मनाची मना साद घालून झाली -- [गझल]

वृत्त- भुजंगप्रयात 
लगावली- लगागा लगागा लगागा लगागा 
मात्रा - २० 
- - - - - - - - - - - - - -- - - - - - - - - - 
मनाची मना साद घालून झाली
सुरूवात पण छान लाजून झाली ..

जगावेगळे प्रेम केलेच आपण 
कथा पूर्ण नयनात वाचून झाली ..

धरू दे मला हात हातात आता 
खुशाली पुरेशी विचारून झाली ..

नको ना पुन्हा तोच एकांत आता
मिठी गच्च गुपचूप मारून झाली ..

करूया जरा प्रेम उघड्यावरीही 
तयारी कधीची मनातून झाली .. !
.

तेव्हा-- आता---

तेव्हा -

पूर्वीचे लहान 
खाली माना घालून 
वडीलधाऱ्यासमोर 
पुस्तकामधे 
तोंड खुपसायचे ..

आता -

आताचे लहान 
खाली माना घालून 
वडीलधाऱ्यासमवेत 
मोबाईलमधे 
तोंड खुपसतात !

.

जीवन

महागाई भाववाढ 
चर्चा आमच्या
नशिबातली 
 टळत नाही..

पिज्झा-बर्गर-

पावभाजीशिवाय
घशाखाली
गिळत नाही..

एका रात्रीत

रंकाचा राव
राजकारणी
 कळत नाही..

जगण्याचे छळणे

चालूच असते
स्वस्तात मरण
मिळत नाही .. !
.

आत्ममग्न-

स्वतःच्या नखांकडे 
पाहत पाहत-
वेळ घालवलास
नेलपॉलिशने
ती रंगवण्यात ..

स्वत:च्या ओठांकडे 
बघत बघत- 
वेळ घालवलास 
लिपस्टिक लावत 
ती रंगवण्यात ..

स्वत:च्या हाताकडे 
कटाक्ष टाकत- 
वेळ घालवलास
मेंदीच्या नक्षीने 
ती रंगवण्यात ..

स्वत:च्या तनाकडे 
नजर ठेवत- 
वेळ घालवलास 
मेकअपने सजवत 
स्वत:शीच रमण्यात ..

आपल्या संसाराकडे
रमत गमत- 
पाहिले असतेस तर 
घटस्फोटाची वेळ
आली नसती ही 
दोघांच्या आयुष्यात .. !
.

पसारा विधात्या किती तू करावा - - [गझल]

वृत्त- भुजंगप्रयात 
लगावली- लगागा लगागा लगागा लगागा 
मात्रा- २० 
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -- - - 
पसारा विधात्या किती तू करावा  
कुणा मेळ तो का कुणाचा नसावा ..
.
इथे बाहुपाशात मी चंद्र असता 
कशाला नभीचा उगा तो बघावा ..
.
कशी जीवनाची ग नौका निघाली 
न वल्हेहि हाती न दिसतो विसावा ..
.
कुणा दु:ख माझे कधी ना दिसावे      
कधी मुखवटाही असा मज मिळावा ..
.
नभाला मिठी ती न मारू शके पण  
किती हट्ट वेडा धरेने धरावा .. 
.
कधी ती मिठीची कळावी ग गोडी   
तिथे तू इथे मी किती तो दुरावा ..
.

ह्याला जीवन ऐसे नाव -

एखादा चिमटा
एखादी टपली
एखादी कुरकुर
एखादी कुरबुर
एखादी गुदगुली
एखादी कोपरखळी
एखादा टोमणा
एखादी स्तुती
एखादी निंदा
एखादा द्वेष
एखादी आठी
एखादी मिठी
एखादे भांडण
एखादे चुंबन
एखादी तडजोड
एखादे आलिंगन
एखादी गुंतागुंत
एखादा धोबीपछाड
एखादी टांग
एखादी घडामोड
एखादी काडीमोड
एखादी कट्टी
एखादी गट्टी
एखादी सबब
एखादे सत्य
एखादी थाप
एखादी चहाडी
एखादी चुगली
एखादे कौतुक
एखादी कोलांटी
एखादा लपंडाव
एखादी शिवी
एखादी ओवी
एखादा धपाटा
एखादी शाबासकी
एखादी थप्पड -
.......... बाकी जीवनात
देण्या/घेण्या/करण्यासारखे
उरतेच काय !
.

बाण डोळ्यातून आला - - [गझल]

वृत्त- देवप्रिया 
लगावली-  गालगागा गालगागा गालगागा गालगा 
मात्रा- २६ 
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
बाण डोळ्यातून आला थेट या छातीवरी  
घाव मोठा आत झाला ये कराया खातरी ..
.
जाणली मी आज गोडी आपल्या स्पर्शातली 
फक्त होते टेकले मी ओठ ह्या ओठांवरी  ..
.
मी तुझ्या केसांवरी हा मस्त गजरा माळला  
चांदणे तुझिया मनी, का आग माझ्या अंतरी ..
.
भेटली होतीस तूही ना तुला न्याहाळले 
शोधतो मी चांदणीला आज का वेड्यापरी ..
.
आज आहे पौर्णिमा का पाहता वाटे तुला    
या जगाची अवस आहे आज काळोखी जरी .. 
.