा कावळेने उत्साहाने उत्तर दिले !

        आता मात्र बंडूला आपल्याभोवती बसप्पा व हजारो कावळे 'कावकाव' करत घिरट्या घालत आहेत असे वाटले आणि मूर्च्छा येऊन तो पाठीमागेच कोसळला !

        मिस सुनंदा कावळे आपल्या चिमुकल्या रुमालाने त्याला वारा घालू लागली.

        कँटीनमधला रेडिओ गात होता-
 "शिकार करनेको आये थे, शिकार होके चले ....!"
.

(पूर्वप्रसिद्धी : सोलापूर समाचार -रविवार-१४-११-१९७१)     
.
       
    

लहरी



ती येणार वाटते,
नेमकी फिरकत नाही..

तिला येणे
जमणार नाही,
वाटत राहते ..

क्षणात ती
समोर हजर होते !

वाण नाही,
पण सखीचा गुण..

तुलाही असा
लागला कसा
अरे पावसा !
.

सेल ! सेल ! सेल !


" अहो, ऐकलंत का ?" - स्वैपाकघरातून अरुणाचा आवाज आला.
अनिल नुकताच ऑफिसमधून घरी आला होता. बुटाचे बंड सोडत असतानाच कानावर  पहिला प्रश्न येऊन आदळला.
"हो ! ऐकल !"- संथपणे तो उद्गारला.
 पुन्हा अरुणाने विचारले- "काय ऐकलं ?"
टायची गाठ सोडताना अनिल त्रासिक मुद्रेनेच म्हणाला- "दुसर काय ऐकणार ? तू आता मला "अहो, ऐकलंत का" म्हटलेलं ऐकलं !"
"इश्श्य ! नेहमीच कशी थट्टा सुचते हो अशी तुम्हाला ? मी इतकं आपलेपणान विचारते आणि तुम्ही मात्र कपाळाला आठ्या घालताय !" - पदराला हात पुसत, बाहेर येत अरुणा फिस्कारली.
" आज किनई मी बटाटेवडे केलेयत तुमच्यासाठी !" - ती म्हणाली.
त्यावर तो उद्गारला- म्हणजे आज आमचा 'बकरा' करायचाय वाटत तुम्हाला !"
त्याचा विनोद न समजून ती पुढे म्हणाली - "मी किनई आज जुन्या पेठेतल्या तुकाराम क्लॉथ स्टोअर्समधे जाणार आहे. तिथे कापडाचा जंगी सेल चालू आहे म्हणे! माझ्यासाठी संक्रांतीला एक छानशी काळी साडी आणि तुमच्यासाठी प्यांट व बुश्कोटला पिसेस आणणार आहे. खर तर सांगणारच नव्हते मी तुम्हाला, पण आठ्यांच्या संख्येत आणखी एकीची भर नको, म्हणून सांगून टाकल !"

        अरुणाची बडबड निमूटपणे ऐकत अनिल आपले काम आटपत होता. टॉवेलने तोंड पुसून, केसातून कंगवा फिरवत तो म्हणाला-
"अग पण कपाटात डझनभर नव्या साड्या असताना, व मला न फाटणारे पण फक्त उसवणारे अर्धा डझन कपडे असताना अजून खरेदीची आवश्यकताच काय ?"

        अरुणा अगदी निश्चयाच्या सुरात म्हणाली- "हे बघा, आता ह्या खेपेस मी तुमचं काही एक ऐकणार नाहीय्ये ! मी जाणार म्हणजे जाणारच ! माझ्या भाऊबीजेच्या पैशातून मी माझ्या आवडीची खरेदी करणार ! पंचवीस टक्क्यांनी स्वस्त सेलमधले  कापड मिळवण्याची सोन्यासारखी संधी मी वाया काही जाऊ देणार नाही म्हटल !" एवढ बोलून पुन्हा ती स्वैपाकघरात वळली .

        अनिल छोट्या आनंदला खेळवण्यात मग्न झाला. नाही म्हटल तरी अनिलचे लक्ष आतच लागले होते. बटाटेवड्याचा खमंग वास त्याला बेचैन करू लागला होता. तेवढ्यात अरुणा चटणी व बटाटेवड्याच्या थाळ्या घेऊन बाहेर आलीच. एखाद्या नवीन झालेल्या नाटकाच्या प्रयोगावर एखाद्या जाणकार टीकाकाराने तुटून पडावे, तसे अनिल त्या थाळीवर तुटून पडला. अर्धा वडा तोंडात कोंबून तो अरुणाला म्हणाला- "हे बघ अरु, पन्नास रुपये हवे तर मी माझ्याजवळचे तुला देतो, पण त्या सेल-बिलच्या भानगडीत तू पडू नकोस. अग, जुना, विटका, न खपलेला माल 'सेल'च्या नावाखाली खपवतात हे दुकानदार लोक !"

        कधी एकदाचे खाणे संपते व मी दुकानात जाते, अशा गडबडीतल्या  अरुणाला हे पटेल तर ना ! ती म्हणाली- "शेजारच्या लताताईनी त्यांच्या  दुकानातून पंचाहत्तर रपयांना आणलेली साडी आहे ना, मी तश्शीच साडी तुम्हाला आज पंचावन्न रुपयात आणून दाखवली म्हणजे झाले ना ?"

        त्यावर अनिल एवढेच म्हणाला-" तुम्हा बायकांना तरी काही समजून घेण्याची बुद्धी सुचणे अशक्यच म्हणा !"

        सर्व तयारी झाल्यावर अरुणा जाण्यास निघाली. जाताना तिने अनिलला बजावले- "आनंदला घरीच ठेवत्येय हो मी. त्याच्याकडे नीट लक्ष द्या. नाहीतर तिन्ही सांजेच घोरत पडाल. येतेच मी अर्ध्या पाउण तासात."

        पायात चपला अडकवून अरुणा गेलीसुद्धा. ती गेलेल्या दिशेकडे पहात अनिल पुटपुटला- "अर्धा नि पाउण तास म्हणजे आता सव्वा तास तरी शांतता मिळेल !"

        जुन्या पेठेतल्या 'त्या' दुकानासमोर ह्या भल्यामोठ्या रांगा लागलेल्या होत्या. पण तानाजी घोरपडीच्या सहायाने जसा सिंहगड (सिंहगडच ना नक्की ?) सरसर चढून गेला होता, त्याच कौशल्याने अरुणा आपल्या बडबड्या स्वभावाने ओळखीपाळखी काढत दुकानाच्या शेवटच्या पायरीवर पोचलीसुद्धा ! आपला मेकप आणि हातातली पर्स सांभाळताना तिची कोण त्रेधा उडत होती. पण गुलाबाचे फूल पाहिजे असल्यास, त्याचे काटे टोचून घेणे भागच असत, याचा तिला अनुभव होता.

        अखेर तिचा नंबर लागला ! तिला पाहिजे तशी साडी व अनिलसाठी कापड तिने घेतले. पंचवीस टक्के कमिशन मिळाल्याने तिला पंचवीस वर्षांनी आयुष्य वाढल्याचा आनंद झाला होता. कधी एकदा घरी जाऊन अनिलला 'लताताई'च्या नाकावर टिच्चून आणलेली साडी दाखवते, असे तिला झाले होते. ती घराकडे लगबगीने निघाली.

        "आई गsss!".... तिला अचानक ठेच लागल्याने ती अस्फुट किंचाळली. तेवढ्यात चप्पलचा अंगठा तुटल्याचे तिच्या ध्यानात आले. तिने मनात ठरवले- "पुढच्या वेळेस चपला देखील सेलमधेच घ्यायच्या !"

        अनिल आनंदला खेळवण्यात अगदी गर्क झाला होता. अरुणाने येतायेताच लताताईना आपल्या घरी 'खरेदी' पाहण्याचे आमंत्रण दिले होते. "हुश्श ! दमले ग बाई !" म्हणत तिने कॉटवर अंग झोकून दिले. अनिलने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्षच केले होते. तो निवांतपणे व्हरांड्यात येरझाऱ्या घालत थांबला. आनंद खरेदीच्या पुडक्याशी झोम्बाझोम्बी करत बसला.

        तेवढ्यात लताताई आल्या. "काय अरुणाबाई, आज बरीच खरेदी केलेली दिसत्येय !" असे विचारत त्या खुर्चीवर बसल्या. त्यावर एक कटाक्ष व्हरांड्याकडे टाकत अरुणा मुद्दामच मोठ्याने म्हणाली- "हो ना ! हे नकोच म्हणत होते, काहीही आणायला. पण ह्यावेळेस मीच त्यांचे ऐकले नाही. " तिने अनिलसाठी आणलेले प्यांटपीसचे पुडके सोडले.

        "खरच ! छान आणले हो !" - लताताई म्हणाल्या. अंगावर मुठभर मांस चढलेली अरुणा साडी दाखवणार, तेवढ्यात अंगावर उंदीर पडावा, तशी ती किंचाळली !

       ....... कारण आनंदने साडीचे पुडके आधीच सोडले होते आणि उलगडलेल्या साडीच्या एका भागावर बसून साडीला असलेल्या भल्यामोठ्या 'भगदाडा'तून डोके काढून मिस्कीलपणे तो हसत होता !
.


(पूर्वप्रसिद्धी- "सोलापूर समाचार"-२०/०५/१९७९)
.        
       
 

करायला जातो एक -

लिहिली ओळ एक, तुजवर मी जर -
गझलेच्या शेरासारखी मनात ठसतेस ..
लिहिला शेर मी, तुजवरती जर -
त्रिवेणी हायकूसारखी फुलून येतेस ..
लिहिली त्रिवेणी, तुजवर मी जर -
सुंदर चारोळीसारखी खुलून मिरवतेस ..
लिहिली चारोळी, तुजवर मी जर -
शांत ओवीसारखी गंभीर होतेस ..
लिहिली ओवी, तुजवर मी जर 
नाजूक गझलेसम हळूच लाजतेस ..
लिहिली गझल, तुजवर मी जर -
फक्कड लावणीसारखी ठुमकत नाचतेस ..
लिहिली लावणी, तुजवर मी जर -
फंदीच्या फटक्यासम फटकून राहतेस ..
लिहिला फटका, तुजवर मी जर -
मुक्तछंदी कवितेसारखी बागडत जातेस ..
ना लिहिली कविता, तुजवर मी तर -
खंडकाव्यासम कोपऱ्यात बसतेस . . !
.

अनुत्तरीत स्वातंत्र्य-प्रेम


या देशात -
कित्येक गावी आज
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही
डोळ्यात पाणी आणूनच -
पाण्याच्या ट्यांकरसाठी
वाट पाहत राहावे लागते.........

कित्येक शहरी आज
त्यांच्या तोंडातून घशात
डोळे भरून, बिसलरी पाहून-
ती पिल्याशिवाय
दुसरे पाणी पचतच नाही .............

त्याच या देशाचा -
" मी नागरीक आहे "
हा अभिमान अजूनही -
कशासाठी बाळगावा .............. !!!
.

कॅलेंडर

                              बँकेतली "वर्षाखेर" एकदाची संपली! पाहता पाहता वर्ष संपले की ! भिंतीकडे नजर गेली. संपलेल्या वर्षाची  कॅलेंडरे, फासावर लटकावलेल्या कैद्याप्रमाणे खिळ्यावर विषण्णपणे अपराधी मुद्रा आणून उगाचच हेलकावे खात होती ! संपला त्यांचा आता भाव ! मी उगीचच मनातून शहारलो. मी बँकेत रोखपाल असल्याने ओळखी बऱ्याच होत्या. 'सेवेसाठी' आमची बँक असल्याने नमस्कार चमत्कार बरेच होतात ! या ओळखीपोटीच ही कॅलेंडरांची 'कलेवरे' भिंतीवर लटकत होती !

        जुन्या वळणाचे घर असल्याने, भिंतीवर नजर ठरणार नाही, इतकी असंख्य कॅलेंडरे होती. खरच , मनुष्याला 'रोटी, कपडा और मकान' यानंतर आठवण होते की, मकानात एक तरी  कॅलेंडर हवेच ! साध्या झोपडीपासून ते राजेशाही टोलेजंग इमारतीपर्यंत पहा, एक तरी कॅलेंडर आत आपल्याला आढळेलच ! एकप्रकारचे जबरदस्त आकर्षण कॅलेंडरबद्दल 'मानवी स्वभावा'ला असते. "जिस घरमे कॅलेंडर नही, वो घर घरही नही" असा डायलॉग एखाद्या पिच्चरमधे फेकला, तर प्रचंड दाद प्रेक्षकांच्याकडून त्याला दिली जाईल, हे नि:संशय !

        शेवटी कॅलेंडर म्हणजे एक 'कोरा कागज'च की ! त्यावर दिनांक, वार, वर्ष वगैरे जी माहिती लिहिलेली असते, त्याला जास्त महत्व असते ! पण या 'ढोंगी' जगात ही सर्व प्रकारची माहिती दुय्यम ठरते ! कारण हे जाहिरातींचे युग आहे. बोलेल त्याची 'अरगट'युक्त बाजरी खपेल, परंतु न बोलणाऱ्याचे 'बन्सी गहू' खपणार नाहीत- असे हे युग आहे. पहावी तिकडे जाहिरातच दिसते. सकाळी उठल्यावर दाताला लावण्याकरता 'बोकड'छाप पांढरी टूथ पावडर ते रात्री झोपण्यासाठी 'ससा'छाप मच्छरप्रतिबंधक अगरबत्ती- या साऱ्या जीवनावश्यक वस्तूंची जाहिरात वाचणे/पाहणे आज अत्यावश्यक होऊन बसले आहे !

        जाहिरातीसाठी 'स्वस्त आणि मस्त' असे प्रभावी साधन म्हणजे
कॅलेंडर ! जाहिरातदारांचे जाहिरातीचे काम झाले, मालाचा खप झाला, भिंतीवर कॅलेंडर लावणाऱ्या घराची शोभा व शान वाढली ! एकंदरीत सर्वजणच खूष !

     
कॅलेंडरांची विविधता तरी किती, आकार किती, प्रकार किती...अबब ! त्यांचा शोध लावणाऱ्यांची खरोखरच धन्य होय ! टेबल-कॅलेंडरपासून ते चारचार फूट लांबरुंद अशी कॅलेंडरे, एक पानी ते चौदा-पंधरा पानी नुसती बगळ्यांसारखी पांढरी ते इंद्रधनुष्याचे रंग ल्यालेली, पंचांगमधे आढळणाऱ्या कॅलेंडरपासून ते कॅलेंडरवर छापलेले पंचांग .. एक का दोन .. शंभर तऱ्हा या कॅलेंडरांच्या ! पुराणातील 'देवा'पासून ते पिक्चरमधील 'देवी'पर्यंत साऱ्यांनाच यावर आग्रहाचे स्थान ! हा पुरुष, ती बाई- प्रेमाचा रंगीत त्रिकोण ते सरकारी लाल त्रिकोण- कश्शाकश्शाचा भेदभाव या कॅलेंडरवर केलेला नसतो ! ब्रह्मचाऱ्याच्या खोलीपासून ते 'अष्टपुत्रा सौभाग्यवती'च्या देवघरापर्यंत कॅलेंडरला प्रवेश असतो !

        'शितावरून भाताची परीक्षा' असते, तशीच
कॅलेंडरवरून घरादाराची परीक्षा करण्यातही काहीअंशी यश मिळते ! उदाहरणार्थ पहा- एका घरातील भिंतीवर या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत, एक इंचही जागा न सोडता, कॅलेंडरे अडकवली आहेत. पहिले एका देवाचे, दुसरे नटीचे, तिसरे एका कुत्र्याचे, चौथे चौपाटीवरील कुण्या एकाच्या 'जिवाच्या मुंबई'चे- असली कॅलेंडरे कुणाच्या घरात असणार हो ? ती लावलेली असणार- एका मध्यमवर्गीय 'कारकुना'च्याच घरात ना ! त्या लावण्यात एकच दृष्टी असते, 'फुकट' मिळाले की लाव ! त्या लावण्यात सौंदर्यदृष्टी, निसर्गप्रेमदृष्टी, दैवताबद्दलची श्रद्धा- वगैरे वगैरे काहीही पहायची नसते ! या उलट एखाद्या गुटगुटीत बालकाचे कॅलेंडर एका कोपऱ्यात, दुसऱ्या कोपऱ्यात एखाद्या देवाचे, समोर एखादे सुरेख निसर्गदृष्य दाखवणारे कॅलेंडर- हे आपल्याला क्लासवन अधिकारी किंवा डॉक्टर-इंजिनियर यांच्या बंगल्याशिवाय कुठे दिसणार ? सदैव फडफडणारे, भरपूर बारा पानांचे, तिथी-वार-नक्षत्र असलेले, ठळक टायपातले कॅलेंडर व्यापाऱ्याशिवाय कुणाच्या घरात आढळणार ! तारखा, वार व महिने काढले जाऊन उरलेली नुसतीच चित्रे , जिच्याकडे पुन्हा पुन्हा पहावे अशी अर्धवट उघडी बाई असलेले, काहीवेळा निरनिराळ्या पोझमधील तरुणी असणारी, घड्याळाचे पट्टे व रेडिओ यांची एकमेकाशेजारी जाहिरात असलेल्या अर्धवस्त्र तरुणीची व उरलेली सर्व 'चालू' नटीची कॅलेंडरे- असलेले घर कुणाचे असणार ?.....एवढेसुद्धा ओळखू येत नाही ? अहो, ते असणार आमच्याच एखाद्या 'ब्रह्मचारी' दोस्ताने 'टर्म बेसिस'वर घेतलेले घर !

           जाहिरातदारांच्या किंवा व्यापाऱ्यांच्या कल्पकतेचा भरभक्कम पाया म्हणा अथवा
कॅलेंडर घेणाऱ्यांच्या मूर्खपणाचा कळस म्हणा, आपण तर दोन्हीवर खूष आहोत ब्वा ! व्यापारी माल खपवण्यासाठी, 'अमुक इतका माल घेतल्यास एक कॅलेंडर मोफत' अशी जाहिरात करतो. त्याच्या ह्या कल्पकतेचे लगेच गिऱ्हाईकांच्या मूर्खपणामुळे स्वागत केले जाते ! काय तडाखेबंद खप होतो, त्या कॅलेंडरांचा व पर्यायाने मालाचा ! व्यापारीरुपी कोळी कॅलेंडररुपी आकड्याचा गळ टाकून, गिऱ्हाईकरुपी माशांना हातोहात पकडतो ना ? लोक तरी किती मूर्ख हो ! 'आम्ही अमृतकुंभ देतो- अगदी घरबसल्या फुकट !' -असे व्यापाऱ्यांनी म्हटले तरी हे मूर्ख लोक त्या देणगीचा अव्हेर करतील ! परंतु विषाच्या दोन इंची बाटलीबरोबर एक कॅलेंडर 'फुकट' मिळणार असेल, तर त्यासाठी दहा कि.मी. कोण यातायात करतील हेच लोक !

        अर्थात प्रत्येक वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही
कॅलेंडरची एकप्रकारची 'नशा'च चढलेली असते ! घरात जन्मणारे पहिले 'सजीव' कॅलेंडर अन भिंतीवर येणारे पहिले 'निर्जीव' कॅलेंडर- या दोन्हींचे मनुष्याला फारच अप्रूप वाटते ! वर्षाच्या सुरुवातीला मनुष्याला कॅलेंडरे गोळा करण्याचा छंदच जडतो ! सुनेचे बाळंतपणाचे पुरेपूर नऊ महिने भरल्याचे जे समाधान सासूला वाटते, तेच- किंबहुना त्याहून अधिकच समाधान मनुष्याला आपल्या घरातील भिंती भरपूर कॅलेंडरानी भरल्यावर वाटते !

        असे हे '
कॅलेंडर-माहात्म्य' रंगवावे तेवढे रंगणार आहे. परंतु संन्याशाच्या संसाराला 'शेंडी'पासून तयारी करावी लागते तशी आता मला, भिंतीना कॅलेंडरांचा प्रपंच संभाळावयास लावण्यासाठी, 'खिळ्या'पासून तयारी करावी लागणार आहे. निदान नव्याचे नऊ दिवस तरी ! नंतर काही काळाने जाळी-जळमटे लागलेली, अर्धवट फाटकी, वेडीवाकडी टांगलेली  कॅलेंडरे पहावी लागणारच आहेत म्हणा !
.                     

गाढव

बदड बदड बदडले तरी 
हूं की चूं कधी करत नाही ..

खाणे पिणे जर दिले नाही 
तरी ते कुरकुरत नाही ..

निवारा मिळाला नाही कधी 
ते रागाने फिस्कारत नाही ..

ग्ध्ध्या, म्हणून हाकारले तरी 
शंख जोरात करत नाही ..

चोवीस तास जर काम दिले 
तरीही ते कंटाळत नाही ..

जास्त काम पडले पाठी 
ते कधीही टाळत नाही ..

माणूस आडवा आला तरी 
ते कधीच ओरडत नाही ..

अनोळखी कुणी दिसला तरी 
लाथा कधी झाडत नाही ..

सहनशील जास्त कोण
काहीवेळा समजत नाही ..

शहाणा कोण- गाढव का माणूस 
कष्टाचा फायदा उमजत नाही.. 

आपले नाव माणसाला दिले 
तरीही ते डूख धरत नाही ..

"गाढवा" असे पुकारले तरी 
माणसासारखे चिडत नाही . . !
.

डायरी

                    सव्वासहाला बँकेची वेळ संपली आणि मी (जातिवंत कारकुनाप्रमाणे -) हातातल्या पिशवीला झोके देत कस्तुरबा मार्केटकडे निघालो. वर्षाखेरीचे काम संपल्याने डोक्यावरचे ओझे नष्ट झाले होते. नवीन वर्षातील सुट्ट्यांचा हिशेब मनात चालला होता. तेवढ्यात -
  "बर झाले साहेब तुम्ही एकटेच इथे भेटलात !"
- असे म्हणून, बँकेतल्या ओळखीच्या एका कस्टमरने माझ्या हातात एक पाकीट दिले आणि ते 'कशाला कशाला' (अस नेहमी म्हणण्याचा रिवाज असल्याने-) करत मी (इकडे तिकडे पहात-) खिशात ठेवलं ! भाजी खरेदी करून 'निर्मल भुवन'मधे एक पेशल पिऊन (अर्थात चहाच !) मी घरचा रस्ता धरला.

        घरी येताच भाजीच्या पिशव्या सौ.च्या अंगावर भिरकावल्या (शिपाई साहेबाच्या अंगावर लेजर्स टाकतात तश्शा -) आणि मोठ्या उत्सुकतेने मी 'ते' पाकीट काढलं . पाहतो तो काय- ती एक "डायरी" होती ! 'डायरिया'तून मुक्त झाल्यासारखा आनंद मला झाला. किंवा 'सीडीएस'ची 'एक शतांश' रक्कम स्वप्नात मिळाल्याचा भास झाला. तेवढा आनंद झाला म्हटल तरी त्यात अतिशयोक्ति ठरणार नाही !

        लग्नाच्या बायकोपेक्षा 'ठेवायला' सोपी, चारचौघात बिनदिक्कतपणे जवळ बाळगायला सोपी, सर्वांसमोर छातीशी कवटाळायला सोपी- अशी चक्क एक 'डायरी' मला नवीन वर्षाची भेट म्हणून मिळाली होती !

        लहानपणापासूनच मला 'डायरी'च फार अप्रूप वाटायचं ! मला कळायला लागल्यापासूनच मी जवळ डायरी 'ठेवायची' ठरवल होत. (पुढे कारकून डायरीशिवाय काहीच 'ठेवू' शकत नाही, हेही समजत गेलंच म्हणा !) पण डायरी ही वस्तू 'विकत' घ्यायची नसते- अशीही माझी एक कल्पना डोक्यात घर करून बसली होती. ती कल्पना शेवटपर्यंत मी अमलात आणली हे विशेषच ! तर सांगायचं तात्पर्य हे की मला एक डायरी (चक्क फुकट!- जळणारे जळोत बिचारे फुकटच !) मिळाली होती. नवीन वर्ष नक्कीच सुखाचे जाणार होते !           

        आपलं नाव, गाव, पत्ता, पॉलिसीचा नंबर, (आपल्या नसलेल्या-) फोनचा नंबर, वजन, उंची, जाडी आणि इतर असंख्य गोष्टी म्हणजे- कार्ड, पाकिटाची किंमत, दशमान पद्धतीचे कोष्टक, (जिथे आपण जन्मात कधी जाणार नाही त्या-) मुंबईचे पोस्टल विभाग क्रमांक, तारखा, महिने हे- जीमधे असतात, अशी ती डायरी आता माझ्याजवळ होती ! मनसुबे रचण्यात आपल्याइतका पटाईत कुणी नाही ! पण पुढे गंमत अशी झाली की, माझ्या त्या डायरीवर डोळा ठेवणाऱ्या आमच्या सौ.ने, आपल्या एकुलत्या एका बंधुराजाचे निमित्त काढून, ऐन संक्रांतीदिवशीच, माझ्या हस्ते त्याला 'ती' डायरी आणि त्याच्या हस्ते मला 'तिळगूळ' दिले ! गोड बोलण्यावाचून मला गत्यंतर नव्हते. (मनातून मी काय केले असेल , हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असणारच ! कारण चोराची पावले चोरालाच ठाऊक ना !) आपलीच डायरी, आपलीच सौ. आणि आपलाच (-दुष्ट आणि नीच) मेहुणा ! सांगणार तरी  कुणाला हो मग ? पण खर सांगू का- बोनस आणि ओव्हरटाईम बंद झाल्यावर देखील वाईट वाटले नाही, इतकं वाईट ती डायरी हातची गेल्यान वाटल ! याला कारण 'डायरी'चे महत्व !

        'डायरी जवळ बाळगण' ह्याइतकी दुसरी अभिमानाची गोष्टच नाही ! नव्या वर्षातील नव्याचे नऊ दिवसच दिसणारी आणि नंतर धूळ खात पडणारी अशी डायरी ! चिमूटभर, मूठभर आणि हातभर लांबरुंद आकार धरण करणारी अशी डायरी ! लेखक-कवींच्या मूळ कल्पना जवळ उतरून घेणारी ती डायरी ! चिठ्ठ्याचपाट्यांचा आधार ठरणारी ती डायरी ! साहेब लोकांना इम्प्रेशन मारण्यासाठी समोर ठेवावी वाटणारी ती डायरी ! खून किंवा आत्महत्या झालेल्या माणसाच्या खिशात हमखास सापडणारी डायरी ! किती अनन्यसाधारण महत्व आहे ना डायरीला !

        'येणी' न चुकता नोंदलेली, पण 'देणी' सोयीस्कररीत्या जिच्यात लिहायची राहून गेलेली असते, अशी ती डायरी ! दुर्विचारानी बरबटलेली मने, जिच्यामधे मोत्याच्या अक्षरात 'सुविचार' लिहू पाहतात- ती डायरी ! प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोचे लिखाण (लग्नाआधीचेच) जिच्यातून दाखवावे वाटते ती डायरी ! रम्य कल्पना, उदात्त उपमा, भव्य विचार जिच्यात उतरवलेल्या आढळतात अशी ती डायरी ! किती किती म्हणून कौतुक करू त्या डायरीचे ? जन्मदिवसाची नोंद, तसेच पुण्यतिथीची नोंद, भेटीगाठीच्या तारखा-वेळा, प्रवासातल्या गमती-जमती वगैरेची खिचडी डायरीतच आढळते ! कुणाला वाण्याकडच्या मालाच्या जमाखर्चाची नोंद घ्यावी वाटते, तर कुणाला दूधवाल्याच्या अदपाव, पावशेर (चुकलो हं- एक चतुर्थांशच्या एक द्वितीयांश लिटर, पाव लिटर!) जादा दुधाची नोंद घ्यावी वाटते. कुण्या प्रियकराला प्रेयसीचे नाव गिरवत रहावे वाटते, तर कुणाला उखाणे लिहावेसे वाटतील ! अशा 'मल्टीपर्पज' डायरीचे कुणाला कौतुक वाटणार नाही ?

        पगाराचे भरणारे दिवस, गिरणी कामगारांना पहावे लागतात. तर (न केलेल्या देखील) प्रवासाच्या भत्त्याचे हिशेब 'टूर'वर असणाऱ्याना ठेवावे लागतात. ह्या गरीब आणि श्रीमंत वर्गांना डायरीच आपलेसे करते. हृदयातील गुपित आणि मासिक वेतनाचे गुपित (म्हणजे पगाराच्या नोटा हो !)या दोघानाही डायरी जवळीकेनेच स्थान देते .

        जात-धर्म, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असले भेदभाव डायरी कधीच पाळत नाही ! मित्रांच्या पत्त्यांपासून ते वरपित्यांच्या पत्त्यापर्यंत सर्वांना सारखेच स्थान तिच्याजवळ असते !
        कमीतकमी जागेत जास्तीत जास्तजणांना सामावून घेणारी डायरी म्हणूनच मला आवडते. आणि मलाच काय, पण कुणालाही त्यातल्या त्यात 'चकटफू' मिळालेली  डायरी बाळगणे अभिमानास्पदच वाटेल !
.

माणूस

       
        "माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे" - असे नेहमी म्हटले जाते. 'माणूस' हा असा कोणता प्राणी आहे की, ज्यामुळे त्याला महत्व द्यावे ? माणसाला 'जनावर' म्हटले तर बिघडले कुठे ? जनावर पोटासाठी धडपडते. माणसाचीही हालचाल, धडपड पोटासाठीच ना ? तरीही माणूसच श्रेष्ठ का ? स्वर्गात इंद्र, ग्रहात सूर्य, पाताळात शेष, तसा भूलोकात 'मानव' श्रेष्ठ ठरतो. त्याला एकमेव कारण म्हणजे देवाकडून किंवा निसर्गाकडून त्याला मिळालेली सर्वोत्कृष्ट देणगी - 'बुद्धी' !

        या एकाच देणगीमुळे मानवाचे वेगळेपण आहे. डोके आहे म्हणून बुद्धी आहे ! (नियमाला अपवाद म्हणून कांदे-बटाटे भरलेले आढळणारच !) पुढे इंजिन म्हटल्यावर मागे डबे, प्रवासी, माल सारे काही आले. तद्वतच बुद्धी म्हणजे नम्रता, तत्परता, ज्ञान हे गुण आलेच ! कुठे कसे बोलावे व कुठे कसे वागावे याचे तारतम्य तो बाळगू शकतो. आजचा मानव सुजाण, सज्ञान व सुशिक्षित आहे ! आपली जबाबदारी ओळखून ती पार पाडण्यास तो समर्थ आहे. तो स्वत: कष्ट करून ईप्सित साध्य करण्याइतपत तो स्वावलंबी आहे. लेखन, मुद्रण (विशेषेकरून भाषण) वगैरे कलात तो पारंगत आहे, हे कशामुळे ? बुद्धीच्या जोरावरच तो सर्व काही करू शकतो ! आजचे युग 'विज्ञान युग' का म्हणतात ? मानवाच्या कर्तबगारीमुळेच ! निर्जीव पाषाण युगातून त्याने चैतन्यमय औद्योगिक युगापर्यंत प्रगती करत आणली आहे !

        रस्त्यावरून जाण्यास मोटारी काय, हवाई उड्डाणास विमाने काय आणि सागर सफरीसाठी बोटी काय ? सारे चमत्कारच ! घरात बसून आजचा माणूस दूरवरच्या बातम्या श्रवण करतो. दूरचित्रवाणीवर 'दृष्टीआडची सृष्टी' पाहू शकतो. अगदी विचार न करता येण्यासारख्या , कल्पनेतही साकार न होणाऱ्या गोष्टींना माणसाने मूर्त स्वरूप दिले आहे .

        वानरजन्मातून मानवजन्म झाला म्हणतात. आता मानवजन्मातून यंत्रमानवाची निर्मिती झालेली आहे ! भूगर्भातील खाणीपासून ते चंद्रावरील मातीपर्यंत त्याच्या बुद्धीची प्रचंड झेप दिसून आली आहे ! सारी शास्त्रे तो कोळून पीत आहे. त्याची मजल कुठवर जाणार आहे कुणास ठाऊक !

        बी रुजते, फोफावते- कशामुळे ? त्याला मिळणाऱ्या पोषक वातावरणामुळे, जमीन, पाणी, हवा - यामुळे ! तसेच मानवाच्या बुद्धीचे आहे. आजूबाजूच्या कालमाना परिस्थितीनुरूप त्याच्या बुद्धीला चालना, प्रेरणा मिळत असते. प्रयत्नाचे खत,अनुभवाचे पाणी व स्मरणशक्तीची हवा यांमुळे त्याचा बुद्धीवृक्ष फोफावत असतो.

        केवळ बुद्धीमुळे माणूस श्रेष्ठ आहे काय ? सकलगुणसंपन्न मानवाला महत्व आहे- ते त्याच्याजवळील अंत:करणामुळे, त्यातील भावनांमुळे ! त्याच्या सुख, दु:ख, काम, क्रोध, लोभ वगैरे भावलहरीमुळे ! हे सारे असून एकतेत भिन्नता आपल्याला आढळते. जगातील माणसे एकसारखीच दिसत नाहीत. 'जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती !' एकच माणूस स्वत:कडे पाहतो- पण आरशातून त्याला दिसते ते डाव्याचे उजवे भाग झालेले ! एक दुसऱ्यासारखा नसतो. श्रीमंत-गरीब , उदार-चिक्कू हे सारे वर्ग बुद्धीच्या कमी-अधिक उपयोगानुसार पडतात ! पैशाने दरिद्री असणारा अंत:करणाने श्रीमंत आढळतो. काहीजण सुखात असतात. काहीजण दु:खातही सुख मानणारे निघतात. पैशांच्या मार्गावरून बुद्धीच्या साधनाने माणुसकीचे साध्य साधणारे विरळच !

        माणसाची प्रगती अधोगती त्याच्या गुणावगुणामुळेच होत असते. एक कर्तव्यदक्ष, दुसरा कर्तव्यच्युत ! एकाची वृत्ती अत्त्युत्साही , दुसरा आळशी ! पहिला सुष्ट, दुसरा दुष्ट ! साधे सरळ उदारमतवादी थोडेच !  Simple living and high thinking असणारे दुर्मिळच !

        माणसाच्या बुद्धीचे वैशिष्ट्य म्हणजे ती जातीधर्म वगैरे मानत नाही ! पाण्याशिवाय विहीर म्हणजे भावनारहित बुद्धी ! पण आज असे म्हटले जाते की, आजचा मानव प्रेम, माया, ममता ह्यापासून दूर चालला आहे ! हा बुद्धीचा ऱ्हास म्हणायचा ? भावनेशी प्रतारणा समजावी काय ? पूर्वी मत, पिता, गुरु, वडीलजन यांचा यथोचित आदर होई. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानली जाई. पित्याच्या आज्ञेखातर मातेचे मुंडके परशुरामाने उडवले खरे, पण तपश्चर्या सामर्थ्याने माता जिवंत होऊ शकली ! आजचा तरुण बाई बाटलीच्या नादात माता-पित्यावर शस्त्र उगारणारा आहे ! आजचा मानव आईची आज्ञा तंतोतंत पाळतो- पण ती आज्ञा असते - स्वत:च्या मुलांच्या आईची !

        आजच्या माणसाची बुद्धी स्वतंत्र आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्याशी ती समन्वय साधू पाहते ! आज मानवाला काम-धंदा-व्यवसायानिमित्त घरदार सोडावे लागते. शिक्षणात, कामधंद्यात एकाग्रचित्त झाल्यावर इतरांचा (सोईस्कर ) विसर पडतो, 'बिचाऱ्या'ला समाजाचे बोलणे खावे लागते ! वास्तविक मायापाश तोडण्याची, इतरांपासून दुरावण्याची त्याची इच्छा का असते ? आपापल्या कार्यात प्रवीण होऊन भवितव्य उज्वल करण्याचा प्रयत्न मानवाने केल्यास त्या वावगे काय ?

        प्रत्येक माणूस आपपल्या क्षेत्रात प्रगतीशील असतो. प्रयत्न व चिकाटी हे त्याचे साथीदार आहेत. छत्रपती शिवाजी, उदारमतवादी अकबर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक ही नावे त्यांच्या उपाधीमुळे चटकन ध्यानात येतात ! अहिंसावादी गांधीजी, लहानमुलांचे चाचा नेहरू, बालकवी ठोंबरे, स्वरसाम्राज्ञी लता- ही स्वकर्तृत्वाने तळपणारी नावे आहेत.

        हायड्रोजन व ऑक्सिजन एकत्र आले की पाणी तयार होते. तद्वत डोके व बुद्धी योग्य प्रमाणात 'माणूस' तयार करण्यास कारणीभूत होतात. एक गाय, देव अनेक- त्याचप्रमाणे एक माणूस पण त्याची रूपे अनेक आहेत, विविध आहेत !
.               

चोर

           माझ्या लहानपणापासून मला "चोर" ह्या प्राण्याविषयी आदर, कुतूहल, आश्चर्य वगैरे वगैरे आहे. कारणे बरीच आहेत. सर्वाना पटण्यासारखीच आहेत. हायस्कूलमधे असताना 'चोरांचे संमेलन' हा धडाही नजरेखाली घातला. त्यामुळे चोरांची चारित्र्यविषयक माहिती खूप मिळाली. त्यांची कार्यपद्धति, जीवनविषयक दृष्टीकोन मला फारच आवडतात. त्यांची थोरवी, महती वर्णावी तितकी थोडीच !

        चोर ही जात प्रामाणिक आहे. एखाद्या घरात तो शिरला म्हणजे थोडक्या वेळात हाताला येतील तेवढ्याच वस्तू तो लंपास करतो. नसत्या गोष्टीसाठी तो अडून बसणार नाही. तो योग्य हत्यारेच बरोबर नेतो. आपल्या कार्यामुळे इतरांना त्रास, गोंधळ जाणवू नये, याची तो पुरेपूर दक्षता घेतो. एक वेळ एखाद्याच्या घराचे नुकसान झालेले त्याला आवडते, पण आपल्यासाठी घरात निष्कारण गोंगाट झालेला त्याला खपत नाही. मग त्याला हाताशी शस्त्र धरावे वाटते. एरव्ही तो सरकारी धोरणाचा पुरस्कर्ता म्हणजे शांततावादी आहे.


        एखादा मंत्री, पुढारी येणार असल्यास त्याच्या स्वागतासाठी सारी जनता चडफडत का होईना पण धावून येते. तोरणा-पताकांचा अवाढव्य खर्च केला जातो. कारण त्याशिवाय मंत्र्याचे समाधान होऊ शकत नाही ना ! पण जगात "चोर" ही एकच व्यक्ती आहे, जिला हा अवाढव्य खर्च आवडत नाही. सरकारने बँका, तिजोऱ्या वगैरे कशासाठी निर्माण केल्या आहेत ? जनतेने पैसे साठवून ठेवण्यासाठीच ना ! पण जनता अडाणी आहे. ती पैसा साठवतच नाही. त्यामुळे नुकसान किती होते पहा. तोरणा-पताकात निष्कारण पैसा खर्च होतो. जनतेचा पैसा वाया जातो. तो कुणाच्याच पदरात पडत नाही. हाच पैसा अडका गाठोडे, गाडगी, मडकी, तिजोऱ्या, बँकात ठेवला तर किती फायदा होईल जनतेचा ? जनतेला घरबसल्या व्याज मिळू शकेल व वेळप्रसंगी हाच पैसा वाया न जाता एखाद्या चोराच्या जीवनचरितार्थाचे साधन तरी होऊ शकेल की !

                 चोरांचे कार्य हे सत्कार्य आहे. चोरी करण्यात त्यांच्या मनात चुकूनही कधी वाईट विचार नसतो. वकील वकिली करून पैसा कमावतो. सुतार सुतारकी करून जगतो. मग चोराने चोरी करूनच जीवन कंठले तर त्याच्या नावाने कशाला बोंब मारावी हो ? चोर लोक गरीब जनतेची पिळवणूक कधीच करणार नाहीत. तसे करावयास ते 'सरकार' आहेत थोडेच ! श्रीमंताविषयी त्यांच्या मनात तिटकारा असतो. चोर श्रीमंत लोकांची संपत्ती लुटून त्यांना गरीब बनवतात. समाजात समतोलपणा राखण्यास ते सहकार्य देतात. लोकांना खायला प्यायला पुरेसे मिळत नाही, हे चोराला माहित आहे. म्हणूनच ते खाद्य पेयाना शक्यतो हात लावत नाहीत, ते फक्त संपत्ती लुटतात. कारण त्यांना माहित आहे की, 'पैसा हे विष आहे !' हे विष जनतेने आपल्याजवळ बाळगलेले चोराला कसे आवडेल ? यात चोरांच्या अंगचा दूरदर्शीपणाचा गुण आढळतो.

               'यह गाडी भारतीय जनताकी संपत्ती' असताना तिचा उपभोग करून घेणे  जनतेतील चोरांचे कर्तव्य आहे. नाहीतर आपलेपणा तो काय राहिला ? गाडीतील पंखे बल्ब गाडीत राहू देणे योग्य नाही. कारण त्या मौल्यवान वस्तू आहेत. म्हणून चोरलोक त्या गाडीत राहू देत नाहीत ! शिवाय लहान मुलांना पंख्यात बोट घालण्याची सवय असते. बल्ब फुटल्यावर काचा सर्वत्र पसरतात, त्या अपायकारकच ! पुन्हा चोरांच्या दूरदर्शीपणाचे कौतुक करावेसे वाटते !

           संपत्ती ही समाजाला लागलेली कीड आहे. तिच्यामुळे समाजात भांडण तंटे खून मारामाऱ्या होतात. ही कीड नाहीशी करण्याचा प्रयत्न चोर करतात. मोठमोठे श्रीमंत लोक, अधिकारी वर्ग सरकारला फसवू पाहतात. कारण ते इन्कमट्याक्स चुकवतात. चोरच  त्यांना शासन करू शकतात. अशाप्रकारे चोरांची 'चोरी' हे सामाजिक राजकीय कार्य आहे. त्यांच्यात व 'फुडाऱ्या'त  फरक काय ? फक्त कार्यपद्धतीच्या तंत्रात !

            चोरी करणे हे पाप नाही, कारण एवढे थोर भगवान श्रीकृष्ण ! परंतु त्यांनी आपल्या आयुष्यात चोरीचा धंदा केलेला आहेच की ! मग म्हणाल तुम्ही की, चोरी हे पाप आहे म्हणून ! श्रीकृष्णच जर पाप करू लागले तर मग चोरांनी काय करायचे हो ? लोण्याची, दह्याची, ताकाची चोरी ही नुसती गंमत आहे. अशी गम्मत करणे फक्त श्रीकृष्णच करू जाणोत ! कृष्णलीला व चौर्यलीला दोन्हीही गंमतीदारच !

        अर्जुनाने मत्स्यवेध करताना जे कौशल्य दाखवले ते कौशल्य चोरापाशी असते. एखादे घर लुटायचे म्हणजे त्या घरातील माणसे केव्हा काय करतात, केव्हा फिरायला जातात, कोणत्या वेळेस झोपतात- या सर्व गोष्टींची सम्यक् माहिती चोराला काढायची असतेच. ही झाली प्राथमिक माहिती ! प्रत्यक्ष चोरी करतेवेळी तर कितीक गोष्टींकडे चोराला लक्ष द्यावे लागते !  त्याला अंधारात मांजराचे डोळे घेऊन वावरावे लागते . शब्दवेध करणाऱ्या पृथ्वीराज चौहानाप्रमाणे कान सारखे टवकारावे लागतात. तर सराईत खाटीक ज्याप्रमाणे हात चालवतो, त्याप्रमाणे त्याला आपले हात सुटकेसच्या कुलुपांवर चालवावे लागतात. ठराविक वेळात त्याला ठरलेले काम पार पाडावेच लागते. त्याला रेल्वेच्या गाड्याप्रमाणे असून भागत नाही. नाही तर मग चोरीसाठी जे 'स्थळ' त्याने 'पसंत' केलेले असते, तेथेच त्याला 'चतुर्भुज' होण्याची पाळी  येते ! 

