सव्वासहाला बँकेची वेळ संपली आणि मी (जातिवंत कारकुनाप्रमाणे -) हातातल्या पिशवीला झोके देत कस्तुरबा मार्केटकडे निघालो. वर्षाखेरीचे काम संपल्याने डोक्यावरचे ओझे नष्ट झाले होते. नवीन वर्षातील सुट्ट्यांचा हिशेब मनात चालला होता. तेवढ्यात -
"बर झाले साहेब तुम्ही एकटेच इथे भेटलात !"
- असे म्हणून, बँकेतल्या ओळखीच्या एका कस्टमरने माझ्या हातात एक पाकीट दिले आणि ते 'कशाला कशाला' (अस नेहमी म्हणण्याचा रिवाज असल्याने-) करत मी (इकडे तिकडे पहात-) खिशात ठेवलं ! भाजी खरेदी करून 'निर्मल भुवन'मधे एक पेशल पिऊन (अर्थात चहाच !) मी घरचा रस्ता धरला.
घरी येताच भाजीच्या पिशव्या सौ.च्या अंगावर भिरकावल्या (शिपाई साहेबाच्या अंगावर लेजर्स टाकतात तश्शा -) आणि मोठ्या उत्सुकतेने मी 'ते' पाकीट काढलं . पाहतो तो काय- ती एक "डायरी" होती ! 'डायरिया'तून मुक्त झाल्यासारखा आनंद मला झाला. किंवा 'सीडीएस'ची 'एक शतांश' रक्कम स्वप्नात मिळाल्याचा भास झाला. तेवढा आनंद झाला म्हटल तरी त्यात अतिशयोक्ति ठरणार नाही !
लग्नाच्या बायकोपेक्षा 'ठेवायला' सोपी, चारचौघात बिनदिक्कतपणे जवळ बाळगायला सोपी, सर्वांसमोर छातीशी कवटाळायला सोपी- अशी चक्क एक 'डायरी' मला नवीन वर्षाची भेट म्हणून मिळाली होती !
लहानपणापासूनच मला 'डायरी'च फार अप्रूप वाटायचं ! मला कळायला लागल्यापासूनच मी जवळ डायरी 'ठेवायची' ठरवल होत. (पुढे कारकून डायरीशिवाय काहीच 'ठेवू' शकत नाही, हेही समजत गेलंच म्हणा !) पण डायरी ही वस्तू 'विकत' घ्यायची नसते- अशीही माझी एक कल्पना डोक्यात घर करून बसली होती. ती कल्पना शेवटपर्यंत मी अमलात आणली हे विशेषच ! तर सांगायचं तात्पर्य हे की मला एक डायरी (चक्क फुकट!- जळणारे जळोत बिचारे फुकटच !) मिळाली होती. नवीन वर्ष नक्कीच सुखाचे जाणार होते !
आपलं नाव, गाव, पत्ता, पॉलिसीचा नंबर, (आपल्या नसलेल्या-) फोनचा नंबर, वजन, उंची, जाडी आणि इतर असंख्य गोष्टी म्हणजे- कार्ड, पाकिटाची किंमत, दशमान पद्धतीचे कोष्टक, (जिथे आपण जन्मात कधी जाणार नाही त्या-) मुंबईचे पोस्टल विभाग क्रमांक, तारखा, महिने हे- जीमधे असतात, अशी ती डायरी आता माझ्याजवळ होती ! मनसुबे रचण्यात आपल्याइतका पटाईत कुणी नाही ! पण पुढे गंमत अशी झाली की, माझ्या त्या डायरीवर डोळा ठेवणाऱ्या आमच्या सौ.ने, आपल्या एकुलत्या एका बंधुराजाचे निमित्त काढून, ऐन संक्रांतीदिवशीच, माझ्या हस्ते त्याला 'ती' डायरी आणि त्याच्या हस्ते मला 'तिळगूळ' दिले ! गोड बोलण्यावाचून मला गत्यंतर नव्हते. (मनातून मी काय केले असेल , हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असणारच ! कारण चोराची पावले चोरालाच ठाऊक ना !) आपलीच डायरी, आपलीच सौ. आणि आपलाच (-दुष्ट आणि नीच) मेहुणा ! सांगणार तरी कुणाला हो मग ? पण खर सांगू का- बोनस आणि ओव्हरटाईम बंद झाल्यावर देखील वाईट वाटले नाही, इतकं वाईट ती डायरी हातची गेल्यान वाटल ! याला कारण 'डायरी'चे महत्व !