                 चोरी कुठे, केव्हा, कशी करावी याचे तंत्र आहे. चोरी करणे येरागबाळ्याचे काम नाही. चोरी ही जातीच्याच चोराला शोभून दिसते. कुणीतरी 'चोरी' या विषयासंबंधी म्हटलेच आहे- "केल्याने होत आहे रे, आधी केलीचि पाहिजे !" ज्या गोष्टीची चोरी केली जाते, त्यावरून चोरांचे प्रकार आढळतात. काही वर्षांपूर्वी केवळ सुंदर स्त्रियांची चुंबने चोरून घेण्यासाठी एक 'चुंबनचोर' अगदी जगप्रसिद्ध झाला होता, हे सर्वश्रुत आहेच ! काही भुरटे चोर असतात, काही मुर्गीचोर, तर काही पाकीटचोर ! ठराविक चोर ठराविक धंद्यातले 'पेशालिष्ट' असतात !उदाहरणार्थ, नेहमी घरफोडी करणाऱ्या चोराला खिसे कापण्यास जमणार नाहीत किंवा मुर्गी पळवण्यात पटाईत असलेल्या चोराला घर फोडणे जमेलच असे नाही ! दरोडेखोर ही चोरांची सुधारून वाढलेली आवृत्ती आहे. अनेक चोरांनी मिळून केलेली मोठ्ठी चोरी म्हणजे दरोडा ! चोरांची बरीच माहिती मला असली तरी, चोराला प्रत्यक्ष पाहण्यास मात्र मला कधीच संधी मिळाली नाही, हे माझे दुर्दैव !

        लहानपणी मी एकदा मित्राच्या घरी गेलो होतो. तेव्हा मित्र नुकताच कुठेतरी बाहेर गेला होता. त्याच्या घरात विशेष माणसे नव्हतीच. मित्र घरात नसल्याने मी परत निघालो. परंतु तेवढ्यात एका खोलीतून हसण्याचा आवाज आला व पाठोपाठ एक वाक्य कानावर अस्पष्टपणे - "अरे चोरा, आता तरी सापडलास की नाही ?" मी उत्सुकतेने 'चोरा'स पाहण्याच्या हेतूने खोलीच्या दरवाजाच्या फटीतून चोरून (!) पाहिले ! - खोलीत मित्राची कॉलेजात जाणारी थोरली बहीण व दुसरा एक तरुण पलंगावर हातात हात घेऊन बसले होते ! त्यावेळी मला समजले नाही की, मित्राची बहीण त्या तरुणाला 'चोर' का म्हणाली ते ! परंतु मोठा झाल्यावर मला समजले की, चोरांच्या अनेक प्रकारांपैकी 'हृदयचोर' ह्या प्रकारात मोडणारा तो तरुण होता !

             चोराला कुठलीच जागा वर्ज्य नाही. तिन्ही लोकात त्याचा संचार असतो. तो आशावादी असतो. भेट दिलेल्या ठिकाणापासून तो रिक्त हस्ताने कधी परत येत नाही. जगण्यासाठी त्याची सदोदित धडपड चालूच असते. जगण्यासाठीच  तो तुरुंगात  जातो व जगण्यासाठीच तो तुरुंगाबाहेर पडण्याची खटपट चालू ठेवतो. कुठे काय मिळते, याबद्दल त्याचे अहोरात्र संशोधन चालते. शिक्षा व (चोरीचे-) शिक्षण हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय !

             चोर हा खरा रसिक असतो. उजेड जसा त्याला आवडतो, तसा अंधारही त्याला प्रिय वाटतो. त्याच्या मनात कधी काळोख नसतो. म्हणतात ना- "चोराच्या मनात ...!"   त्याला 'निशाचर' 'रजनीचर' वगैरे नावेही आहेत. चोरास फार पुरातनकालापासून अनन्यसाधारण महत्व आहे. लोणी चोरणाऱ्या बालकृष्णापासून ते हल्लीच्या इंग्रजी वाड.मयाची चोरी करणाऱ्या लेखकूपर्यंत 'चोर' जातीचा वंशविस्तार झालेला आपल्याला आढळतो. थंडीच्या रक्षणार्थ लोकर, उन्हाच्या रक्षणार्थ गॉगल, तसे खास चोरांच्या रक्षणार्थ सरकारने पोलीसखाते निर्माण केलेले आहे !        

            पूर्वीच्याकाळी चोराला फार महत्व दिले जात होते. हे आपल्याला एका उदाहरणावरून स्पष्ट होईल-
     पूर्वी चोर व संन्यासी या दोघांचाही सुळसुळाट झाला होता. तरीही एखादी चोरी मारामारी झाल्यास त्याबद्दल संन्याशास पकडले जात असे व त्यालाच चोरी केल्याच्या अपराधावरून फाशी दिले जात असे व चोराला जीवदान दिले जाई ! तेव्हापासून 'चोराला सोडून संन्याशाला फाशी द्यावे'-अशी म्हण प्रचारात आली, ती खास चोरांच्या सन्मानार्थ ! नाहीतरी संन्यासी वृत्तीच्या लोकांचा जगात उपयोग नाही, हे आजच्या काळातही आपल्याला पटते, नाही का ! चोरांचे महत्व अवर्णनीय आहे, म्हणूनच एखादा चोर सापडला तर, त्याला तुरुंगात स्मरणपूर्वक जतन करून येत असते !

             चोरांची माहिती प्रत्येकाला लहानपणापासूनच असणे आवश्यक आहे. पहिल्या यत्तेच्या पुस्तकातील "मी कोण ?" धड्यात मला पुढील ओळी असणे आवश्यक वाटते-
" कुलूप तोडतो, दार फोडतो,
घर सगळे धुवून टाकतो -
तर मी कोण ? "
.
         

तीन तीनोळी


१)  मुहूर्त 

राजकारणी नेत्यांच्या मते ,

  "एक एप्रिल"चा मुहूर्त -
साडेचार मुहूर्तांपैकी उत्तम मुहूर्त !

.



२) पारखी

शंभरजणात नव्व्याण्णव 'गुणी'
शोधत नाही कधीच कुणी . .
'दोषी' शोधायला मात्र प्रत्येकजण आतुर !
.



३)  अनोखी भेट

पन्नास वर्षे सुखाचा संसार झाल्यावर ,
तिने त्याला वाढदिवसाची भेट म्हणून . .

 "श्रवणयंत्र " दिले घेऊन !
.