'डायरी जवळ बाळगण' ह्याइतकी दुसरी अभिमानाची गोष्टच नाही ! नव्या वर्षातील नव्याचे नऊ दिवसच दिसणारी आणि नंतर धूळ खात पडणारी अशी डायरी ! चिमूटभर, मूठभर आणि हातभर लांबरुंद आकार धरण करणारी अशी डायरी ! लेखक-कवींच्या मूळ कल्पना जवळ उतरून घेणारी ती डायरी ! चिठ्ठ्याचपाट्यांचा आधार ठरणारी ती डायरी ! साहेब लोकांना इम्प्रेशन मारण्यासाठी समोर ठेवावी वाटणारी ती डायरी ! खून किंवा आत्महत्या झालेल्या माणसाच्या खिशात हमखास सापडणारी डायरी ! किती अनन्यसाधारण महत्व आहे ना डायरीला !
'येणी' न चुकता नोंदलेली, पण 'देणी' सोयीस्कररीत्या जिच्यात लिहायची राहून गेलेली असते, अशी ती डायरी ! दुर्विचारानी बरबटलेली मने, जिच्यामधे मोत्याच्या अक्षरात 'सुविचार' लिहू पाहतात- ती डायरी ! प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोचे लिखाण (लग्नाआधीचेच) जिच्यातून दाखवावे वाटते ती डायरी ! रम्य कल्पना, उदात्त उपमा, भव्य विचार जिच्यात उतरवलेल्या आढळतात अशी ती डायरी ! किती किती म्हणून कौतुक करू त्या डायरीचे ? जन्मदिवसाची नोंद, तसेच पुण्यतिथीची नोंद, भेटीगाठीच्या तारखा-वेळा, प्रवासातल्या गमती-जमती वगैरेची खिचडी डायरीतच आढळते ! कुणाला वाण्याकडच्या मालाच्या जमाखर्चाची नोंद घ्यावी वाटते, तर कुणाला दूधवाल्याच्या अदपाव, पावशेर (चुकलो हं- एक चतुर्थांशच्या एक द्वितीयांश लिटर, पाव लिटर!) जादा दुधाची नोंद घ्यावी वाटते. कुण्या प्रियकराला प्रेयसीचे नाव गिरवत रहावे वाटते, तर कुणाला उखाणे लिहावेसे वाटतील ! अशा 'मल्टीपर्पज' डायरीचे कुणाला कौतुक वाटणार नाही ?
पगाराचे भरणारे दिवस, गिरणी कामगारांना पहावे लागतात. तर (न केलेल्या देखील) प्रवासाच्या भत्त्याचे हिशेब 'टूर'वर असणाऱ्याना ठेवावे लागतात. ह्या गरीब आणि श्रीमंत वर्गांना डायरीच आपलेसे करते. हृदयातील गुपित आणि मासिक वेतनाचे गुपित (म्हणजे पगाराच्या नोटा हो !)या दोघानाही डायरी जवळीकेनेच स्थान देते .
जात-धर्म, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असले भेदभाव डायरी कधीच पाळत नाही ! मित्रांच्या पत्त्यांपासून ते वरपित्यांच्या पत्त्यापर्यंत सर्वांना सारखेच स्थान तिच्याजवळ असते !
कमीतकमी जागेत जास्तीत जास्तजणांना सामावून घेणारी डायरी म्हणूनच मला आवडते. आणि मलाच काय, पण कुणालाही त्यातल्या त्यात 'चकटफू' मिळालेली डायरी बाळगणे अभिमानास्पदच वाटेल !
.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा